मागां जालें निरूपण । साहवें भक्तीचें लक्षण ।
आतां ऐका सावधान । सातवी भक्ती ॥१॥
मागे सहाव्या भक्तीचे लक्षण सांगितले; आता सावध चित्ताने सातवी 'दास्यभक्ती' ऐका.
सातवें भजन तें दास्य जाणावें । पडिलें कार्य तितुकें करावें ।
सदा सन्निधचि असावें । देवद्वारीं ॥२॥
सातवी भक्ती म्हणजे दास्यत्व होय; देवाचे पडेल ते काम स्वतः करावे आणि नेहमी देवाच्या दारात सेवकासारखे हजर राहावे.
देवाचें वैभव संभाळावें । न्यूनपूर्ण पडोंचि नेदावें ।
चढतें वाढतें वाढवावें । भजन देवाचें ॥३॥
देवाचे ऐश्वर्य व्यवस्थित सांभाळावे, त्यात काहीही कमी पडू देऊ नये आणि दिवसेंदिवस देवाचा भजन-उत्सव वाढवत न्यावा.
भंगलीं देवाळयें करावीं । मोडलीं सरोवरें बांधावीं ।
सोफे धर्मशाळा चालवावीं । नूतनचि कार्यें ॥४॥
पडकी मंदिरे दुरुस्त करावीत, फुटलेले तलाव बांधावे आणि धर्मशाळा व मंडप यांची नवी कामे सुरू करावीत.
नाना रचना जीर्ण जर्जर । त्यांचे करावे जीर्णोद्धार ।
पडिलें कार्य तें सत्वर । चालवित जावें ॥५॥
जीर्ण झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करावा आणि देवाची जी जी कामे अडून राहिली असतील ती तातडीने पूर्ण करावीत.
गज रथ तुरंग सिंहासनें । चौकिया सिबिका सुखासनें ।
मंचक डोल्हारे विमानें । नूतनचि करावीं ॥६॥
हत्ती, रथ, घोडे, सिंहासने, पालख्या, मखरे आणि विमाने या सर्वांची नित्य नवी व्यवस्था करत राहावे.
मेघडंब्रें छत्रें चामरें । सूर्यापानें निशाणें अपारें ।
नित्य नूतन अत्यादरें । सांभाळित जावीं ॥७॥
मेघडंबरी, छत्रे, चामरे, सूर्यापान आणि निशाणे अत्यंत आदराने व स्वच्छतेने सांभाळावीत.
नाना प्रकारीचीं यानें । बैसावयाचीं उत्तम स्थानें ।
बहुविध सुवर्णासनें । येत्नें करीत जावीं ॥८॥
देवाची विविध वाहने, बसण्याची उत्तम स्थाने आणि सोन्याची सुंदर आसने प्रयत्नाने तयार करावीत.
भुवनें कोठड्या पेट्या मांदुसा । रांझण कोहळीं घागरी बहुवसा ।
संपूर्ण द्रव्यांश ऐसा । अति येत्नें करावा ॥९॥
भांडारे, खोल्या, पेट्या, संदूका, रांजण आणि घागरी अशा सर्वांत देवद्रव्य अतिशय काळजीपूर्वक जतन करावे.
भुयेरीं तळघरें आणी विवरें । नाना स्थळें गुप्त द्वारें ।
अनर्घ्ये वस्तूंचीं भांडारें । येत्नें करीत जावीं ॥१०॥
तळघरे, भुयारे आणि गुप्त खोल्यांतून मौल्यवान व दुर्मिळ वस्तूंची भांडारे सुरक्षित ठेवावीत.
आळंकार भूषणें दिव्यांबरें । नाना रत्नें मनोहरें ।
नाना धातु सुवर्णपात्रें । येत्नें करीत जावीं ॥११॥
दागिने, अलंकार, भरजरी वस्त्रे, मौल्यवान रत्ने आणि सोन्या-चांदीची भांडी प्रयत्नाने व्यवस्थित ठेवावीत.
पुष्पवाटिका नाना वनें । नाना तरुवरांचीं बनें ।
पावतीं करावीं जीवनें । तया वृक्षांसी ॥१२॥
फुलांच्या बागा आणि उपवने फुलवावीत आणि त्या सर्व झाडांना नित्यनेमाने पाणी पोहोचवावे.
नाना पशूंचिया शाळा । नाना पक्षी चित्रशाळा ।
नाना वाद्यें नाट्यशाळा । गुणी गायेक बहुसाल ॥१३॥
जनावरांचे गोठे, विविध पक्षी, वाद्ये, नाटकशाळा आणि गुणी गायक-कलाकारांची मंदिरात उत्तम व्यवस्था करावी.
स्वयंपाकगृहें भोजनशाळा । सामग्रीगृहें धर्मशाळा ।
निद्रिस्तांकारणें पडशाळा । विशाळ स्थळें ॥१४॥
स्वयंपाकघरे, भोजनशाळा, सामान ठेवण्याच्या खोल्या, धर्मशाळा आणि विश्रांतीसाठी मोठ्या पडशाळा उभ्या कराव्यात.
नाना परिमळद्रव्यांचीं स्थळें । नाना खाद्यफळांचीं स्थळें ।
नाना रसांचीं नाना स्थळें । येत्नें करीत जावीं ॥१५॥
सुगंधी द्रव्यांची, उत्तम फळांची आणि विविध पेयांची स्थाने काळजीपूर्वक सांभाळावीत.
नाना वस्तांची नाना स्थानें । भंगलीं करावीं नूतनें ।
देवाचें वैभव वचनें । किती म्हणौनि बोलावें ॥१६॥
तुटलेल्या वस्तूंची दुरुस्ती करून त्या नव्या कराव्यात; देवाचे वैभव किती म्हणून वर्णावे?
सर्वां ठाई अतिसादर । आणी दास्यत्वासहि तत्पर ।
कार्यभागाचा विसर । पडणार नाहीं ॥१७॥
सर्व कामांच्या ठिकाणी अतिशय तत्पर राहावे, सेवा करण्यास सदैव तयार असावे आणि सेवेचा कधीही विसर पडू देऊ नये.
जयंत्या पर्वें मोहोत्साव । असंभाव्य चालवी वैभव ।
जें देखतां स्वर्गींचे देव । तटस्त होती ॥१८॥
जयंत्या आणि सणांचे उत्सव एवढ्या मोठ्या वैभवाने साजरे करावेत की ते पाहून स्वर्गातील देवही थक्क व्हावेत.
ऐसें वैभव चालवावें । आणी नीच दास्यत्वहि करावें ।
पडिले प्रसंगीं सावध असावें । सर्वकाळ ॥१९॥
असा मोठा थाट सांभाळतानाच स्वतः अगदी नम्रपणे झाडलोटीसारखी क्षुद्र सेवाही करावी आणि प्रत्येक प्रसंगी दक्ष राहावे.
जें जें कांहीं पाहिजे । तें तें तत्काळचि देजे ।
अत्यंत आवडीं कीजे । सकळ सेवा ॥२०॥
देवाला ज्या ज्या वेळी जे हवे असेल ते तत्काळ हजर करावे आणि सर्व सेवा अत्यंत प्रेमाने पार पाडावी.
चरणक्षाळळें स्नानें आच्मनें । गंधाक्षतें वसनें भूषणें ।
आसनें जीवनें नाना सुमनें । धूप दीप नैवेद्य ॥२१॥
चरण धुणे, स्नान घालणे, आचमन, चंदन, वस्त्रे, अलंकार, आसन, फुले, धूप, दीप आणि नैवेद्य ही सर्व सेवा तत्परतेने करावी.
शयेनाकारणें उत्तम स्थळें । जळें ठेवावीं सुसीतळें ।
तांबोल गायनें रसाळें । रागरंगें करावीं ॥२२॥
झोपण्यासाठी उत्तम शय्या, पिण्यासाठी थंडगार पाणी, विडा आणि श्रवणासाठी मधुर गायन-वादनाची व्यवस्था करावी.
परिमळद्रव्यें आणी फुलीलीं । नाना सुगंधेल तेलें ।
खाद्य फळें बहुसालें । सन्निधचि असावीं ॥२३॥
सुगंधी द्रव्ये, फुले, अत्तरे आणि नाना प्रकारची फळे नेहमी देवाजवळ उपलब्ध ठेवावीत.
सडे संमार्जनें करावीं । उदकपात्रें उदकें भरावीं ।
वसनें प्रक्षालून आणावीं । उत्तमोत्तमें ॥२४॥
मंदिराच्या अंगणात सडा-संमार्जन करावे, पाण्याची भांडी पाण्याने भरून ठेवावीत आणि स्वच्छ धुतलेली वस्त्रे आणावीत.
सकळांचें करावें पारपत्य । आलयाचें करावें आतित्य ।
ऐसी हे जाणावी सत्य । सातवी भक्ती ॥२५॥
मंदिरातील व्यवस्थेवर कडक देखरेख ठेवावी आणि आलेल्या पाहुण्यांचे उत्तम आतिथ्य करावे; हीच खरी सातवी दास्यभक्ती जाणावी.
वचनें बोलावीं करुणेचीं । नाना प्रकारें स्तुतीचीं ।
अंतरें निवतीं सकळांचीं । ऐसें वदावें ॥२६॥
नेहमी नम्रतेची आणि करुणेची वचने बोलावीत; सर्वांचे अंतःकरण शांत व तृप्त होईल अशा गोड शब्दांत स्तुती करावी.
ऐसी हे सातवी भक्ती । निरोपिली येथामती ।
प्रत्यक्ष न घडे तरी चित्तीं । मानसपूजा करावी ॥२७॥
अशी ही सातवी भक्ती यथाशक्ती सांगितली आहे; प्रत्यक्ष करणे शक्य नसेल तर मनातल्या मनात ही मानससेवा करावी.
ऐसें दास्य करावें देवाचें । येणेंचि प्रकारें सद्गुbरूचें ।
प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजेचें । करित जावें ॥२८॥
असे दास्य भगवंताचे आणि सद्गुरूंचेही करावे; बाह्य स्वरूपात शक्य नसल्यास मानसपूजेच्या रूपाने अखंड करत राहावे.