हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा ।
श्रीसंतवरदा शारंगधरा । पतितपावना दयानिधे ॥१॥
हे सगुण रूप धारण करणाऱ्या, चंद्रभागेच्या तीरावर विहार करणाऱ्या, संतांना वर देणाऱ्या आणि धनुष्य हाती धरणाऱ्या दयाळू रुक्मिणीपती, तू पतितपावन आहेस.
लहानावांचून मोठ्याचा । मोठेपणा न टिके साचा ।
पतिताविण परमेश्वराचा । बोलबाला होणें नसे ॥२॥
लहानांच्या अस्तित्वाशिवाय मोठ्यांचे मोठेपण टिकत नाही, आणि पापी वा पतित जन नसल्यास देवाला पतितपावन म्हणून कोणी ओळखले नसते.
आम्ही आहों पतित । म्हणून तुला म्हणतात ।
पावनकर्ता रुक्मिणीकांत । हें आतां विसरूं नको ॥३॥
आम्ही पतित आहोत म्हणूनच तुला पतितांचा उद्धार करणारा म्हणतात, या गोष्टीचा विसर पडू देऊ नकोस.
परिस लोहाला सोनें करी । म्हणुनी त्याचें महत्त्व भूमीवरी ।
ओहोळ पोटीं घे गोदावरी । म्हणून म्हणती तीर्थ तिला ॥४॥
परिस लोखंडाचे सोने करतो म्हणूनच त्याचे महत्त्व आहे, आणि गोदावरी ओहोळाला पोटात सामावून घेते म्हणूनच तिला पावन तीर्थ मानतात.
याचा विचार करावा । चित्तीं आपुल्या माधवा ।
दासगणूला हात द्यावा । बुडूं न द्यावें कोठेंही ॥५॥
हे माधवा, या गोष्टीचा मनात विचार करून दासगणूला हात देऊन सांभाळ आणि कुठेही वाहून जाऊ देऊ नकोस.
असो गोविंदबुवा टाकळीकर । एक हरिदास होता थोर ।
तो कराया कीर्तनगजर । शेगांवासी पातला ॥६॥
गोविंदबुवा टाकळीकर नावाचा एक श्रेष्ठ कीर्तनकार कीर्तन करण्यासाठी शेगावात आला.
तेथें शिवाचें मंदिर । पुरातन होतें साचार ।
ज्याचा केला जीर्णोध्दार । मोटे नामक सावकारें ॥७॥
तेथील एका प्राचीन शिवमंदिराचा जिर्णोद्धार मोटे नावाच्या सावकाराने केला होता.
अलिकडच्या श्रीमंताला । मदिराचा कंटाळा ।
मोटारी क्लब बायसिकला । यांचें प्रेम बहु असे ! ॥८॥
आजकालच्या श्रीमंतांना मंदिरांची आवड नसते; त्यांना केवळ गाड्या, क्लब आणि मौजमजेचेच आकर्षण असते.
तैसा न मोटे सावकार । श्रीमंत असून भाविक फार ।
त्यानेंच हा जीर्णोध्दार । केला असे मंदिराचा ॥९॥
परंतु मोटे सावकार श्रीमंत असूनही अत्यंत भाविक असल्याने त्याने त्या मंदिराचा जिर्णोद्धार घडवून आणला होता.
म्हणोन मोट्याचें मंदिर । वदूं लागले नारीनर ।
आतां पुढचा प्रकार । काय झाला तो ऎका ॥१०॥
त्यामुळे सर्व लोक त्या मंदिराला 'मोट्याचे मंदिर' म्हणू लागले; आता त्यानंतर पुढे काय घडले ते ऐका.
त्या मोट्याच्या मंदिरीं । उतरले टाकळीकर कथेकरी ।
त्यांचा घोडा समोरी । बांधिला होता मंदिराच्या ॥११॥
त्याच मंदिरात टाकळीकर बुवा उतरले होते आणि मंदिरासमोर त्यांचा घोडा बांधलेला होता.
घोडा अतिद्वाड होता । कोणासही मारी लाथा ।
समोरून कोणी येतां । त्यास चावे कुत्र्यासम ॥१२॥
तो घोडा अत्यंत खोडकर असून समोर येणाऱ्यास लाथा मारायचा आणि कुत्र्यासारखा चावायचा.
तोडी चर्हाटें वरच्यावरी । स्थिर न राहे क्षणभरी ।
कधीं कधीं कांतारीं । त्यानें जावें पळोन ॥१३॥
तो सारखी दोरी तोडून टाकायचा, एका जागी शांत राहत नसे आणि कित्येकदा रानात पळून जायचा.
खिंकाळे रात्रंदिवस । वाईट खोड्या बहुवस ।
आल्या होत्या मुक्कामास । श्रोते तया घोड्याच्या ॥१४॥
तो रात्रंदिवस खिंकाळत राहायचा आणि त्याच्या अशा अनेक वाईट खोड्यांमुळे सर्वजण हैराण झाले होते.
लोखंडाच्या सांखळ्या । होत्या त्यासी बांधण्या केल्या ।
त्या या समयीं राहिल्या । टाकळीमाजी विसरून ॥१५॥
त्याला बांधण्यासाठी लोखंडी साखळ्या केल्या होत्या, परंतु त्या वेळी त्या टाकळी गावामध्येच विसरून राहिल्या होत्या.
चर्हाटानें कसा तरी । घोडा मंदिरासामोरी ।
बांधूनिया कथेकरी । निजले जाऊन शय्येला ॥१६॥
त्यामुळे दोरीने कसेबसे घोड्याला मंदिरासमोर बांधून कीर्तनकार बुवा झोपण्यासाठी निघून गेले.
रात्र झाली दोन प्रहर । तमें आक्रमिलें अंबर ।
दिवाभीतांचे घुत्कार । होऊं लागले वृक्षावरी ॥१७॥
मध्यरात्र झाली, आकाशात सर्वत्र काळोख पसरला आणि रात्रीच्या वेळी वृक्षांवर घुबडांचे आवाज सुरू झाले.
टिटव्या ' टी टी ' शब्द करिती । वाघुळें भक्ष्या धुंडिती ।
पिंगळे बसुनि वृक्षांवरती । किलबील करूं लागले ॥१८॥
टिटव्यांचा आवाज येत होता, वटवाघळे भक्ष्याचा शोध घेत होती आणि पिंगळे झाडावर बसून ओरडू लागले होते.
सामसुम जिकडे तिकडे । बंद झालीं कवाडें ।
कोठेंही ना दृष्टि पडे । एकही माणूस रस्त्यांनीं ॥१९॥
सर्वत्र शांतता पसरली होती, घरांचे दरवाजे बंद झाले होते आणि रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता.
ऎशा रात्रसमयास । श्रीगजानन पुण्यपुरुष ।
घोडा बांधल्या ठायास । येते झाले सहजगतीं ॥२०॥
अशा मध्यरात्रीच्या वेळी पुण्यपुरुष श्री गजानन महाराज सहज चालत त्या घोड्यापाशी आले.
जे जे कोणी द्वाड असती । त्यांना सुधारण्याप्रती ।
साधुपुरुष अवतार घेती । ईशाज्ञेनें भूमीवर ॥२१॥
जगात जे खोडकर आणि दुर्गुणी असतात त्यांना सन्मार्गावर आणण्यासाठीच संत ईश्वराच्या आज्ञेने पृथ्वीवर अवतार घेतात.
औषधाचें प्रयोजन । रोगा निवारण्याकारण ।
तेवीं द्वाडाचें द्वाडपण । साधुसंत निवारिती ॥२२॥
ज्याप्रमाणे रोगाचे निवारण करण्यासाठी औषधाची गरज असते, त्याचप्रमाणे संत वाईट प्रवृत्तीच्या लोकांचे दोष दूर करतात.
असो गजानन घोड्यापासी । आले रात्रसमयासी ।
जाऊनी निजले अति हर्षीं । चहूं पायांत घोड्याच्या ॥२३॥
महाराज त्या रात्री घोड्यापाशी आले आणि अत्यंत आनंदाने त्या घोड्याच्या चारही पायांमध्ये जाऊन झोपले.
मुखें भजन चाललें होतें । ' गणी गण गणांत बोते ' ।
या सांकेतिक भजनातें । जाणण्या कोण समर्थ हो ? ॥२४॥
त्यांच्या मुखात 'गणी गण गणांत बोते' हे सांकेतिक भजन चालू होते, ज्याचा खरा अर्थ समजणे अत्यंत कठीण आहे.
त्या सूत्ररूप भजनाचा । अर्थ ऎसा वाटतो साचा ।
गणी या शब्दाचा । अर्थ मोजी हाच असे ॥२५॥
त्या गूढ भजनाचा विचार करता 'गणी' या शब्दाचा खरा अर्थ 'मोजणे' असा होतो.
जीवात्मा म्हणजे गण । तो ब्रह्माहून नाहीं भिन्न ।
हें सुचवावया कारण । गणांत हा शब्द असे ॥२६॥
जीवात्मा म्हणजेच गण असून तो परब्रह्मापेक्षा वेगळा नाही, हे सुचवण्यासाठी 'गणांत' हा शब्द वापरला आहे.
बोते हा शब्द देखा । अपभ्रंश वाटे निका ।
बोते हा शब्द ऎका । तेथें असावा निःसंशय ॥२७॥
'बोते' हा मूळचा शब्द अपभ्रंश होऊन आला असावा असे वाटते.
बाया शब्दें करून । घेतलें पाहिजे मन ।
तें हें आहे सर्वनाम । शब्दाऎवजीं आलेलें ॥२८॥
येथे मनाला उद्देशून हा शब्द आला असून तो सर्वनामासारखा वापरला गेला आहे.
म्हणजे मना समजे नित्य । जीव हा ब्रह्मास सत्य ।
मानूं नको तयाप्रत । निराळा त्या तोचि असे ॥२९॥
म्हणजेच हे मना, जीवात्मा आणि ब्रह्म एकच आहेत, त्यांना वेगळे मानू नकोस हाच त्याचा भावार्थ आहे.
' गिणगिण गिणांत बोते ' । कोणी ' गणी गण गणांत बोते , ।
ऎशीं आहेत दोन मतें । या भजनाविषयीं शेगांवीं ॥३०॥
शेगावात या भजनाविषयी 'गिणगिण गिणात बोते' आणि 'गणी गण गणांत बोते' अशी दोन मते प्रचलित आहेत.
त्यासी न आपुलें प्रयोजन । आपणा कथेसी कारण ।
महाराज निजले येऊन । चौपायांत घोड्याच्या ॥३१॥
त्या वादाशी आपल्याला कर्तव्य नसून, महाराज घोड्याच्या चार पायांत येऊन झोपले ही आपल्या कथेची मुख्य गोष्ट आहे.
वरील भजन मुखानें । चाललें होतें आनंदानें ।
वाटे या भजनरूप सांखळीनें । घोडा बांधूनीं टाकिला ॥३२॥
महाराजांचे ते भजन आनंदाने सुरू होते आणि जणू त्या भजनरूपी साखळीनेच घोड्याला शांत बांधून टाकले होते.
गोविंदबुवांच्या अंतरीं । धास्ती होती जबर खरी ।
म्हणून तो वरच्यावरी । उठून पाहे वारूला ॥३३॥
गोविंदबुवांच्या मनात घोड्याविषयी सतत भीती असल्याने ते वारंवार उठून घोड्याकडे पाहत होते.
तो ठाण्यावरी घोडा शांत । ऎसें पडता दृष्टीप्रत ।
गोविंदबुवांच्या चित्तांत । अति नवल वाटलें ॥३४॥
तोपर्यंत घोडा शांत उभा असल्याचे पाहून गोविंदबुवांच्या मनात मोठे नवल वाटले.
तों आपुल्या मनीं म्हणे । हें ऎसें झालें कशानें ।
का कांहीं आजारानें । व्याप्त झाला घोडा हा ॥३५॥
हा घोडा आज असा अचानक शांत कसा झाला, की त्याला काही आजार झाला आहे असा विचार ते करू लागले.
म्हणूनी राहिला शांत । हें न काहीं कळों येत ।
हा ऎसा आजपर्यंत । नाहीं कधीच स्थिरावला ॥३६॥
तो आजपर्यंत कधीही शांत बसला नव्हता, मग आज तो असा स्तब्ध का झाला हे त्यांना समजेना.
हें काय आहे तें पहाया गेलें । तों एक माणूस दिसलें ।
चोहोंपायांत निजलेले । त्या द्वाड घोड्याच्या ॥३७॥
नेमके काय घडले आहे हे पाहण्यासाठी ते जवळ गेले, तेव्हा त्या खोडकर घोड्याच्या चार पायांमध्ये एक माणूस झोपलेला दिसला.
अति निकट येऊनी । पाहूं लागले निरखुनी ।
तों दिसले कैवल्यदानी । तेथें गोविंदबुवाला ॥३८॥
अतिशय जवळ जाऊन नीट निरखून पाहिले असता गोविंदबुवांना तेथे गजानन महाराज प्रत्यक्ष दिसले.
ते म्हणाले मनांत । घोडा कां झाला शांत ।
हें कळलें कारणासहीत । मजलागीं येधवां ॥३९॥
तेव्हा घोडा शांत होण्याचे मूळ कारण काय होते हे गोविंदबुवांच्या पूर्णपणे लक्षात आले.
समर्थांच्या सहवासें । घोडा शांत झालासे ।
जेथें कस्तुरी तेथें नसे । दुर्गंधाला थारा कदा ॥४०॥
समर्थांच्या केवळ सहवासानेच तो घोडा शांत झाला, कारण जिथे कस्तुरीचा सुवास असतो तिथे दुर्गंधी अजिबात टिकत नाही.
समर्थांच्या पायांवरी । गोविंदबुवानें अत्यादरीं ।
शिर ठेविलें निर्धारीं । अष्टभाव दाटले ॥४१॥
गोविंदबुवांनी अत्यंत आदराने महाराजांच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि त्यांच्या अंतःकरणात भावाश्रू दाटून आले.
मुखें करूं लागलें स्तवन । आपण खरेच गजानन ।
विघ्नांचे करितसा कंदन । याचा प्रत्यय आज आला ॥४२॥
ते स्तुती करत म्हणाले की, आपण खरोखरच सर्व विघ्नांचा नाश करणारे गजानन आहात याची प्रचिती मला आज आली.
माझा घोडा द्वाड अती । सर्वही ज्याला भीती ।
तेथेंच आलात गुरुमूर्ती । हरण्या त्याचा द्वाडपणा ॥४३॥
ज्या खोडकर घोड्याला सर्वजण घाबरत होते, त्याचा खोडकरपणा घालवण्यासाठीच आपण सद्गुरू येथे आलात.
ह्या घोड्याच्या अचाट खोडी । चालतां मध्येंच मारी उडी ।
क्षणक्षणा मागल्या झाडी । हा दुगण्या महाराजा ! ॥४४॥
हा घोडा चालता चालता उड्या मारतो आणि क्षणाक्षणाला मागच्या पायांनी लाथा झाडतो.
मी गेलों होतों कंटाळून । म्हणूण बाजारालागून ।
गेलों विकाया कारण । परी न कोणी घेई या ॥४५॥
या घोड्याला कंटाळून मी त्याला बाजारात विकायला गेलो होतो, परंतु त्याला कोणीही विकत घेतले नाही.
फुकटही लागलो द्याया । परी न कोणी तयार घ्याया ।
त्यावरी आपण केली दया । हें झालें फार बरें ॥४६॥
मी त्याला फुकट देण्यासही तयार झालो, तरीही कोणी नेण्यास तयार नव्हते; अशा घोड्यावर आपण कृपा केली हे फार चांगले झाले.
आम्हां कथेकर्याचें । घोडें पाहिजे गरीब साचें ।
घरामाजीं धनगराचें । नाहीं वाघ कामाचा ॥४७
आम्हा कीर्तनकारांना शांत आणि गरीब स्वभावाचा घोडा लागतो; धनगराच्या घरी वाघाचा काहीही उपयोग नसतो.
ऎसा झाला प्रकार । घोडें झाले गरीब फार ।
जडजीवांचा उध्दार । करण्यास स्वामी अवतरले ॥४८॥
अशा रीतीने तो घोडा अतिशय शांत झाला, कारण समर्थ दुर्जनांचा उद्धार करण्यासाठीच अवतरले आहेत.
घोड्यास म्हणाले, " आतां गड्या । करूं नकोस खोड्या ।
त्या तेथेंच रोकड्या । द्याव्या अवघ्या सोडून ॥४९॥
महाराजांनी घोड्याला सांगितले की, आता तू सर्व खोड्या इथेच ताबडतोब सोडून दे.
तूं शिवाच्या समोरीं । याचा विचार कांहीं करी ।
वागत जावें बैलापरी । त्रास न देई कवणातें " ॥५०॥
तू शिवाच्या मंदिरासमोर बांधलेला आहेस याचे भान ठेव, बैलासारखा गरीब होऊन राहा आणि कोणालाही त्रास देऊ नकोस.
ऎसें त्यासी बोलून । निघून गेले दयाघन ।
कृपाकटाक्षें करून । पशूही ज्यानें आकळिला ॥५१॥
असे त्या घोड्याला सांगून दयाळू महाराज निघून गेले; त्यांनी आपल्या कृपादृष्टीने पशूलाही वश केले होते.
असो श्रोते दुसरे दिवशीं । मळ्यांत असतां पुण्यराशी ।
आले गोविंदबुवा दर्शनासी । घोड्यावरी बैसून ॥५२॥
दुसऱ्या दिवशी महाराज मळ्यात बसलेले असताना गोविंदबुवा त्या घोड्यावर बसून दर्शनासाठी आले.
घोडा गोविंदबुवांचा । शेगांवासी ठाऊक साचा ।
कोश अवघ्या खोड्यांचा । भीत होते त्यासी जन ॥५३॥
गोविंदबुवांचा घोडा किती खोडकर आहे हे सर्व शेगाववासीयांना ठाऊक असल्यामुळे लोक त्याला भीत होते.
तो मळ्यांत आलेला पाहून । लोक बोलले त्याकारण ।
गोविंदबुवा ही घेऊन । पीडा कशास येथें आला ॥५४॥
तो घोडा मळ्यात आलेला पाहून लोकांनी गोविंदबुवांना विचारले की ही पीडा इथे कशासाठी आणली.
मुलें बायका मळ्यांत । आहेत पहा वावरत ।
तुमचा घोडा करील घात । सहज लीलेनें कवणाचा ॥५५॥
मळ्यात लहान मुले आणि स्त्रिया वावरत आहेत, हा घोडा सहज कोणाचा तरी घात करेल.
गोविंदबुवा त्यास वदले । तुमचें म्हणणें मीं ऎकिलें ।
माझ्या घोड्यास शहाणें केले । काल रात्रीं समर्थांनी ॥५६॥
गोविंदबुवांनी सांगितले की मी तुमचे म्हणणे ऐकले, पण काल रात्री समर्थांनी या घोड्याला पूर्णपणे शहाणे केले आहे.
त्यानें खोड्या दिल्या टाकून । झाला गोगलगाईसमान ।
आतं भ्यावयाचें कारण । कांहीं न उरलें कोणाशीं ॥५७॥
त्याने सर्व खोड्या सोडून दिल्या असून तो गोगलगाईसारखा गरीब झाला आहे, आता कोणालाही भीती उरलेली नाही.
चिंचेखालीं उभा केला । टाकळीकरांनी घोडा भला ।
चर्हाटावांचूनी राहिला । उभा तो एक प्रहर ॥५८॥
टाकळीकरांनी घोड्याला चिंचेच्या झाडाखाली उभे केले आणि तो दोरीविना एक प्रहरभर शांत उभा राहिला.
भाजीपाला कोवळा घांस । मळ्यांत होता विशेष ।
परी ना लाविलें त्यास । तोंड घोड्यानें एकाही ॥५९॥
मळ्यात ताजी भाजी आणि कोवळा चारा असूनही घोड्याने त्याला अजिबात तोंड लावले नाही.
पाहा संताची केवढी शक्ति । पशूही आज्ञेंत वागती ।
पत्र्यांत आरंभिली स्तुती । गोविंदबुवांनीं समर्थांची ॥६०॥
संतांच्या सामर्थ्याने पशूही आज्ञेत वागू लागल्याचे पाहून गोविंदबुवांनी समर्थांची स्तुती केली.
श्लोक ( पृथ्वी वृत्त ) अचिंत्य जगताप्रती कृति तुझी न कोणा कळे । असो खलहि केवढा तव-कृपें सुमार्गी वळे ॥
उणें पुढति ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी । शिरीं सतत माझिया वरदहस्त ठेवा झणीं ॥१॥
जगाला न समजणाऱ्या आपल्या अद्भुत लीलांनी कितीही दुष्ट प्राणी असला तरी तो सन्मार्गावर येतो, म्हणून आपल्या कृपेपुढे चिंतामणीही तुच्छ असून आपला वरदहस्त माझ्या मस्तकावर सदैव राहो.
ऎसी स्तुती करून । गेले गोविंदबुवा निघून ।
घोड्यास आपल्या घेऊन । टाकळी ग्रामाकारणें ॥६१॥
अशी स्तुती करून गोविंदबुवा आपल्या घोड्याला घेऊन टाकळी गावाला निघून गेले.
प्रत्येक दिनीं शेगावीं । यात्रा येई नवी नवी ।
कांहीं तरी धरून जीवीं । हेतु आपल्या श्रोते हो ॥६२॥
आपल्या मनात विविध हेतू धरून शेगावात दररोज नवीन भाविकांची गर्दी जमत असे.
त्या यात्रेकरू मंडळींत । बाळापूरचे दोन गृहस्थ ।
आले कांहीं धरून हेत । समर्थांच्या दर्शना ॥६३॥
त्या गर्दीत बाळापूरचे दोन गृहस्थ एका विशिष्ट हेतूने समर्थांच्या दर्शनासाठी आले.
पथीं जातां एकमेकां । बोलूं लागले ऎसें देखा ।
पुढल्या वारीस गांजा सुका । येऊं आपण घेऊन ॥६४॥
वाटेत चालताना ते एकमेकांना म्हणाले की पुढील वारीला आपण महाराजांसाठी वाळलेला गांजा घेऊन येऊ.
कां कीं या गांजावर । समर्थांचे प्रेम फार ।
तो आपण आणिला जर । तरी कृपा होईल त्यांची ॥६५॥
महाराजांना गांजा खूप आवडतो असे ऐकल्याने आपण तो आणल्यास आपल्यावर त्यांची कृपा होईल असा त्यांचा विचार होता.
लोक आणती बर्फी खवा । आपण गांजा नेऊं बरवा ।
गांठ धोत्रां बांधून ठेवा । ना तरी विस्मृति होईल ॥६६॥
इतर लोक बर्फी-खवा आणतात, पण आपण गांजा आणू; विसर पडू नये म्हणून धोतराच्या टोकाला गाठ बांधून ठेवू, असे त्यांनी ठरवले.
पुढल्या वारीस दोघेजण । आले दर्शनाकारण ।
परि गेले विसरोन । गांजा तो आणावया ॥६७॥
पुढील वारीला दोघे दर्शनासाठी आले खरे, पण गांजा आणण्याचे पूर्णपणे विसरून गेले.
शिर ठेवितां पायांवरी । आठवण त्यांना झाली खरी ।
कीं नाहीं आणिला बरोबरी । गांजा तो आपण ॥६८॥
महाराजांच्या पायावर मस्तक ठेवताच आपण गांजा आणला नाही याची त्यांना खरी आठवण झाली.
आतां पुढल्या वारीसी । दुप्पट आणूं गांज्यासी ।
ऎसें बोलून मानसीं । दर्शन घेऊन गेले हो ॥६९॥
आता पुढच्या वारीला आपण दुप्पट गांजा आणू, असा मनात विचार करून ते निघून गेले.
पुढल्या वारीस तेंच झालें । गांजा आणण्याचे विसरले ।
कर जोडून मात्र बसले । स्मृति नसे गांजाची ॥७०॥
त्यानंतरच्या वारीलाही तेच घडले; ते गांजा आणण्याचे विसरून केवळ हात जोडून बसून राहिले.
तै स्वामीं म्हणाले भास्करासी । पाहा जगाची रीत कैसी ।
गांठ मारून धोतरासी । विसरती जिन्नस आणावया ॥७१॥
तेव्हा स्वामी भास्कराला म्हणाले की, धोतराला गाठ बांधूनही आणायची वस्तू विसरणाऱ्या जगाची रीत पाहा.
जातीनें आहेत ब्राह्मण । तेच आपुलें भाषण ।
करिती आपण होऊन । खोटें पहा सर्वांशीं ॥७२॥
जातीने ब्राह्मण असूनही हे स्वतःहून बोललेले वचन खोटे पाडत आहेत.
ब्राह्मणांचे भाषण । कदा नसावें अप्रमाण ।
या तत्त्वालागून । न जाणती चांडाळ ते ॥७३॥
ब्राह्मणाचे बोलणे कधीही खोटे नसावे, या तत्त्वाची चाड या दुष्टांना राहिलेली नाही.
द्विजें निजधर्म सोडिला । आचार विचार सांडिला ।
ह्यामुळें श्रेष्ठत्वाला । ते मुकले सांप्रत ॥७४॥
द्विजांनी आपला धर्म आणि सदाचार सोडल्यामुळेच ते आपले श्रेष्ठत्व गमावून बसले आहेत.
बेटे मनीं नवस करिती । आणि हात हालवित येथें येती ।
अशानें कां पूर्ण होती । त्यांच्या मनींचे मनोरथ ? ॥७५॥
मनात नवस करतात आणि दर्शनाला रिकाम्या हाताने येतात, अशाने त्यांचे मनोरथ कसे पूर्ण होणार?
बोलण्यांत पाहिजे मेळ । चित्त असावें निर्मळ ।
तरीच तो घननीळ । कृपा करितो भास्करा ॥७६॥
बोलण्यात प्रामाणिकपणा आणि मनात निर्मळता असेल तरच परमेश्वराची कृपा होते, असे समर्थ भास्कराला म्हणाले.
हे शब्द त्या दोघांसी । अती लागले मानसीं ।
पाहूं लागले एकमेकांसी । कुतूहल दृष्टीनें ॥७७॥
महाराजांचे हे शब्द त्या दोघांच्या मनाला लागले आणि ते एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले.
पाहा केवढें अगाध ज्ञान । आहे यांचें परिपूर्ण ।
हा जगत्चक्षु गजानन । सूर्यापरीच असे हो ॥७८॥
सूर्याप्रमाणे जगातील सर्व गोष्टी पाहणाऱ्या या गजानन महाराजांचे ज्ञान किती अगाध आहे, हे त्यांच्या लक्षात आले.
आपण नवस केला मनीं । तो जाणिला समर्थांनी ।
आतां येऊं घेऊनी । चला गांजा गांवांतून ॥७९॥
आपण मनात केलेला नवस समर्थांनी अचूक ओळखला, आता गावात जाऊन गांजा घेऊन येऊ, असे त्यांनी ठरवले.
ऎसा विचार करून उठले । गांवांत जाऊं लागले ।
गांजा आणावयाला भले । तैं महाराज वदले त्या ॥८०॥
ते गावात गांजा आणण्यासाठी उठून जाऊ लागले असता महाराज त्यांना बोलले.
आतां शिळ्या कढीप्रत । कां हा उगा आणितां ऊत ।
सार नाहीं किमपि यांत । मी न हपापलो गांज्याला ॥८१॥
आता या शिळ्या कढीला ऊत आणून काही उपयोग नाही, मी काही गांजासाठी भुकेलेला नाही.
आतां आपण गांजाप्रत । नका जाऊं पेठेंत ।
मेळ हमेशा बोलण्यांत । ठेवा तुम्ही आपुल्या ॥८२॥
आता गांजा आणायला बाजारात जाऊ नका, फक्त स्वतःच्या बोलण्यात आणि वागण्यात नेहमी मेळ ठेवा.
लबाडाचे न हेतु पुरती । ही खूणगांठ बांधा चित्तीं ।
तुमचें काम झाल्यावरती । मर्जी असल्या गांजा आणा ॥८३॥
लबाड माणसाचे हेतू कधीही सफल होत नाहीत हे लक्षात ठेवा; तुमचे काम झाल्यावर इच्छा असेल तर गांजा आणा.
पुढील आठवड्यांत तुमचें काम । होईल जा अत्युत्तम ।
परी कदा न चुकावा नेम । पांच वार्या येथील करा ॥८४॥
पुढच्या आठवड्यात तुमचे काम यशस्वी होईल, पण इथल्या पाच वाऱ्या करण्याचा नेम मात्र चुकू देऊ नका.
कां कीं हा येथें स्थिर । आहे मृडानीपती कर्पूरगौर ।
ज्याच्या कृपेनें कुबेर । जगीं झाला धनपती ॥८५॥
कारण ज्याच्या कृपेने कुबेर धनपती झाला, तो पार्वतीपती शंकर येथे स्थिर आहे.
जा नमस्कार त्यासी करा । गांजा आणावया न विसरा ।
परमार्थात खोटें जरा । बोलूं नये मानवांनी ॥८६॥
जा आणि त्या शंकराला नमस्कार करा; पुढच्या वेळी गांजा आणायला विसरू नका आणि परमार्थात माणसाने कधीही खोटे बोलू नये.
ऎसा उपदेश ऎकून । महाराजांशीं वंदून ।
घेतलें शिवाचें दर्शन । आणी गेले बाळापुरा ॥८७॥
असा उपदेश ऐकून महाराजांना वंदन करून व शिवादिक देवाचे दर्शन घेऊन ते बाळापूरला गेले.
पुढील आठवड्यामाजी भले । काम त्यांचें फत्ते झालें ।
तेही गांजा घेऊन आले । शेगावांत वारीला ॥८८॥
पुढच्या आठवड्यात त्यांचे काम पूर्ण झाले आणि ते वारीसाठी शेगावात गांजा घेऊन आले.
त्या बाळापुरची दुसरी कथा । तुम्ही ऎका श्रोते आतां ।
बाळकृष्ण नामें होता । बाळापुरांत रामदासी ॥८९॥
आता त्या बाळापूरची दुसरी एक कथा श्रोत्यांनी ऐकावी, जिथे बाळकृष्ण नावाचा एक रामदासी राहत होता.
कांता त्याची पुतळाबाई । परम भाविक होती पाही ।
दरवर्षी वारीस जाई । पायीं सज्जनगडातें ॥९०॥
त्याची पत्नी पुतळाबाई ही अतिशय भाविक असून दरवर्षी पायी चालत सज्जनगडाच्या वारीला जात असे.
पति-पत्नीचा विचार एक । पौष मासीम निघती देख ।
ओझ्यासाठीं घोडें एक । घेऊनिया बरोबरी ॥९१॥
पती-पत्नी एकविचाराने एका घोड्यावर सामान लादून पौष महिन्यात वारीसाठी निघत असत.
कुबडी कंथा दासबोध । सवें हें सामान अति शुध्द ।
साधुत्वाचा नव्हता मद । तयासी कीं चढलेला ॥९२॥
कुबडी, झोळी आणि दासबोध असे साधे सामान त्यांच्याजवळ होते आणि त्यांना स्वतःच्या साधुत्वाचा कोणताही गर्व नव्हता.
मार्गी चालतां ग्रामांतरीं । प्रत्यहीं झोळी फिरवी खरी ।
त्या झोळीच्या भिक्षेवरी । नैवेद्य करी रामाला ॥९३॥
वाटेत गावातून जाताना दररोज झोळी फिरवून मिळालेल्या भिक्षेचा नैवेद्य ते श्रीरामाला दाखवत.
पौष वद्यांत बाळापूर । सोडी नवमीला साचार ।
असे कांता बरोबर । पुतळाबाई नाम जिचें ॥९४॥
पौष वद्य नवमीला बाळकृष्णबुवा पत्नी पुतळाबाईसह बाळापूर सोडत असत.
बाळकृष्णबुवा हातीं । चंदनाच्या चिपळ्या असती ।
पुतळाबाई करी साथी । झांज हातीं घेऊन ॥९५॥
बाळकृष्णबुवांच्या हातात चंदनाच्या चिपळ्या असत आणि पुतळाबाई हातात झांज घेऊन त्यांना साथ देत असे.
रघुपतीचा नामगजर । करी पंथानें निरंतर ।
शेगांव खामगांव मेहेकर । देऊळगांवराजा पुढें ॥९६॥
वाटेत रामाचा नामगजर करत ते शेगाव, खामगाव, मेहकर आणि देऊळगावराजा मार्गाने पुढे जात.
आनंदीस्वामीस जालनापुरीं । वंदुनिया जांब नगरीं ।
जाय तेथें मात्र करी । तीन दिवस मुक्काम ॥९७॥
जालन्याला आनंदीस्वामींचे दर्शन घेऊन ते समर्थांचे जन्मस्थान असलेल्या जांब गावात तीन दिवस मुक्काम करत.
कां कीं तें ठिकाण । समर्थांचे जन्मस्थान ।
पुढें दिवर्यास येऊन । वंदन करी गोदेला ॥९८॥
ते समर्थांचे जन्मस्थान असल्याने तेथे राहून पुढे दिग्रसला येऊन गोदावरीला वंदन करत.
पुढें बीड आंबेजोगाईचे । मोहोरी बेलेश्वर स्वामीचे ।
पट्टशिष्य समर्थांचे । डोमगांवीं कल्याण ॥९९॥
पुढे बीड, आंबेजोगाई, मोहोरी, बेलेश्वर आणि समर्थांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींचे डोमगाव येथे जात.
नरसिंगपूर पंढरपूर । नातेपोतें शिंगणापूर ।
वाई आणि सातारा । असे जे गडाच्या पायथ्याशीं ॥१००॥
नंतर नरसिंगपूर, पंढरपूर, नातेपुते, शिंगणापूर, वाई आणि सातारा मार्गाने ते सज्जनगडाच्या पायथ्याशी पोहोचत.
माघ वद्य प्रतिपदेला । तो येऊन पहुचे भला ।
श्रीसज्जनगडाला । नवमीच्या त्या उत्सवासी ॥१॥
माघ वद्य प्रतिपदेला ते दासनवमीच्या उत्सवासाठी श्रीसज्जनगडावर सुखरूप पोहोचत असत.
यथाशक्तिप्रमाणें । ब्राह्मणभोजन करावें त्यानें ।
श्रीस्वामीसमर्थांकारणें । खरा खराच रामदासी ॥२॥
तेथे ते यथाशक्ती ब्राह्मणभोजन घालत आणि समर्थांची खरीखुरी निष्ठा बाळगणारे रामदासी होते.
ऎसे रामदासी आतां । होणें कठीण सर्वथा ।
दासनवमीचा उत्सव होता । परत जाई त्याच मार्गें ॥३॥
असा निस्सीम रामदासी होणे आज कठीण आहे; दासनवमीचा उत्सव संपल्यावर ते त्याच मार्गाने परत फिरत.
ऐसा क्रम चालला । बहुत दिवस त्याचा भला ।
साठ वर्षें देहाला । गेलीं त्याच्या उलटुन ॥४॥
अनेक वर्षे हा वारीचा क्रम अविरत सुरू राहिला आणि बाळकृष्णबुवांचे वय साठ वर्षांच्या वर गेले.
माघ वद्य द्वादशीस । सोडून सज्जनगडास ।
निघावें परत जावयास । त्यानें आपुल्या बाळापुरा ॥५॥
माघ वद्य द्वादशीला सज्जनगड सोडून ते बाळापूरला आपल्या घरी परत जाण्यास निघत असत.
असो वद्य एकादशीसी । बसला समर्थ समाधींपासीं ।
आले दुःखाश्रु लोचनासी । शब्द न त्यासी बोलवे ॥६॥
एकादशीच्या दिवशी समर्थांच्या समाधीपाशी बसले असताना त्यांच्या डोळ्यांत दुःखाश्रू आले आणि त्यांना बोलता येईना.
हे रामदास स्वामी समर्था ! । हे गुरुराया पुण्यवंता ! ।
माझें शरीर थकलें आतां । वारी न पायीं होईल ॥७॥
माझे शरीर आता थकले असून पायांनी वारी करणे मला यापुढे शक्य होणार नाही, असे ते समर्थांना आर्ततेने म्हणाले.
जरी बसून वाहानातें । येऊं सज्जनगडातें ।
तरी तेंही कठीण देसतें । मजलागीं दयाळा ॥८॥
वाहनात बसून गडावर येणेही मला आता कठीण वाटत आहे, अशी त्यांनी दयाळू समर्थांपुढे खंत व्यक्त केली.
नेम चालला आजवर । आतां पडूं पाहे अंतर ।
परमार्थासी शरीर । निकोप आधीं पाहिजे ॥९॥
आजवर चाललेला नेम आता चुकणार असे वाटते, कारण परमार्थासाठी शरीर निरोगी असणे आवश्यक असते.
तरीच सर्व घडे कांहीं । हे रामदासा माझे आई ।
हें म्हणण्याची जरूर नाहीं । आपण सर्व जाणतसा ॥११०॥
शरीर साथ देईल तरच भक्ती घडेल; हे समर्था, मी वेगळे सांगण्याची गरज नसून आपण सर्व जाणताच.
ऐशी प्रार्थना करून । निजला शय्येस जाऊन ।
तों प्रभातकाळीं पडलें स्वप्न । बाळकृष्णबुवाला ॥११॥
अशी प्रार्थना करून ते झोपी गेले असता पहाटेच्या वेळी बाळकृष्णबुवांना एक स्वप्न पडले.
स्व्प्नीं म्हणाले रामदास । ऐसा न होई हताश ।
नको येऊं येथून खास । या सज्जनगडातें ॥१२॥
समर्थांनी स्वप्नात येऊन सांगितले की तू असा हताश होऊ नकोस आणि यापुढे सज्जनगडावर येऊ नकोस.
माझी कृपा तुझ्यावरी । माझा उत्सव बाळापुरीं ।
करावा तूं आपल्या घरीं । मी येईन नवमीला ॥१३॥
माझी तुझ्यावर पूर्ण कृपा असून तू माझा दासनवमीचा उत्सव बाळापूरला तुझ्या घरीच कर, मी प्रत्यक्ष नवमीला येईन.
तुला द्याया दर्शन । हें मानीं प्रमाण वचन ।
आपल्या शक्तीस पाहून । परमार्थ तो आचरावी ॥१४॥
मी तुला दर्शन द्यायला येईन हे माझे वचन सत्य मान आणि आपल्या शरीराच्या ताकदीनुसारच परमार्थाचे आचरण कर.
ऐसें स्वप्न पाहिलें । बाळकृष्ण आनंदले ।
कांतेसह परत आले । बाळापुरास आपुल्या घरीं ॥१५॥
असे स्वप्न पाहून बाळकृष्ण आनंदित झाले आणि पत्नीसह आपल्या गावी बाळापूरला परतले.
पुढें श्रोते दुसरे वर्षी । काय झालें माघमासीं ।
त्या बाळापुरासी । तें आतां अवधारा ॥१६॥
त्यानंतर दुसऱ्या वर्षी माघ महिन्यात बाळापूरमध्ये काय घडले ते श्रोत्यांनी एकाग्रतेने ऐकावे.
माघ वद्य प्रतिपदेस । समर्थांच्या उत्सवास ।
आरंभ बाळापुरास । बाळकृष्णांनीं घरीं केला ॥१७॥
माघ वद्य प्रतिपदेला बाळकृष्णाने आपल्या बाळापूरच्या घरी समर्थांच्या दासनवमी उत्सवाला सुरुवात केली.
दासबोधाचें वाचन । रात्रीस हरिकीर्तन ।
दोन प्रहरीं ब्राह्मणभोजन । धूपार्ती अस्तमानाला ॥१८॥
दिवसा दासबोधाचे वाचन, दुपारी ब्राह्मणभोजन, संध्याकाळी धूपारती आणि रात्री हरिकीर्तन असा उत्सव सुरू झाला.
बाळकृष्णाच्या मनांत । विचार हाची घोळत ।
पाहूं कसे येतात । स्वामी समर्थ नवमीसी ॥१९॥
समर्थ नवमीच्या दिवशी प्रत्यक्ष कसे येतात याचाच विचार बाळकृष्णाच्या मनात सतत घोळत होता.
बाळकृष्णाच्या वचनांनी । केली गांवकर्यांनीं ।
आपापसांत वर्गणी । उत्सवा साह्य करावया ॥१२०॥
बाळकृष्णाच्या सांगण्यावरून गावकर्यांनी उत्सवाच्या साहाय्यासाठी आपापसात वर्गणी गोळा केली.
ऐसा थात बाळापुरा । नव दिवस झाला खरा ।
नववे दिवशीं दोन प्रहरा । अघटित आलें घडून ॥२१॥
अशा मोठ्या थाटात नऊ दिवस उत्सव चालला आणि नवव्या दिवशी दुपारच्या वेळी एक विलक्षण घटना घडली.
श्रीगजानन साक्षात्कारी । श्रोते तया बाळापुरीं ।
उभे राहिले दोन प्रहरीं । नवमी तिथी लक्षून ॥२२॥
साक्षात्कारी श्री गजानन महाराज नवमीच्या तिथीला दुपारच्या वेळी बरोबर बाळापूरला येऊन ठेपले.
बाळकृष्णाच्या द्वारांत । रामाभिषेक चालला आंत ।
लोक झाले विस्मित । गजाननासी पाहूनिया ॥२३॥
बाळकृष्णाच्या घरात रामाचा अभिषेक सुरू असताना गजानन महाराजांना दारात उभे पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटले.
म्हणूं लागले बुवासी । उठा उठा हो वेगेसी ।
तुमच्या दासनवमीसी । द्वारीं पातलें गजानन ॥२४॥
तुमच्या दासनवमीला दारात साक्षात गजानन महाराज आले आहेत, असे सांगत लोक बुवांना उठवू लागले.
त्यावरी बुवा म्हणाले । गजानन आले बरें झालें ।
त्याही संतांचे लागले । पाय माझ्या घरासी ॥२५॥
त्यावर बुवा म्हणाले की गजानन महाराज आले हे उत्तम झाले, अशा संतांचे पाय माझ्या घराला लागले हे माझे भाग्य आहे.
परी आजच्या दिनीं साची । मी वाट पाहतों समर्थांची ।
त्या सज्जनगड निवासियाची । आतूर होऊन ये ठायां ॥२६॥
परंतु आजच्या दिवशी मी सज्जनगडनिवासी समर्थ रामदासांची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे.
त्यांचा मसी करार आहे । मी नवमीला येईन पाहे ।
ती वाणी असत्य नोहे । ऐसा माझा भरवंसा ॥२७॥
मी नवमीला येईन असा त्यांचा माझ्याशी करार असून त्यांचे वचन खोटे ठरणार नाही असा मला पूर्ण विश्वास आहे.
इकडे स्वामी गजानन । द्वारीं उभे राहून ।
जय जय रघुवीर म्हणोन । श्लोक बोलुं लागले ॥२८॥
इकडे गजानन महाराज दारात उभे राहून 'जय जय रघुवीर' म्हणत श्लोक उच्चारू लागले.
श्लोक - अहिल्या शिळा राघवें मुक्त केली । पदीं लागतां दिव्य होऊनि गेली ॥
अशी वाणी ऐकतां उठली । स्वारी बाळकृष्णाची ॥२९॥
'अहिल्या शिळा राघवे मुक्त केली' हा श्लोक ऐकताच बाळकृष्णबुवा उठून घराबाहेर आले.
पाहाती जों येऊन द्वारीं । तों गजाननाची नग्न स्वारी ।
आजानुबाहु साजिरी । उभी निजानंदामध्यें ॥१३०॥
दारात येऊन पाहतात तो आजानुबाहू गजानन महाराज स्वतःच्याच आनंदात नग्नावस्थेत उभे असलेले दिसले.
करण्या गेला नमस्कार । तों रामदास दिसले साचार ।
हातीं कुबडी जटाभार । रुळत होता पाठीवरी ॥३१॥
नमस्कार करायला जाताच गजाननांच्या जागी पाठीवर जटाभार आणि हातात कुबडी घेतलेले समर्थ रामदास स्वामी दिसले.
भालीं त्रिपुंड उभा साचा । होता गोपीचंदनाचा ।
नेसलेल्या लंगोटीचा । रंग होता हिरमुजी ॥३२॥
त्यांच्या कपाळावर गोपीचंदनाचा उभा त्रिपुंड होता आणि नेसलेली लंगोटी तांबड्या रंगाची होती.
ऎसें रूप पाहिलें । बाळकृष्णा भरतें आलें ।
प्रेमाचें तें श्रोते भले । नयनी संचले आनंदाश्रु ॥३३॥
असे साक्षात रूप पाहून बाळकृष्णाच्या मनात प्रेमाचे भरते आले आणि डोळ्यांत आनंदाश्रू दाटले.
तों सवेंच दिसती गजानन । त्याच्या नेत्रांकारण ।
कुबडी लंगोटी कांहींच न । त्रिपुंड शिरींचा जटाभार ॥३४॥
तोच पुन्हा त्यांच्या डोळ्यांना त्रिपुंड, जटा किंवा कुबडी नसलेले गजानन महाराज दिसू लागले.
पुनः त्यानें हताश व्हावें । तों रामदास स्वामी दिसावे ।
पुनः जों निरखून पाहावें । तों मागुती गजानन ॥३५॥
ते पुन्हा हताश झाल्यावर पुन्हा रामदास स्वामी दिसले आणि निरखून पाहिले की पुन्हा गजानन महाराज दिसू लागले.
ऐसी स्थिती झाली खरी । सिनेमाच्या खेळापरी ।
घोटाळलासे अंतरी । कोडें कांहींच उमगेना ॥३६॥
चित्रपटाच्या खेळाप्रमाणे घडणाऱ्या या प्रकारामुळे बाळकृष्णाचे मन पूर्णपणे गोंधळून गेले आणि हे कोडे त्याला उलगडेना.
मग म्हणाले गजानन । रामदासासी प्रेमें करून ।
नको गांगरूं देऊं मन । तुझा समर्थ मीच असे ॥३७॥
तेव्हा गजानन महाराजांनी प्रेमाने सांगितले की, तू मनात गोंधळून जाऊ नकोस, तुझा रामदास तो मीच आहे.
मागें बापा गडावरी । माझीच वस्ती होती खरी ।
आतां शेगांवाभीतरीं । राहिलों येऊन मळ्यांत ॥३८॥
पूर्वी सज्जनगडावर माझीच वस्ती होती आणि आता मी शेगावात मळ्यामध्ये येऊन राहिलो आहे.
तुला सज्जनगडीं दिलें वचन । कीं दासनवमीस येईन ।
मी बाळापुरालागून । ह्यांचे स्मरण आहे का ? ॥३९॥
दासनवमीला बाळापूरला येईन असे सज्जनगडावर तुला दिलेले वचन तुला आठवते का?
त्या वचनाची पूर्तता । करण्यास येथें आलों आतां ।
दे सोडोन अवघी चिंता । मीच आहे रामदास ॥१४०॥
त्याच वचनाची पूर्तता करण्यासाठी मी येथे आलो असून काळजी सोडून दे, मीच प्रत्यक्ष रामदास आहे.
शरीररूपी वस्त्रास । तूं किंमत देतोस ।
आणि आत्म्याला विसरतोस । याला काय म्हणावें ? ॥४१॥
तूं आत्म्याला विसरून या केवळ नश्वर देहरूपी वस्त्रालाच का महत्त्व देत आहेस?
श्लोक आहे गीतेठायीं । " वासांसि जीर्णानि " तो पाही ।
ऎसी मुळीं ना भ्रमिष्ट होई । चाल पाटीं बसवी मला ॥४२॥
गीतेमध्ये 'वासांसि जीर्णानि' असा श्लोक आहे, त्यामुळे संभ्रमात न पडता मला पाटावर बसव.
बाळकृष्णाचा धरून हात । गजानन आले घरांत ।
एका मोठ्या पाटीं स्थित । स्वामी गजानन जाहले ॥४३॥
बाळकृष्णाचा हात धरून महाराज घरात आले आणि एका मोठ्या पाटावर जाऊन बसले.
बाळापुरीं पुकार झाली । गजानन आल्याची ती भली ।
मंडळीं धांवू लागलीं । दर्शन घ्याया पायांचे ॥४४॥
बाळापुरात गजानन महाराज आल्याची बातमी पसरताच लोक त्यांच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी धावून आले.
रामदासी अवघ्या दिवसभर । करीत राहिला विचार ।
शेवटीं रात्र होतां तीन प्रहर । स्वप्न पडलें बाळकृष्णा ॥४५॥
बाळकृष्ण दिवसभर या चमत्काराचा विचार करत राहिला आणि रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात त्याला पुन्हा स्वप्न पडले.
अरे गजानन माझीच मूर्ति । हल्लीं तुमच्या वर्हाडप्रांतीं ।
संशय मुळीं ना धरी चित्तीं । तो धरितां बुडशील ॥४६॥
महाराज म्हणाले की गजानन हे माझेच रूप असून तू मनात कसलाही संशय धरू नकोस, अन्यथा तुझा घात होईल.
मी तोच समजून । करी गजाननाचें पूजन ।
गीतेचें हें आहे वचन । " संशयात्मा विनश्यति "॥४७॥
गजानन हे माझेच स्वरूप मानून त्यांचे पूजन कर, कारण गीतेत 'संशयी वृत्तीचा नाश होतो' असे स्पष्ट सांगितले आहे.
ऐसें स्वप्न पडल्यावरी । बाळकृष्ण तोषला भारी ।
मस्तक ठेविलें अत्यादरीं । गजाननाचें पायांवर ॥४८॥
असे स्वप्न पडताच बाळकृष्णाचे समाधान झाले आणि त्याने अत्यंत आदराने गजानन महाराजांच्या पायांवर मस्तक ठेवले.
महाराज आपुली लीला । मी ना समर्थ जाणण्याला ।
तो घोटाळा उकलिला । तुम्ही स्वप्न देऊन ॥४९॥
आपली लीला ओळखण्याचे सामर्थ्य माझ्यात नव्हते, पण आपणच स्वप्न देऊन माझा संभ्रम दूर केलात.
नवमी माझी सांग झाली । न्यूनता न कांहीं उरली ।
अर्भकावरी कृपा केली । तेणें धन्य झालों मी ॥१५०॥
माझी नवमी निर्विघ्नपणे पार पडली, काहीही उणे राहिले नाही आणि बालकावर कृपा केल्याने मी धन्य झालो.
आतां कांहीं दिवस । राहा या बाळपुरास ।
हीच आहे मनीं आस । ती पूर्ण करा हो ॥५१॥
आता काही दिवस आपण या बाळापुरात राहावे हीच माझी मनापासून इच्छा असून ती पूर्ण करावी.
महाराज म्हणाले त्यावर । ऐक माझा विचार ।
कांहीं दिवस गेल्यावर । येईन मी बाळापुरा ॥५२॥
त्यावर महाराज म्हणाले की, माझा विचार ऐक, मी काही दिवसांनी पुन्हा बाळापूरला येईन.
भोजनोत्तर निघून गेले । स्वामी शेगांवासी भले ।
रस्त्यानें न कोणा दिसले । क्षणांत पोंचलें शेगांवीं ॥५३॥
भोजन झाल्यावर महाराज कोणालाही न दिसता क्षणार्धात शेगावी निघून गेले.
स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
सुखद होवो भाविकांप्रत । हेंचि इच्छी दासगणू ॥१५४॥
दासगणू विरचित हा 'गजानन विजय' ग्रंथ भाविकांना सुख देणारा ठरो, हीच दासगणूंची सदिच्छा आहे.