नामधारक म्हणे सिद्धासी । गोकर्णीचा महिमा आम्हांसी ।
विस्तार करावा कृपेसी । पूर्वी कवणा वर जाहला ॥१॥
नामधारक सिद्धाला म्हणाला, 'गोकर्णाचा महिमा आम्हाला कृपा करून विस्ताराने सांगा. पूर्वी कोणाला वर मिळाला होता?'
समस्त तीर्थे सोडुनी । श्रीपाद गेले किंकारणी ।
पूर्वी आराधना केली कवणी । पुराण कथा सांग मज ॥२॥
'श्रीपाद सर्व तीर्थे सोडून (गोकर्णाला) का गेले? पूर्वी तेथे कोणी आराधना केली होती? ती पुराणकथा मला सांगा.'
ज्यावरी असेल गुरुची प्रीति । तीर्थ महिमा ऐकणे चित्ती ।
वांछा होतसे ज्ञानज्योती । कृपामूर्ति सिद्धराया ॥३॥
'ज्याच्यावर गुरुंची कृपा असते त्याला तीर्थमहिमा ऐकण्याची आवड असते. हे कृपामूर्ती सिद्धराया, मला ज्ञानज्योतीची इच्छा आहे.'
सिद्ध म्हणे नामधारकासी । गोकर्णमहिमा मज पुससी ।
सांगेन तुज विस्तारेसी । एकचित्ते ऐकावे ॥४॥
सिद्ध म्हणाला, 'तू मला गोकर्णाचा महिमा विचारतोस. मी तुला विस्ताराने सांगतो, एकाग्र चित्ताने ऐक.'
पूर्वयुगान्तरी इक्ष्वाकुवंशी । मित्रसह राजा परियेसीं ।
प्रतापवंत क्षत्रियवंशी । सर्वधर्मरत देखा ॥५॥
'पूर्वीच्या युगात इक्ष्वाकु वंशात मित्रसह नावाचा राजा होता. तो प्रतापी, क्षत्रिय आणि सर्व धर्म पाळणारा होता.'
राजा सकळशास्त्रज्ञ । विवेकी असे श्रुतिनिपुण ।
बलाढ्य शूर महाभिज्ञ । नित्योद्दोगी दयानिधि ॥६॥
तो राजा सर्व शास्त्रे जाणणारा, विवेकी, वेदात निपुण, बलवान, शूर, महाज्ञानी, सतत उद्योगी आणि दयाळू होता.
असतां राजा एके दिवशीं । विनोदें निघाला पारधीसी ।
प्रवेश जाहला अरण्यासी । वास सिंह-शार्दूलां ॥७॥
एके दिवशी राजा मौजेने शिकारीला निघाला आणि जंगलात शिरला, जेथे सिंह-वाघ राहतात.
निर्मनुष्य अरण्यांत । राजा पारधी खेळत ।
भेटला तेथे दैत्य अद्भुत । ज्वाळाकार भयानक ॥८॥
निर्जन जंगलात राजा शिकार करत असताना त्याला एक अद्भुत, आगीसारखा भयंकर दैत्य भेटला.
राजा देखोनि तयासी । शरजाळ वर्षे कोपेसी ।
मूर्छना येऊनि धरणीसी । पडिला दैत्य तये वेळीं ॥९॥
राजाने त्याला पाहून रागाने बाणांचा वर्षाव केला. मूर्च्छित होऊन तो दैत्य जमिनीवर पडला.
दैत्य वधितां तये वेळीं । होता त्याचा बंधु जवळी ।
आक्रंदतसे प्रबळी । बंधुशोकें करोनियां ॥१०॥
दैत्य मारला जाताना त्याचा भाऊ जवळच होता. भावाच्या दुःखाने तो खूप आक्रोश करू लागला.
प्राण त्यजितां निशाचरु । बंधूसी म्हणे येरु ।
तूं जरी होसील सहोदरु । सूड माझा घ्यावा ॥११॥
प्राण सोडताना तो राक्षस भावाला म्हणाला, 'तू खरा सख्खा भाऊ असशील तर माझा सूड घे.'
ऐसें बोलुनि बंधूसी । दैत्य पावला पंचत्वासी ।
अनेक माया तयापाशीं । नररुप धरिलें तया वेळीं ॥१२॥
असे सांगून दैत्य मरण पावला. त्याच्या भावाकडे अनेक मायावी विद्या होत्या, त्याने त्या वेळी मानवाचे रूप धारण केले.
रुप धरुनि मानवाचे । सौम्य वाणी बोले वाचें ।
सेवक जाहला राजयाचा । अतिनम्रत्वें बोलोनियां ॥१३॥
मानवाचे रूप घेऊन तो गोड वाणीने बोलू लागला आणि अत्यंत नम्रपणे राजाचा सेवक झाला.
सेवा करी नानापरी । जैसे स्वामीचें मनोहरी ।
ऐसें क्वचित् दिवसवरी । वनांतरीं राजा होता ॥१४॥
तो नाना प्रकारे सेवा करी, स्वामीला आवडेल तशी. असे काही दिवस राजा जंगलात राहिला.
समस्त मृग मारुनि । दुष्ट जीव छेदोनि ।
राजा आला परतोनि । आपुले नगरा परियेसा ॥१५॥
सर्व हरिण मारून आणि दुष्ट प्राणी मारून राजा आपल्या नगरात परत आला.
ऐसे क्रमितां एके दिवशी । पितृश्राद्ध आलें परियेसीं ।
आमंत्रण सांगे त्या ऋषींसी । वसिष्ठादि मुनिवरां ॥१६॥
असे दिवस जात असताना एके दिवशी पितृश्राद्धाचा दिवस आला. त्याने वसिष्ठ आदी श्रेष्ठ ऋषींना आमंत्रण दिले.
ते दिनी नियमें स्वयंपाक । करवी राजा सविवेक ।
कपटी होता जो सेवक । तया स्थानीं ठेविला ॥१७॥
त्या दिवशी राजाने नियमाने स्वयंपाक करवला. जो कपटी सेवक होता, त्याला त्याने त्या जागी ठेवले.
राजा म्हणे त्यासी । पाकस्थानीं तू वससी ।
जें जें मागतील माणवसीं । सर्व आणूनि त्वां द्यावें ॥१८॥
राजा त्याला म्हणाला, 'तू स्वयंपाकघरात राहा. ब्राह्मण जे जे मागतील ते सर्व तू आणून द्यावेस.'
अंगीकारोनि तो सेवक । नरमांस आणोनि देख ।
कापट्यभावें करवी पाक । केली शाक तया वेळीं ॥१९॥
तो सेवक मान्य करून मानवाचे मांस आणून कपटाने स्वयंपाक करवू लागला आणि तेच शिजवून भाजी केली.
ठाय घालितां ऋषेश्र्वरांसी । पहिलेंच वाढिलें नरमांसासी ।
पाहतांचि कोपला वसिष्ठ ऋषि । दिधला शाप तये वेळीं ॥२०॥
ऋषींसाठी पाट मांडले आणि पहिलेच नरमांस वाढले. ते पाहताच वसिष्ठ ऋषी रागावले आणि त्यांनी शाप दिला.
वसिष्ठ म्हणे रायास । नरमांस वाढिलें आम्हांस ।
त्वरित हो गा ब्रह्मराक्षस । म्हणोनि कोपे तयावेळीं ॥२१॥
वसिष्ठ राजाला म्हणाले, 'तू आम्हाला नरमांस वाढलेस, म्हणून तू लगेच ब्रह्मराक्षस हो!' असे ते रागाने म्हणाले.
शाप देतांचि तयेवेळीं । राजा कोपला अति प्रबळी ।
अपराध नसतां आम्हांजवळी । वायां शापिलेति कां ॥२२॥
शाप देताच राजा अत्यंत रागावला. 'आमचा काहीही अपराध नसताना तुम्ही आम्हाला वाया का शापिलेत?'
नेणें मांसपाक कवणें केला । माझा निरोप नाहीं झाला ।
वृथा आमुतें शाप दिधला । आपण शापीन म्हणतसे ॥२३॥
'मांस कोणी शिजवले ते मला माहीत नाही, माझी आज्ञा नव्हती. तुम्ही विनाकारण आम्हाला शाप दिला, मी तुम्हाला शाप देतो,' असे तो म्हणाला.
उदक घेऊनि अंजुळीं । शापावया सिद्ध झाला तये काळी ।
तंव राजस्त्री येऊनि जवळी । वर्जिती जाहली पतीसी ॥२४॥
राजा हातात पाणी घेऊन शाप द्यायला तयार झाला. तेव्हा राणीने जवळ येऊन पतीला थांबवले.
पतीसी म्हणे ते नारी । गुरुसी शापितां दोष भारी ।
वंदूनि त्याचे चरण धरीं । तेणें तरशील भवसागर ॥२५॥
ती पतीला म्हणाली, 'गुरूला शाप दिल्यास मोठा दोष लागतो. त्यांच्या चरणांना नमस्कार करा, त्याने तुम्ही भवसागर तराल.'
‘मदयंती’ सतीचे वचन । मानिता झाला राजा आपण ।
अंजुळीं उदक होतें जाण । पाडिलेम आपुले चरणावरी ॥२६॥
'मदयंती' या सतीचे वचन राजाने मान्य केले. ओंजळीतील पाणी त्याने स्वतःच्या पायांवर पाडले.
शाप देता कल्मषपाणी । पडलें राजयाचे चरणीं ।
‘कल्माषपाद’ नाम म्हणोनि । ब्रह्मराक्षस झाला तो राव ॥२७॥
शापाचे पाणी (कल्मष) पायावर पडल्याने राजाचे नाव 'कल्माषपाद' झाले आणि तो ब्रह्मराक्षस झाला.
पतिव्रता राजमहिषी । लागली वसिष्ठचरणांसी ।
उद्धरी स्वामी बाळकासी । एवढा कोप काय कीजे ॥२८॥
पतिव्रता राणी वसिष्ठांच्या चरणी लागली आणि म्हणाली, 'स्वामी, या बाळाचा उद्धार करा. इतका राग का?'
करुणावचन ऐकोनि । शांत झाला वसिष्ठ मुनि ।
वर्षें बारा क्रमोनि । पुनरपि राजा होईल ॥२९॥
तिचे करुणेचे बोलणे ऐकून वसिष्ठ मुनी शांत झाले आणि म्हणाले, 'बारा वर्षे गेल्यावर तो पुन्हा राजा होईल.'
उःशाप देऊनि वसिष्ठ ऋषि । गेला आपुले ठायासी ।
ब्रह्मराक्षस राजा परियेसीं । होउनी गेला वनांतरा ॥३०॥
असा उःशाप देऊन वसिष्ठ ऋषी आपल्या स्थानी गेले आणि राजा ब्रह्मराक्षस होऊन वनात निघून गेला.
निर्मनुष्य अरण्यांत । राक्षस राहिला प्रख्यात ।
भक्षण करी अनेक जंत । पशुपक्षिमनुष्यादिकरुन ॥३१॥
निर्मनुष्य जंगलात तो राक्षस प्रसिद्ध झाला. तो पशू, पक्षी आणि मनुष्य अशा अनेक जीवांना खाऊ लागला.
ऐसें क्रमितां तये वनीं । मार्गस्थ दंपत्यें दोनी ।
ब्राह्मणजाती मार्ग क्रमूनि । देखिला राक्षस भयासुर ॥३२॥
असे दिवस जात असताना त्या वनात एक पती-पत्नीची जोडी वाट चालत आली. ब्राह्मण जातीचे ते दोघे होते. त्यांनी एक भयंकर राक्षस पाहिला.
येऊनि धरिलें ब्राह्मणासी । व्याघ्र जैसा पशूसी ।
घेऊनि गेला भक्षावयासी । विप्रस्त्री जाय समागमे ॥३३॥
वाघ जसा पशूला पकडतो तसा त्याने त्या ब्राह्मणाला पकडले आणि खाण्यासाठी घेऊन गेला. ब्राह्मणाची पत्नी त्याच्या मागे गेली.
अतिशोक करीतसे ते ब्राह्मणी । जाऊनि लागे राक्षसाचरणी ।
राखे मजला अहेवपणीं । प्राणेश्र्वरासी सोडी पां ॥३४॥
ती ब्राह्मणी खूप शोक करू लागली आणि राक्षसाच्या पाया पडून म्हणाली, 'मला सौभाग्यवती राहू दे. माझ्या पतीला सोड.'
न भक्षी माझा पति । माझी प्राणेश्र्वरी प्रीति ।
माते भक्षीं गा सुखवृत्तीं । वल्लभातें सोडी पां ॥३५॥
'माझ्या पतीला खाऊ नको. माझे प्राणप्रिय पती आहेत. मला सुखाने खा, पण माझ्या पतीला सोड.'
पतीविणें राहती नारी । जन्म वृथा दगडापरी ।
पहिलें मातें स्वीकारी । प्राण राखे पतीचा ॥३६॥
'पतीशिवाय राहणाऱ्या स्त्रीचा जन्म दगडासारखा वृथा आहे. मला आधी घे आणि पतीचे प्राण राख.'
अति लावण्य पूर्ववयेसीं । वेदशास्त्र-पारगासी ।
याचा प्राण तूं रक्षिसी । जगदूरक्षिलें पुण्य तुज ॥३७॥
'हा अतिशय सुंदर, तरुण आणि वेदशास्त्र जाणणारा आहे. याचे प्राण तू वाचवलेस तर तुला जगाचे रक्षण केल्याचे पुण्य मिळेल.'
कृपा करी गा आम्हांवरी । होईन तुझी कन्याकुमारी ।
मज पुत्र होतील जरी । नाम ठेवीन तुझेचि ॥३८॥
'आमच्यावर कृपा कर. मी तुझी मुलगी होईन. मला पुत्र झाले तर मी त्यांना तुझेच नाव देईन.'
ऐसे नानापरी देखा । विप्रस्री करी महादुःखा ।
बोल न मानितां राक्षसे ऐका । त्या ब्राह्मणाते भक्षिले ॥३९॥
अशा प्रकारे ब्राह्मणीने खूप दुःखाने विनवले, तरी राक्षसाने तिचे बोलणे न ऐकता त्या ब्राह्मणाला खाल्ले.
पतीसि भक्षिले देखोनि । शाप दिधला ते ब्रह्मणीं ।
म्हणे राक्षसा ऐक कानीं । शाप माझा एकचित्ते ॥४०॥
पतीला खाल्लेले पाहून त्या ब्राह्मणीने शाप दिला, 'हे राक्षसा, माझा शाप एकाग्रतेने ऐक.'
तूं राजा सूर्यवंशी । शापास्तव राक्षस झालासी ।
पुढें-मागुतीं राजा होसी । द्वादश वर्षे क्रमोनियां ॥४१॥
'तू सूर्यवंशी राजा होतास, शापामुळे राक्षस झालास. बारा वर्षे गेल्यावर तू पुन्हा राजा होशील.'
परी रमतां तुवां स्रियेसवें । प्राण जाईल स्वभावें ।
आम्हां अनाथा भक्षिसी दुष्ट भावें । दुरात्मया तूं राक्षसा ॥४२॥
'पण तू स्त्रीशी रममाण होशील तेव्हा तुझा प्राण जाईल, कारण तू आम्हा अनाथांना दुष्ट भावाने खाल्लेस, दुष्टा राक्षसा.'
शाप देऊनि तये वेळीं । पतीच्या अस्थि मिळवूनि सकळी ।
काष्ठें घालूनियां प्रबळी । अग्निप्रवेश केला तिणें ॥४३॥
असा शाप देऊन तिने पतीच्या अस्थी गोळा केल्या, लाकडे रचली आणि स्वतः अग्नीत प्रवेश केला.
ऐसें असतां राजा देखा । क्रमिली तेथ बारा वर्षां ।
पुनरपि राजा होऊनि ऐका । आला आपुले नगरासी ॥४४॥
असे बारा वर्षे गेली. राजा पुन्हा मनुष्य होऊन आपल्या नगरात परत आला.
विप्रस्रियेचे शापवचन । स्रियेसी सांगे ते खूण ।
रतिसंगति करितांक्षण । मृत्यु असे आपणासी ॥४५॥
ब्राह्मणीचा शापवचन त्याने पत्नीला सांगितले, 'स्त्रीसंगाच्या क्षणी मला मृत्यू येईल.'
ऐकोनि पतीचे वचन । मदयंती दुःख करी आपण ।
मन करूनि निर्वाण । त्यजूं प्राण म्हणतसे ॥४६॥
पतीचे वचन ऐकून मदयंतीला दुःख झाले. तिने मन निर्धाराने करून 'मी प्राण सोडते' असे म्हटले.
मदयंती म्हणे रायासी । संतान नाहीं तुम्हांसी ।
आतां कष्टला बारा वर्षी । प्रारब्ध आपुले न चुकेचि ॥४७॥
मदयंती राजाला म्हणाली, 'तुम्हाला संतान नाही. बारा वर्षे कष्ट सोसले, पण आपले प्रारब्ध चुकत नाही.'
ऐकोनि सतीचे वचन । शोक दाटला अतिगहन ।
बाष्पें निघती लोचनीं । केवी करु म्हणतसे ॥४८॥
सतीचे बोलणे ऐकून राजाला खूप शोक झाला. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि 'मी काय करू?' असे तो म्हणाला.
मंत्रीवृद्धपुरोहितांसी । बोलाविता झाला परियेसीं ।
ब्रह्महत्या घडली आपणासीं । विमोचन होय कवणेपरीं ॥४९॥
त्याने मंत्री, वृद्ध आणि पुरोहितांना बोलावले, 'मला ब्रह्महत्या घडली आहे, यातून सुटका कशी होईल?'
मंत्री वृद्ध पुरोहित । रायासी म्हणती ऐक मात ।
तीर्थे आचरावीं समस्त । तेणे पुनीत होशील ॥५०॥
मंत्री, वृद्ध आणि पुरोहित राजाला म्हणाले, 'ऐका, सर्व तीर्थे करा, त्याने तुम्ही शुद्ध व्हाल.'
ऐसा करोनि विचारु । राजा निघे तीर्थ आचरूं ।
सकळ तीर्थ परिकरु । विधिपूर्वक करीतसे ॥५१॥
असा विचार करून राजा तीर्थयात्रेला निघाला. त्याने सर्व तीर्थे विधीपूर्वक केली.
जे जे तीर्था जाय आपण । अनेक पुण्य करी जाण ।
यज्ञादि कर्म, ब्राह्मण- । जना अन्नदान करीतसे ॥५२॥
जेथे जेथे तो जाई तेथे तो अनेक पुण्यकर्मे, यज्ञ आणि ब्राह्मणांना अन्नदान करी.
ऐसी नाना तीर्थे करीत । ब्रह्महत्या सवे असे येत ।
अघोररुपें असे दिसत । नवचे कवणेपरी देखा ॥५३॥
असे नाना तीर्थे करताना ब्रह्महत्या त्याच्याबरोबर येत होती. ती भयंकर रूपात दिसे आणि कोणत्याही प्रकारे जात नव्हती.
कष्टोनि राजा बहुतांपरी । निर्वाण होऊनि मनाभितरीं ।
हिंडत पातला मिथिलापुरीं । चिंताक्रांत होऊनियां ॥५४॥
राजा खूप कष्टाने, निराश होऊन आणि चिंतेने ग्रासून फिरत फिरत मिथिला नगरीला पोहोचला.
नगरा-बाह्य प्रदेशीं । श्रमोनि राजा परियेसीं ।
चिंतीतसे मानसीं । वृक्षच्छाये बैसोनियां ॥५५॥
नगराच्या बाहेरच्या प्रदेशात थकलेला राजा झाडाच्या सावलीत बसून मनात विचार करत होता.
तंव ऋषेश्र्वरांसमवेत । जैसा रुद्र प्रकाशित ।
गौतम-ऋषेश्र्वर ख्यात । अवचित तेथें पातला ॥५६॥
तेवढ्यात रुद्रासारखे तेजस्वी, ऋषींसह प्रसिद्ध असे गौतम ऋषी अचानक तेथे पोहोचले.
देखोनि राजा गौतमासी । चरणीं लोळे संतोषी ।
नमन करी अति हर्षी । भक्तिभावें करोनियां ॥५७॥
राजाने गौतमांना पाहून आनंदाने चरणी लोळण घेतली आणि भक्तिभावाने नमस्कार केला.
आश्र्वासूनि तये वेळीं । गौतम पुसे करुणा-बहाळी ।
क्षेमसमाधान सकळी । पुसता झाला वृतांत ॥५८॥
त्या वेळी गौतमांनी त्याला धीर देऊन करुणेने सर्व क्षेमकुशल आणि वृत्तांत विचारला.
काय झाले तुझे राज्य । अरण्यवासी कवण काज ।
चिंताव्याकुळ मुखांबुज । कवण कार्य घडले असे ॥५९॥
'तुझे राज्य काय झाले? तू अरण्यात का राहतोस? तुझ्या चेहऱ्यावर चिंता का आहे? कोणते कार्य घडले?'
ऐकोनि ऋषेश्र्वराचे वचन । राजा सांगे विस्तारोन ।
शाप जाहला ब्राह्मणवचन । ब्रह्महत्या घडली मज ॥६०॥
ऋषींचे बोलणे ऐकून राजा सविस्तर सांगू लागला, 'मला ब्राह्मणाचा शाप झाला. ब्रह्महत्या घडली आहे.'
प्रायश्र्चितादि सकळिक । यज्ञादि सर्व धर्मादिक ।
समस्त तीर्थे क्षेत्रें सुखे । आचरली आपण देखा ॥६१॥
'प्रायश्चित्त आदी सर्व, यज्ञ आदी सर्व धर्मकृत्ये आणि सर्व तीर्थे व क्षेत्रे मी केली आहेत.'
शमन न होय माझा दोष । सवेंचि येतसे अघोर वेष ।
व्रते आचरलों कोटिश । न वचे दोष परियेसा ॥६२॥
'तरीही माझा दोष शमत नाही. तो भयंकर वेषात माझ्याबरोबर येतोच. कोट्यवधी व्रते केली, तरी दोष जात नाही.'
आजि माझा सफळ जन्म । दर्शन झालें तुझे चरण ।
होतील माझे कष्ट निवारण । म्हणोनि चरणीं लागला ॥६३॥
'आज माझा जन्म सफल झाला कारण तुमचे चरणदर्शन झाले. माझे कष्ट आता दूर होतील,' असे म्हणून तो चरणी लागला.
ऐकोनि रायाचे वचन । करुणासागर गौतम आपण ।
भय सांडी गा निर्वाण वचन । तारील शंकर मृत्युंजय ॥६४॥
राजाचे बोलणे ऐकून करुणासागर गौतम म्हणाले, 'भय सोड. मृत्युंजय शंकर तुला तारील.'
तुझे पापनिवारणासी । सांगेन तीर्थविशेषीं ।
महापातक संहारासी । गोकर्ण-म्हणिजे स्थान असे ॥६५॥
'तुझ्या पापनिवारणासाठी मी विशेष तीर्थ सांगतो. महापापांचा नाश करणारे 'गोकर्ण' नावाचे स्थान आहे.'
स्मरण करितां गोकर्णासी । ब्रह्महत्यादि पाप नाशी ।
ईश्र्वर तेथे सदा निवासी । मृत्युंजय सदाशिव ॥६६॥
'गोकर्णाचे स्मरण केल्याने ब्रह्महत्या आदी पाप नाश पावते. तेथे मृत्युंजय सदाशिव सदैव निवास करतो.'
जैसे कैलासीचें शिखर । अथवा मूर्धिमंदर ।
निश्र्चय वास कर्पूरगौर । गोकर्णक्षेत्री परियेसा ॥६७॥
'जसे कैलासाचे शिखर किंवा सुमेरू पर्वत, तसेच निश्चितपणे कर्पूरगौर शिवाचा वास गोकर्ण क्षेत्री आहे.'
रात्रि असतां अंधकारोनि । उजेड नव्हे त्या अग्नी ।
चंद्रोदये नव्हे निर्वाणी । तयाभास्करावांचून ॥६८॥
'रात्री अंधार असताना अग्नीने उजेड होत नाही, चंद्रोदयानेही होत नाही, सूर्याशिवाय तो अंधार जात नाही.'
तैसे समस्त तीर्थानें । पापें न जाती त्याचे गुणें ।
सूर्योदयी तम हरणे । तैसे गोकर्णदर्शनमात्रें होय ॥६९॥
'तसे सर्व तीर्थांनी पापे जात नाहीत. सूर्योदयाने अंधार जातो तसा गोकर्णाच्या दर्शनानेच तो नाश पावतो.'
सहस्र ब्रह्महत्या जरी । घडल्या असतील या शरीरीं ।
प्रवेश होतां गोकर्णक्षेत्री । शुद्धात्मा होय परियेसा ॥७०॥
'हजार ब्रह्महत्या या शरीराकडून घडल्या असतील, तरी गोकर्ण क्षेत्रात प्रवेश केल्यावर माणूस शुद्ध होतो.'
इंद्रोपेंद्रविरिंचि देखा । जाऊनि तया स्थानी ऐका ।
तप केले हो सकळिका । काम्यसिद्धि व्हावया गति ॥७१॥
'इंद्र, विष्णू आणि ब्रह्मदेव यांनीही त्या ठिकाणी जाऊन तप केले, आपली इच्छित सिद्धी मिळवण्यासाठी.'
भक्तिपूर्वक तया स्थानीं । जप व्रत करिती जाण ।
फळ होय लक्षगुण । ऐसे पुण्यक्षेत्र असे ॥७२॥
'त्या स्थानी भक्तीने जप-व्रत केल्यास त्याचे फळ लक्षपटीने मिळते. असे हे पुण्यक्षेत्र आहे.'
जेथे ब्रह्मा विष्णु देखा । इंद्रादि देवगण सकळिकां ।
साध्य झाले तप ऐका । यावेगळे काय सांगूं ॥७३॥
'जेथे ब्रह्मा, विष्णू, इंद्र आदी देवगणांचे तप सिद्ध झाले, यापेक्षा आणखी मी काय सांगू?'
जाणा तो साक्षात ईश्र्वर । गोकर्णक्षेत्र कैलासपुर ।
प्रतिष्ठा करी विघ्नेश्र्वर । विष्णुनिरोपें विनयार्थ ॥७४॥
'गोकर्ण क्षेत्र हे साक्षात ईश्वर आहे, कैलासपूरच आहे. विष्णूच्या आज्ञेने विघ्नेश्वराने तेथे प्रतिष्ठा केली.'
समस्त देव तेथे येती । पुण्यक्षेत्रीं वास करिती ।
ब्रह्मा विष्णु इंद्रासहिती । विश्र्वेदेव मरुद्गण ॥७५॥
'सर्व देव तेथे येतात आणि पुण्यक्षेत्रात वास करतात, ब्रह्मा, विष्णू, इंद्र, विश्वेदेव आणि मरुद्गणांसह.'
सूर्य-चंद्र-वसु आदिक । ‘पूर्वद्वारीं’ राहिले ऐक ।
प्रीतिकरें भक्तिपूर्वक । वसताति तये स्थानीं ॥७६॥
'सूर्य, चंद्र आणि वसू आदी देव 'पूर्वद्वारी' राहिले. ते प्रेमाने आणि भक्तीने त्या ठिकाणी वास करतात.'
अग्नि यम चित्रगुप्त । एकादश रुद्र पित्र ।
‘दक्षिणद्वारीं’ वास करित । अति संतोषें राहिले असती ॥७७॥
'अग्नी, यम, चित्रगुप्त, अकरा रुद्र आणि पितर 'दक्षिणद्वारी' वास करतात आणि आनंदाने राहतात.'
वरुणादिसहित गगा सकळें । ‘पश्र्चिमद्वारीं’ वास जाहले ।
प्रीतिकरीं चंद्रमौळे । वास केला परियेसा ॥७८॥
'वरुण आणि गंगा आदी 'पश्चिमद्वारी' राहिले आणि चंद्रमौळी (शिव) प्रेमाने तेथे राहिले.'
कुबेर वायु भद्रकाळी । मातृदेवता चंडी सकळी ।
‘उत्तरद्वारीं’ वास त्रिकाळीं । पूजा करिती महाबळेश्र्वराची ॥७९॥
'कुबेर, वायू, भद्रकाली, मातृदेवता आणि चंडी हे सर्व 'उत्तरद्वारी' तिन्ही काळी राहून महाबळेश्वराची पूजा करतात.'
चित्ररथादि विश्र्वावसु । चित्रसेन गंधर्व सुरसु ।
पूजा करिती महेशु । सदा वसोनि तये ठायीं ॥८०॥
'चित्ररथ, विश्वावसू, चित्रसेन असे गंधर्व नेहमी त्या ठिकाणी राहून महेशाची पूजा करतात.'
घृताची रंभा मेनका । तिलोत्तमा उर्वशी ऐका ।
नित्य नृत्य करिती सुखा । महाबळेश्र्वरा सन्मुख ॥८१॥
'घृताची, रंभा, मेनका, तिलोत्तमा आणि उर्वशी (अप्सरा) महाबळेश्वरासमोर रोज आनंदाने नृत्य करतात.'
वसिष्ठ कश्यप कण्व ऋषि । विश्र्वामित्र महातापसी ।
भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषि । पूजा करिती सदा तेथें ॥८२॥
'वसिष्ठ, कश्यप, कण्व, विश्वामित्र, भरद्वाज, जैमिनी आणि जाबाल ऋषी तेथे नेहमी पूजा करतात.'
ऋतु अंगिरस ब्रह्मऋषि । आचार करिती महातापसी ।
महाबळेश्र्वराचे भक्तिसी । राहिले गोकर्णक्षेत्रांत ॥८३॥
'क्रतू, अंगिरस आणि ब्रह्मर्षी हे महातपस्वी आचार पाळतात. ते महाबळेश्वराच्या भक्तीसाठी गोकर्ण क्षेत्रात राहिले.'
मरीची नारद अत्रिऋषि । दक्षादि सकल ब्रह्म-मुनि परियेसीं ।
सनदादिक तापसी । उपनिषदाचें उपासिती ॥८४॥
'मरीची, नारद, अत्री, दक्ष आदी सर्व ब्रह्ममुनी आणि सनकादिक तपस्वी उपनिषदाची उपासना करतात.'
अनेक सिद्ध साध्य जाण । मुनीश्र्वर अजिनधारण ।
दंडधारी संन्यासी निर्गुण । ब्रह्मचारी तेथें वसती ॥८५॥
'अनेक सिद्ध, साध्य, मुनीश्वर जे अजिन (कृष्णाजिन) धारण करतात, दंडधारी संन्यासी आणि ब्रह्मचारी तेथे राहतात.'
त्वगस्थिमात्रशरीरेसीं । अनुष्ठिती महातापसी ।
पूजा करिती भक्तिसीं । चंद्रमौळीची परियेसा ॥८६॥
'ज्यांचे शरीर फक्त हाडे आणि कातडे उरले आहे असे महातपस्वी तेथे अनुष्ठान करतात आणि चंद्रमौळी शिवाची पूजा भक्तीने करतात.'
गंधर्वादि समस्त देव । पितर सिद्ध अष्टवसव ।
विद्याधर किंपुरुष सर्व । सेवेसी जाती निरंतर ॥८७॥
'गंधर्व आदी देव, पितर, सिद्ध, अष्टवसू, विद्याधर आणि किंपुरुष सर्व निरंतर सेवेसाठी येतात.'
गुह्यक किन्नर स्वर्गलोक । शेषादि नाग तक्षक ।
पिशाच वेताळ सकळिक । जाती पूजे तया स्थानीं ॥८८॥
'गुह्यक, किन्नर, स्वर्गलोकातील देव, शेष आदी नाग, तक्षक, पिशाच आणि वेताळ हे सर्व त्या ठिकाणी पूजेसाठी येतात.'
नाना श्रृंगार करुनि आपण । अनेक भूषणे विराजमान ।
सूर्यसंकाश विमान । वाहने येती देवगण ॥८९॥
'नाना शृंगार करून आणि अनेक भूषणे घालून, सूर्यासारख्या तेजस्वी विमानांत देवगण वाहनांवर येतात.'
स्तोत्रगायनें करिती देखा । नमिती नृत्य करिती अनेका ।
पूजेकारणे येती सकळिका । महाबळेश्र्वरलिंगापाशी ॥९०॥
'ते स्तोत्रे गातात, नमस्कार करतात आणि अनेक नृत्ये करतात. सर्व जण पूजेसाठी महाबळेश्वराच्या लिंगाजवळ येतात.'
जे जे इच्छिती मनकामना । पावे त्वरित निर्धारे जाणा ।
समान नाही क्षेत्र गोकर्णा । या ब्रह्मांडगोलकांत ॥९१॥
'जी जी इच्छा मनात असेल ती लगेच निश्चित पूर्ण होते. या ब्रह्मांडात गोकर्णासारखे क्षेत्र दुसरे नाही.'
अगस्त्यादि सनत्कुमार । प्रियव्रतादि राजकुमार ।
अग्निदेव कंदर्प येर । वर लाधले तया ठायीं ॥९२॥
'अगस्त्य, सनत्कुमार, प्रियव्रत आदी राजकुमार, अग्निदेव, कंदर्प (कामदेव) आणि इतरांना तेथे वर मिळाले.'
शिशुमारी भद्रकाळी । पूजा करिती त्रिकाळीं ।
मणिनागातें गरुड न गिळी । महाबळेश्र्वरदर्शने ॥९३॥
'शिशुमारी आणि भद्रकाली तिन्ही काळी पूजा करतात. महाबळेश्वराच्या दर्शनाने गरुडही मणिनागाला गिळत नाही.'
रावणादि राक्षसकुळ । कुंभकर्ण येर सकळ ।
वर लाधले केवळ । बिभीषण पूजीतसे ॥९४॥
'रावण आदी राक्षसकुळ, कुंभकर्ण आणि इतर सर्वांना वर मिळाले. बिभीषण तेथे पूजा करतो.'
ऐसे समस्त देवकुळ । सिद्धदानवादि सकळ ।
गोकर्णक्षेत्रा जाऊनि प्रबळ । आराधिती नानापरी ॥९५॥
'असे सर्व देवकुळ, सिद्ध, दानव सगळे बलवान होऊन गोकर्ण क्षेत्री जाऊन नाना प्रकारे आराधना करतात.'
लिंग स्थापिती आपुले नामी । असंख्यात नामोनामीं ।
वर लाधले होते कामी । चतुर्विध पुरुषार्थ ॥९६॥
'त्यांनी आपल्या नावाने लिंगे स्थापली आणि अनेकांना इच्छित वर मिळाले आणि चारही पुरुषार्थ प्राप्त झाले.'
ब्रह्मा विष्णु आपण देखा । कार्तवीर्य विनायका ।
आपुले नामी लिंग ऐका । प्रतिष्ठा केली तये ठायी ॥९७॥
'ब्रह्मा, विष्णू, कार्तवीर्य, विनायक यांनीही आपल्या नावाने लिंग स्थापित करून त्या जागी प्रतिष्ठा केली.'
धर्मक्षेत्रपाळादि । दुर्गादिदेवशक्तिवृंदी ।
लिंग स्थापिती आपुले आदी । तया गोकर्णक्षेत्रांत ॥९८॥
'धर्म, क्षेत्रपाल, दुर्गा आदी देवी-शक्तींच्या समूहांनी तेथे आपापली लिंगे स्थापली.'
गोकर्णक्षेत्र असे गहन । लिंग तीर्थे असंख्यात जाण ।
पदिपदी असती निर्गुण । ऐसे क्षेत्र अनुपम्य ॥९९॥
'गोकर्ण क्षेत्र गहन आहे. तेथे असंख्य लिंगे आणि तीर्थे आहेत. पावलोपावली निर्गुणाचे वास आहे. असे हे अनुपम क्षेत्र आहे.'
सांगो किती त्याची खूण । असंख्यात तीर्थे जाण ।
पाषाण समस्त लिंग सगुण । तीर्थ जाण समस्त उदकें ॥१००॥
'त्याची खूण किती सांगू? तेथे असंख्य तीर्थे आहेत. सर्व दगड सगुण लिंग आहेत आणि सर्व पाणी तीर्थ आहे.'
कृतायुगीं महाबळेश्र्वर श्र्वेत । त्रेतायुगी दिसे लोहित ।
द्वापारी रुप पीत । कलियुगी कृष्णवर्ण जाणा ॥१०१॥
'सत्ययुगात महाबळेश्वर पांढरा, त्रेतायुगात लाल, द्वापारात पिवळा आणि कलियुगात काळा दिसतो.'
सप्त खोलीवेन । उभे असे लिंग आपण ।
कलियुगी मृदु होऊन । दिसे सूक्ष्मरुपानें ॥१०२॥
'ते लिंग सात खोल (पाताळापर्यंत) स्वतः उभे आहे. कलियुगात ते मृदू होऊन सूक्ष्म रूपाने दिसते.'
पश्र्चिम समुद्रतीरेसी । गोकर्ण-तीर्थ उत्तमेसी ।
ब्रह्महत्यादि पाप नाशी । काय आश्र्चर्य परियेसा ॥१०३॥
'पश्चिम समुद्रकिनारी गोकर्ण हे उत्तम तीर्थ आहे. ते ब्रह्महत्या आदी पापे नाहीशी करते, यात काय आश्चर्य?'
ब्रह्महत्यादि पंच महापापें । परद्वारादि दुष्ट पापें ।
दुःशील दुराचारी पापें । जाती गोकर्ण-महाबळेश्र्वर दर्शने ॥१०४॥
'ब्रह्महत्या आदी पाच महापापे, परस्त्रीगमन आदी दुष्ट पापे, दुराचारी आणि दुःशील पापेही गोकर्णातील महाबळेश्वराच्या दर्शनाने जातात.'
दर्शनमात्रे पुनीत होती । समस्त काम्यार्थ साधिती ।
अंती होय त्यांसी गति । गोकर्णलिंगदर्शनमात्रें ॥१०५॥
'केवळ दर्शनाने ते पवित्र होतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. शेवटी गोकर्ण लिंगाच्या दर्शनानेच त्यांना सद्गती मिळते.'
तया स्थानी पुण्यदिवशीं । जे अर्चिती भक्तीसी ।
तेचि जाणा रुद्रवंशी । रायासी म्हणे गौतम ॥१०६॥
'त्या स्थानी पुण्य दिवशी जे भक्तीने पूजा करतात तेच रुद्राच्या वंशातले आहेत,' असे गौतम राजाला म्हणाला.
एखादे समयीं गोकर्णासी । जाय भक्तीनें मानुषी ।
पूजा करितां सदाशिवासी । ब्रह्म-पद तो पावें जाणा ॥१०७॥
'एखाद्या प्रसंगी जो मनुष्य भक्तीने गोकर्णाला जातो आणि सदाशिवाची पूजा करतो, तो ब्रह्मपद मिळवतो.'
आदित्य-सोम-बुधवारीं । अमावास्यादि पर्वांभीतरी ।
स्नान करुनि समुद्रीं । दानधर्म करावा ॥१०८॥
'रविवार, सोमवार, बुधवार आणि अमावास्या आदी पर्वांत समुद्रात स्नान करून दानधर्म करावा.'
शिवपूजा व्रत होम हवन । जप ब्राह्मणसंतर्पण ।
किंचित् करितां अनंत पुण्य । म्हणे गौतम रायासी ॥१०९॥
'शिवपूजा, व्रत, होम-हवन, जप आणि ब्राह्मणांना भोजन थोडेसे जरी केले तरी अनंत पुण्य मिळते,' असे गौतम राजाला म्हणाला.
व्यतीपातादि पर्वणीसी । सूर्यसंक्रांतीचे दिवशीं ।
महाप्रदोष त्रयोदशीसी । पूजितां पुण्य अगम्य ॥११०॥
'व्यतीपात आदी पर्वणी, सूर्यसंक्रांती, महाप्रदोष आणि त्रयोदशीला पूजा केल्यास अपार पुण्य मिळते.'
काय सांगू त्याची महिमा । वर लाधलें अखिल कामा ।
ईश्र्वर भोळा अनंत महिमा । पुन्यमार्गे तुष्टतसे ॥१११॥
'त्याचा महिमा काय सांगू? सर्व इच्छा पूर्ण होतात. ईश्वर भोळा आहे आणि अनंत महिमा असलेला तो पुण्यमार्गाने संतुष्ट होतो.'
असितपक्ष माघामासी । शिवरात्रि चतुर्दशीं ।
बिल्वपत्र वाहिल्यासी । दुर्लभ असे त्रिभुवनांत ॥११२॥
'माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात महाशिवरात्री चतुर्दशीला बिल्वपत्र वाहिले तर ते तिन्ही लोकांत दुर्लभ आहे.'
ऐसे अनुपम्य स्थान असतां । नवजाती मूर्ख ऐकतां ।
शिवतिर्थी असे दुर्लभता । नेणती मूढ बधिर जाणा ॥११३॥
'असे अनुपम स्थान असूनही नवजात, मूर्ख, बहिरे असे अज्ञानी लोक ऐकत नाहीत आणि शिवतीर्थाची दुर्लभता जाणत नाहीत.'
उपोषणादि जागरण । लिंग संनिध गोकर्ण ।
स्वर्गासि जावया सोपान- । पद्धति असे परियेसा ॥११४॥
'उपवास, जागरण आणि लिंगाजवळचे गोकर्ण ही स्वर्गाला जाण्याची पायरीच आहे.'
ऐसे या गोकर्णस्थानासी । जे जन जाती यात्रेसी ।
चतुर्विध पुरुषार्थांसी । लाधे लोक अवधारीं ॥११५॥
'असे या गोकर्ण स्थानी जे लोक यात्रेला जातात, त्यांना चारही पुरुषार्थ मिळतात.'
स्नान करुनि समस्त तीर्थीं । महाबळेश्र्वरलिंगार्थी ।
पूजा करावी भक्त्यर्थीं । पातकाव्यतिरिक्त होय जाणा ॥११६॥
'सर्व तीर्थांत स्नान करून महाबळेश्वर लिंगाची भक्तीने पूजा करावी, म्हणजे माणूस पापमुक्त होतो.'
ऐशापरि गोकर्णमहिमा । प्रकाश केला ऋषी-गौतमा ।
राजा ऐकोनि अतिप्रेमा । पुसता झाला तये वेळीं ॥११७॥
अशा प्रकारे ऋषी गौतमांनी गोकर्णाचा महिमा सांगितला. ऐकून राजा अत्यंत प्रेमाने त्या वेळी विचारू लागला.
राजा म्हणे गौतमासी । गोकर्णस्थान-महिमा निरोपिलासी ।
पूर्वी कवण कवणासी । साक्षी झाली असेल कीं ॥११८॥
राजा गौतमांना म्हणाला, 'तुम्ही गोकर्ण स्थानाचा महिमा सांगितला. पूर्वी कोणाला कोणाची साक्ष झाली असेल का?'
विस्तारुनि आम्हांसी । सांगा स्वामी करुणेसीं ।
म्हणोनि लागला चरणांसी । अतिभक्तीकरुनियां ॥११९॥
'कृपा करून आम्हाला विस्ताराने सांगा,' असे म्हणून तो अत्यंत भक्तीने चरणी लागला.
म्हणे गौतम तये वेळी । गोकर्णक्षेत्र महाबळी ।
जाणों आम्ही बहुकाळी । अपार साक्षी देखिली असे ॥१२०॥
गौतम त्या वेळी म्हणाले, 'गोकर्ण क्षेत्र महाबलवान आहे. आम्ही बऱ्याच काळापासून तेथे अपार साक्ष पाहिली आहे.'
गेलो होतो आम्ही यात्रे । देखिला दृष्टांत विचित्र ।
आले होते तेथे जनमात्र । यात्रारुपे करोनियां ॥१२१॥
'आम्ही यात्रेला गेलो होतो आणि विचित्र दृश्य पाहिले. तेथे अनेक लोक यात्रेच्या रूपात आले होते.'
माध्यानकाळीं आम्ही तेथे । बैसलो होतों वृक्षच्छायेते ।
दुरोनि देखिलें चांडाळीतें । वृद्ध अंध महारोगी ॥१२२॥
'दुपारच्या वेळी आम्ही झाडाच्या सावलीत बसलो होतो. दुरून एक चांडाळ स्त्री दिसली. ती म्हातारी, आंधळी आणि महारोगी होती.'
शुष्कमुखी निराहारी । कुष्ठ सर्वांगशरीरीं ।
कृमि पडले असती अघोरी । पूय शोणित दुर्गंध ॥१२३॥
'तिचे मुख कोरडे, ती उपाशी होती, तिच्या सर्व अंगावर कुष्ठ होते. अंगावर किडे पडले होते आणि पू-रक्ताची दुर्गंधी येत होती.'
कुक्षरोगी गंडमाळा । कफ दाटला असे गळां ।
दंतहीन अतिविव्हळा । वस्त्र नाही परिधाना ॥१२४॥
'तिला पोटाचे आजार होते, गळ्यात कफ दाटला होता, दात नव्हते, ती अतिशय व्याकूळ होती आणि अंगावर वस्त्र नव्हते.'
चंडसूर्य किरणाकरितां । प्राण जाय कंठगता ।
शौचव्याधी असे बहुता । सर्वांगशूळ महादुःखी ॥१२५॥
'कडक सूर्यकिरणांनी तिचे प्राण कंठाशी आले होते. तिला शौचाचा आजार होता आणि सर्व अंगात वेदना होत होत्या.'
विधवा आपण केशवपनीं । दिसे जैशी मुख-मरणी ।
क्षणक्षणा पडे धरणीं । प्राणत्याग करुं पाहे ॥१२६॥
'ती विधवेसारखी केस कापलेली, मरणप्राय मुखाची दिसत होती. क्षणोक्षणी ती जमिनीवर पडत होती आणि प्राण सोडू पाहत होती.'
ऐशी अवस्था चांडाळीसी । आली वृक्षच्छायेसी ।
देह टाकिला धरणीसी । त्यजूं पाहे प्राण आपुला ॥१२७॥
'अशी अवस्था असलेली ती चांडाळी झाडाच्या सावलीत आली आणि जमिनीवर देह टाकून प्राण सोडू लागली.'
प्राण त्यजितां तये वेळीं । विमान उतरले तत्काळीं ।
शिवदूत अतुर्बळी । त्रिशूळ खट्वांग धरुनि हाती ॥१२८॥
'प्राण सोडताना त्या वेळी आकाशातून विमान उतरले. त्यात शक्तिशाली शिवदूत हातात त्रिशूळ आणि खट्वांग धरून होते.'
टंकायुधें चंद्र भाळी । चंद्रासारखी कांति केवळी ।
किरीटकुंडलें मिरवे कपोलीं । चतुर्वर्ग येणेपरी ॥१२९॥
'त्यांच्या हातात टंक (छिन्नी) शस्त्र होते, कपाळावर चंद्र आणि चंद्रासारखी कांती होती. किरीट-कुंडले कानावर चमकत होती.'
विमानी सूर्यासारिखें तेज । अतिविचित्र दिसे विराज ।
आले चांडाळिये काज । अपूर्व वर्तले तये वेळीं ॥१३०॥
'त्या विमानात सूर्यासारखे तेज होते आणि ते खूप विचित्र दिसत होते. ते त्या चांडाळीसाठी आले. त्या वेळी अपूर्व घडले.'
आम्ही पुशिले शिवदूतांसी । आलेति कवण कार्यासी ।
दूत म्हणती आम्हांसी । आलो चांडाळीस न्यावया ॥१३१॥
'आम्ही शिवदूतांना विचारले, 'तुम्ही कोणत्या कार्यासाठी आलात?' ते आम्हाला म्हणाले, 'आम्ही या चांडाळीला न्यायला आलो आहोत.''
ऐकोनि दूतांचे वचन । विस्मित झालें आमुचे मन ।
पुनरपि केला त्यांसी प्रश्र्न । ऐक राया एकचित्ते ॥१३२॥
'दूतांचे बोलणे ऐकून आमचे मन चकित झाले. आम्ही पुन्हा प्रश्न केला, राजा, एकाग्र चित्ताने ऐक.'
ऐशी चांडाळी पापिणीसी । कैसी योग्य विमानेसीं ।
नेऊनियां श्र्वानासी । सिंहासनीं काय योग्य ॥१३३॥
'अशा चांडाळी पापिणीला विमानाने कसे नेता? कुत्र्याला सिंहासनावर बसवणे योग्य आहे का?'
आजन्मादारभ्य इसी । पापें पापसंग्रहासी ।
ऐशी पापीण दुर्वृत्तीसी । केवीं न्याल शिवलोका ॥१३४॥
'हिला जन्मापासून पापांचा साठा आहे. अशा दुर्वृत्त पापिणीला तुम्ही शिवलोकात कसे नेता?'
नाहीं इसी शिवज्ञान । न करी तपसाधन ।
दया सत्य कदा नेणे । इतें कैसे नेतां तुम्ही ॥१३५॥
'हिला शिवज्ञान नाही, तपश्चर्या केली नाही, दया-सत्य कधी जाणत नाही. हिला तुम्ही कसे नेता?'
पशुमांस-आहार अहर्निशी । सदा करी जीवहिंसी ।
ऐशी कुष्ठी पापिणीसी । केवीं नेतां स्वर्गभुवना ॥१३६॥
'ती रात्रंदिवस पशूंचे मांस खाते आणि सतत हिंसा करते. अशा कुष्ठी पापिणीला स्वर्गलोकात कसे नेता?'
अथवा कधीं शिवपूजन । न करी पंचाक्षरीजपन ।
नाही केले शिवस्मरण । इतें कैसे नेतां तुम्ही ॥१३७॥
'हिने कधी शिवपूजन केले नाही, पंचाक्षरी मंत्राचा जप केला नाही, शिवस्मरण केले नाही. हिला कसे नेता?'
शिवरात्रीं उपोषण । नाही केले दान आपण ।
केले नाही देखिले यज्ञ । इयेसी कैसें न्याल तुम्ही ॥१३८॥
'शिवरात्रीला उपवास किंवा दान केले नाही, यज्ञ पाहिला नाही, तिला कसे न्याल?'
न करी स्नान सर्वकाळीं । नेणे तीर्थ कवणे वेळी ।
अथवा व्रतादि सकळीं । केले नाहीं महापापी हे ॥१३९॥
'तिने कधी स्नान केले नाही, कोणत्या तीर्थाला गेली नाही, व्रतही केले नाही. ही महापापी आहे.'
सर्वांगी कुष्ठ पूय शोणित । दुर्गंधी वास असे बहुत ।
ऐशी चांडाळी दुर्वृत्त । कैसी विमानीं बैसवाल ॥१४०॥
'सर्व अंगावर कुष्ठ, पू आणि रक्त आहे, दुर्गंधी खूप आहे. अशी दुर्वृत्त चांडाळी विमानात कशी बसवाल?'
अर्जन जन्मांतरीचें म्हणा । कुष्ठ सर्वांग हेचि खुणा ।
कृमि निघती मुखांतून । पूर्वार्जित केवीं होईल ॥१४१॥
'हे कुष्ठ सर्वांगावर, हीच जन्मांतरीच्या पापाची खूण आहे. तोंडातून किडे निघतात. हे पूर्वकर्म कसे फिटेल?'
ऐशी पापिणी दुराचारी । योग्य नव्हे सचराचरी ।
केवी नेतां कैलासपुरी । केवी विमानी बैसवाल ॥१४२॥
'अशी दुराचारी पापिणी कोणत्याही जगात योग्य नाही. तिला कैलासपुरीत कसे नेता आणि विमानात कसे बसवाल?'
गौतम म्हणे रायासी । ऐसे पुशिलें दूतांसी ।
त्यांणी सांगितला आम्हांसी । आद्यंत चांडाळणीचा ॥१४३॥
गौतम राजाला म्हणाले, 'असे मी दूतांना विचारले, तेव्हा त्यांनी मला त्या चांडाळीची सुरुवातीपासून हकीकत सांगितली.'
ऐके गौतम ऋषेश्र्वरा । या चांडाळीचे पूर्वापरा ।
सांगो तुम्हां सविस्तरा । आश्र्चर्य असे परियेसा ॥१४४॥
'ऋषी गौतमा, ऐका, या चांडाळीचे पूर्वीचे सर्व तुम्हाला सविस्तर सांगतो. आश्चर्य आहे, ऐका.'
पूर्वी इचे जन्मस्थान । ब्राह्मणकुळीं जाहली कन्या ।
‘सौमिनी’ नाम असे पूर्ण । सोमबिंबासारखे मुख ॥१४५॥
'पूर्वी तिचा जन्म ब्राह्मण कुळात कन्या म्हणून झाला होता. तिचे नाव 'सौमिनी' होते आणि तिचे मुख चंद्रबिंबासारखे होते.'
अतिसुंदर रुप इसी । उपवर जाहली पितृगृहेसी ।
न मिळे वर तियेसरसी । चिंता करिती मातापिता ॥१४६॥
'तिचे रूप अतिशय सुंदर होते. ती वडिलांच्या घरी उपवर झाली, पण योग्य वर मिळेना. आई-वडील चिंता करू लागले.'
न मिळे सुंदर वर तिसी । उन्नत जाहली दहा वरुषी ।
मिळवूनि एक द्विजासी । गृह्योक्तेसी दिधली कन्या ॥१४७॥
'तिला सुंदर वर मिळाला नाही आणि ती दहा वर्षांची झाली. शेवटी एका ब्राह्मणाशी गृह्यसूत्राप्रमाणे तिचे लग्न लावून दिले.'
विवाह झालियावरी । होती तया पतीचे घरी ।
क्वचित्काळ येणेपरी । होती नारी परियेसा ॥१४८॥
'लग्नानंतर ती पतीच्या घरी राहिली. काही काळ ती तेथे राहिली.'
वर्ततां असे पुढे देखा । तिचे पतीस झालें दुःखा ।
पंचत्व पावला तात्काळिका । विधिवशेंकरुनियां ॥१४९॥
'असे चालले असताना तिच्या पतीला दुःख झाले आणि तो दैववशात लगेच मरण पावला.'
ऐकोनि तिचे मातापिता । कन्या आपुले घरी आणितां ।
पतीचे दुःखकरीं बहुता । खेद करी ते नारी ॥१५०॥
'हे ऐकून तिचे आई-वडील तिला आपल्या घरी घेऊन आले. ती स्त्री पतीच्या दुःखाने खूप खेद करू लागली.'
अतिसुंदर पूर्ववयेसी । मदें व्यापिलें प्रतिदिवसीं ।
चंचळ होय मानसीं । परपुरुषांते देखोनि ॥१५१॥
'ती अतिसुंदर आणि तरुण होती. मद तिच्यावर रोज चढू लागला आणि परपुरुषांना पाहून तिचे मन चंचल होऊ लागले.'
गुप्तरुपें क्वचित्काळी । जारकर्म करिती जाहली ।
प्रगट जाहले केवळी । गौप्य नोहे पातकासी ॥१५२॥
'तिने कधीतरी गुप्तपणे जारकर्म (व्यभिचार) केले. पण ते उघड झाले, पाप कधी लपत नाही.'
आपण विधवा असे नारी । विशेषरुप अतिसुंदरी ।
पूर्ववयसा प्राय भारी । स्थिर नोहे तिचे मन ॥१५३॥
'ती विधवा असूनही अतिशय सुंदर होती. तरुण वयात तिचे मन स्थिर राहत नव्हते.'
ऐसे तिचे पातकासी । प्रकट जाहले सर्वांसी ।
वाळीत केले तयांसी । मातापिताबंधुवर्गादिकां ॥१५४॥
'तिचे हे पाप सर्वांना कळले. आई-वडील, भाऊ आदी सगळ्यांनी तिला वाळीत टाकले.'
माता पिता बंधुजन । त्यजिले तिसी विसर्जोन ।
प्रायश्र्चित घेऊनि आपण । शुद्ध झाले परियेसा ॥१५५॥
'आई-वडिलांनी आणि भावांनी तिला सोडून दिले. त्यांनी प्रायश्चित्त घेऊन स्वतः शुद्धी केली.'
शंका होती पहिली तिसी । निःशंक झाली व्यभिचारासी ।
प्रगटरुप अहर्निशी । रमूं लागली नगरांत ॥१५६॥
'आधी तिला भीती होती, पण नंतर ती व्यभिचारात निःशंक झाली आणि दररोज उघडपणे नगरात फिरू लागली.'
तया नगरीं एक वाणी । रुपें होता अतिलावण्यी ।
पूर्ववयसी देखोनि । झाली त्याची कुलस्री ॥१५७॥
'त्या नगरात एक वाणी (व्यापारी) होता. तो अतिशय रूपवान होता. तिच्याकडे बघून तो तिचा नवरा झाला.'
तया शूद्राचे घरी । वर्तत होती ते नारी ।
ऐसी पापिणी दुराचारी । कुळवैरीण बेचाळीस ॥१५८॥
'ती त्या शूद्राच्या घरी राहू लागली. अशी पापिणी आणि दुराचारी, कुळाची वैरीण ठरली.'
स्रियः कामेन नश्यन्ति ब्राह्मणो हीनसेवया ।
राजानो ब्रह्मदंडेन । यततो भोगसंग्रहांत ॥१५९॥
'स्त्रिया कामाने नष्ट होतात, ब्राह्मण हीन सेवेने, राजे ब्राह्मणाच्या शापाने आणि भोग गोळा करणारे यती (संन्यासी) नष्ट होतात.' (संस्कृत श्लोक)
स्रिया नासती कामत्वे । ब्राह्मण नासती हीनसेवे ।
राज्य जाय द्विजक्षोभें । यति नासे विषयसेवनें ॥१६०॥
'स्त्रिया कामवासनेने नष्ट होतात, ब्राह्मण हीन सेवेने, राज्य ब्राह्मणाच्या क्रोधाने आणि संन्यासी विषयसेवनाने नष्ट होतो.'
शूद्रासवें अहर्निशी । रमत होती अतिहर्षी ।
पुत्र जाहला तियेसी । तया शूद्राघरीं असतां ॥१६१॥
'ती शूद्राबरोबर रात्रंदिवस आनंदाने राहत होती. त्या शूद्राच्या घरी असताना तिला एक पुत्र झाला.'
नित्य मांस आहार तिसी । मद्यपान उन्मत्तेसीं ।
होऊनि तया शूद्रा महिषी । होती पापिणी दुराचारी ॥१६२॥
'ती रोज मांस खाई आणि मद्यपान करून उन्मत्त होई. ती त्या शूद्राची पत्नी होऊन पापिणी आणि दुराचारी राहिली.'
वर्ततां ऐसे एके दिवसीं । उन्मत्त होवोनि परियेसीं ।
छेदिलें वांसरुं आहारासी । मेष म्हणोनि पापिणीनें ॥१६३॥
'असे असताना एके दिवशी उन्मत्त होऊन तिने जेवणासाठी वासराचा वध केला, ते मेंढरू आहे असे समजून.'
छेदोनि वत्स परियेसीं । पाक केला विनयेसीं ।
शिर ठेविलें शिंकेसी । एके दिवसीं भक्षावया ॥१६४॥
'वासराला कापून तिने ते शिजवले आणि त्याचे डोके शिंक्यावर ठेवले, एका दिवशी खाण्यासाठी.'
आपण भ्रमित मद्यपानीं । जागृत जाहली अस्तमानीं ।
वांसरुं पाहतसे भुवनीं । धेनू दोहावयालागीं ॥१६५॥
'ती मद्यपानाने बेभान होती. अस्तमानाच्या वेळी ती जागी झाली आणि गायीला दूध काढण्यासाठी वासरू पाहू लागली.'
वत्सस्थानीं असे मेष । अमित जाहली अतिक्लेश ।
घरांत पाहातसे शिरास । व्यक्त दिसे वांसराचे ॥१६६॥
'वासराच्या जागी मेंढ्याचे डोके दिसले आणि ती खूप दुःखी झाली. घरात शिर शोधले तर ते वासराचे असल्याचे स्पष्ट दिसले.'
अनुतप्त होवोनि तया वेळी । ‘शिव शिव’ म्हणे चंद्रमौळी ।
अज्ञाने ऐशी पापें घडलीं । म्हणोनि चिंती दुरात्मिणी ॥१६७॥
'ती पश्चात्तापाने 'शिव शिव' म्हणू लागली. 'अज्ञानामुळे अशी पापे घडली,' असा विचार ती दुष्टा करू लागली.'
तया वत्सशिरासी । निक्षेप केला भूमीसी ।
पति कोपेल म्हणोनि परियेसीं । अस्थिचर्म निक्षेपिलें ॥१६८॥
'त्या वासराचे शिर तिने जमिनीत पुरले. 'नवरा रागावेल' म्हणून हाडे आणि कातडे पुरून ठेवली.'
जाऊनि सांगे शेजारी लोकां । व्याघ्रे भक्षिले वत्सासी ऐका ।
रोदन करी समस्तांपुढे देखा । पतीपुढे येणेपरी ॥१६९॥
'तिने शेजाऱ्यांना जाऊन सांगितले, 'वाघाने वासराला खाल्ले.' ती सर्वांसमोर आणि पतीसमोर रडू लागली.'
ऐसी कितीक दिवसवरी । नांदत होती शूद्राघरीं ।
पंचत्व पावली ती नारी । नेली दूतीं यमपुरासी ॥१७०॥
'असे काही दिवस ती शूद्राच्या घरी राहिली आणि मरण पावली. यमदूत तिला यमपुरीला घेऊन गेले.'
घातलें तिसी नरकांत । भोग भोगी अतिदुःखित ।
पुनरपि चांडाळीजात । उपजली ते नारी ऐका ॥१७१॥
'तिला नरकात टाकले आणि तिने अतिशय दुःखाचे भोग भोगले. मग ती पुन्हा चांडाळ जातीत जन्मली.'
जाहली उपजतांचि आंधळी । विद्रूपवर्ण जैशी काजळी ।
मातापिता क्वचित्काळी । प्रतिपाळिती मायामोहें ॥१७२॥
'ती जन्मतःच आंधळी, काजळासारखी काळी आणि विद्रूप होती. आई-वडिलांनी मायेने तिचे काही काळ पालन केले.'
उच्छिष्ट अन्न मांसपिंड । चारताति तिसी अखंड ।
बाळपणी ऐसी विघड । पोसिती तिसी अवधारा ॥१७३॥
'तिला उष्टे अन्न आणि मांसाचे तुकडे ते सतत खायला घालत. बालपणी असे विचित्र पालन ते करत.'
ऐसे असतां वर्तमानीं । सर्वांगी झाली कुष्वर्णी ।
पंचत्व पावली पिताजननी । दरिद्री झाली निराश्रय ॥१७४॥
'असे असताना तिच्या सर्व अंगावर कुष्ठ झाला. आई-वडील मरण पावले आणि ती गरीब, निराधार झाली.'
सर्वांग कुष्ठव्रणे पीडित । त्यजिती तियेसि स्वजन भ्रात ।
याचूनि आपुले उदर भरित । रक्षण करी देह आपुला ॥१७५॥
'तिचे अंग कुष्ठाच्या जखमांनी पीडित झाले. भाऊ आणि नातेवाईकांनी तिला सोडले. ती भीक मागून पोट भरी आणि स्वतःचे संरक्षण करी.'
येणेपरि बहुत काळीं । वर्तत होती चांडाळी ।
क्षुधें पीडित सर्वकाळीं । आपण आंधळी कुष्ठदेही ॥१७६॥
'अशा प्रकारे बराच काळ ती चांडाळी राहिली. ती नेहमी भुकेने पीडित, आंधळी आणि कुष्ठरोगी देह असलेली होती.'
न मिळे तिसी वस्रान्न । दुःख करी आतिगहन ।
ऐसे तिचे पूर्वकर्म । झाली वृद्ध अतिकष्टें ॥१७७॥
'तिला वस्त्र आणि अन्न मिळत नसे आणि ती खूप दुःख करी. हेच तिचे पूर्वकर्म होते. ती वृद्ध झाली आणि खूप कष्टात राहिली.'
भक्षावया मागें महाजनांसी । मार्गी पडोनि अहर्निशी ।
कधी न भरे उदर तिसी । दुःख अहर्निशी करीतसे ॥१७८॥
'ती थोर लोकांकडे अन्न मागे, रस्त्यात पडून राही. तिचे पोट कधीच भरत नसे आणि ती नेहमी दुःख करी.'
व्याधि असे शरीरासी । शोणित पूय परियेसी ।
दुर्गंधी ते महादोषी । सर्वागीं कुष्ठ गळतसे ॥१७९॥
'तिच्या शरीराला रोग होता, रक्त आणि पू वाहत होते, मोठी दुर्गंधी होती आणि सर्व अंगातून कुष्ठ गळत होते.'
ऐसे वर्ततां माघमासीं । लोक निघाले यात्रेसी ।
महास्थान गोकर्णासी । कलत्रपुत्रसहित देखा ॥१८०॥
'असे असताना माघ महिन्यात लोक गोकर्ण या महास्थानी यात्रेला निघाले, पत्नी-पुत्रांसह.'
शिवरात्रीचे यात्रेसी । येती लोक देशोदेशीं ।
चतुर्वर्ण असमसहासी । हर्षे येती परियेसा ॥१८१॥
'शिवरात्रीच्या यात्रेसाठी देशोदेशीचे लोक येतात. चारही वर्णांचे लोक अत्यंत आनंदाने येतात.'
देशोदेशींचे राजे देखा । हस्तीरथसहित ऐका ।
येती समस्त भूमंडलिका । महाबळेश्र्वरलिंगदर्शनासी ॥१८२॥
'देशोदेशींचे राजे हत्ती-रथांसह येतात. सर्व पृथ्वीतील लोक महाबळेश्वर लिंगाच्या दर्शनासाठी येतात.'
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । येती यात्रेसी विनोद ।
समारंभ करिती आनंद । अमित लोक परियेसा ॥१८३॥
'ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आनंदाने यात्रेला येतात. ते समारंभ करतात, असंख्य लोक आनंद करतात.'
किती हांसती गायन करिती । धांवती नृत्य करीत येती ।
शिवस्मरण गर्जती । यात्राप्रसंगे जाती देखा ॥१८४॥
'काही हसतात, गातात, धावतात, नाचत येतात आणि शिवाचे नामस्मरण गर्जतात. असे ते यात्रेच्या प्रसंगाने जातात.'
ऐसे महाजनांसमवेत । चांडाळी गेली याचित ।
सवे भिक्षुक बहुत । तयांसमागमें जातसे ॥१८५॥
'अशा महाजनांबरोबर ती चांडाळी याचना करत गेली. तिच्याबरोबर पुष्कळ भिक्षुकही होते, त्यांच्या मागोमाग ती गेली.'
येणेपरी गोकर्णासी । चांडाळी पातली सायासी ।
करावलंबे महाजनांसी । भिक्षा मागे करुणावचनें ॥१८६॥
'अशा प्रकारे ती चांडाळी कष्टाने गोकर्णाला पोहोचली आणि हात पसरून महाजनांना करुणेच्या शब्दांनी भिक्षा मागू लागली.'
लोक चालती मार्गांत । शयन करुनि आक्रंदत ।
करावलंबे असे मागत । महाजन लोकांसी ॥१८७॥
'लोक रस्त्यावरून चालत होते आणि ती झोपून रडत हात पसरून महाजनांना मागत होती.'
पूर्वजन्माची पापी आपण । पीडितसें याचि कारण ।
भिक्षा घाला क्षुधानिवारण । म्हणोनि मागे सकळिकांसी ॥१८८॥
'मी पूर्वजन्मीची पापी आहे, म्हणून मला हे कष्ट होतात. भूक शमवण्यासाठी भिक्षा घाला,' असे ती सर्वांना म्हणत होती.
नेणे कधी वस्र प्रावरण । धुळींत लोळतसे पापिण ।
क्षुधाक्रांत होतसे मरण । धर्म करा हो सकळिक ॥१८९॥
'तिला कधी वस्त्र मिळाले नाही आणि ती धुळीत लोळत होती. भुकेने तिला मरण येत आहे, 'सर्व जण धर्म करा' असे ती म्हणाली.'
सर्वांग कुष्ठरुजा गळत । वस्रावीणें बाधे शीत ।
अक्ष नाही क्षुधाक्रांत । धर्म करा सकळिक हो ॥१९०॥
'तिच्या सर्व अंगातून कुष्ठाचे व्रण गळत होते, वस्त्र नसल्याने थंडी लागत होती, डोळे नव्हते आणि भूक लागली होती. ती 'सर्व धर्म करा' म्हणत होती.'
चिरोपवासें क्षुधा बहुत । जठराग्नि असे संदीप्त ।
धर्म करा असे म्हणत । पडली असे मार्गांतु ॥१९१॥
'दीर्घ उपवासाने तिची भूक खूप वाढली होती आणि जठराग्नी पेटला होता. 'धर्म करा' असे म्हणत ती रस्त्यात पडली होती.'
पूर्वी जन्मशतांतरी । नाही केले पुण्य येरीं ।
याचिकारणे पीडतसे भारी । धर्म करा सकळिक ॥१९२॥
'शेकडो जन्मांपूर्वी तिने कधी पुण्य केले नाही म्हणून ती खूप पीडित आहे. 'सर्वजण धर्म करा,' असे ती म्हणते.'
येणेपरी मार्गांत । चांडाळी असे याचित ।
ते दिनीं शिवरात्रि असे व्रत । कोणी न घाली भिक्षा तिसी ॥१९३॥
'अशा प्रकारे ती चांडाळी रस्त्यात याचना करत राहिली. त्या दिवशी शिवरात्रीचे व्रत होते म्हणून तिला कोणीही भिक्षा घातली नाही.'
पूजेसि जाती सकळ जन । त्यांते मागतसे आक्रंदोन ।
एक म्हणती हांसोनि । उपवास आजि अन्न कैचें ॥१९४॥
'पूजेला जाणारे सर्व लोक होते. त्यांच्याकडे ती आक्रोश करून मागत होती. कोणी हसून म्हणाले, 'आज उपवास आहे, अन्न कुठले?'
हातीं होती बिल्वमंजरी । ते घातली तिचे करीं ।
हुंगोनि पाहे येरी । भक्षणवस्तु नव्हे म्हणे ॥१९५॥
'एकाच्या हातात बेलाची मंजिरी होती, ती त्याने तिच्या हातात घातली. तिने हुंगून पाहिले आणि 'हे खाण्यासारखे नाही' असे म्हटले.'
कोपोन टाके ते अवसरी । जाऊनि पडली लिंगावरी ।
रात्री असतां अंधकारीं । अलभ्य पूजा घडली तिसी ॥१९६॥
'रागाने तिने ती फेकली. ती जाऊन शिवलिंगावर पडली. रात्रीच्या अंधारात तिच्याकडून अनायासे पूजा घडली.'
कोणी न घालिती भिक्षा तिसी । उपास घडला ते दिवशी ।
पूजा पावली ते शिवासी । बिल्वमंजरी शिवमस्तकीं ॥१९७॥
'कोणी तिला भिक्षा घातली नाही, त्यामुळे त्या दिवशी तिचा उपवास घडला. शिवाला पूजा पोहोचली, बिल्वमंजरी शिवाच्या मस्तकावर पडली.'
इतुके पुण्य घडले इसी । प्रयत्न न करितां परियेसीं ।
तुष्टला तो ईश्र्वर हर्षी । भवार्णवा कडे केले ॥१९८॥
'एवढे पुण्य तिला कोणताही प्रयत्न न करता घडले. तेव्हा ईश्वर आनंदाने प्रसन्न झाला आणि त्याने तिला संसारसागर पार करून दिला.'
येणेपरि चांडाळीसी । उपास घडला परियेसी ।
तेथूनि उठे दुसरे दिवशी । भिक्षा मागावयासी ॥१९९॥
'अशा प्रकारे चांडाळीचा उपवास घडला. दुसऱ्या दिवशी ती भिक्षा मागण्यासाठी उठली.'
पहिलीच कुष्ठरोगी असे । अशक्त जाहली उपवासे ।
चालू न शके मार्ग न दिसे । जात असे मंदमंद ॥२००॥
'आधीच ती कुष्ठरोगी होती आणि उपवासाने अशक्त झाली होती. चालता येईना आणि रस्ता दिसेना. ती हळूहळू जात होती.'
सूर्यरश्मींकरुनि तिसी । दुःख होय असमसहासीं ।
पूर्वार्जित कर्मे ऐसीं । दूत म्हणती गौतमाते ॥२०१॥
'सूर्यकिरणांमुळे तिला खूप दुःख होत होते, ते तिचे पूर्वकर्म होते,' असे दूत गौतमांना म्हणाले.
ऐसी चांडाळी कष्टत । आली वृक्षासमीपत ।
त्यजूं पाहे प्राण त्वरित । म्हणोनि आलों इसी न्यावया ॥२०२॥
'अशी ती चांडाळी कष्ट करत झाडाजवळ आली आणि लगेच प्राण सोडू लागली. म्हणून आम्ही तिला न्यायला आलो.'
पुण्य केले इणे आजी । उपवास शिवतिथीकाजी ।
बिल्वपत्रे ईश्र्वर पूजी । घडले रात्री जागरण ॥२०३॥
'हिने आज पुण्य केले. शिवरात्रीचा उपवास, बिल्वपत्रे ईश्वराला वाहिली आणि रात्री जागरण घडले.'
त्या पुण्येकरुनि इचे । पाप गेलें शतजन्मींचे ।
ईश्र्वरासी प्रेम इयेचे । म्हणोनि पाठविले आम्हांसी ॥२०४॥
'त्या पुण्याने हिची शेकडो जन्मांची पापे गेली. ईश्वराला हिच्याबद्दल प्रेम वाटले, म्हणून त्याने आम्हाला पाठवले.'
ऐसे म्हणती शिवदूत । तियेवरी शिंपिती अमृत ।
दिव्यदेह केले त्वरित । घेऊनि गेले शिवलोका ॥२०५॥
असे म्हणून शिवदूतांनी तिच्यावर अमृत शिंपडले, तिला दिव्य देह दिला आणि लगेच शिवलोकात घेऊन गेले.
ऐसे गोकर्ण असे स्थान । गौतम सांगे विस्तारुन ।
राजयासि म्हणतसे सगुण । त्वरित जाई गोकर्णासी ॥२०६॥
'असे गोकर्ण स्थान आहे,' असे गौतमाने विस्ताराने सांगितले आणि राजाला म्हणाला, 'तू लगेच गोकर्णाला जा.'
जातांचि तुझी पापें जाती । इह सौख्य परत्र साधती ।
संशय न धरी तूं चित्ती । म्हणोनि निरोपिलें रायासी ॥२०७॥
'तेथे गेल्याबरोबर तुझी पापे जातील. इहलोकातले सुख आणि परलोकातले कल्याण मिळेल. मनात संशय धरू नकोस,' असे राजाला सांगितले.
ऐकोनि गौतमाचे वचन । राजा मनीं संतोषोन ।
पावला त्वरित गोकर्ण । पापावेगळा जाहला जाणा ॥२०८॥
गौतमांचे वचन ऐकून राजा मनात संतुष्ट झाला आणि लगेच गोकर्णाला पोहोचला. तो पापांपासून मुक्त झाला.
ऐसें पुण्यपावन स्थान । म्हणोनि श्रीपाद राहिले आपण ।
सिद्ध म्हणे ऐक कथन । नामधारका एकचित्ते ॥२०९॥
असे हे पुण्यपावन स्थान आहे, म्हणूनच श्रीपाद तेथे राहिले, असे सिद्ध म्हणाले आणि नामधारकाला एकाग्र चित्ताने ऐकायला सांगितले.
म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
श्रोते करुनि निर्धार । एकचित्तें परियेसा ॥२१०॥
म्हणून सरस्वती-गंगाधर गुरुचरित्राचा विस्तार सांगतात. श्रोत्यांनी निश्चय करून एकाग्र चित्ताने ऐकावे.
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे
गोकर्णमहिमावर्णनं नाम सप्तमोऽध्यायः ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥