॥ जय जय विठ्ठल रखुमाई ॥ संतवाणी डिजिटल लायब्ररी २०२६
सरस्वती गंगाधर विरचित

श्री गुरुचरित्र – अध्याय एकविसावा

॥ मृतपुत्रसंजीवन – ब्रह्मचारीउपदेश व औदुंबरमहिमा ॥

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

सर्व अध्याय सूची अध्याय एकविसावा (एकूण ८९ ओव्या)
ओवी १

सिद्ध म्हणे नामधारका । ब्रह्मचारी तो कारणिका ।
उपदेशिले ज्ञानविवेका । तया प्रेतजननीसी ॥१॥

सार्थ भावार्थ:

सिद्ध म्हणाला, 'नामधारका, तो ब्रह्मचारी कारणासाठी आला होता. त्याने त्या प्रेताच्या आईला ज्ञानविवेकाचा उपदेश केला.'

शब्दार्थ: कारणिका = कार्यासाठी आलेला
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी २

ब्रह्मचारी म्हणे नारी । मूढपणें दुःख न करी ।
कवण वाचला असे स्थीरी । या संसारी सांग मज ॥२॥

सार्थ भावार्थ:

ब्रह्मचारी म्हणाला, 'बाई, मूर्खपणाने दुःख करू नकोस. या संसारात कोण कायमचा टिकला आहे ते मला सांग.'

शब्दार्थ: मूढपणें = मूर्खपणाने
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ३

उपजला कवण मेला कवण । उत्पत्ति जाहली कोठोन ।
जळांत उपजे जैसा फेण । बुदबुद राहे कोठे स्थिर ॥३॥

सार्थ भावार्थ:

'कोण जन्मला, कोण मेला? उत्पत्ती कुठून झाली? पाण्यात जसा फेस किंवा बुडबुडा उठतो, तो कुठे स्थिर राहतो?'

शब्दार्थ: फेण = फेस; बुदबुद = बुडबुडा
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ४

तैसा देह पंचभूतीं । मिळोनि होय देहनिर्मिती ।
वेगळे होतांचि पंचभूती । अव्यक्त होय देह जाणा ॥४॥

सार्थ भावार्थ:

'तसा देह पंचमहाभूतांच्या मिळण्याने बनतो. पंचभूते वेगळी होताच देह अव्यक्त (नाहीसा) होतो, हे जाणा.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ५

तया पंचभूतांचे गुण । मायापाशें वेष्टोन ।
भ्रांति लाविती देह म्हणोन । पुत्रमित्रकलत्रवास ॥५॥

सार्थ भावार्थ:

'त्या पंचभूतांचे गुण मायेच्या पाशाने बांधून भ्रम निर्माण करतात, आणि मग हा देह मी, पुत्र-मित्र-पत्नी माझी, असे वाटते.'

शब्दार्थ: कलत्र = पत्नी
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ६

रज-सत्त्व-तमोगुण । तया भूतांपासोन ।
वेगळाले लक्षण । होती ऐक एकचित्तें ॥६॥

सार्थ भावार्थ:

'रज, सत्त्व आणि तम हे गुण त्या भूतांपासून होतात. त्यांची लक्षणे वेगवेगळी असतात, ती एकाग्रतेने ऐक.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ७

देवत्व होय सत्त्वगुण । रजोगुण मनुष्य जाण ।
दैत्यांसी तमोगुण । गुणानुबंधे कर्में घडती ॥७॥

सार्थ भावार्थ:

'सत्त्वगुणाने देवत्व, रजोगुणाने मनुष्यत्व आणि तमोगुणाने दैत्यत्व येते. गुणांच्या संबंधाने कर्मे घडतात.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ८

ज्याणे जें कर्म आचरती । सुकृत अथवा दुष्कृति ।
तैसी होय फळप्राप्ति । आपुली आपण भोगावी ॥८॥

सार्थ भावार्थ:

'ज्याने जसे कर्म केले, पुण्य किंवा पाप, तसे फळ त्याला मिळते. ते प्रत्येकाने स्वतःच भोगावे लागते.'

शब्दार्थ: सुकृत = पुण्य; दुष्कृति = पाप
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ९

जैसी गुणांची वासना । इंद्रियें तयाधिन जाणा ।
मायापाशें वेष्टोन । सुखदुःखा लिप्त करिती ॥९॥

सार्थ भावार्थ:

'गुणांच्या वासनेप्रमाणे इंद्रिये त्यांच्या अधीन होतात आणि मायापाशात बांधून सुखदुःखाने लिप्त करतात.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी १०

या संसारवर्तमानीं । उपजती जंतु कर्मानुगुणीं ।
आपुल्या आर्जवापासोनि । सुखदुःख भोगिताति ॥१०॥

सार्थ भावार्थ:

'या संसारात प्राणी कर्मानुसार जन्म घेतात आणि आपापल्या कर्मामुळे सुखदुःख भोगतात.'

शब्दार्थ: आर्जव = कमाई, केलेले कर्म
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ११

कल्पकोटी वरुषें जयांसी । असती आयुष्यें देवऋषीं ।
त्यांसी न सुटे कर्मवशी । मनुष्या कवण पाड सांगे ॥११॥

सार्थ भावार्थ:

'ज्यांना देव आणि ऋषींना कल्पकोटी वर्षे आयुष्य असते त्यांनाही कर्मातून सुटका नाही; मग माणसाची काय कथा?'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी १२

एखादा नर देहाधीन । काळ करी आपुले गुण ।
कर्म होय अनेक गुण । देहधारी सर्व येणेंपरी ॥१२॥

सार्थ भावार्थ:

'माणूस देहाच्या अधीन असतो; काळ आपला प्रभाव दाखवतो आणि कर्मे घडतात. सर्व देहधारी याच प्रकारे वागतात.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी १३

जो असेल देहधारी । त्यासी विकार नानापरी ।
स्थिर नव्हे निर्धारी । आपुले आपण म्हणावया ॥१३॥

सार्थ भावार्थ:

'जो देहधारी आहे त्याला नाना प्रकारचे विकार होतात. 'माझे' म्हणावे असे काहीच खात्रीने स्थिर नसते.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी १४

याकारणें ज्ञानवंते । संतोष न करावा उपजतां ।
अथवा नर मृत होता । दुःख आपण करुं नये ॥१४॥

सार्थ भावार्थ:

'म्हणून ज्ञानी माणसाने जन्मला म्हणून आनंद करू नये आणि कोणी मेला म्हणून दुःखही करू नये.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी १५

जघीं गर्भसंभव होतां । काय दिसे आकारता ।
अव्यक्त असतां दिसे व्यक्ता । सवेंचि होय अव्यक्त पैं ॥१५॥

सार्थ भावार्थ:

'गर्भधारणा झाल्यावर काय आकार दिसतो? अव्यक्त असलेले व्यक्त दिसते आणि पुन्हा लगेच अव्यक्त होते.'

शब्दार्थ: जघीं = जेव्हा
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी १६

बुदबुद दिसती जैसे जळीं । सवेंचि नासती तात्काळी ।
तैसा देह सर्वकाळी । स्थिर नव्हे परियेसा ॥१६॥

सार्थ भावार्थ:

'पाण्यावर दिसणारे बुडबुडे लगेच नाहीसे होतात; तसा देह कधीही स्थिर नसतो, हे लक्षात घे.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी १७

जघीं गर्भउद्भव झाला । नाश्य म्हणोनि जाणती सकळा ।
कर्मानुबंधने जैसे फळ । तैसा भोग देहासी ॥१७॥

सार्थ भावार्थ:

'गर्भ तयार झाला की तो नाशवंत आहे हे सर्व जाणतात. कर्मबंधनानुसार जसे फळ तसा देहाला भोग मिळतो.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी १८

कोणी मरती पूर्ववयसीं । अथवा मरती वृद्धाप्येसी ।
आपुले आर्जव असे जैशी । तेणेपरी घडे जाण ॥१८॥

सार्थ भावार्थ:

'कोणी तरुणपणी मरतात, कोणी म्हातारपणी. आपल्या कर्मानुसार जसे असेल तसे घडते.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी १९

मायापाशें वेष्टोनि । म्हणती पिता सुत जननी ।
कलत्र मित्र तेणे गुणी । आपुले आपुले म्हणती मूढ ॥१९॥

सार्थ भावार्थ:

'मायापाशात अडकून मूर्ख लोक पिता, पुत्र, आई, पत्नी, मित्र यांना 'आपले आपले' म्हणतात.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी २०

निर्मळ देह म्हणो जरी । उत्पत्ति रक्त-मांस-रुधिरीं ।
मळमूत्रांत अघोरी । ऊद्भव झाला परियेसा ॥२०॥

सार्थ भावार्थ:

'देह निर्मळ म्हणावा तर तो रक्त, मांस आणि रुधिरापासून झाला आहे; घाणेरड्या मलमूत्रात त्याची उत्पत्ती झाली आहे.'

शब्दार्थ: अघोरी = अमंगळ, किळसवाणे
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी २१

कर्मानुवशे उपजतांचि । ललाटी लिहितो विरंचि ।
सुकृत अथवा दुष्कृतेंचि । भोग भोगी म्हणोनि ॥२१॥

सार्थ भावार्थ:

'जन्माच्या वेळीच कर्मानुसार ब्रह्मदेव कपाळी लिहून टाकतो. पुण्य किंवा पाप, त्याचे भोग माणूस भोगतो.'

शब्दार्थ: विरंचि = ब्रह्मदेव
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी २२

ऐसें या कर्म काळासी । जिकिलें नाही कोणी परियेसी ।
याकारणे देहासी । नित्यत्व नाही परियेसा ॥२२॥

सार्थ भावार्थ:

'अशा कर्म आणि काळावर कोणीही विजय मिळवलेला नाही. म्हणून देह नित्य नाही, हे समजून घे.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी २३

स्वप्नीं निधान दिसे जैसे । कवणे करावें भरंवसे ।
इंद्रजाल गारुड जैसे । स्थिर केवीं मानिजे ॥२३॥

सार्थ भावार्थ:

'स्वप्नात दिसलेल्या खजिन्यावर कोण भरवसा ठेवील? जादू आणि गारुडी खेळ कधी स्थिर मानला जातो का?'

शब्दार्थ: इंद्रजाल = जादू; गारुड = मायावी खेळ
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी २४

तुझे तूंचि सांग वहिले । कोटी जन्म भोग भोगिले ।
मनुष्य अथवा पशुत्व लाधले । पक्षी अथवा कृमिरुप ॥२४॥

सार्थ भावार्थ:

'तूच सांग, तू कोट्यवधी जन्म भोगले आहेस; मनुष्य, पशू, पक्षी किंवा कृमी अशा योनींत जन्मलीस.'

शब्दार्थ: लाधले = प्राप्त झाले
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी २५

जरी होतीस मनुष्ययोनीं । कोण कोणाची होतीस जननी ।
कोण कोणाची होतीस गृहिणी । सांग तुवां आम्हांपुढे ॥२५॥

सार्थ भावार्थ:

'तू मनुष्ययोनीत असताना कोण कोणाची आई होती आणि कोण कोणाची पत्नी होती, ते आमच्यापुढे सांग.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी २६

कवण तुझीं मातापिता । जन्मांतरींची सांग आतां ।
वायां दुःख करिसी प्रलापिता । पुत्र आपुला म्हणोनि ॥२६॥

सार्थ भावार्थ:

'जन्मांतरीचे तुझे आईवडील कोण? आता सांग. 'हा माझा पुत्र' म्हणून व्यर्थ रडतेस.'

शब्दार्थ: प्रलापिता = विलाप करत
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी २७

पंचभूतात्मक देह । चर्म-मांस-अस्थि-मेद ।
वेष्टोनियां नवम देह । मळबद्ध शरीर जाणावें ॥२७॥

सार्थ भावार्थ:

'देह पंचभूतांचा आहे; कातडी, मांस, हाडे, चरबी यांनी वेढलेले, नऊ दारांचे आणि मळाने भरलेले शरीर आहे असे जाण.'

शब्दार्थ: नवम देह = नऊ द्वारे असलेला देह
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी २८

कैचा पुत्र कोठे मृत्यु । वायां कां भ्रमोनि रडसी तूं ।
सांडोनि द्यावे कैचे प्रेत । संस्कारिती लौकिकार्थी ॥२८॥

सार्थ भावार्थ:

'कुठला पुत्र, कुठला मृत्यू? व्यर्थ भ्रमाने का रडतेस? लोकरीतीसाठी प्रेताचा संस्कार करतात, ते सोडून द्यावे.'

शब्दार्थ: लौकिकार्थी = लोकरीतीसाठी
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी २९

येणेपरी ब्रह्मचारी । सांगे त्वरित विस्तारीं ।
परिसोनि त्या अवसरीं । विनवीतसे तयासी ॥२९॥

सार्थ भावार्थ:

ब्रह्मचारी विस्ताराने असे सांगत असता ते ऐकून ती त्या वेळी त्याला विनंती करू लागली.

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ३०

विप्रवनिता तया वेळीं । विनवीतसे करुणाबहाळी ।
स्वामी निरोपिलें धर्म सकळी । परी स्थिर नव्हे अंतःकरण ॥३०॥

सार्थ भावार्थ:

ती ब्राह्मणी करुणेने म्हणाली, 'स्वामी, तुम्ही सर्व धर्म सांगितलात, पण माझे मन स्थिर होत नाही.'

शब्दार्थ: करुणाबहाळी = करुणेने भरलेली
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ३१

प्रारब्ध प्रमाण म्हणो जरी । तरी कां भजावा श्रीहरि ।
परीस-संपर्के लोह जरी । सुवर्ण नव्हे कोण बोले ॥३१॥

सार्थ भावार्थ:

'प्रारब्ध प्रमाण असेल तर श्रीहरीला का भजावे? परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होत नाही असे कोण म्हणेल?'

शब्दार्थ: परीस = परीस (स्पर्शाने लोखंडाचे सोने करणारा दगड)
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ३२

आम्ही पहिलेचि दैवहीन । म्हणोनि धरिले श्रीगुरुचरण ।
अभय दिधले नाही मरण । म्हणोनि विश्र्वास केला आम्हीं ॥३२॥

सार्थ भावार्थ:

'आम्ही आधीपासूनच दुर्दैवी, म्हणून श्रीगुरुचरण धरले. त्यांनी मरण नाही असे अभय दिले, म्हणून आम्ही विश्वास ठेवला.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ३३

एखाद्या नरा येतांचि ज्वरा । धांवत जाती वैद्याचिया घरा ।
औषधी देऊनियां प्रतिकारा । सवेंचि करी आरोग्यता ॥३३॥

सार्थ भावार्थ:

'एखाद्याला ताप आला की तो वैद्याच्या घरी धावत जातो; वैद्य औषध देऊन लगेच बरे करतो.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ३४

एके समयी मनुष्यासी । आश्रय करिती करुणेसी ।
साह्य होय भरंवसी । आला आपदा परिहारी ॥३४॥

सार्थ भावार्थ:

'माणूस कधी करुणा करणाऱ्याचा आश्रय घेतो. तो विश्वासाने साहाय्य करतो आणि संकट दूर करतो.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ३५

त्रयमूर्तीचा अवतारु । श्रीनरसिंहसरस्वती असे गुरु ।
तेणें दिधला असे वरु । केवीं असत्य होय सांग मज ॥३५॥

सार्थ भावार्थ:

'श्रीनरसिंहसरस्वती गुरु हे त्रिमूर्तींचे अवतार आहेत. त्यांनी वर दिला आहे; तो खोटा कसा होईल, ते मला सांगा.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ३६

आराधिले मी तयासी । वर दिधला गा आम्हांसी ।
त्याचा करुनियां भरंवसी । होतों आपण स्वस्थचित्त ॥३६॥

सार्थ भावार्थ:

'मी त्यांची आराधना केली; त्यांनी वर दिला. त्यावर भरवसा ठेवून मी निश्चिंत होते.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ३७

विश्र्वासोनि असतां आपण । केवीं केले निर्वाण ।
कैसे माझे मूर्खपण । म्हणोनि स्वामी निरोपिसी ॥३७॥

सार्थ भावार्थ:

'विश्वास ठेवलेला असताना त्यांनी माझा घात का केला? माझा मूर्खपणा कसा, असे तुम्ही म्हणता का, स्वामी?'

शब्दार्थ: निर्वाण = शेवट, घात
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ३८

याकारणे आपण आतां । प्राण त्यजीन सर्वथा ।
समर्पीन गुरुनाथा । वाढो कीर्ति तयाची ॥३८॥

सार्थ भावार्थ:

'म्हणून आता मी नक्की प्राण सोडीन आणि ते गुरुनाथांना अर्पण करीन; त्यामुळे त्यांची कीर्ती वाढो.'

शब्दार्थ: (उपरोधाने बोलणे)
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ३९

ऐकोनि तियेचे वचन । ओळखुनियां भाव मन ।
सांगे बुद्धि तिसी ज्ञान । उपाय एक करी आतां ॥३९॥

सार्थ भावार्थ:

तिचे बोलणे ऐकून आणि तिचा भाव ओळखून ब्रह्मचारीने तिला ज्ञान दिले, 'आता एक उपाय कर.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ४०

विश्र्वास केला त्वां श्रीगुरुसी । पुत्र लाधला पूर्णायुषी ।
जरी आला मृत्यु त्यासी । घेऊनि जाई श्रीगुरुस्थाना ॥४०॥

सार्थ भावार्थ:

'तू श्रीगुरूंवर विश्वास ठेवलास आणि पूर्ण आयुष्याचा पुत्र मिळाला. आता तो मेला तर त्याला श्रीगुरुस्थानी घेऊन जा.'

शब्दार्थ: पूर्णायुषी = पूर्ण आयुष्य असलेला
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ४१

जेथे जाहला असेल तुज वर । तेथें समर्पी तूं कलेवर ।
पंचगंगाकृष्णातीर । औदुंबरवृक्षातळी ॥४१॥

सार्थ भावार्थ:

'जेथे तुला वर मिळाला तेथे हे कलेवर अर्पण कर. पंचगंगा आणि कृष्णेच्या तीरावर औदुंबराच्या झाडाखाली.'

शब्दार्थ: कलेवर = शव
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ४२

ऐसे वचन ऐकोनि । विश्र्वास जाहला तिचे मनीं ।
पोटीं शव बांधोनि । घेऊनि गेली औदुंबराप्रति ॥४२॥

सार्थ भावार्थ:

हे ऐकून तिच्या मनात विश्वास निर्माण झाला. तिने मृत मुलाला पोटाशी बांधले आणि औदुंबराकडे गेली.

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ४३

जेथे होत्या गुरुपादुका । आफळी शिर ते बालिका ।
रुधिरें भरल्या पादुका । आक्रोश करी ते नारी ॥४३॥

सार्थ भावार्थ:

जेथे गुरुपादुका होत्या तेथे ती स्त्री डोके आपटू लागली. पादुका रक्ताने भिजल्या आणि ती आक्रोश करत राहिली.

शब्दार्थ: आफळी = आपटते
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ४४

सकळ दुःखाहुनी अधिक । साहवेना पुत्रशोक ।
क्षयरोग तोचि ऐक । मातापित्या मृत्युमूळ ॥४४॥

सार्थ भावार्थ:

सर्व दुःखांपेक्षा पुत्रशोक सर्वात मोठा असून तो सहन होत नाही. ऐका, तो क्षयरोगासारखा आईवडिलांच्या मृत्यूचे कारण होतो.

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ४५

ऐसे करितां जाहली निशी । विप्र मागती प्रेतासी ।
म्हणती आक्रोश कां वो करिसी । संस्कारुनि जाऊं आतां ॥४५॥

सार्थ भावार्थ:

असे करता करता रात्र झाली. ब्राह्मण प्रेत मागू लागले आणि म्हणाले, 'आक्रोश का करतेस? आता संस्कार करून जाऊ.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ४६

मनुष्य नाही अरण्यांत । केवीं राहूं जाऊं म्हणत ।
जाळूं दे आतां प्रेत । ऐक कर्कशे म्हणताति ॥४६॥

सार्थ भावार्थ:

'अरण्यात माणसे नाहीत, आम्ही इथे कसे राहावे? प्रेत जाळू दे,' असे ते म्हणाले; पण ती हट्टी स्त्री ऐकेना.

शब्दार्थ: कर्कशा = हट्टी स्त्री
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ४७

कांहीं केलिया नेदी प्रेत । आपणासवे जाळा म्हणत ।
पोटी बांधोनियां प्रेत । लोळतसे पादुकांवरी ॥४७॥

सार्थ भावार्थ:

काहीही केले तरी ती प्रेत देत नव्हती. 'मलाही याच्यासोबत जाळा,' म्हणत प्रेत पोटाशी बांधून पादुकांवर लोळत होती.

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ४८

म्हणती विप्र ज्ञाती लोक । राहूं नये रानीं निःशंक ।
तस्करबाधा होईल ऐका । जाऊं आता घरासी ॥४८॥

सार्थ भावार्थ:

ब्राह्मण आणि जातीचे लोक म्हणाले, 'रानात राहू नये; चोरांचा त्रास होईल. आता घरी जाऊ.'

शब्दार्थ: तस्कर = चोर
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ४९

जाऊं आतां स्नान करुनि । उपवास हो कां आजिचे दिनीं ।
प्रातःकाळी येऊनि । दहन करुं म्हणती ऐका ॥४९॥

सार्थ भावार्थ:

'आता स्नान करून जाऊ आणि आजच्या दिवशी उपवास करू. उद्या प्रातःकाळी येऊन दहन करू,' असे ते म्हणाले.

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ५०

आजिचे रात्री प्रेतासी । सुटेल वास दुर्गंधीसी ।
आपोआप दहनासी । देईल जाणा ते कर्कशा ॥५०॥

सार्थ भावार्थ:

'आजच्या रात्री प्रेताला दुर्गंधी सुटेल, मग ही हट्टी स्त्री आपोआप दहनासाठी देईल,' असे ते म्हणाले.

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ५१

म्हणोनि निघती सकळ लोक । राहिलीं तेथे जननीजनक ।
प्रेतासहित करिती शोक । होती रात्री परियेसा ॥५१॥

सार्थ भावार्थ:

असे म्हणून सर्व लोक निघून गेले. तेथे आईवडील राहिले आणि प्रेताबरोबर शोक करत रात्र घालवली.

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ५२

निद्रा नाहीं दिवस दोन्ही । शोक करितां जनकजननी ।
याम तीन होतां रजनी । झोंप आली तियेसी ॥५२॥

सार्थ भावार्थ:

दोन्ही दिवस झोप नव्हती. शोक करता करता तीन प्रहर रात्र झाली तेव्हा तिला झोप लागली.

शब्दार्थ: याम = प्रहर
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ५३

देखतसे सुषुप्तींत । जटाधारी भस्मांकित ।
व्याघ्रचर्म परिधानित । रुद्राक्षमाळा सर्वांगीं ॥५३॥

सार्थ भावार्थ:

तिला झोपेत दिसले: जटाधारी, भस्म लावलेला, वाघाचे कातडे नेसलेला आणि सर्वांगावर रुद्राक्षमाळा घातलेला एक योगी.

शब्दार्थ: सुषुप्ति = गाढ झोप
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ५४

योगदंड त्रिशूळ हातीं । आला औदुंबराप्रती ।
कां वो शोक करिसी सती । आक्रोशोनि आम्हांवरी ॥५४॥

सार्थ भावार्थ:

त्याच्या हातात योगदंड आणि त्रिशूळ होते. तो औदुंबराजवळ आला आणि म्हणाला, 'सती, तू आमच्यावर आक्रोश करून का शोक करतेस?'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ५५

काय जाहलें तुझे कुमरा । आतां त्यासी करुं प्रतिकारा ।
म्हणोनि दे तो अभय करा । भक्तवत्सल श्रीगुरु ॥५५॥

सार्थ भावार्थ:

'तुझ्या मुलाला काय झाले? आता त्याचा प्रतिकार करू,' असे म्हणून भक्तवत्सल श्रीगुरूंनी तिला अभयाचा हात दिला.

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ५६

भस्म काढोनि प्रेतासी । लावीतसे सर्वांगेसी ।
मुख पसरी म्हणे तिसी । वायु पुरस्करुं म्हणे ॥५६॥

सार्थ भावार्थ:

त्यांनी भस्म काढून प्रेताच्या सर्वांगावर लावले, आणि तिला म्हणाले, 'त्याचे तोंड उघड. मी वायू (प्राण) भरतो.'

शब्दार्थ: पुरस्करुं = पुढे करून भरतो
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ५७

प्राण म्हणजे वायु जाण । बाहेर गेला विसरुन ।
घालितों मागुतीं आणून । पुत्र तुझा सजीव होय ॥५७॥

सार्थ भावार्थ:

'प्राण म्हणजे वायू. तो बाहेर निघून गेला आहे, पण तो विसरला आहे. मी तो परत आणून घालतो; तुझा पुत्र जिवंत होईल.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ५८

इतुकें होतांचि भयचकित । जाहली नारी जागृत ।
म्हणे आपणा कैसी भ्रांत । लागली असे प्रेतावरी ॥५८॥

सार्थ भावार्थ:

एवढे होताच ती स्त्री भयचकित होऊन जागी झाली. ती म्हणाली, 'मला प्रेतावर कसला भ्रम झाला आहे?'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ५९

जे कां वसे आपुले मनीं । तैसे दिसे निद्रास्वप्नी ।
कैचा देव नरसिंहमुनि । भ्रांति आपणा लागली असे ॥५९॥

सार्थ भावार्थ:

'जे मनात असते तेच झोपेत स्वप्नात दिसते. कुठला देव, कुठले नरसिंहमुनी? हा माझा भ्रम आहे.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ६०

आमुचे प्रारब्ध असतां उणें । देवावरी बोल काय ठेवणे ।
अज्ञान आम्ही मूर्खपणें । श्रीगुरुवरी काय बोल ॥६०॥

सार्थ भावार्थ:

'आमचे प्रारब्धच कमी असताना देवावर दोष कशाला ठेवायचा? आम्ही अज्ञानी, मूर्खपणाने श्रीगुरूंना बोल लावले.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ६१

येणेंपरी चिंता करीत । तंव प्रेतासी झालें चेत ।
सर्वांगीं उष्ण बहुत । सर्वसंधींसी जीव आला ॥६१॥

सार्थ भावार्थ:

ती अशी चिंता करत असता प्रेताला चेतना आली. सर्वांगात उष्णता आली आणि सर्व सांध्यांत जीव आला.

शब्दार्थ: संधी = सांधे
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ६२

म्हणे प्रेतासी काय झाले । किंवा भूत संचरलें ।
मनीं भय उपजलें । ठेवी काढूनि दूर परतें ॥६२॥

सार्थ भावार्थ:

ती म्हणाली, 'प्रेताला काय झाले? की भूत शिरले?' मनात भीती वाटून तिने त्याला दूर ठेवले.

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ६३

सर्व संधी जीव भरला । बाळ उठोनि बैसला ।
म्हणे क्षुधा लागली मला । अन्न देईं म्हणतसे ॥६३॥

सार्थ भावार्थ:

सर्व अवयवांत प्राण भरला आणि बाळ उठून बसला. तो म्हणाला, 'मला भूक लागली आहे, अन्न द्या.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ६४

रुदन करी तया वेळीं । आला कुमर मातेजवळी ।
स्तन घालितां मुखकमळीं । क्षीर निघे बत्तीस धारा ॥६४॥

सार्थ भावार्थ:

तिने त्या वेळी रडत जवळ आलेल्या मुलाला स्तन दिले आणि त्याच्या तोंडात बत्तीस धारांनी दूध निघाले.

शब्दार्थ: क्षीर = दूध
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ६५

संतोष भय दोनी प्रीतीसी । संदेह मागुती असे मानसीं ।
कडिये घेऊनि बाळकासी । गेली आपुले पतीजवळी ॥६५॥

सार्थ भावार्थ:

तिला आनंद आणि भीती दोन्ही होते, मनात संदेह होताच. बाळाला कडेवर घेऊन ती पतीजवळ गेली.

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ६६

जागृत करुनि पतीसी । सांगे वृतांत आद्यंतेसी ।
पति म्हणे तियेसी । चरित्र असे श्रीगुरुचें ॥६६॥

सार्थ भावार्थ:

तिने पतीला जागे करून सर्व वृत्तांत सुरुवातीपासून सांगितला. पती म्हणाला, 'हे श्रीगुरूंचे चरित्र आहे.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ६७

म्हणोनि दंपती दोघेजण । करुनि औदुंबरा प्रदक्षिणा ।
साष्टांगी करिती नमन । स्तोत्र करिती नानापरी ॥६७॥

सार्थ भावार्थ:

नंतर पतीपत्नी दोघांनी औदुंबराला प्रदक्षिणा घातली, साष्टांग नमस्कार केला आणि नाना प्रकारे स्तोत्र केले.

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ६८

जय जया वरदमूर्ति । ब्रह्मा-विष्णु-शिव यति ।
भक्तवत्सला तुझी ख्याति । वास पहासी भक्तांच्या ॥६८॥

सार्थ भावार्थ:

'जय जय वरदमूर्ती! ब्रह्मा-विष्णू-शिव स्वरूप यतीश्वर! हे भक्तवत्सला, तुझी कीर्ती आहे की तू भक्तांच्या ठिकाणी वास करतोस.'

शब्दार्थ: ख्याति = कीर्ती
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ६९

तूं तारक विश्र्वासी । म्हणोनि भूमीं अवतरलासी ।
अशक्य तुज वर्णावयासी । क्षमा करणें स्वामिया ॥६९॥

सार्थ भावार्थ:

'तू विश्वासू भक्तांचा तारक आहेस, म्हणून भूमीवर अवतरलास. तुझे वर्णन करणे अशक्य आहे; स्वामी, क्षमा करा.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ७०

कोपेंकरुनि मातेसी । निष्ठुर बोले बाळ कैसी ।
तैसे अविद्यामायेसीं । तुम्हां वोखटें बोलिलों ॥७०॥

सार्थ भावार्थ:

'रागाने मुलगा आईला कठोर बोलतो, तसे अविद्येच्या मायेत मी तुम्हाला वाईट बोलले.'

शब्दार्थ: वोखटें = वाईट
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ७१

सर्वस्व आम्हां क्षमा करणें । म्हणोनि घालिती लोटांगणे ।
विनवूनियां करुणावचनें । गेली स्नाना गंगेंत ॥७१॥

सार्थ भावार्थ:

'आम्हाला सर्व क्षमा करा,' असे म्हणून त्यांनी लोटांगणे घातली आणि करुण वचने बोलून ती गंगेत स्नानासाठी गेली.

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ७२

स्नान करुनि बाळकासहित । धुती झाली पादुकांचे रक्त ।
औदुंबरा स्नपन करीत । लाविती दीप तये वेळी ॥७२॥

सार्थ भावार्थ:

तिने बाळासह स्नान करून पादुकांवरील रक्त धुतले. औदुंबराला अभिषेक करून त्या वेळी दिवे लावले.

शब्दार्थ: स्नपन = अभिषेक
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ७३

पूजा करिती भक्तीसीं । मंत्रपूर्वक विधीसीं ।
शमीपत्र-कुसुमेंसी । पूजा करिती परियेसा ॥७३॥

सार्थ भावार्थ:

त्यांनी भक्तीने विधी आणि मंत्रांसह शमीपत्रे आणि फुलांनी पूजा केली, हे ऐका.

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ७४

नीरांजन तया वेळी । करिती गायन परिबळी ।
अतिसंतोष तये बाळीं । भक्तिभावें स्तुति करिती ॥७४॥

सार्थ भावार्थ:

त्या वेळी त्यांनी नीरांजन ओवाळले, गायन केले आणि अत्यानंदाने भक्तिभावाने स्तुती केली.

शब्दार्थ: परिबळी = सर्वतोपरी
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ७५

इतुकें होतां गेली निशी । उदय जाहला दिनकरासी ।
संस्कारुं म्हणोनि प्रेतासी । आले विप्रज्ञाती सकळ ॥७५॥

सार्थ भावार्थ:

एवढे होईपर्यंत रात्र संपली आणि सूर्योदय झाला. प्रेताचा संस्कार करण्यासाठी सर्व ब्राह्मण आणि जातीचे लोक आले.

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ७६

तंव देखतांचि कुमारासी । विस्मय जाहला सकळिकांसी ।
समाराधना करिती हर्षी । महानंद प्रवर्तला ॥७६॥

सार्थ भावार्थ:

त्या बाळाला पाहताच सर्वांना आश्चर्य वाटले. त्यांनी आनंदाने समाराधना (भोजन) केली आणि मोठा आनंद पसरला.

शब्दार्थ: समाराधना = सहभोजन
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ७७

ऐसा श्रीगुरुस्थानमहिमा । अखिल लोक लाधले कामा ।
एकेकाची सांगतां सीमा । विस्तार होईल बहु कथा ॥७७॥

सार्थ भावार्थ:

असा श्रीगुरुस्थानाचा महिमा आहे. सर्व लोकांना इच्छित फळ मिळाले. एकेकाची मर्यादा सांगू लागलो तर कथा फार वाढेल.

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ७८

सिद्ध म्हणे नामधारका । स्थानमहिमा ऐसा ऐका ।
अपार असे सांगतां आणिका । साधारण तुज निरोपिले ॥७८॥

सार्थ भावार्थ:

सिद्ध म्हणाला, 'नामधारका, स्थानमहिमा असा आहे, तो ऐक. तो इतरांना सांगायला अपार आहे; तुला मी थोडक्यात सांगितला.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ७९

तया औदुंबरातळीं । श्रीगुरुवास सर्वकाळीं ।
काम्य होत तात्काळीं । आराधितां श्रीगुरुसी ॥७९॥

सार्थ भावार्थ:

'त्या औदुंबराखाली श्रीगुरूंचा वास सर्वकाळ आहे. श्रीगुरूंची आराधना केली तर इच्छा लगेच पूर्ण होते.'

शब्दार्थ: काम्य = इच्छित
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ८०

पुत्रापत्य वांझेसी । श्रियायुक्त दरिद्रियासी ।
आरोग्य होय रोगियासी । अपमृत्यु कधीं नोहे जाणा ॥८०॥

सार्थ भावार्थ:

'वांझेला पुत्रसंतान मिळते, गरिबाला संपत्ती मिळते, रोग्याला आरोग्य मिळते, आणि अपमृत्यू कधीही येत नाही.'

शब्दार्थ: अपमृत्यु = अकाली मृत्यू
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ८१

भाव असावा आपुले मनीं । पूजा करावी श्रीगुरुचरणीं ।
जे जे वासना ज्याचे मनीं । त्वरित होय परियेसा ॥८१॥

सार्थ भावार्थ:

'मनात भाव असावा आणि श्रीगुरुचरणांची पूजा करावी. ज्याच्या मनात जी इच्छा असेल ती लगेच पूर्ण होते.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ८२

कुष्ठी असेल अंगहीन । त्यानें अर्चावे गुरुचरण ।
सुवर्ण होय अंग जाण । संशय मनीं न धरावा ॥८२॥

सार्थ भावार्थ:

'कुष्ठरोगी किंवा अंगहीन असेल त्याने गुरुचरणांची पूजा करावी; त्याचे शरीर सोन्यासारखे होते. मनात संशय धरू नये.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ८३

हृदयशूळ गंडमाळा । अपस्मारादि रोग सकळा ।
परिहरती तात्काळा । श्रीगुरुपादुका अर्चिता ॥८३॥

सार्थ भावार्थ:

'हृदयशूळ, गंडमाळा, अपस्मार आदी सर्व रोग श्रीगुरुपादुकांची पूजा केली की लगेच दूर होतात.'

शब्दार्थ: गंडमाळा = गळ्यावरच्या गाठींचा रोग; अपस्मार = फेफरे
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ८४

जो का असेल मंदमति । बधिर मुका पांगूळ रक्ती ।
औदुंबरी सेवा करिती । सुदेह होय सत्य माना ॥८४॥

सार्थ भावार्थ:

'मंदबुद्धी, बहिरा, मुका, पांगळा, रक्तरोगी असे कोणीही औदुंबराखाली सेवा केली तर निरोगी होतात, हे सत्य माना.'

शब्दार्थ: पांगूळ = पांगळा
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ८५

चतुर्विध पुरुषार्थ । तेथे होय निश्र्चित ।
प्रत्यक्ष असे श्रीगुरुनाथ । औदुंबरी सनातन ॥८५॥

सार्थ भावार्थ:

'धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ तेथे निश्चित मिळतात. औदुंबरात सनातन श्रीगुरुनाथ प्रत्यक्ष आहेत.'

शब्दार्थ: चतुर्विध पुरुषार्थ = धर्म-अर्थ-काम-मोक्ष
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ८६

जया नाम कल्पतरु । प्रत्यक्ष जाणा औदुंबरु ।
जें जें मनीं इच्छिती नरु । साध्य होय परियेसा ॥८६॥

सार्थ भावार्थ:

'ज्याला कल्पतरू म्हणतात तोच प्रत्यक्ष औदुंबर आहे. माणूस मनात जे जे इच्छितो ते ते साध्य होते.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ८७

किती वर्णू तेथील महिमा । सांगतां असे अशक्य आम्हां ।
श्रीगुरु ‘नृसिंहसरस्वती’ नामा । प्रख्यात असे परियेसा ॥८७॥

सार्थ भावार्थ:

'तेथील महिमा किती वर्णू? तो सांगणे आम्हाला अशक्य आहे. श्रीगुरु 'नृसिंहसरस्वती' या नावाने प्रसिद्ध आहेत.'

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ८८

गंगाधराचा नंदन । सांगे गुरुचरित्र कामधेनु ।
भक्तिपूर्वक ऐकती जन । सकलाभीष्टें पावती ॥८८॥

सार्थ भावार्थ:

गंगाधराचा पुत्र (सरस्वती) कामधेनूसारखे गुरुचरित्र सांगतो. जे लोक ते भक्तिपूर्वक ऐकतात त्यांना सर्व इच्छित फळे मिळतात.

श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
ओवी ८९

म्हणोनि सरस्वतीगंगाधरु । सदा ध्यातसे श्रीगुरु ।
उतरावया पैलपारु । इहसौख्य परागति ॥८९॥

सार्थ भावार्थ:

म्हणून सरस्वतीगंगाधर नेहमी श्रीगुरूंचे ध्यान करतो, संसारसागराच्या पैलतीराला जाण्यासाठी; इहलोकी सुख आणि परलोकी उत्तम गती मिळते.

शब्दार्थ: पैलपार = पलीकडचा किनारा; परागति = मोक्ष
श्री गुरुचरित्र (अध्याय एकविसावा) santvani.co.in
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे
मृतपुत्रसंजीवनं नाम एकविंशोऽध्यायः ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥