॥ जय हरी विठ्ठल – श्री समर्थ धोंडूतात्या महाराज प्रसन्न ॥ संतवाणी डिजिटल लायब्ररी २०२६
🚩 प्रतिपंढरपूर - डोंगरशेळकी धाम

श्री समर्थ धोंडूतात्या महाराज महाचरित्र

भाग ११: श्री क्षेत्र डोंगरशेळकी आगमन, दत्त मंदीर स्थापना, वास्तव्यातील चमत्कार व नाम सप्ताह सोहळे.

भाग ११: डोंगरशेळकी व दत्त मंदीर स्थापना (प्रकरण ५६ ते ६०)


या भागात समाविष्ट प्रकरणे:

  • प्रकरण ५६: श्री क्षेत्र डोंगरशेळकी - तात्यांचे डोंगरशेळकी भूमीत आगमन.
  • प्रकरण ५७: दत्त मंदीर स्थापना - श्री क्षेत्र डोंगरशेळकी येथे भव्य दत्त मंदिराची स्थापना.
  • प्रकरण ५८: श्रींच्या वास्तव्यातील चमत्कार - डोंगरशेळकीतील वास्तव्या दरम्यान घडलेले दिव्य चमत्कार.
  • प्रकरण ५९: नाम सप्ताह सोहळा - अखंड हरिनामाचा गजर आणि भव्य सप्ताह.
  • प्रकरण ६०: प्रति पंढरपूर - डोंगरशेळकीला प्राप्त झालेली 'प्रतिपंढरपूर' ही अलौकिक ख्याती.

६१. श्री एकनाथ महाराजांचे आगमन

इतक्यात उंबरजहून १०-१५ माणसांसह श्री एकनाथ महाराज आले. डोक्याला जरीचा तांबडा फेटा, अंगात काळा कोट, खाली धोतर, बोटांत अंगठ्या, कानांत कुंडले आणि पायांत तोडा घालून, घोड्याला पूर्ण साज चढवून राजऐश्वर्यात ते आले.

त्यांना सन्मानाने आणण्यासाठी सर्व लोक सामोरे गेले. नामघोषाच्या गर्जनेने गगन दुमदुमून गेले. सुवासिनींनी कुंभ आणि कुमारिकांनी पंचारती ओवाळून स्वागत केले. वाद्य वाजताच एकनाथ महाराजांची घोडी तालावर नाचू लागली.

घोड्यावरून उतरून एकनाथ महाराज समर्थ धोंडूतात्यांच्या उच्चासनाजवळ आले आणि तात्यांच्या चरणी वंदन केले. दोघांची अत्यंत प्रेमळ भेट झाली. तात्यांनी पाठीवरून हात फिरवून त्यांना आपल्या शेजारी बसवून घेतले. वयोवृद्ध तात्यांजवळ नवतरुण एकनाथ महाराज बसलेले पाहून जणू बृहस्पतीजवळ कच शोभावा, तशी शोभा दिसू लागली. दोन सामर्थ्यशाली महात्म्यांचा मधुर संवाद ऐकण्यासाठी सर्व लोक लीन होऊन बसले.

६२. श्री नागादेव महाराजांचे आगमन

संवादादरम्यान तात्या म्हणाले, “तुम्ही वेळेवर आलात ते छान झाले. अशा वेळी माझे मित्र जांबचे नागादेव महाराज असते तर आणखी आनंद झाला असता!”

गावकऱ्यांनी आमंत्रण दिले नव्हते, त्यामुळे एकनाथ महाराजांनी तात्यांना विचारणा केली. तात्यांनी क्षणाचाही विलंब न लावता रुद्राक्ष माळ कंठात घातली, डोळे झाकले आणि आपल्या योगसामर्थ्याने व अचिंत्य दैवी शक्तीने जांबळबेटी जाऊन श्री नागादेव महाराजांना पाचारण केले!

काही क्षणांतच उत्तर दिशेकडून एक पुरुष वाऱ्याच्या वेगाने पृथ्वीला पाय न टेकवता अधांतरी येत असल्याचे लोकांना दिसले. गावाजवळ येताच त्यांचा तो दिव्य वेग मंदावला आणि ते जमिनीवरून चालू लागले. लोक ओळखून जयघोष करू लागले, “नागादेव महाराज आले! नागादेव महाराज आले!”

हातात वाकडा दंड, 'ॐ नमः शिवाय' चा गंभीर जप, पायांत खडावा, रुद्राक्ष माळा, भाळी आडवा गंध आणि पांढरीशुभ्र दाढी-मिशा अशा तेजस्वी रूपात ८०-८५ वर्षांचे नागादेव महाराज आले.

नागादेव महाराजांनी समर्थ तात्यांच्या चरणी आदरपूर्वक प्रणाम केला. तात्यांच्या डाव्या बाजूस एकनाथ महाराज व उजव्या बाजूस नागादेव महाराज विराजमान झाले. एकाच आसनावर हे तिन्ही महात्मे बसलेले पाहून जणू ब्रह्मा, विष्णु आणि महेश एकत्रित अवतरल्यासारखे आणि त्रिवेणी संगम झाल्यासारखे वाटू लागले!

“करू आवडीने वाद ।
तुमच्या सुखाचा संवाद।।” – संत तुकाराम महाराज

तिघां महात्म्यांमध्ये बऱ्याच वेळ सुखाचा पारमार्थिक संवाद रंगला. हे अलौकिक दृश्य पाहून उपस्थित सर्व भाविकांच्या नेत्रांचे पारणे फिटले.

❮ भाग १० मागे अनुक्रमणिका भाग १२ वाचा ➔

🚩 जय हरी विठ्ठल!

श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांची ही पावन कथा सर्व भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा.

॥ श्री समर्थ धोंडूतात्या महाराज प्रसन्न ॥