॥ जय हरी विठ्ठल – श्री समर्थ धोंडूतात्या महाराज प्रसन्न ॥ संतवाणी डिजिटल लायब्ररी २०२६
🚩 प्रतिपंढरपूर - डोंगरशेळकी धाम

श्री समर्थ धोंडूतात्या महाराज महाचरित्र

भाग १२: श्री एकनाथ व नागादेव महाराज आगमन, तात्यांच्या सामर्थ्याचा पुन:प्रत्यय आणि सूर्यगती स्तंभन प्रसंग.

भाग १२: थोर संतांचे आगमन व सूर्यगती स्तंभन (प्रकरण ६१ ते ६५)


या भागात समाविष्ट प्रकरणे:

  • प्रकरण ६१: श्री एकनाथ महाराजांचे आगमन - थोर संत श्री एकनाथ महाराजांचे डोंगरशेळकी येथे आगमन.
  • प्रकरण ६२: श्री नागादेव महाराजांचे आगमन - सिद्धयोगी नागादेव महाराजांची भेट.
  • प्रकरण ६३: श्री तात्यांच्या सामर्थ्याचा पुन:प्रत्यय - तात्यांच्या अलौकिक आध्यात्मिक शक्तीचा प्रचिती सोहळा.
  • प्रकरण ६४: सूर्यास गगनामध्ये थांबविले - पुन्हा एकदा तात्यांच्या तपोबलाने आकाशात सूर्य थांबल्याचा प्रसंग.
  • प्रकरण ६५: पिंपरीचे कृष्णाजी मामा - पिंपरी येथील निष्ठावंत भक्त कृष्णाजी मामांची पावन कथा.

६३. श्री तात्यांच्या सामर्थ्यांचा पुनःप्रत्यय

श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांची आज्ञा घेऊन गावकरी मंडळींनी दिवसा सूर्यास्ताच्या अगोदर पाच वाजताच्या सुमारास पंगती बसविण्यास सुरुवात केली. जिकडे तिकडे पंगतीमध्ये समाज गर्दीने बसून राहिला. हा सर्व समाज पाहून बाहेरगावची काही मंडळी आपापसांत चर्चा करू लागली की, "हे अन्न तर यातील अर्ध्या लोकांनाही पुरेसे होणार नाही. भोजन समयी गोंधळ होईल," असे ठिकठिकाणी बोलू लागले.

परंतु डोंगरशेळकीवासी ग्रामस्थ मात्र सर्व निःशंक व आनंदी राहून आपापल्या भागाला आलेली प्राप्ताहिक कामे झटून करू लागले. सर्व नवतरुण पाण्याने भरलेल्या घागरी खांद्यावर घेऊन नाचत गावजेवणातील पाणी भरू लागले. ही मंडळी निःशंक राहण्याचे कारण थोड्याच दिवसांपूर्वी ग्रंथसमाप्तीच्या वेळेस श्री समर्थ तात्यांनी आपल्या हातातील मूठभर तांदूळ स्वयंपाकावर शिंपडायला सांगितले होते, ते तांदूळ स्वयंपाकावर शिंपडले; त्या वेळी सर्व समाज जेवूनही स्वयंपाक काही शिल्लक होता. अशी तात्यांच्या सामर्थ्याची जाण या मंडळींना असल्याकारणाने हा सर्व समाज पाहूनही ते निःशंक होते.

प्रथम देवाला नैवेद्य अर्पण करून मग त्या स्वयंपाकाची, त्या अन्नदेवतेची पूजा करून श्रीफळ फोडले. बरीचशी मंडळी वाढण्यासाठी सज्ज झाली व त्या सर्व वाढेकऱ्यांनी एकमुखाने "पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम" असा जयजयकार करून वाढण्यास सुरुवात केली. शेकडो लोकांच्या पंगती बसलेल्या होत्या. वाढेकरी चपळाईने वाढू लागले. पंगतीची वाढ होताच काही मंडळी श्री समर्थ तात्यांच्याकडे येऊन त्यांना म्हणाले, “महाराज, पंगतीला वाढ झाली आहे, तेव्हा आपण सर्वांना जेवणाची परवानगी, आज्ञा द्यावी.”

श्री तात्या नागादेवास म्हणाले, “नागादेव, आपण उठा आणि पंगतीमध्ये जाऊन संकल्प सोडून सर्वांना प्रसाद घेण्याची परवानगी देऊन या.” असे तात्यांचे वाक्य ऐकून “हो मी करतो,” असे बोलून नागादेव महाराज चटकन उठले, ग्रामस्थ मंडळींबरोबर पंगतीमध्ये गेले व संकल्प सोडून त्यांनी मोठ्या आवाजात “पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम” असा गजर करून सर्वांना प्रसाद घेण्याची परवानगी दिली. सर्व लोक श्री समर्थ धोंडूतात्यांचा प्रसाद म्हणून आनंदाने भोजन करू लागले.

समाज तर खूपच होता. त्यांच्या भोजनाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्या समाजातील अर्ध्याच लोकांना अन्न पुरेल, असे अन्न दिसू लागले. तेव्हा ज्या मंडळींना श्री समर्थ तात्यांच्या सामर्थ्याची जाणीव नव्हती, अशी मंडळी वाढेकऱ्यांना "अहो, थोडे हात आवरून वाढा; लहान-मोठे पाहून वाढा," असे म्हणू लागली. परंतु एकाही वाढेकऱ्याने हात आवरून वाढले नाही. सर्वांची यथेच्छ भोजने झाली.

अन्न कमी पडेल अशी शंका होती पण यत्किंचितही अन्न कमी पडले नाही. कसे कमी पडेल? कारण श्री समर्थ तात्यांचे सामर्थ्यच तसे आहे. त्यांच्या जीवनात असा एकही प्रसंग घडून आला नाही की ज्या ठिकाणी श्री तात्या उपस्थित आहेत तेथे अन्न कमी पडले; असे चुकूनसुद्धा झाले नाही.

कारण अणिमा, महिमा आदी अष्टमहासिद्धी तात्यांच्या समोर कर जोडून सतत तिष्ठत उभ्या असल्याकारणाने त्यांच्या संपूर्ण जीवनात कोणत्याही गोष्टीची न्यूनता नव्हती. म्हणून ज्या गावजेवणामध्ये श्री तात्या उपस्थित राहिले; तेथे हजार माणसांचा स्वयंपाक केलेला असता तर दोन हजार समाज जेवूनही अन्न शिल्लक राहत असे. एवढी बरकत त्या अन्नामध्ये निर्माण व्हावयाची. असे का होत होते, तर श्री तुकाराम महाराज म्हणतात:

“अष्ट महासिद्धी ओळंगती द्वारी ।
नवजती दुरी दवडीता।।” – संत तुकाराम महाराज

ज्या महात्म्यांच्या हातामध्ये भक्तीचे वर्म आलेले आहे, त्यांच्या घरी दैवी संपत्ती नांदते. अष्टमहासिद्धी त्यांच्या द्वारामध्ये ओळंगतात, तिष्ठत राहतात आणि सर्व कामे आपण होऊन करतात. अशा सर्व सिद्धी तात्यांच्या सान्निध्यात वावरत असल्याकारणाने त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. म्हणूनच आज एवढा समाज जमलेला असूनही प्रत्येकाची व्यवस्थितपणे जेवणे झाली. सर्वांनी तृप्तीचे ढेकर दिले.

खरोखर, त्या पंगतीमध्ये बसून महाप्रसाद सेवन करणाऱ्यांचे किती भाग्य असेल! कारण श्री समर्थ धोंडूतात्या महाराज, श्री एकनाथ महाराज व श्री नागादेव महाराज या तीन महात्म्यांचे दर्शन व यांच्या हस्तस्पर्शाने पवित्र झालेल्या अन्नाचे भोजन; किती आनंदाचा तो प्रसंग! संत निळोबारायांच्या शब्दांत:

“धन्य ही आनंदाची सापडली वेळ ।
तेणे संत सज्जन भेटले कृपाळ।।” – संत निळोबाराय

६४. सूर्यास गगनामध्ये थांबविले

श्री नागादेव महाराज पंगतीमध्ये फिरू लागले, वाढेकरी वाढू लागले, जेवणारी माणसे जेऊ लागली. ती पहिलीच पंगत होती. त्यांनी पंगतीमध्ये फिरताना "भरपूर घ्या, पोटभर जेवा," असे म्हणण्यास सुरुवात केली.

तेव्हा काही वडील माणसे श्री नागादेव महाराजांना म्हणाली, “महाराज, ही पहिलीच पंगत आहे आणि दिवस तर मावळायला गेला आहे. पुन्हा आणखी दोन-तीन पंगती बसतील; रात्र तर अंधाराची आहे. तेव्हा आता उजेडाची, प्रकाशाची काय व्यवस्था करावी? म्हणून काळजी वाटत आहे.”

श्री नागादेव महाराज म्हणाले, “तुम्ही काही काळजी करू नका. कारण हा भंडारा ज्यांनी केलेला आहे ते श्री धोंडूतात्या महाराज सूर्योपासक आहेत. तेव्हा ते पंगतीमध्ये कसा अंधार पडू देतील? तुम्ही फक्त वाढ करा.”

असे बोलून ते श्री समर्थ तात्यांच्या जवळ आले व त्यांना म्हणाले, “महाराज, दिवस तर मावळायला गेला आणि आणखी पहिली पंगतही उठली नाही. मग समाज तर जेवायचा तसाच राहिला आहे; अंधार पडल्यानंतर कसे जेवतील?”

हसतमुखाने श्री तात्या म्हणाले, “मग मी काय करू?” नागादेव महाराज म्हणाले, “आपण सूर्याचे उपासक आहात; तेव्हा आज आपण आपल्या सूर्यदेवतेस प्रकाशाची मागणी करून सर्वांना प्रकाशात जेवू घाला.” श्री तात्या म्हणाले, “बरे ठीक आहे. करू काही तरी! तुम्ही वाढ करायला सांगा.”

असे बोलत मावळत्या सूर्याकडे किंचित मान वळवून पाहिले आणि पुन्हा सरळ होऊन आपले दोन्ही हात जोडून श्री तात्या ध्यानस्थ बसले. त्या वेळी श्री एकनाथ महाराज, श्री नागादेव महाराज यांच्यासहित ज्या ज्या मंडळींना श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या अचिंत्य सामर्थ्याची जाणीव होती, ती सर्व मंडळी तात्यांकडे पाहत अगदी तटस्थ मौनावस्थेमध्ये बसून राहिली. सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

इकडे पहिली पंगत उठली, दुसरी बसली व व्यवस्थितपणे जेवणे झाली. ती दुसरी पंगत उठल्यानंतर तिसऱ्या पंगतीचे जेवण सुरू झाले. आश्चर्य असे की पहिल्या पंगतीलाच सूर्य मावळणार असे प्रत्येकाला वाटले होते, पण सूर्य काही मावळत नव्हता! आकाशामध्ये मावळतीचा सूर्य पहिल्या पंगतीच्या वेळी जेथे होता, तेथेच तिसऱ्या पंगतीच्या वेळीही स्तब्ध थांबलेला होता. सर्व लोक आश्चर्याने पाहू लागले की:

पहिली पंगत जेवताना सूर्य तेथेच होता! दुसरी पंगत जेवतानाही सूर्य तेथेच!! आणि तिसरी पंगत जेवली तरी सूर्य तेथेच!!!

राहिलेले वाढेकरी वगैरे सर्व लहान-थोर जेवून झाले तरी सूर्य तेथेच होता. अन्नही कमी पडले नाही व सूर्यही मावळला नाही.

“नोहे हा सामान्य महिमा संतांचा।।” – संत निळोबाराय

धन्य तात्यांची निष्ठा व धन्य तात्यांचे सामर्थ्य! श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे हे सामर्थ्य पाहून श्री नागादेव महाराजांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले, कंठ दाटून आला. तेव्हा हलक्या आवाजात ते एकनाथ महाराजांना म्हणाले, "वेळ पुष्कळ झालेली आहे. श्री तात्यांना इतका वेळ मी उगीच शिणवले," असे बोलत हात जोडून तटस्थ राहिले.

तेव्हा एकनाथ महाराजांनी श्री तात्यांच्या चरणाला हळूच स्पर्श करून म्हटले, 'महाराज सर्वांची जेवणे झाली, वेळ पुष्कळ झालेली आहे.' श्री समर्थ तात्यांनी आपली समाधी व्युत्थान करून प्रसन्न मुद्रेने पाहत नागादेवास विचारले, “सर्वांची जेवणे झाली का?” श्री नागादेव म्हणाले, “हो महाराज, सर्वांची जेवणे झाली.”

श्री तात्यांनी पुन्हा आपली मान वळवून मावळत्या सूर्याकडे पाहिले आणि आपले हात गुडघ्यांवरून फिरवत सर्वांकडे प्रसन्न मुद्रेने पाहू लागले. तेवढ्यात एक-दोन क्षणांमध्येच सूर्य मावळला व गडद अंधकार पडला.

त्या वेळी साधारण रात्री नऊ वाजताचा समय होता, असे बहुसंख्य लोकांचे म्हणणे आहे. म्हणजेच सहा ते नऊ वाजेपर्यंतचा पहिला एक प्रहर असतो, तर श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांनी आकाशामध्ये थांबवलेला सूर्य अडीच तास स्तब्ध होता! प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर गंभीर छटा उमटली. सर्व लहान-थोर श्री तात्यांचे गुणगान गाऊ लागले. प्रत्येकाच्या बोलण्याचा विषय श्री तात्याच झाले. असे त्यांचे गुणवर्णन करत सर्व लोक त्या अंधारातच आपापल्या घरी गेले.

इकडे श्री तात्यांसाठी सोवळ्यामध्ये स्वयंपाक केलेला होता. या तिन्ही महात्म्यांनी एका पंगतीला बसून भोजन केले व रात्री हरिकीर्तन-भजन ऐकत रात्रभर जागरणामध्ये घालवून दुसऱ्या दिवशी काल्याचे कीर्तन झाले. लाही घेऊन श्री नामदेव महाराज व जांबचे नागादेव महाराज परत स्वस्थानी जाण्यासाठी सज्ज झाले. तेव्हा डोंगरशेळकीच्या ग्रामस्थांनी या दोन्ही महात्म्यांना थाटाने व सन्मानाने निरोप दिला.

६५. पिंपरीचे कृष्णाजी मामा

उदगीर तालुक्याच्या ईशान्य दिशेला 'पिंपरी' नावाचे एक गाव आहे. त्या गावचे काही भाविक श्री तात्यांच्या दर्शनानिमित्त अधूनमधून विराळ गावी जात होते. त्या सर्वांमध्ये कृष्णाजी नावाचे एक भक्त होते.

ज्याप्रमाणे सर्वांमध्ये सगुणप्रेमी लडिवाळ भक्तशिरोमणी नामदेव महाराज हे विठ्ठलाचे अत्यंत आवडते भक्त होते, त्याप्रमाणे सर्वांमध्ये विशेषत्वाने श्री तात्यांची जवळीक साधणारे एकमेव भक्त म्हणजे हे श्री कृष्णाजी होते. या भक्ताला त्यांच्या जीवनामध्ये श्री तात्यांशिवाय दुसरा कोणताच विषय नव्हता. त्यांची अवर्णनीय स्वरूपाची दृढ भक्ती तात्यांच्या चरणी जडली होती.

श्री समर्थ तात्या डोंगरशेळकीस आल्यानंतर त्यांनी तात्यांच्या सहवासाचा जास्तीत जास्त लाभ घेतला. तात्यांना तपकिरीची सवय होती, म्हणून हे कृष्णाजी स्वतः तपकीर घेऊन जाऊन ती तात्यांना देऊन त्यांचे दर्शन घेत असत. आपल्या लडिवाळ भक्ताने माझ्यासाठी किती चांगली तपकीर आणली, म्हणून तात्या ती घेऊन आवडीने ओढत असत.

एके दिवशी कृष्णाजीभक्त श्री तात्यांच्या भेटीनिमित्त डोंगरशेळकीस निघाले. वाटेत नावंदी गावावरून येत असताना एका ठिकाणी काकडीचा वेल दिसला. आपल्या तात्यांना भोजनामध्ये कोशिंबीर फार आवडते, म्हणून या कृष्णाजींनी दोन काकड्या तोडल्या. आपल्या वेलीच्या काकड्या कोणीतरी अनोळखी मनुष्याने तोडल्या म्हणून ती स्त्री क्रोधयुक्त होऊन त्यांना शिव्या देऊ लागली.

तेव्हा त्या स्त्रीस कृष्णाजी म्हणाले, “बाई, या दोन काकड्या मी श्री धोंडूतात्या महाराजांना नेऊन देण्यासाठी तोडल्या आहेत.” ती स्त्री म्हणाली, “वा! न विचारता तोडायच्या आणि अंगावर गोष्ट आली म्हणजे महाराजांचे नाव पुढे करायचे, हे बरे शहाणपण आहे!” असे बरेच शब्द त्या स्त्रीने वापरले. कृष्णाजी मनात म्हणाले, “ही स्त्री कितीही शिव्या देवो, पण माझ्या महाराजांना कोशिंबीर आवडते; तेव्हा आपण घेऊनच जाऊ.” असा विचार करून ती स्त्री रागावली तरी काहीही न बोलता ते डोंगरशेळकीस आले.

श्री समर्थ तात्यांचे दर्शन घेऊन त्यांनी आणलेल्या काकड्या महाराजांपुढे ठेवल्या व आणलेली तपकीर तात्यांना देऊ लागले. तेव्हा तात्या म्हणाले, “काय रे कृष्णाजी, त्या बाईचे तेवढे बोलून घेऊन या काकड्या कशाला घेऊन आलास?” कृष्णाजी म्हणाले, “महाराज, ती बोलली म्हणून काय झाले? मी तुमच्यासाठी आणले आहे.” आपल्याला वाटेत घडलेला प्रसंग श्री समर्थ तात्यांना कसा समजला असावा, याचे कौतुक या भक्तास वाटले.

असे अनेक प्रसंग घडत गेले. त्याचबरोबर तात्यांची महती, त्यांचे सामर्थ्य, त्यांचे अलौकिकत्व व संतत्व हे सर्व समजून आले आणि त्यामुळे त्यांची दृढ भक्ती तात्यांच्या चरणी जडली. श्री समर्थ तात्याही प्रेमाने त्यांना आपले मनोगत सांगू लागले. आपला प्रेमळ व एकनिष्ठ भक्त म्हणून श्री तात्यांनी या कृष्णाजीस एक पंचा व रुद्राक्षाची माळ दिली. या भक्ताने आपल्या जीवनात त्या माळेस व पंचास प्राणांपेक्षाही अधिक जपून स्वतःजवळ ठेवले.

एका पाटावर तो लहानसा पंचा पसरून त्यावर ती रुद्राक्षमाळ ते ठेवत असत. दररोज स्नानानंतर नित्यनियमाने तो पाट पुढे घेऊन त्या माळेने जप करत असत व जप संपल्यावर त्या पाटावर पंचा पसरून त्यावर त्या माळेला ठेवत असत. असा त्यांचा काळ हरिनामात चालला होता. त्यांच्या ध्यानी-मनी श्री समर्थ तात्याच बसले होते.

पुढे श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे देहावसान (प्रयाण) झाल्यानंतर या भक्तास फारच दुःख झाले. कधी कधी तर "तात्या तात्या" म्हणून टाहो फोडून ते रडू लागत. त्यांचे कोठेही मन रमेना; तात्यांवाचून त्यांना हुरहूर वाटू लागली.

तेव्हा त्यांच्याकडे एक म्हैस होती; ती म्हैस विकून त्यांनी त्या रुपयांतून श्री समर्थ तात्या महाराजांची ओताऱ्याकडून एक पितळी मुखवटा—अर्थात गळ्यापासून वरच्या भागाची प्रतिमा तयार करून आणली आणि रात्रंदिवस त्या मूर्तीची सेवा करू लागले. त्या मूर्तीशी ते बोलू लागले, त्या मूर्तीला साखर चारू लागले. खरोखर:

“नव्हे हा सामान्य महिमा संतांचा ।
नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी।।”

ज्याप्रमाणे श्री नामदेव महाराजांच्या हातचा नैवेद्य देवाने खाल्ला, त्याप्रमाणे या प्रेमळ भक्ताच्या हातातील साखर त्या मूर्तीच्या तोंडाला लावली असता ती साखर श्री समर्थ तात्या खात असत! या भक्ताने हातावर साखर घेऊन तात्यांना खाण्याबद्दल आग्रह करत नामस्मरण करताना थोड्याच वेळात ती हातातील साखर आपोआप संपून जायची!

तसेच कधी कधी काही लोक या भक्तास विनोदाने विचारायचे, “काय कृष्णाजी, पाऊस केव्हा पडणार आहे?” त्या लोकांना ते म्हणायचे, “मी महाराजांना विचारून येऊन पावसाची तारीख सांगतो.” असे म्हणून ते घरी येऊन श्री समर्थ तात्यांच्या मूर्तीशी बोलत असत व या सर्व गोष्टी विचारत असताना त्या मूर्तीतून स्वतः श्री तात्या त्यांना उत्तर देत असत!

तेव्हा हे बाहेर येऊन सर्वांना सांगायचे की, “श्री तात्यांना पाऊस पडण्याविषयी विचारले, तेव्हा त्यांनी उद्या दुपारी दोन वाजता पूर जाण्याइतका मुसळधार पाऊस पडणार आहे असे सांगितले आहे.” असे ऐकून त्या सर्वांना हसूच आले. परंतु दुसऱ्या दिवशी दोन वाजता सांगितल्याप्रमाणे मुसळधार पाऊस सुरू झाला! तेव्हा सर्व पिंपरीनिवासीयांना श्री कृष्णाजीच्या प्रेमळ भक्तीमध्ये काय सामर्थ्य आहे हे कळून आले.

पुन्हा ज्या ज्या वेळी लोक अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी कृष्णाजींना विचारू लागले, त्या त्या वेळी कृष्णाजी तात्यांना विचारून घेऊन सांगताच ते सर्व सत्य होऊ लागले. असे प्रत्यक्षात कितीतरी प्रसंगी लोकांनी विचारले व कृष्णाजींनी सांगितल्याप्रमाणे सर्व सत्य स्वरूपात वस्तुस्थितीने सर्वांना दिसून आले.

त्यामुळे पिंपरी गावातील सर्व लहान-थोरांची दृढ निष्ठा समर्थ तात्यांच्या चरणी जडली. सर्व गावकरी भाविक भक्त त्यांच्या स्मरणाप्रीत्यर्थ प्रतिवर्षी अखंड हरिनाम सप्ताह करतात. तात्यांची सर्व महती जाणून या ग्रामवासियांनी आपल्या पिंपरी गावामध्ये श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे भव्य मंदिर बांधले आहे.

❮ भाग ११ मागे अनुक्रमणिका भाग १३ वाचा ➔

🚩 जय हरी विठ्ठल!

श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांची ही पावन कथा सर्व भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा.

॥ श्री समर्थ धोंडूतात्या महाराज प्रसन्न ॥