॥ जय हरी विठ्ठल – श्री समर्थ धोंडूतात्या महाराज प्रसन्न ॥ संतवाणी डिजिटल लायब्ररी २०२६
🚩 प्रतिपंढरपूर - डोंगरशेळकी धाम

श्री समर्थ धोंडूतात्या महाराज महाचरित्र

भाग १३: देऊळवाडी, गणपती दर्शन, 'माझाच रुपया मला' प्रसंग व विराळवासी पश्चाताप.

भाग १३: देऊळवाडी, गणपती दर्शन व पश्चाताप (प्रकरण ६६ ते ७०)


या भागात समाविष्ट प्रकरणे:

  • प्रकरण ६६: देऊळवाडी - देऊळवाडी क्षेत्रातील अध्यात्मिक प्रसंग.
  • प्रकरण ६७: गणपती महाराज आले - गणपती महाराजांचे आगमन व भावबंध.
  • प्रकरण ६८: माझाच रुपया मला - तात्यांच्या अंतर्यामी ज्ञानाचा प्रचिती देणारा प्रसंग.
  • प्रकरण ६९: विराळवासी पश्चाताप - तात्यांच्या निर्गमनानंतर विराळच्या लोकांना झालेला पश्चाताप.
  • प्रकरण ७०: दर्शन्ही दिले नाही - पश्चातापाने आलेल्यांना तात्यांनी दर्शन न देण्याचा कटू प्रसंग.

६६. देऊळवाडी

श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या जीवनामध्ये त्यांचे निष्कलंक नैष्ठिक ब्रह्मचर्य, अचिंत्य योगसामर्थ्य व अपूर्व भक्तीचा त्रिवेणी संगम झालेला असल्याकारणाने सर्व जनतेची दृढ निष्ठा त्यांच्या चरणी जडली. म्हणून गावोगावचे भाविक भक्त त्यांना आपल्या गावी घेऊन जाऊ लागले.

तेव्हा प्रत्येकाच्या निमंत्रणास मान देऊन समाजाला व्यसनांपासून परावृत्त करीत, अनेक प्रकारची सत्कर्मे करीत गावोगावच्या लोकांना भेटी देऊन पावन करू लागले. तेव्हा श्री तात्यांच्या विषयी सर्व लोकांच्या मनात आदराची भावना राहून त्यांच्या भेटीची सर्वांना आपुलकी वाटू लागली.

असे प्रत्येक गावची भक्तमंडळी आपापल्या परीने तात्यांच्या चरणी आदरभाव व जिव्हाळा ठेवून वर्तन करू लागली. विशेष करून देऊळवाडी (ता. उदगीर) येथील काही भक्तमंडळी तर श्री समर्थ तात्यांच्या सतत सान्निध्यात राहून त्यांनी काया वाचा मनाने सेवा केली व शेवटपर्यंत त्या भक्तांची तात्यांच्या चरणी दृढनिष्ठा राहिली.

६७. गणपती महाराज आले

श्री तात्यांचे व गणपती महाराजांचे नाते (संबंध) चुलत्या-पुतण्याचे होते. अर्थात गणपती महाराज तात्यांच्या वडील बंधूंचे कनिष्ठ चिरंजीव. ते लहानपणी काही काळ विराळ गावी तात्यांजवळ राहून त्यांची सेवा करू लागले. त्या वेळी गणपती महाराजांना "तू लग्न करू नकोस, मी तुला दत्तकपुत्र म्हणून माझ्याजवळ ठेवून घेईन" असे तात्यांनी सांगून ठेवलेले होते. परंतु त्यांनी न मानता पुढे विवाहबद्ध होऊन लोहा येथे आपल्या घरी राहू लागले.

इकडे तात्यांजवळ असलेला त्यांचा शिष्य (दत्तक) पळून गेला. तसेच तात्यांनी विराळचा परित्याग करून डोंगरशेळकीस रहिवास केला आणि शेळकी गावाला पाणी दिले. गावजेवणामध्ये आपल्या तपःसामर्थ्याने गगनात सूर्याला एक प्रहर उभे केले. हा सर्व महिमा श्रुत होताच गणपती महाराज सहकुटुंब डोंगरशेळकीस आले आणि तात्यांचे पाय धरून 'मला पदरामध्ये घ्या' अशी विनवणी करू लागले. त्या वेळी श्री समर्थ तात्यांनी त्यांना आश्रय देऊन माझ्याजवळ ठेवून घेतले.

गणपती महाराज सहकुटुंब तात्यांच्या सान्निध्यात राहून त्यांची सेवा करू लागले. असा अडीच वर्षाचा काळ बस्तापुरे यांच्या घरी गेला. नंतर श्री समर्थ तात्यांचे दूरदूरचे नातेवाईक, पाहुणे व भक्तमंडळी त्यांच्या भेटीसाठी खूपच येऊ लागली. तेव्हा गावातील काही मंडळींसमोर "आम्हाला राहण्यासाठी मोकळी जागा असावी" असे गणपती महाराजांनी सांगितले. तेव्हा गावातील काही प्रतिष्ठित मंडळींनी श्री संगा शेळके यांच्या वाड्यामध्ये तात्यांची राहण्याची व्यवस्था केली.

६८. माझाच रुपया मला

श्री समर्थ तात्यांची किती सर्वज्ञता होती? हे विचार करण्यासारखे आहे की ते दुसऱ्यांच्या मनातील हेतू पण ओळखत होते. एके दिवशी सणानिमित्त सर्वजण दक्षिणा देऊन श्री तात्यांचे दर्शन घेऊ लागले. तात्या जमलेली रक्कम माझ्याजवळ न ठेवता आपल्या संबंधात असलेल्या कोणाही एका प्रामाणिक व्यक्तीकडे जमा ठेवत असत.

सर्व लोक दर्शनास येत असलेले पाहून ज्यांच्याकडे रक्कम जमा होती ती व्यक्ती पण दर्शनासाठी निघाली, परंतु दक्षिणा देण्यासाठी त्यांच्याकडे रुपया नव्हता. त्या वेळी त्यांनी विचार केला की आपल्याकडे महाराजांनी ठेवलेले रुपये आहेत, तेव्हा त्या रुपयांतील एक रुपया घेऊन जाऊन तो महाराजांना देऊन दर्शन करावे; नंतर त्यामध्ये आपला रुपया घालू. म्हणून तो रुपया घेऊन ते गृहस्थ श्री तात्यांकडे आले.

बैठकीमध्ये मंचकावर श्री तात्या बसले होते व भोवती बाजूला काही भाविक भक्त बसलेले होते. बैठकीमध्ये बराच सुखाचा संवाद झाला. नंतर जाते वेळी प्रत्येकजण दक्षिणा देऊन दर्शन घेऊ लागला. शेवटी हे गृहस्थ दर्शनासाठी पुढे येऊन तो रुपया महाराजांना देऊन दर्शन घेऊ लागले. तो रुपया हातात पडताच श्री तात्या म्हणाले, "का रे, मी तुला काही जबरदस्ती केलेली होती किंवा तुला दंडदोष देणार होतो का? म्हणून तू माझाच रुपया मला देऊन दर्शन घेत आहेस."

तात्यांचे हे शब्द ऐकून सर्वजण चकित झाले आणि हा रुपया तात्यांनी कसा ओळखला? हे जाणून त्यांच्या सर्वज्ञतेची प्रशंसा करू लागले. अर्थात तात्या सर्वांचे मनोगत ओळखत होते.

६९. विराळवासी पश्चात्तापात

श्री समर्थ तात्यांच्या जीवनामध्ये असे काही हृदयद्रावक प्रसंग घडत आलेले होते, त्यामुळे त्यांच्या जीवनाची चरित्ररुपी गंगा वाहू लागली. जिकडे-तिकडे सर्व लोक तात्यांची कीर्ती वर्णन करू लागले. त्यांच्या हयातीतच त्यांची कीर्ती वायुवेगाने दशदिशांत व्यापली. "श्री तात्यांनी विराळ सोडले," असे गावोगावचे लोक विराळवासियांना नावे ठेवून बोलू लागले.

तेव्हा सर्व विराळवासी पश्चात्तापात पडले व श्री तात्यांना आपल्या गावी घेऊन जाण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागले. प्रत्येकाचा स्वभाव असा आहे की, एखादी बहुमोलाची वस्तू सतत सान्निध्यात निकटवासात असली तर तिची किंमत, त्या वस्तूचे माहात्म्य बहुतेकांना जाणवत नाही. पण तीच वस्तू जशी जशी आपल्यापासून दूर जाते तशी त्या वस्तूची महती कळू लागते. त्याप्रमाणेच सर्व विराळवासियांना आता तात्यांची महती कळून आली.

परंतु आता कळून काही उपयोग नव्हता, कारण श्री तात्यांनी डोंगरशेळकीच्या भक्तमंडळींना सांगून ठेवले होते की, "कोणी विराळचे लोक आले तर माझे दर्शनसुद्धा घेऊ देऊ नका. इतकेच नव्हे तर माझ्या देहपाता नंतर माझ्या शरीराची राख (भस्म) देखील त्यांना देऊ नका." असे सांगून ठेवलेले असल्याकारणाने सर्व डोंगरशेळकीवासी श्री तात्यांच्या सतत सान्निध्यात राहून त्यांची सेवाभक्ती करून त्यांच्या मनाला आनंद देऊ लागले व तात्यांच्या संरक्षणात जबाबदारीने राहू लागले. "आपण श्री तात्यांच्या बरोबर उगीच विरोध केला, परंतु आता तरी आपण काहीही प्रयत्न करू पण त्यांना आपल्या गावी घेऊन जाऊ," असा विचार विराळवासी करू लागले.

७०. दर्शनही दिले नाही

श्री तात्यांना विराळगावी घेऊन जाण्याचा प्रयत्न विराळवासी करू लागले व वेळोवेळी २०-२५ माणसे मिळून डोंगरशेळकीस येऊ लागली. परंतु श्री तात्यांनी विराळला जावयाचे नाही, असे मनोमन ठरवलेले होते. त्यामुळे त्या विराळवासियांचे सर्व प्रयत्न निष्फळ होऊ लागले.

त्याचे कारण विराळचे लोक गावच्या सीमेवर येऊन पोहोचले की तात्यांना अंतर्ज्ञानदृष्टीने समजत होते. त्या वेळी तात्या डोंगरशेळकी येथील मंडळींना म्हणायचे की, "विराळचे लोक मला घेऊन जाण्यासाठी आपल्या गावाच्या जवळ आलेले आहेत. तेव्हा लोकांनी येऊन माझ्याविषयी विचारपूस केली तर 'महाराज दुसऱ्या गावी गेले आहेत' असे सांगा आणि माझा पत्ता त्यांना लागू देऊ नका." असे तात्यांनी सर्वांना सांगून ठेवले होते.

इतक्यात विराळचे लोक गावामध्ये आले व श्री तात्यांच्या विषयी विचारपूस करू लागले, तेव्हा सर्वांनी एकमुखाने तात्या इथे नाहीत, आज ते दुसऱ्या गावी गेले आहेत असे सांगितले. त्या वेळी ती विराळची मंडळी निराश होऊन आपल्या गावी परत गेली. पुन्हा ज्या ज्या वेळी येऊन त्यांनी विचारपूस केली, त्या त्या वेळी दुसऱ्या कोणत्या तरी गावचे नाव सांगून आज श्री तात्या गावी नाहीत असे सांगून त्या विराळवासियांना बऱ्याच वेळेस निराश करून परत केले. परंतु विराळचा परित्याग करून डोंगरशेळकीस आल्यानंतर पुढे सहा वर्षांच्या काळात विराळच्या त्या लोकांना तात्यांनी आपले दर्शनही दिले नाही व विराळला जाण्याचे टाळले.

७१. पायांमध्ये काटे निघाले

श्री तात्यांना कुठे बाहेर गावी जावयाचे झाले तर दोन माणसांनी अलगदपणे उचलून मेण्यामध्ये बसवावे लागत होते. तसेच त्यांना लघुशंका करावयाची असेल किंवा शौचास जावयाचे झाले तर माणसांनी उचलून नेऊन बसवावे लागत होते. अशी त्यांची एकंदरीत अवस्था होती. अर्थात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावयाचे झाले तर उचलून ठेवावे किंवा न्यावे लागत होते.

असे असले तरी त्यांचे एक आश्चर्य असे की, सकाळी त्यांच्या दर्शनानिमित्त काही भक्तमंडळी त्यांच्याकडे आली असता श्री तात्या त्यांना आपल्या पायातील काटे काढावयास लावत असत. डोंगरशेळकी येथील काही भक्तमंडळींनी तात्यांच्या पायांतील काटे काढलेले आहेत. यावरून सर्व भाविक विचार करू लागले की, श्री तात्यांना तर जागाही सोडता येत नाही, परंतु एवढे काटे यांच्या पायांमध्ये रुतले कसे? कशामुळे पायांमध्ये काटे मोडतात? हे कोणालाही समजेनासे झाले.

असाच एक वेळ श्री तात्यांच्या पायामध्ये काटा मोडला होता. त्यांच्या दर्शनानिमित्त एक भक्त श्री तात्यांच्या जवळ जाऊन चरणाला स्पर्श करताच मंचकावर (पलंगावर) बसलेले तात्या त्या भक्तास म्हणाले, “अरे, माझ्या पायामध्ये काटा मोडलेला आहे. एवढा काटा काढून टाक बरे!” त्यांनी तात्यांचा पाय आपल्या गुडघ्यावर घेऊन पायांतील काट्याकडे पाहिले. काट्याचे टोक वरून नसवास लागत होते व तो पायामध्ये खोलवर रुतलेला होता. तो भक्त काट्याकडे पाहून घाबरला. त्यांनी नखाने तो काटा काढण्याचा खूप प्रयत्न केला पण काटा काही निघत नव्हता. तो तात्यांना म्हणाला, “महाराज, हा काटा काढण्यासाठी मी चिमटा (लाचकण) घेऊन येतो.” असे बोलून त्यांनी मेहतरच्या घरी येऊन चिमटा घेऊन मेहंतरासह परत आला व तो काटा काढण्यासाठी तात्यांच्या पायांकडे पाहू लागला. त्या वेळी पायांमध्ये काटाही दिसला नाही आणि तो काटा काढून टाकला म्हणावे तर त्या स्थानी त्या काट्याचा वणही (छिद्रही) नव्हता!

त्या भाविकाला आश्चर्य वाटले व त्यांनी श्री तात्यांना विचारले, “महाराज, आपल्या पायांत काटे मोडलेले दिसतात; तेव्हा तुम्ही कुठे फिरायला जाता?” असा प्रश्न ऐकून श्री तात्या म्हणाले, “अरे, हे सांगून कसे कळायचे? मला उभे राहता येत नाही, मग मला हिंडता-फिरता कसे येईल?” असे त्यांचे वाक्य ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले व "हा काय प्रकार असावा" असा विचार करू लागले.

७२. योगाची शक्ती

श्री समर्थ तात्यांच्या अंगी भक्तीबरोबर योगाचेही खूप सामर्थ्य होते. या योगामुळे अघटित घटना घडून समाजाच्या दृष्टीपुढे असे प्रसंग चमत्काराच्या रूपाने उभे राहू लागले. हे अघटित प्रसंग कसे घडतात हे जनसामान्यांना कसे कळणार? मग हे कोणाला कळते? याचे उत्तर असे आहे की, ज्याप्रमाणे:

“भक्तांचा महिमा भक्तचि जाणती ।
दुर्लभ या गती आणिकांसी।।” – संत तुकाराम महाराज

श्री तुकाराम महाराज म्हणतात, भक्ताचा महिमा भक्तांनाच कळतो. इतरांना तो दुर्लभ असतो, अगम्य स्वरूपाचा असतो. अर्थात भक्ताचा महिमा भक्तच जाणू शकतात; त्याप्रमाणेच योगी पुरुषाचा महिमा योगी लोकच जाणू शकतात. म्हणून उंबरजचे नामदेव महाराज, अंबुलग्याचे निवृत्ती महाराज, जांबचे नागादेव महाराज व श्री समर्थ धोंडूतात्या महाराज हे सर्व समवयस्क असून हे सर्व महात्मे योगी व संत होते. यांनी एकमेकांमध्ये फारच आपुलकीचे संबंध ठेवले होते.

श्री समर्थ योगी असल्याकारणाने ते आपल्या योगसामर्थ्याने स्वेच्छेने अघटित घटना घडवू लागले. कारण योग्याच्या अंगी अशी शक्ती, असे सामर्थ्य असतेच. याविषयी श्री ज्ञानेश्वर महाराज लिहितात:

“ऐके देह होय सोनियाचे । परी लाघव ये वायूचे ।
जे आप आणि पृथ्वीचे । अंशु नाही ।।
मग समुद्रापैलीकडील देखे । स्वर्गीचा आलेचु ऐके ।
मनोगत ओळखे । मुंगियेचे ।।
पवनाचा वारिक वावळे । चाले तरी उदकी पाऊल न लागे ।
येणे येणे प्रसंगे । येती बहुता सिद्धी।।” – संत ज्ञानेश्वर महाराज

योग्याचा देह सोन्यासारखा कांतिमान होतो, परंतु त्याच्या शरीरात वाऱ्यासारखा हलकेपणा येतो; कारण त्या देहातील पाणी आणि पृथ्वी यांचे वजनदार अंश नष्ट झालेले असतात. मग तो योगी एका ठिकाणी बसून समुद्राच्या पलीकडचे पाहतो, स्वर्गातील शब्द ऐकतो आणि मुंगीच्या मनातील विचार ओळखतो. वाऱ्याच्या घोड्यावर बसून फेरफटका मारतो, पाण्यावरून चालला तरी पायाला पाणी लागत नाही. अशा वेगवेगळ्या प्रसंगाने त्याच्याजवळ पुष्कळ सिद्धी येतात. असे योगाचे सामर्थ्य श्री तात्यांच्या अंगी असल्याकारणाने अनेक प्रसंग चमत्काररूपाने घडत गेले.

❮ भाग १२ मागे अनुक्रमणिका भाग १४ वाचा ➔

🚩 जय हरी विठ्ठल!

श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांची ही पावन कथा सर्व भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा.

॥ श्री समर्थ धोंडूतात्या महाराज प्रसन्न ॥