७३. इच्छामरणी संत
पुढे थोड्याच दिवसांत श्री तात्यांच्या आयुष्याचा काळ संपत आला. जीवन म्हणजे जिचा प्रवाह कधीही उलट्या दिशेने वाहत नाही, अशी एक नदी आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्याचा नित्य ऱ्हास होत असतो. कच्च्या मडक्यातील पाणी झिरपावे त्याप्रमाणे मनुष्याचे आयुष्य प्रत्येक क्षणाला कमी कमी होत असते आणि सकाळनंतर दुपार व दुपारनंतर हळूहळू सूर्य अस्तमानाला जातो; तसे बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धापकाळ प्राप्त होऊन जीवनाचा अंत होतो. मृत्यूकाळ सर्वांच्या पाठीमागे लागलेला असतो. तो मृत्यूकाळ केव्हा येईल? हे काही सांगता येत नाही. परंतु संतांनी मात्र काळाला आपल्या ताब्यात ठेवले. त्याप्रमाणे श्री समर्थ तात्यांनी त्या काळाला आपल्या ताब्यात, अंकित ठेवून इच्छामरणी महापुरुष (संत) झाले. कारण आरोग्यसंपन्न आयुष्याचा एक शतक ओलांडून ते पुढे गेले होते.
श्री समर्थ तात्यांनी एके दिवशी डोंगरशेळकी येथील आपल्या नेहमी सान्निध्यात राहणाऱ्या दोन भाविक भक्तांना आपल्या अंतकाळाचा दिवस अर्थात देह ठेवण्याचा दिवस व अंत्येष्टी संस्काराचे स्थळ, या दोन्ही गोष्टी सांगून ठेवल्या. "मी आजपासून पाचव्या दिवशी देह ठेवणार आहे," असे निर्धाराने सांगून ठेवले. हे केवढे आश्चर्य! कारण आपल्या अंतकाळाचा निश्चित दिवस कोणता? हे इतरांना कळणे शक्य नाही. परंतु साधुसंत व योगी यांना मात्र अंतकाळाचा दिवस समजतो. याविषयी श्री ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे:
“कांनी घालूनियां बोटे नाद जे पाहावे । न दिसता जाणावे नऊ दिवस ।।१।।
भोवयां पाहतां न दिसे जाणा । आयुष्याची गणना सात दिवस ।।२।।
डोळां घालोनियां बोटे चक्र जे पहावे । न दिसता जाणावे पांच दिवस ।।३।।
नासाग्रीचे अग्र न दिसे नयनी । तरी तेचि दिनी म्हणा रामकृष्ण ।।४।।
ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण । अंतकाळी आपण बेगी पहा ।।५।।” – संत ज्ञानेश्वर महाराज
या अभंगातून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी साधुपुरुष आपला अंतकाळ नऊ दिवस, पाच दिवस व चालू दिवस यापैकी आपल्याला केव्हा देह ठेवावा लागणार? ते लक्षणांनी जाणतात, असे प्रतिपादन केलेले आहे. त्याप्रमाणे श्री समर्थ तात्या योगी व संत असल्याकारणाने इच्छामरणी महापुरुष होऊन अंतकाळाची सर्व लक्षणे जाणूनच त्यांनी "मी आजपासून पाचव्या दिवशी देह ठेवणार आहे," असे आपल्या दोन भक्तांजवळ सांगून ठेवले.
७४. प्रयाणकाळ
"मी पाचव्या दिवशी देह ठेवणार आहे" असे तात्यांनी आपल्या दोघा भक्तांजवळ सांगून ठेवलेले असल्याकारणाने त्या भक्तांच्या मुखाने काही माणसांना समजले. म्हणून ही सर्व मंडळी तात्यांच्या सान्निध्यात रात्रंदिवस सातत्याने राहू लागली व रात्री त्यांच्या निकट, समीपच झोपू लागली. सर्वांच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा होती. परंतु श्री तात्या मात्र अगदी शांत, प्रसन्न मुद्रेने होते. अर्थात सुख-दुःखाच्या अतीत, द्वंद्वविवर्जित होऊन आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन जीवन्मुक्तीच्या विलक्षण सुखासाठी मुखाने सतत जप व अधूनमधून परमार्थ मार्गातील भक्तीचा संवाद करत ईश्वरचिंतनामध्ये आपला काळ क्रमू लागले.
या कालावधीतील श्री समर्थ तात्यांची संपूर्ण सेवा श्री गणपती महाराजांच्या हातून होऊ लागली. कारण गणपती महाराजांच्या सौभाग्यवती (पत्नी) बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या असल्याकारणाने तात्यांना स्नान घालणे, सोवळे नेसवणे, सोवळ्यामध्ये स्वयंपाक करणे, सोवळ्यात भोजन देणे व सतत समीप राहून सर्व व्यवस्था करणे ही सेवा गणपती महाराज दक्षतेने करू लागले.
नित्याप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीयेच्या दिवशी संध्याकाळी गणपती महाराजांनी श्री तात्यांना त्यांच्या शय्यासनावर बसविले. ते आपल्या शय्यासनावर बसून झोपण्यापूर्वी बराच वेळ रुद्राक्षमाळेचे मणी हाताने फिरवत चिंतन, जप करून निद्रा करत असत. दररोजच्या नियमाप्रमाणे ते हातामध्ये माळ घेऊन भगवच्चिंतन करू लागले. श्री गणपती महाराजांनी आपले सर्व आटोपून तात्यांच्या मंचका शेजारी अंथरुण केले व चार-पाच भक्तमंडळींसह आपण सारखे तात्यांकडे पाहत बसून राहिले.
श्री समर्थ तात्या शय्यासनावर अंग न टाकता अर्थात निद्रा न घेता ते बसून भगवंताचे नामस्मरण करू लागले. त्यांनी सांगून ठेवलेला प्रयाणकाळाचा दिवस समीप आलेला असल्याकारणाने ही भक्तमंडळी डोळ्यांत तेल घालून सावधगिरीने तात्यांकडे पाहत हरिपाठ व अभंग म्हणत आपला वेळ क्रमू लागली. एका बाजूला दीपाची कंपरहित ज्योत प्रकाश देत होती. तेव्हा वायूच्या संस्पर्शावाचून व पतंगाच्या झेपावाचून ती ज्योत एकाएकी शांत झाली. सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. इतक्यात एकाएकी सूर्यासारखा प्रकाश दिसला; वीज चमकावी त्याप्रमाणे लख्ख प्रकाश पडला. त्याच वेळी भगवंताचे नामस्मरण करता करता, आपल्या अचिंत्य योगसामर्थ्याने, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चैत्र शुद्ध तृतीया, शके १८५४ (इ.स. १९३२) साली श्री समर्थ धोंडूतात्या महाराज ब्रह्मस्वरूपामध्ये विलीन झाले.
७५. श्री तात्यांचा समाधी सोहळा
ज्या वेळी सूर्यासारखा लख्ख प्रकाश पडला, त्या वेळी या भक्तमंडळींचे नेत्र दीपले व त्यांच्या डोळ्यांना अंधारी आली. श्री गणपती महाराजांनी दीप प्रज्वलित करून श्री तात्यांकडे पाहिले तर रात्री ज्या अवस्थेमध्ये बसले होते तीच अवस्था कायम होती; हालचाल काही नव्हती व डोळे मिटलेले होते. श्री गणपती महाराजांनी जवळ जाऊन त्यांचा श्वासोच्छवास पाहिला, तेव्हा तो बंद पडलेला लक्षात येताच त्यांनी जोरात "तात्या गेले" म्हणून हंबरडा फोडला व आक्रोश करू लागले. तेव्हा सर्व लोक जागे झाले आणि धावत जाऊन श्री समर्थ तात्यांच्या भोवती गोळा झाले. मुंगीलाही वाट मिळणार नाही अशी गर्दी तेथे होऊन तो वाडा माणसांनी भरला.
अवती-भवती खेडेगावांतील लोकांना श्री तात्यांनी देह ठेवल्याची बातमी समजली. त्या वेळी भोवतालच्या प्रत्येक गावचा समाज डोंगरशेळकीत उपस्थित झाला. सकाळी नऊ-दहा वाजण्याच्या वेळी गावामध्ये जिकडे तिकडे माणसांची गर्दीच गर्दी झाली. श्री समर्थ तात्यांचा अद्भुत महिमा कोण वर्णावा? गाडी-मोटारीची व्यवस्था नसताना देखील भोवतालची सर्व विद्वान ब्राह्मण मंडळी ज्याप्रमाणे आकाशातून पक्षांचा थवा उतरावा, त्याप्रमाणे या समाधी सोहळ्यास उपस्थित झाली. जिकडे तिकडे ब्राह्मणांचा समुदाय दिसू लागला. त्या ब्राह्मण मंडळींमध्ये कोणी ऋग्वेदी, तर कोणी यजुर्वेदी, कोणी माध्यांजन शाखेचे तर कोणी वाजसनयी शाखेचे, कोणी कश्यप गोत्राचे तर कोणी भारद्वाज गोत्राचे, कोणी कर्ममार्गी तर कोणी ज्ञानमार्गी!
ज्याप्रमाणे आळंदी क्षेत्रामध्ये संतसम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी प्रसंगी हजारो वैष्णवांचा व साधुसंतांचा समुदाय इंद्रायणी काठी जमा झाला; तसेच विमानामध्ये बसून देवलोक फुलांचा वर्षाव करू लागले. त्या वेळी देवादिदेव विठ्ठल रुक्मिणीला म्हणाले:
“देवो म्हणती रुक्मिणी । हा एकचि योगी देखिला नयनी ।
हेचि ज्ञानसंजीवनी । जाण त्रैलोक्यासी ।।१।।
धन्य धन्य धरातळी । जो याते दृष्टी न्याहाळी ।
तो वाहात येईल टाळी । वैकुंठ भुवनासी ।।२।。” – संत नामदेव महाराज
श्री ज्ञानेश्वर महाराजांचे असे वर्णन गाताना व ऐकताना श्री विठ्ठल व रुक्मिणी स्फुंदोस्कुंदून रडू लागले; त्याप्रमाणेच श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे वर्णन ऐकून सर्व भूदेवांच्या नेत्रांमधून अश्रूधारा स्त्रवू लागल्या.
श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या अंत्येष्टी संस्कारासाठी गावोगावचे नागरिक जन व टाळ-मृदंगासह सर्व वैष्णवांचे समुदाय एकत्र आले. ब्राह्मण मंडळींनी मंत्राचा जयघोष करत तात्यांना सोवळ्यामध्ये स्नान घालून सोवळे नेसवले व उत्तरीय वस्त्र परिधान केले. तसेच सर्व ब्राह्मणांनी तात्यांच्या अंगाला चंदनाची उटी लावली. गंध, अक्षता, तुळशी-पुष्पांच्या माळा समर्पण करून पूजा केली व सर्वांनी पंचारती केली. त्या वेळी अनेकविध वाद्यांच्या गजरात, वैष्णव समुदायाच्या भजनात भगवंताच्या नामाच्या गर्जना व श्री तात्यांच्या नामाचा जयजयकार सर्व लहान-थोर करू लागले. अशा गजरात सर्व ब्राह्मण मंडळी वैदिक मंत्रांचा घोष करत विधीपूर्वक श्री समर्थ तात्यांचे पार्थिव अंत्येष्टी संस्कार स्थळाच्या समीप घेऊन आली.
“आळंदी हे गांंव पुण्यभूमी ठाव ।
दैवताचे नांंव सिद्धेश्वर।।” – संत नामदेव महाराज
या स्थळाची खूण श्री तात्यांनी डोंगरशेळकी गावच्या उत्तरेस व मारुती मंदिराच्या पश्चिमेस जेथे आठ-दहा दगडांचे त्रिकुट आहे, त्या स्थानी माझा अंत्येष्टी विधी व्हावा असे देह ठेवण्यापूर्वीच सांगून ठेवलेले होते. त्याच स्थळी त्यांचे पार्थिव घेऊन आले. या सोहळ्यामध्ये हजारो भाविकांचा समुदाय एकत्रित आला. चैत्र महिन्यातील शुद्ध तृतीयेचा तो दिवस; अर्थात कडक उन्हाळ्याचाच तो दिवस! परंतु श्री समर्थ तात्यांच्या प्रयाणकाळाच्या दिवशी सूर्यदेवता आपली तप्त किरणे आकुंचित करून दिवसभर ढगाआड लपून राहिली. म्हणून कोणालाही उन्हाचा त्रास झाला नाही. जिकडे तिकडे लोकांची खूप गर्दी झाली; सर्वांच्या नेत्रांतून अश्रूधारा वाहू लागल्या. एकंदरीत बांधलेल्या तळ्याचा पाट फुटावा तशी सर्वांची स्थिती झाली.
इतक्यात विराळ गावची बरीच मंडळी आली व पैंज मांडून डोंगरशेळकीच्या ग्रामस्थांबरोबर "आम्ही तात्यांचे पार्थिव विराळगावी घेऊन जाणार" असे वाद-विवाद करू लागली. तेव्हा डोंगरशेळकीच्या ग्रामस्थांनी त्यांना सांगितले की, "हे बघा, पूर्वेला उगवणारा सूर्य पश्चिमेस उगवेल, परंतु आम्ही श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे पार्थिव तुम्हाला विराळगावी घेऊन जाऊ देणार नाही. कारण 'विराळगावी माझी राख (भस्म) देखील जाऊ देऊ नका' असे श्री तात्यांनी आम्हाला सांगून ठेवलेले असल्याकारणाने कोणत्याही परिस्थितीत तात्यांचे पार्थिव तुम्हाला मिळणार नाही," असे स्पष्ट शब्दांत सांगितले. तेव्हा नाइलाजास्तव विराळ गावची मंडळी निवांत राहिली.
त्या वेळी अनेकविध वाद्यांच्या गजरामध्ये व भाविकांच्या जयजयकारामध्ये दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास चैत्र शुद्ध तृतीयेच्या दिवशी चंदनाचे काष्ठ, तुळशीचे काष्ठ व सुगंधी द्रव्य या सर्व साहित्यानिशी श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या पार्थिवाचा अंत्येष्टी संस्कार विधीपूर्वक यथासांग पार पाडण्यात आला.
आळंदी हे पुण्यपावन क्षेत्र असून तेथील दैवत सिद्धेश्वर नावाने सुप्रसिद्ध आहे. त्याप्रमाणेच डोंगरशेळकी येथे पुरातन शिवालय आहे. ज्याप्रमाणे पुरातन शिवपीठ व पवित्र भूमी म्हणून इंद्रायणी काठी श्री क्षेत्र आळंदी येथे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेऊन सदाचे वास्तव्य केले, अगदी त्याप्रमाणे श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांनी आपल्या अंतर्ज्ञानाने या स्थळाचे माहात्म्य जाणूनच ते डोंगरशेळकी येथे आपला स्थूल देह विसर्जन करून अजरामर कीर्तीशरीराने इथे सदाचे विराजमान होऊन आपला कीर्तीध्वज भूमंडळामध्ये फडकावत आहेत.
७६. अजरामर कीर्तिशरीर
श्री समर्थ तात्या आपल्या स्थूल देहाचा परित्याग करून ब्रह्मस्वरूपात विलीन झाले तरी त्यांचे कीर्तीशरीर मात्र चिरंजीव स्वरूपामध्ये आजही विद्यमान आहे. ज्याप्रमाणे उदबत्ती स्वतः जळून संपते तरीही तिचा मानवाला आकर्षित करणारा सुगंध तिच्या मागे साऱ्या वातावरणात दरवळत असतो, सर्वत्र पसरलेला असतो; त्याप्रमाणे श्री समर्थ तात्यांनी सत्कृती करून सर्वभक्षक कालधर्माप्रमाणे, कालौघाच्या चपेटघाताचा अटळ परिणाम म्हणून शरीरदृष्टीने पंचमहाभूतांत विलीन झाले असले, स्थूल शरीर जरी अंतर्धान पावले तरी त्यांचे अस्तित्व त्यांनी स्थापन केलेल्या मठाच्या रूपाने आणि त्यांच्या स्मारकरूपाने सूक्ष्म, अमूर्त व चिरंजीव कीर्तीसुगंधाच्या रूपाने विद्यमान आहे, अजरामर आहे. श्री समर्थ तात्यांच्या सत्कृतीचे कीर्तन समाजाच्या मनोमंदिरात सदाचेच चालू आहे.
म्हणून स्थूल शरीर जरी इंद्रियांस अगोचर झाले तरी सूक्ष्म अमूर्त कीर्तीशरीर मात्र या वसुधातलावर अजरामर राहते. याविषयी श्री तुकाराम महाराज म्हणतात:
“तुका म्हणे एका मरणेचि सरे ।
उत्तमचि उरे कीर्ति मागे।।” – संत तुकाराम महाराज
देवास आत्मत्वाने जाणले असता स्थूल शरीराच्या नियोजनाच्या दृष्टीने एकदा मरावे लागते, पण पुन्हा त्यांना जन्मास मुळीच यावे लागत नाही आणि त्यांचे उत्तम कीर्तीशरीर मात्र त्यांच्या पश्चातही सदाचेच उरते. याविषयी श्री नामदेव महाराज म्हणतात:
“गेले दिगंबर ईश्वर विभूती ।
राहिल्या त्या कीर्ति जगांमाजी।।” – संत नामदेव महाराज