॥ जय हरी विठ्ठल – श्री समर्थ धोंडूतात्या महाराज प्रसन्न ॥ संतवाणी डिजिटल लायब्ररी २०२६
🚩 प्रतिपंढरपूर - डोंगरशेळकी धाम

श्री समर्थ धोंडूतात्या महाराज महाचरित्र

भाग १५: अजरामर कीर्ती, अखंड हरिनाम सप्ताह, संतचरित्राचे फल, प्रार्थना व महाआरती.

भाग १५: अजरामर कीर्ती, फलश्रुती व महाआरती (प्रकरण ७६ ते ८३)


या भागात समाविष्ट प्रकरणे:

  • प्रकरण ७६: अजरामर कीर्तिशरीर - देहत्यागानंतरही भक्तांच्या हृदयात तात्यांचे अमर स्थान.
  • प्रकरण ७७: अखंड हरिनाम सप्ताह - डोंगरशेळकीत दरवर्षी होणारा भव्य सप्ताह.
  • प्रकरण ७८: दर्शनास भाविकांची गर्दी - लाखावर भक्तांची दरवर्षी होणारी गर्दी.
  • प्रकरण ७९: संतचरित्र लिहिण्याचा हेतू - चरित्र लेखनामागील लोककल्याणकारी उद्देश.
  • प्रकरण ८०: संतचरित्राचे फल - या पावन चरित्राच्या वाचनाने मिळणारी शांती व समाधान.
  • प्रकरण ८१: प्रार्थना - श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या चरणी लीन प्रार्थना.
  • प्रकरण ८२: थोडक्यात माहात्म्ये... - तात्यांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त गोषवारा.
  • प्रकरण ८३: आरती - श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांची पावन महाआरती.

७७. अखंड हरिनाम सप्ताह

श्री समर्थ धोंडूतात्या महाराज संस्थान, मु. पो. डोंगरशेळकी, ता. उदगीर, जि. लातूर येथे श्री तात्यांच्या हयातीत डोंगरशेळकी येथील अखंड हरिनाम सप्ताह वैशाख वद्य प्रतिपदेपासून ते वैशाख वद्य अष्टमीपर्यंत त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्ताने होत होता. श्री तात्यांनी देह ठेवलेल्या वर्षाचा सप्ताह प्रतिवर्षीप्रमाणे वैशाख महिन्यामध्ये करण्यात आला आणि इ.स. १९३३ (शके १८५५) सालापासून हा हरिनाम सप्ताह श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने प्रतिवर्षी फाल्गुन वद्य द्वादशीपासून ते चैत्र शुद्ध चतुर्थीपर्यंत साजरा होत आहे.

या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सकाळी ७ ते १० पर्यंत सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ पर्यंत गाथा भजन, दुपारी ४ ते ५ ज्ञानेश्वरी प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ अभंग संकीर्तन, १२ ते ३ हरिजागर व पहाटे ३ ते ५ पर्यंत काकडा भजन इत्यादी कार्यक्रम होत आहेत.

तसेच श्री तात्यांच्या पुण्यतिथीदिवशी अर्थात चैत्र शुद्ध तृतीयेदिवशी दुपारी वैदिक ब्राह्मणांच्या मंत्रघोषामध्ये श्री तात्यांची महापूजा, महिम्नपूजा व अभिषेकविधी आणि गुलालाचे कीर्तन करून दुपारनंतर ५ वाजेपासून ते १० वाजेपर्यंत महाप्रसादाची सोय केली जाते आणि चैत्र शुद्ध चतुर्थीदिवशी सकाळी काल्याचे कीर्तन व दहीहंडी कार्यक्रम होऊन या सप्ताहाची सांगता होते.

७८. दर्शनास भाविकांची गर्दी

डोंगरशेळकीस श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या दर्शनानिमित्त प्रतिदिवशी दूरदूरच्या भाविक भक्तांचे आगमन होत आहे आणि भारतीयांच्या सणादिवशी, पुण्यकाळ, पर्वकाळदिवशी, नैमित्तिक कार्यक्रमादिवशी तसेच प्रति एकादशीस तर दर्शनासाठी भाविकांची खूप गर्दी असते.

त्यातही विशेषत्वाने वद्य एकादशीस तर श्री तात्यांच्या वारीस दर्शनास येणाऱ्या भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे त्या दिवसास (वद्य एकादशीस) यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या वद्य एकादशीस एवढी प्रचंड गर्दी होण्याचे कारण श्री क्षेत्र पंढरी येथील यात्रेमध्ये श्री विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवून श्री ज्ञानेश्वर महाराज श्री विठ्ठल देवास म्हणाले, "देवा, मी संजीवन समाधी घेणार आहे, ती केव्हा घेऊ? आपण सांगा." तेव्हा विठ्ठल देव म्हणाले:

“कृष्णपक्षी तुज निर्धारा । भेटी देत जाईन ।।
कार्तिक शुद्ध एकादशी । पंढरीयात्रा होईल सरशी ।।
दुसरी कृष्ण पक्षी निधरिसी । तुज दिधली असे।।” – संत नामदेव महाराज

तुम्ही शुक्लपक्षामध्ये समाधी न घेता कृष्णपक्षामध्ये घ्या, मग मी प्रति कृष्ण पक्षातील एकादशीस भेट देत जाईन.

श्री विठ्ठलाच्या आज्ञेवरून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक वद्य त्रयोदशीस संजीवन समाधी घेतली. म्हणून शुद्ध एकादशीची वारी श्री क्षेत्र पंढरीची आहे आणि वद्य एकादशीची वारी श्री क्षेत्र आळंदीची आहे. अर्थात शुद्ध पक्षातील एकादशीची वारी देवाची व वद्य पक्षातील एकादशीची वारी संतांची असते.

“देव ते संत देव ते संत ।
निमित्त त्या प्रतिमा।।” – संत तुकाराम महाराज

देव व संत एकच, म्हणून प्रति एकादशीस जरी तात्यांच्या दर्शनास भाविकांची गर्दी होत असली तरीही नियमाप्रमाणे संतांची वारी म्हणून डोंगरशेळकीस प्रति वद्य एकादशीस श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या दर्शनानिमित्त हजारो भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.

७९. संतचरित्र लिहिण्याचा हेतू

प्रत्येक मानव हा स्वार्थासाठी जगत असतो. माझे जीवन, माझे कुटुंब आणि माझा संसार या चाकोरीबाहेर तो जात नाही. स्वतःचे जीवन समृद्ध करण्यासाठी त्याचे सर्व प्रयत्न असतात. श्रीमंत माणसे अधिक श्रीमंत होण्यासाठी प्रयत्नशील असतात, तर आपल्यासही श्रीमंतासारखे जगता यावे यासाठी गरीब माणसे आयुष्यभर परिश्रम घेत असतात. मनुष्यस्वभावच असा आहे, त्यात त्यांचा दोष नाही आणि म्हणूनच या चाकोरीबाहेर पडणारे व जगाच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित करणारे ते असामान्य आणि अद्वितीय पुरुष होत. कोट्यवधी लोकांत अशी एखादीच व्यक्ती जन्मास येते. स्वतःचा संसार त्यांना माहित नसतो. आपल्या ईश्वरभक्तीसाठी, समाजासाठी आणि मानवतेच्या उद्धारासाठी स्वतःच्या संसाराला लाथाडून हे महात्मे आपले समर्पित जीवन जगत असतात व जगाला सन्मार्ग दाखवतात. ज्याप्रमाणे शास्त्रज्ञ जन्माला आले नसते तर मनुष्यजीवन मर्यादित राहिले असते, त्याचप्रमाणे साधुसंत जन्माला आले नसते तर मनुष्यजीवन दिशाहीन बनले असते. आज या जगात जो प्रामाणिकपणा आहे, नीतिमत्ता आहे, आदरभाव आहे, एक-दुसऱ्याबद्दल प्रेमाची भावना आहे आणि भक्ती आहे; या सर्वांच्या बुडाशी साधुसंतांचीच शिकवण आहे. म्हणून संतांचे माहात्म्य अनन्यसाधारण आहे. यास्तव अशा संतांचे चरित्र लिहिण्याची अत्यंत गरज आहे. कारण संतचरित्रातील चमत्काराने जीवाने भगवद्भक्तीस लागावे, एवढेच तात्पर्य चमत्कार करणाऱ्या संतांचे व चरित्र लिहिणाऱ्यांचे असते.

वास्तविक श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे जीवनचरित्र समुद्रापेक्षाही सखोल व आकाशापेक्षाही व्यापक आहे. अशा थोर संताच्या चरित्राविषयी:

“शब्द कैसा घडिजे । प्रमेयी कैसे पां चढिजे ।
अलंकारु म्हणिजे । काय ते नेणे।।” – संत ज्ञानेश्वर महाराज

अशा अज्ञ व्यक्तीने काही लिहावे, ही कल्पनाही करता येणार नाही.

“पढे ना वाची । ना सेवाही जाणे स्वामीची।।”

अशा व्यक्तीने चरित्र लिहिण्याचा प्रयत्न करणे म्हणजे चंदनाला सुगंधत्व येण्यासाठी अन्य सौगंधिक पदार्थाची पुट देण्यासारखे हास्यास्पद आहे. श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या सर्व प्रकाशक श्रुत चरित्रावर आपण काही अधिक प्रकाश पाडावा अशी भावना किंवा अभिनिवेश मी ठेवलेला नाही.

सूत्राधीन दारुयंत्राप्रमाणे ते बोलवतील तेच मी यथामती बोलण्याचा म्हणजे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या गंगेसमान अंतर्बाह्य पवित्र "जीवनचरित्राशी" या निमित्ताने आमच्या ओहळासमान गुणशून्य व सर्वदोषदूषित वाणीचा योग घडून तिला शुद्धत्व यावे; हाच केवळ या अल्प प्रयत्नांचा उद्देश आहे. तोच या निमित्ताने पूर्ण होवो, ही समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या चरणी प्रार्थना!

८०. संतचरित्राचे फल

“मी निर्गुणत्वे ब्रह्म पूर्ण । साधू चालते बोलते ब्रह्म जाण ।
तयासी रिघालिया शरण । जन्म मरण बाधेना।।” – संत एकनाथ महाराज

देव म्हणतात, संत रूपाने मीच प्रगट होत असतो; संत हे माझे चालते-बोलते रूप आहे. म्हणून त्यांच्या चरित्राची प्रशंसा करतात तेही मला प्राणांपेक्षा अधिक आवडतात.

“तेहि प्राणापरौते । आवडती हे निरूते ।
जे भक्त चरित्राते । प्रशंसिती।।” – संत ज्ञानेश्वर महाराज

ज्याप्रमाणे आपल्या बालकाची स्तुती श्रवण करून त्याच्या मातेस आनंद व्हावा, त्याप्रमाणे संतचरित्राची प्रशंसा केली असता देवाला संतोष निर्माण होतो.

म्हणूनच संतांच्या कृपेशिवाय भगवंताची भेट होत नाही व त्याविना जीवाला समाधान प्राप्त होत नाही. कारण संसारामध्ये त्रस्त झालेल्या जीवास स्वास्थ्य मिळण्यास एवढी एकच जागा आहे, ती म्हणजेच संत!

जन्मभर प्रपंचाचे आघात सहन करून मेटाकुटीस आलेला जीव संतांच्या सावलीत विसावा पावतो.

सर्व जगाने जीवावर कृपा केली तरी त्याचे समाधान होणार नाही, लक्ष्मीची कृपा झाली तरी संतोष मिळणार नाही, धन्वंतरी भेटूनही आराम पडणार नाही, बृहस्पती प्रसन्न झाले तरीही शांतता लाभणार नाही; तर जीवाला पाहिजे असलेली वस्तू म्हणजे नित्यानंद! त्या आनंदाचा गाभा जो श्रीहरी, तो भेटण्यासाठी संतदर्शनच व्हावयास पाहिजे.

आपणासही संतभेट होऊन भगवंताचे दर्शन व्हावे, एवढ्यासाठी संतांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून त्यांच्या आचरणाची आठवण करत गेल्यास मानवी जीवनात सद्गुणांची वृद्धी होऊन सुखाची व समाधानाची प्राप्ती होते. तसेच जे मुक्ताते निर्धारिती, त्यांना स्वतःचीच मुक्तता लाभते; ज्याप्रमाणे दिव्याने पाहिले असता आपलीच वस्तू दिसते, तद्वत हारपलेले स्वतःचे स्वरूप प्राप्त होते.

॥ प्रार्थना ॥

काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी ।
देशोऽयं क्षोभरहितो ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः ।।१।।

अपुत्राः पुत्रिणः सन्तु पुत्रिणः सन्तु पौत्रिणः ।
अधनाः सधनाः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।।२।।

श्रीशुभं भवतु ! ॐ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु !!

❮ भाग १४ मागे अनुक्रमणिका भाग १६ पुढे➔

🚩 जय हरी विठ्ठल!

श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांची ही पावन कथा सर्व भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा.

॥ श्री समर्थ धोंडूतात्या महाराज प्रसन्न ॥