॥ नमः शिवाय ॥ हर हर महादेव ॥ संतवाणी डिजिटल लायब्ररी २०२६
श्रीधरस्वामी नाझरेकर विरचित (विशेष अध्याय)

श्री शिवलीलामृत - अध्याय ११ वा

॥ रुद्राक्ष व भस्म धारणाचे माहात्म्य ॥

सर्व अध्याय सूची अध्याय अकरावा
ओवी १

धन्य धन्य तेच जन । जे शिवभजनीं परायण ।
सदा शिवलीलामृत श्रवण । अर्चन सदा शिवाचें ॥ १ ॥

सार्थ भावार्थ:

जे लोक नेहमी भगवान शिवाच्या भक्तीमध्ये लीन असतात, सतत शिवलीलामृत ग्रंथाचे श्रवण करतात आणि शिवाची पूजा-अर्चा करतात, तेच या जगात खरोखर धन्य आहेत.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी २

सूत म्हणे शौनकादिकांप्रती । जे रुद्राक्षधारण भस्म चर्चिती ।
त्यांच्या पुण्यास नाहीं मिती । त्रिजगतीं तेचि धन्य ॥ २ ॥

सार्थ भावार्थ:

सूतमुनी शौनकादिक ऋषींना म्हणाले, जे लोक अंगाला भस्म (विभूती) लावतात आणि रुद्राक्ष धारण करतात, त्यांच्या पुण्याला काही सीमा राहत नाही. तिन्ही लोकांत तेच धन्य ठरतात.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ३

जो सहस्र रुद्राक्ष करी धारण । त्यासी वंदिती शक्रादि सुरगण ।
तो शंकरचि त्याचे दर्शन । घेतां तरती जीव बहू ॥ ३ ॥

सार्थ भावार्थ:

जो मनुष्य अंगावर हजाराहून अधिक रुद्राक्ष धारण करतो, त्याला इंद्रादी सर्व देवही वंदन करतात. तो प्रत्यक्ष शंकरस्वरूपच बनतो आणि त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ४

अथवा षोडश षोडश दंडीं जाण । बांधावे रुद्राक्ष सुलक्षण ।
शिखेमाजीं एक बांधावा पूर्ण । शिवस्वरूप म्हणवूनी ॥ ४ ॥

सार्थ भावार्थ:

अथवा दोन्ही दंडांवर (बाहूंवर) सोळा-सोळा उत्तम रुद्राक्ष बांधावेत आणि डोक्यावरील शिखेमध्ये (शेंड्यात) एक रुद्राक्ष शिवस्वरूप मानून पूर्ण निष्ठेने बांधावा.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ५

त्यावरोनि करितां स्नान । तरी त्रिवेणीस्नान केल्यासमान ।
असो द्वादश द्वादश मनगटीं पूर्ण । रुद्राक्ष बांधिजे आदरें ॥ ५ ॥

सार्थ भावार्थ:

शरीरावर रुद्राक्ष असताना स्नान केले असता ते गंगा-यमुना-सरस्वती या त्रिवेणी संगमावर स्नान केल्यासारखे पवित्र मानले जाते. तसेच दोन्ही मनगटांवर आदराने बारा-बारा रुद्राक्ष बांधावेत.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ६

कंठीं बांधावे बत्तीस । मस्तकाभोंवते चोवीस ।
सहा सहा कर्णी पुण्य विशेष । बांधितां निर्दोष सर्वदा ॥ ६ ॥

सार्थ भावार्थ:

गळ्यात बत्तीस, मस्तकाभोवती चोवीस आणि दोन्ही कानांत सहा-सहा रुद्राक्ष बांधल्याने विशेष पुण्य प्राप्त होते आणि मनुष्य सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्त होतो.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ७

अष्टोत्तरमाळा । सर्वदा असावी गळां ।
एकमुखी रुद्राक्ष आगळा । पूजित भाग्य विशेष ॥ ७ ॥

सार्थ भावार्थ:

गळ्यात नेहमी १०८ रुद्राक्षांची माळ असावी. तसेच एकमुखी रुद्राक्ष अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे; त्याची पूजा करणारा मनुष्य अत्यंत भाग्यवान ठरतो.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ८

पंचमुख षण्मुख अष्टमुख । चतुर्दशमुख लक्ष्मीकारक ।
सकळ मंत्र सुफळ देख । रुद्राक्षजप नित्य करितां ॥ ८ ॥

सार्थ भावार्थ:

पाच, सहा, आठ किंवा चौदा मुखी रुद्राक्ष हे लक्ष्मी व समृद्धी देणारे असतात. नित्य रुद्राक्षाची माळ जपल्याने सर्व मंत्र सिद्ध होतात आणि फलद्रूप होतात.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ९

नित्य रुद्राक्षपूजन । तरी केले जाणिजे शिवार्चन ।
रुद्राक्षमहिमा परम पावन । इतिहास ऐका येविषयीं ॥ ९ ॥

सार्थ भावार्थ:

रोज रुद्राक्षाची पूजा करणे म्हणजे प्रत्यक्ष भगवान शिवाचीच पूजा केल्यासारखे आहे. या रुद्राक्षाचा महिमा अत्यंत पवित्र आहे, याविषयीचा एक इतिहास (कथा) ऐका.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १०

काश्मीरदेशीचा नृप पावन । नामाभिधान भद्रसेन ।
विवेकसंपन्न प्रधान । परम चतुर पंडित ॥ १० ॥

सार्थ भावार्थ:

काश्मीर देशामध्ये 'भद्रसेन' नावाचा एक पवित्र राजा राज्य करत होता. त्याचा प्रधान (मंत्री) अत्यंत विवेक बुद्धीचा, हुशार आणि ज्ञानी पंडित होता.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ११

प्रजा दायाद भूसुर । धन्य म्हणती तोचि राजेश्वर ।
लांच न घे न्याय करी साचार । अमात्य थोर तोचि पैं ॥ ११ ॥

सार्थ भावार्थ:

राजा आणि प्रधान लाच न घेता खरा न्याय करत असत. त्यामुळे प्रजा, भाऊबंद आणि ब्राह्मण सर्वजण राजा व त्याच्या श्रेष्ठ अमात्याची नेहमी प्रशंसा करत असत.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १२

सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी । पूर्वदत्तें ऐसी लाधिजे कामिनी ।
सुत सभाग्य विद्वान गुणी । विशेष सुकृते पाविजे ॥ १२ ॥

सार्थ भावार्थ:

सुंदर, पतिव्रता आणि गोड बोलणारी पत्नी पूर्वजन्मीच्या पुण्याईनेच मिळते. तसेच भाग्यवान, विद्वान आणि गुणी मुलगाही मोठ्या पुण्यानेच प्राप्त होतो.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १३

गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर । शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार ।
वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार । विशेष सुकृते लाहिजे ॥ १३ ॥

सार्थ भावार्थ:

सर्वज्ञ व कृपाळू गुरू, बुद्धिवान व गुरुभक्त शिष्य, तसेच क्षमाशील, शास्त्रज्ञ व रसाळ वक्ता मिळणे हे पूर्वपुण्याईचेच फळ असते.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १४

श्रोता सप्रेम चतुर सावधान । यजमान साक्षेपी उदार पूर्ण ।
काया आरोग्य सुंदर कुलीन । पूर्वसुकृतें प्राप्त होय ॥ १४ ॥

सार्थ भावार्थ:

प्रेमादर असणारा चतुर श्रोता, उदार व दक्ष यजमान, तसेच निरोगी, सुंदर व कुलीन शरीर लाभणे हे पूर्वजन्मीच्या पुण्यामुळेच शक्य होते.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १५

असो तो भद्रसेन आणि प्रधान । बहुत करितां अनुष्ठान ।
दोघांसी झाले नंदन । शिवभक्त उपजतांचि ॥ १५ ॥

सार्थ भावार्थ:

राजा भद्रसेन आणि त्याचा प्रधान यांनी खूप अनुष्ठाने व तपे केली. त्यानंतर दोघांनाही प्रत्येकी एक-एक मुलगा झाला, जे जन्मापासूनच जन्मतःच शिवभक्त होते.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १६

राजपुत्र नाम सुधर्म । प्रधानात्मज तारक नाम ।
दोघे शिवभक्त निःसीम । सावधान शिवध्यानीं ॥ १६ ॥

सार्थ भावार्थ:

राजपुत्राचे नाव 'सुधर्म' आणि प्रधानाच्या मुलाचे नाव 'तारक' असे ठेवले गेले. दोघेही असीम शिवभक्त होते आणि नेहमी शिवध्यानात मग्न असत.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १७

बाळे होऊनि सदा प्रेमळ । अनुराग चित्तीं वैराग्यशीळ ।
लौकिकके संगे ध्रुव अमंगळ । त्यांची संगती नावडे त्यां ॥ १७ ॥

सार्थ भावार्थ:

ती बालके लहान असूनही अत्यंत प्रेमळ, वैराग्यशील आणि शिवभक्तीने युक्त होती. त्यांना ऐहिक, सांसारिक गोष्टी आणि वाईट संगती अजिबात आवडत नसे.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १८

पंचवर्षी दोघे कुमर । लेवविती वस्त्रे अलंकार ।
गजमुक्तमाळा मनोहर । नानाप्रकारें लेवविती ॥ १८ ॥

सार्थ भावार्थ:

मुले पाच वर्षांची झाल्यावर राजा व प्रधानाने त्यांना सुंदर वस्त्रे, दागिने व मोत्यांच्या माळा घालावयास दिल्या.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १९

तंव ते बाळ दोघेजण । सर्वालंकार उपाधी टाकून ।
करिती रुद्राक्षधारण । भस्म चर्चिती सर्वांगीं ॥ १९ ॥

सार्थ भावार्थ:

परंतु त्या दोघा बालकांनी सर्व दागिने व वस्त्रे ही उपाधी मानून काढून टाकली आणि अंगाला भस्म लावून रुद्राक्ष धारण केले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी २०

आवडे सर्वदा एकांत । श्रवण करिती शिवलीलामृत ।
बोलती शिवनामावळी नित्य । पाहणे शिवपूजा सर्वदा ॥ २० ॥

सार्थ भावार्थ:

त्यांना नेहमी एकांत आवडायचा. ते शिवलीलामृताचे श्रवण करत, शिवाची नामावळी जपत आणि नेहमी शिवपूजा पाहण्यात रमून जात.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी २१

आश्चर्य करिती राव प्रधान । यस कां नावडे वस्त्रभूषण ।
करिती रुद्राक्षभस्म धारण । सदा स्मरण शिवाचें ॥ २१ ॥

सार्थ भावार्थ:

राजा आणि प्रधान आश्चर्यचकित झाले की या मुलांना वस्त्रे-दागिने सोडून रुद्राक्ष-भस्म धारण करणे आणि सतत शिवाचे स्मरण करणेच का आवडते?

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी २२

विभूती पुसोनि रुद्राक्ष काढिती । मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ।
तें सवेंचि । ब्राह्मणांसी अर्पिती । घेती मागुती शिवदीक्षा ॥ २२ ॥

सार्थ भावार्थ:

पालकांनी मुलांचे भस्म पुसून, रुद्राक्ष काढून पुन्हा दागिने-वस्त्रे घातली की ती बालके ते सर्व लगेच ब्राह्मणांना दान करून टाकत आणि पुन्हा भस्म व रुद्राक्ष धारण करत.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी २३

शिक्षा करितां बहुत । परी ते न सांडिती आपुले व्रत ।
राव प्रधान चिंताग्रस्त । म्हणती करावें काय आतां ॥ २३ ॥

सार्थ भावार्थ:

कितीही समजावले किंवा शिक्षा केली तरी त्यांनी आपले शिवभक्तीचे व्रत सोडले नाही. यामुळे राजा आणि प्रधान अत्यंत चिंताग्रस्त झाले की आता काय करावे.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी २४

तो उगवला सुकृतमित्र । घरासी आला पराशर ।
सवें वेष्टित ऋषींचे भार । अपर सूर्य तेजस्वी ॥ २४ ॥

सार्थ भावार्थ:

अशा वेळी त्यांच्या पुण्याच्या उदयाने प्रत्यक्ष पराशर ऋषी अनेक ऋषींच्या समुदायासोबत सूर्यासारखे तेजस्वी रूप घेऊन राजाच्या घरी आले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी २५

जो कृष्णद्वैपायनांचा जनिता । त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टिकर्ता ।
जो वासष्ठाचा नातू तत्त्वतां । राक्षससत्र जेणे केलें ॥ २५ ॥

सार्थ भावार्थ:

हे पराशर ऋषी महर्षी व्यासांचे (कृष्णद्वैपायन) पिता, त्रिकाळज्ञानी, वसिष्ठ ऋषींचे नातू आणि राक्षसांचा नाश करण्यासाठी सत्र (यज्ञ) करणारे महान ऋषी होते.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी २६

जेवीं मनुष्यें वागती अपार । तैसेच पूर्वी होते रजनीचर ।
ते पितृकैवारे समग्र । जाळिले सत्र करूनियां ॥ २६ ॥

सार्थ भावार्थ:

पूर्वी राक्षसांनी त्यांच्या पित्याचा (शक्ती ऋषींचा) छळ करून वध केला होता, म्हणून पराशरांनी पित्याच्या रक्षणासाठी यज्ञ करून सर्व राक्षसांना जाळून भस्म केले होते.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी २७

जनमेजयें सर्पसत्र केलें । तें आस्तिकें मध्येच राहविलें ।
पराशरासी पुलस्तीने प्रार्थिलें । मग वाचले रावणादिक ॥ २७ ॥

सार्थ भावार्थ:

जसे जनमेजयाचे सर्पसत्र आस्तिक ऋषींनी थांबवले, तसेच पुलस्त्य ऋषींनी पराशरांना प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी यज्ञ थांबवला आणि रावणादी उरलेले राक्षस वाचले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी २८

विरंचीस दटावूनि क्षणमात्रे । प्रतिसृष्टि केली विश्वामित्रे ।
तेवीं पितृकैवारें पराशरें । वादी जर्जर पै केलें ॥ २८ ॥

सार्थ भावार्थ:

ज्याप्रमाणे विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली होती, तसेच पराशरांनीही आपल्या पित्याच्या प्रेमापोटी शत्रूंचा नाश करून त्यांना जर्जर केले होते.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी २९

ते सांगावी समूळ कथा । तरी विस्तार होईल ग्रंथा ।
यालागीं ध्वनितार्थ बोलिलों आतां । कळले पाहिजे निधारें ॥ २९ ॥

सार्थ भावार्थ:

ती सर्व कथा सांगितल्यास ग्रंथाचा विस्तार खूप वाढेल, म्हणून मी ती थोडक्यात (सूचक रूपाने) सांगितली आहे.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ३०

ऐसा महाराज पराशर । ज्याचा नातू होय शुकयोगींद्र ।
तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार । घरा आला जाणोनी ॥ ३० ॥

सार्थ भावार्थ:

असे महान पराशर ऋषी, ज्यांचे नातू शुकदेवजी होते, ते भद्रसेन राजाचे कुळगुरू असून राजाच्या घरी आले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ३१

राव प्रधान सामोरे धांवती । साष्टांग नमूनि घरासी आणिती ।
षोडशोपचारीं पूजिती । भाव चित्तीं विशेष ॥ ३१ ॥

सार्थ भावार्थ:

राजा व प्रधान त्यांना सामोरे गेले, साष्टांग नमस्कार करून त्यांना आदराने घरात आणले आणि भावपूर्ण अंतःकरणाने त्यांची षोडशोपचार पूजा केली.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ३२

समस्तां वस्त्रे भूषणे देऊन । राव विनवी कर जोडून ।
म्हणे दोघे कुमर रात्रंदिन । ध्यान करिती शिवाचें ॥ ३२ ॥

सार्थ भावार्थ:

सर्वांना वस्त्रे-भूषणे देऊन राजा हाथ जोडून गुरूंसमोर विनंती करू लागला, "स्वामी, आमची दोन्ही मुले रात्रंदिवस फक्त शिवाचीच भक्ती करतात."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ३३

नावडती वस्त्रे अलंकार । रुद्राक्षभस्मावरी सदा भर ।
वैराग्यशील अणुमात्र । भाषण न करिती कोणासीं ॥ ३३ ॥

सार्थ भावार्थ:

"त्यांना वस्त्रे-दागिने आवडत नाहीत, फक्त रुद्राक्ष आणि भस्मावरच त्यांचे प्रेम आहे. ते अत्यंत वैराग्यशील बनले आहेत आणि कोणाशीही बोलत नाहीत."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी २४

इंद्रिय भोगावरी नाहीं भर । नावडे राजविलास अणुमात्र ।
गजवाजियानीं समग्र । आरूढावें आवडेना ॥ २४ ॥

सार्थ भावार्थ:

"त्यांना कोणत्याही विषयांचे भोग किंवा राजविलास आवडत नाही. हत्ती-घोडे यांच्यावर बसणेही त्यांना अजिबात रुचत नाही."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ३५

पुढे हे कैसे राज्य करिती । हे आम्हांसी गूढ पडले चित्तीं ।
मग ते दोघे कुमर आणोनि गुरुप्रती । दाखविले भद्रसेनें ॥ ३५ ॥

सार्थ भावार्थ:

"पुढे हे राज्य कसे चालवतील, याचीच आम्हाला मोठी चिंता पडली आहे," असे सांगून राजा भद्रसेनाने दोन्ही मुलांना आणून गुरूंसमोर उभे केले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ३६

गुरूने पाहिलें दृष्टीसीं । जैसे मित्र आणि शशी ।
तैसें तेजस्वी उपमा तयांसीं । नाहीं कोठे शोधितां ॥ ३६ ॥

सार्थ भावार्थ:

पराशर गुरूंनी मुलांकडे पाहिले. ते दोघे सूर्य आणि चंद्रासारखे अत्यंत तेजस्वी दिसत होते; त्यांच्या तेजाची उपमा कुठेही शोधून सापडणार नव्हती.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ३७

यावरी बोले शक्तिसुत । म्हणे हे कां झाले शिवभक्त ।
यांची पूर्वकथा समस्त । ऐक तुज सांगतों ॥ ३७ ॥

सार्थ भावार्थ:

यावर पराशर ऋषी राजाला म्हणाले, "हे दोघे लहानपणीच असे शिवभक्त का झाले, यांची पूर्वजन्मीची सर्व कथा मी तुला सांगतो, ऐक."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ३८

पूर्वी है काश्मीरदेशांत उत्तम । महापट्टण नंदिग्राम ।
तेथील वारांगना मनोरम । महानंदा नाम तियेचें ॥ ३८ ॥

सार्थ भावार्थ:

पूर्वी याच काश्मीर देशात 'नंदिग्राम' नावाचे एक उत्तम नगर होते. तिथे 'महानंदा' नावाची एक अत्यंत सुंदर वारांगना (गणिका) राहत होती.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ३९

त्या ग्रामीचा तोचि भूपे । पृथ्वीमाजी निःसीम स्वरूप ।
ललितकृति पाहोनि कंदर्प । तन्मय होवोनि नृत्य करी ॥ ३९ ॥

सार्थ भावार्थ:

तिचे सौंदर्य इतके अथांग होते की, ती त्या नगराची जणू राणीच वाटायची. तिचे रूप आणि नृत्य पाहून प्रत्यक्ष मदन (कामदेव) देखील तन्मय होऊन जात असे.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ४०

जैसा उगवला पूर्णचंद्र । तैसें तिजवरी विराजे छत्र ।
रत्नखचित यानें अपार । भाग्या पार नाही तिच्या ॥ ४० ॥

सार्थ भावार्थ:

पूर्ण चंद्राप्रमाणे तिच्यावर छत्र धरले जाई. तिच्याकडे रत्नांनी मढवलेली अनेक वाहने होती, तिच्या भाग्याला सीमा नव्हती.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ४१

रत्नमय दंडयुक्त । चामरें जीवरी सदा ढळत ।
मणिमय पादुका रत्नखचित । चरणी जिच्या सर्वदा ॥ ४१ ॥

सार्थ भावार्थ:

तिच्यावर नेहमी रत्नांच्या दांड्याची चामरे ढाळली जात असत आणि तिच्या पायांत नेहमी रत्नांनी मढवलेल्या मखमली पादुका असत.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ४२

विचित्र वसने दिव्य सुवास । हिरण्मय रत्नपर्यंक राजस ।
चंद्रराश्मिसम प्रकाश । शय्या जिवी अभिनव ॥ ४२ ॥

सार्थ भावार्थ:

ती दिव्य सुवासिक वस्त्रे वापरत असे, तिच्याकडे सोन्या-रत्नांचा पलंग होता आणि तिची शय्या चंद्राच्या किरणांप्रमाणे अत्यंत मऊ व प्रकाशमय होती.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ४३

दिव्याभरणीं संयुक्त । अंगीं सुगंध विराजित ।
गोमहिषीखिल्लारें बहुत । वाजी गज घरी बहुवस ॥ ४३ ॥

सार्थ भावार्थ:

ती विविध दिव्याभूषणांनी नटलेली असे, तिच्या शरीराला दिव्य सुगंध येत असे. तिच्या घरी गाई-म्हशींचे कळप आणि अनेक हत्ती-घोडे होते.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ४४

दास दासी अपार । घरीं माता सभाग्य सहोदर ।
जिचे गायन ऐकतां किन्नर । तटस्थ होती कोकिळा ॥ ४४ ॥

सार्थ भावार्थ:

तिच्या घरी अगणित दास-दासी होत्या. तिचे गायन ऐकून किन्नर आणि कोकिळा देखील मूक (स्तब्ध) होऊन जात असत.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ४५

जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन । सकळ नृप डोलविती मान ।
तिचा भोगकाम इच्छून । भूप सभाग्य येती घरा ॥ ४५ ॥

सार्थ भावार्थ:

तिचे अप्रतिम नृत्य पाहून मोठे-मोठे राजे मान डोलवायचे आणि तिच्या सहवासाची इच्छा धरून अनेक भाग्यवान राजे तिच्या घरी येत असत.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ४६

वेश्या असोनि पतिव्रता । नेमिला जो पुरुष तत्त्वतां ।
त्याचा दिवस न सरतां । इंद्रासही वश्य नव्हे ॥ ४६ ॥

सार्थ भावार्थ:

ती व्यवसाय वेश्येचा करत असली तरी वृत्तीने पतिव्रतेसारखी होती. तिने जो पुरुष ठरवला असेल, त्याचा नियम पूर्ण होईपर्यंत ती इंद्रालाही वश होत नसे.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ४७

परम शिवभक्त विख्यात । दानशीळ उदार बहुत ।
सोमवार प्रदोषव्रत । शिवरात्र करी नेमेसीं ॥ ४७ ॥

सार्थ भावार्थ:

ती अत्यंत प्रसिद्ध शिवभक्त, दानशूर आणि उदार होती. ती नित्य नियमाने सोमवार, प्रदोष आणि महाशिवरात्रीचे व्रत करत असे.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ४८

अन्नछत्र सदा चालवीत । नित्य लक्षत्रिदळे शिव पूजित ।
ब्राह्मणहस्ते अद्भुत । अभिषेक करवी शिवासी ॥ ४८ ॥

सार्थ भावार्थ:

ती नेहमी अन्नछत्र चालवायची, रोज एक लाख बेलपत्रांनी शिवाची पूजा करायची आणि ब्राह्मणांच्या हस्ते शिवाला अभिषेक करायची.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ४९

याचक मनी जें जें इच्छित । तें तें महानंदा पुरवीत ।
कोटि लिंग करवीत । श्रावणमास अत्यादरें ॥ ४९ ॥

सार्थ भावार्थ:

याचक (मागणी करणारे) जे जे मागत, ते सर्व महानंदा पुरवायची. श्रावण महिन्यात ती आदराने कोटी पार्थिव लिंगांची पूजा करवत असे.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ५०

ऐक भद्रसेना सावधान । कुक्कुट मर्कट पाळिले प्रीतीकरून ।
त्यांच्या गळां रुद्राक्ष बांधोन । नाचू शिकविले कौतुकें ॥ ५० ॥

सार्थ भावार्थ:

पराशर ऋषी म्हणाले, "हे भद्रसेना, ऐक! महानंदेने प्रीतीने एक कोंबडा (कुक्कुट) आणि एक माकड (मर्कट) पाळले होते. तिने कौतुकाने त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले आणि त्यांना नाचायला शिकवले."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ५१

आपुलें जें कां नृत्यागार । तेथे शिवलिंग स्थापिलें सुंदर ।
कुक्कुट मर्कट त्यासमोर । तेथेंचि बांधी प्रीतीनें ॥ ५१ ॥

सार्थ भावार्थ:

तिच्या नृत्यगृहात तिने एक सुंदर शिवलिंग स्थापन केले होते. त्या शिवलिंगासमोरच ती त्या कोंबड्याला आणि माकडाला प्रेमाने बांधून ठेवत असे.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ५२

करी शिवलीलापुराणश्रवण । तेंहीं ऐकती दोघेजण ।
सवेचि महानंदा करी गायन । नृत्य करी शिवापुढे ॥ ५२ ॥

सार्थ भावार्थ:

जेव्हा ती शिवलीला आणि पुराणांचे श्रवण करायची, तेव्हा ते दोघे (कोंबडा व माकड) देखील ते ऐकायचे. त्यानंतर महानंदा शिवासमोर गायन व नृत्य करत असे.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ५३

महानंदा त्यांसी सोडून । नृत्य करिवी कौतुकेंकरून ।
त्यांच्या गळां कपाळी जाण । विभूती चर्वी स्वहस्तें ॥ ५३ ॥

सार्थ भावार्थ:

महानंदा त्यांना सोडून कौतुकाने त्यांच्याकडून नृत्य करवून घ्यायची आणि स्वतःच्या हाताने त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष व कपाळाला भस्म लावायची.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ५४

एवं तिच्या संगतींकरून । त्यांसही घडतसे शिवभजन ।
असो तिचे सत्र पाहावयालागोन । सदाशिव पातला ॥ ५४ ॥

सार्थ भावार्थ:

अशा प्रकारे महानंदेच्या संगतीमुळे त्या प्राण्यांकडूनही नकळत शिवभक्ती घडत होती. शेवटी तिची भक्ती व सत्त्व परीक्षा पाहण्यासाठी प्रत्यक्ष भगवान सदाशिव तिथे आले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ५५

सौदागराचा वेष धरिला । महानंदेच्या सदना आला ।
त्याचे स्वरूप देखोनि ते अबला । तन्मय झाली तेधवां ॥ ५५ ॥

सार्थ भावार्थ:

शिवाने एका व्यापाऱ्याचा (सौदागराचा) वेष धारण केला आणि ते महानंदेच्या घरी आले. त्यांचे दिव्य रूप पाहून ती स्त्री तन्मय झाली.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ५६

पूजा करोनि स्वहस्तकी । त्यास बैसविलें रेलमंचकी ।
तो पृथ्वीमोलाचे हस्तकीं । कंकण त्याच्या देखीलें ॥ ५६ ॥

सार्थ भावार्थ:

तिने स्वतःच्या हाताने त्यांची पूजा करून त्यांना मंचकावर बसवले. तेव्हा तिच्या दृष्टीस व्यापाऱ्याच्या हातातील अथांग मोलाचे रत्नजडित कंकण (कडे) पडले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ५७

देखता गेली तन्मय होऊन । म्हणे स्वर्गीची वस्तु वाटे पूर्ण ।
विश्वकम्यनें निर्मिली जाण । मानवी कर्तृत्व हे नव्हे ॥ ५७ ॥

सार्थ भावार्थ:

ते कंकण पाहून ती मोहित झाली आणि म्हणाली, "ही तर स्वर्गातील वस्तू वाटते, विश्वाकर्मानेच ही बनवली असावी, माणसाचे हे काम नाही."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ५८

सौदागरें ते काढून । तिच्या हस्तकी घातलें कंकण ।
येरी होवोनि आनंदवन । नेम करी तयासीं ॥ ५८ ॥

सार्थ भावार्थ:

सौदागराने ते कंकण काढून तिच्या हातात घातले. यामुळे महानंदा अत्यंत आनंदी झाली आणि तिने त्यांना वचन दिले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ५९

पृथ्वीचे मोल हे कंकण । मीही बत्तीसलक्षणी पद्मिण ।
तीन दिवस संपूर्ण । दासी तुमची झालें मी ॥ ५९ ॥

सार्थ भावार्थ:

"हे कंकण संपूर्ण पृथ्वीच्या मोलाचे आहे; मीसुद्धा ३२ लक्षणी पद्मिनी स्त्री आहे. म्हणूनच मी तीन दिवस तुमची दासी होऊन सेवा करेन."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ६०

तयासी ते मानलें । सवेंच त्याने दिव्यालंग काढिलें ।
सूर्यप्रभेहून आगळे । तेज वर्णिलें नवजाय ॥ ६० ॥

सार्थ भावार्थ:

सौदागराने तिची ही अट मान्य केली. लगेच त्याने स्वतःजवळील एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले, ज्याचे तेज सूर्याच्या प्रकाशापेक्षाही अधिक होते.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ६१

लिंग देखोनि ते वेळीं । महानंदा तन्मय झाली ।
म्हणे जय जय चंद्रमौळी । म्हणोनि वंदी लिंगातें ॥ ६१ ॥

सार्थ भावार्थ:

ते अप्रतिम शिवलिंग पाहून महानंदा तन्मय झाली आणि "जय जय चंद्रमौळी!" असे म्हणत तिने त्या शिवलिंगाला वंदन केले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ६२

म्हणे या लिंगाच्या प्रभेवरूनी । कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी ।
सौदागर म्हणे महानंदेलागूनी । लिंग ठेवीं जतन हे ॥ ६२ ॥

सार्थ भावार्थ:

ती म्हणाली, "या शिवलिंगाच्या तेजावरून अशी कोटी कंकणे ओवाळून टाकावीत!" तेव्हा सौदागर म्हणाला, "हे शिवलिंग तू नीट जतन करून ठेव."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ६३

म्हणे या लिंगापाशी माझा प्राण । भंगले की गेले दग्ध होऊन ।
तरी मी अग्निप्रवेश करीन । महाकठिण व्रत माझे ॥ ६३ ॥

सार्थ भावार्थ:

सौदागर म्हणाला, "माझा प्राण या शिवलिंगात आहे. हे जर फुटले किंवा जळाले, तर मी अग्नीत उडी मारून प्राण देईन; असा माझा कडक नियम आहे."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ६४

येरीने अवश्य म्हणोन । ठेविलें नृत्यागारी नेऊन ।
मग दोघे करिती शयन । रत्नखचित मंचकीं ॥ ६४ ॥

सार्थ भावार्थ:

महानंदेने "होय" म्हणून ते शिवलिंग आपल्या नृत्यगृहात सुरक्षित ठेवले. त्यानंतर दोघेही रत्नजडित पलंगावर शयन करायला गेले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ६५

तिचें कैसे आहे सत्व । धैर्य पाहे सदाशिव ।
भक्त तारावया अभिनव । कौतुकचरित्र दाखवी ॥ ६५ ॥

सार्थ भावार्थ:

तिची भक्ती आणि धैर्य किती श्रेष्ठ आहे हे पाहण्यासाठी भगवान सदाशिवाने एक नवीन लीला दाखवली.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ६६

त्याच्या आज्ञेकरून । नृत्यशाळेस लागला अग्नि ।
जन धांवों लागले चहूकडोन । एकचि हांक जाहली ॥ ६६ ॥

सार्थ भावार्थ:

देवाच्या आज्ञेने त्या नृत्यगृहाला अचानक आग लागली! चहूबाजूने लोक पळत आले आणि एकच आक्रोश सुरू झाला.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ६७

तीस सावध करी मदनारी । म्हणे अग्नि लागला ऊठ लवकरी ।
येरी उठली घाबरी । तंव वातात्मज चेतला ॥ ६७ ॥

सार्थ भावार्थ:

शिवाने तिला जागे केले आणि सांगितले, "आग लागली आहे, लवकर उठ!" महानंदा घाबरून उठली, तोवर वाऱ्याच्या वेगाने आग भडकली होती.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ६८

तशामाजी उडी घालुन । कंठपाश त्यांचे काढून ।
कुक्कुट मर्कट दिधले सोडून । गेले पळोन वनाप्रती ॥ ६८ ॥

सार्थ भावार्थ:

त्या जळत्या आगीत उडी मारून महानंदेने प्रथम कोंबड्याचा आणि माकडाचा गळफास सोडून त्यांना मोकळे केले, आणि ते पळून जंगलात गेले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ६९

नृत्यशाळा भस्म झाली समग्र । मग शांत झाला सप्तकर ।
यावरी पुसे सौदागर । महानंदेप्रति तेधवां ॥ ६९ ॥

सार्थ भावार्थ:

संपूर्ण नृत्यशाळा जळून भस्म झाली आणि आग शांत झाली. मग सौदागराने महानंदेला विचारले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ७०

माझे दिव्य लिंग आहे की जतन । महानंदा घाबरी ऐकोन ।
वक्षःस्थळ घेत बडवून । म्हणे दिव्यालिंग दग्ध झालें ॥ ७० ॥

सार्थ भावार्थ:

"माझे ते दिव्य शिवलिंग सुरक्षित आहे ना?" हे ऐकून महानंदा घाबरली आणि छाटी बडवून रडत म्हणाली, "ते दिव्य शिवलिंग आगीत जळून गेले!"

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ७१

सौदागर बोले वचन । नेमाचा आजि दुसरा दिन ।
मी आपुला दे तों प्राण । लिंगाकारणें तुजवरी ॥ ७१ ॥

सार्थ भावार्थ:

सौदागर म्हणाला, "माझ्या नियमाचा आज दुसराच दिवस आहे. आता शिवलिंग नष्ट झाल्यामुळे मी तुझ्यासमोरच माझे प्राण देतो."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ७२

मग त्रिचरण चेतविला । आकाशपंथे जाती ज्वाळा ।
सौदागर सिद्ध झाला । समीप आला कुंडाच्या ॥ ७२ ॥

सार्थ भावार्थ:

सौदागराने अग्नी पेटवला, ज्याच्या ज्वाळा आकाशापर्यंत जात होत्या. सौदागर प्राणाहुती देण्यासाठी कुंडाजवळ आला.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ७३

अतिलाघवी उमारंग । जो भक्तजनभवभंग ।
उडी घातली सवेग । ॐनमः शिवाय म्हणवुनी ॥ ७३ ॥

सार्थ भावार्थ:

आणि भक्तांचे दुःख हरण करणाऱ्या त्या लीलामयी शिवाने 'ॐ नमः शिवाय' असे म्हणत वेगाने त्या अग्निकुंडात उडी घेतली!

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ७४

ऐसे देखतां महानंदा । बोलाविलें सर्व ब्रह्मवृंदा ।
लुटविली सर्व संपदा । कोशसमवेत सर्वही ॥ ७४ ॥

सार्थ भावार्थ:

हे पाहताच महानंदेने सर्व ब्राह्मणांना बोलावले आणि आपला खजिना व सर्व संपत्ती गरिबांना व ब्राह्मणांना लुटवून टाकली.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ७५

अश्वशाळा गजशाळा संपूर्ण । सर्वसंपत्तिसहित करी गृहदान ।
महानंदेनें स्नान करून । भस्म अंगीं चर्चिलें ॥ ७५ ॥

सार्थ भावार्थ:

हत्ती, घोडे, घर आणि सर्व मालमत्ता दान करून महानंदेने स्नान केले आणि अंगाला भस्म फासले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ७६

रुद्राक्ष सर्वांगी लेऊन । हृदयीं चिंतिले शिवध्यान ।
हर हर शिव म्हणून । उडी निःशंक घातली ॥ ७६ ॥

सार्थ भावार्थ:

शरीरावर रुद्राक्ष धारण करून, हृदयात शिवाचे ध्यान करत 'हर हर शिव' म्हणत तिनेही निःशंकपणे त्याच अग्निकुंडात उडी घेतली.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ७७

सूर्यबिंब निघे उदयाचळीं । तैसा प्रगटला कपाळमौळी ।
दशभुज पंचवदन चंद्रमौळी । संकटी पाळी भक्तातें ॥ ७७ ॥

सार्थ भावार्थ:

पूर्व दिशेला सूर्य उगवावा, तसे भक्तांचे संकट निवारणारे पाच तोंडे, दहा हात आणि मस्तकावर चंद्र असलेले भगवान शंकर प्रकट झाले!

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ७८

माथां जटांचा भार । तृतीय नेत्रीं वैश्वानर ।
शिरीं झुळझुळ वाहे नीर । भयंकर महाजोगी ॥ ७८ ॥

सार्थ भावार्थ:

ज्यांच्या डोक्यावर जटांचा भार आहे, तिसऱ्या डोळ्यात अग्नी आहे आणि शिरावरून गंगा वाहत आहे, असे ते महायोगी प्रकट झाले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ७९

चंद्रकळा तयाचे शिरी । नीलकंठ खट्‍वांगधारी ।
भस्म चर्चिलें शरीरीं । गजचर्म पांघुरला ॥ ७९ ॥

सार्थ भावार्थ:

ज्यांच्या डोक्यावर चंद्रकोर आहे, गळा निळा आहे, अंगाला भस्म लावले आहे आणि ज्यांनी हत्तीचे चर्म पांघरले आहे,

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ८०

नैसलासे व्याघ्रांबर । गळां मनुष्यमुंडांचे हार ।
सर्वांगी वेष्टित फणिवर । दशभुजा मिरवती ॥ ८० ॥

सार्थ भावार्थ:

ज्यांनी वाघाचे कातडे नेसले आहे, गळ्यात मुंडमाळा आणि शरीरावर नाग वेढलेले आहेत, असे दहा हात असणारे शिवप्रभू प्रकट झाले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ८१

वरचेवरी कंदुके झेलित । तेवी दहा भुजा पहरोनि अकस्मात ।
महानंदेस झेलून धरित । हृदयकमळी परमात्मा ॥ ८१ ॥

सार्थ भावार्थ:

जसे एखादा चेंडू झेलतात, तसे आपल्या दहा हातांनी शिवाने महानंदेला आगीतून झेलून धरले आणि आपल्या हृदयाशी लावले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ८२

म्हणे जाहलों मी सुप्रसन्न । महानंदे माग वरदान ।
ती म्हणे हें नगर उद्धरून । विमान बैसवी दयाळा ॥ ८२ ॥

सार्थ भावार्थ:

शिव म्हणाले, "महानंदे, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे, वर माग!" ती म्हणाली, "हे दयाळा, या संपूर्ण नगराचा उद्धार करून सर्वांना विमानात बसवून शिवलोकी ने!"

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ८३

माताबंधूंसमवेत । महानंदा विमानी बैसत ।
दिव्यरूप पावोनि त्वरित । नगरासमवेत चालली ॥ ८३ ॥

सार्थ भावार्थ:

आपल्या आई, भावांसह संपूर्ण नगरातील लोकांना दिव्य रूप प्राप्त झाले आणि महानंदा त्या सर्वांसह विमानात बसून शिवलोकी गेली.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ८४

पावलीं सकळ शिवपदी । जेथे नाहीं आधिव्याधी ।
क्षुधातुयाविरहित त्रिशुद्धी । भेदबुद्धि कैची तेथे ॥ ८४ ॥

सार्थ भावार्थ:

ते सर्वजण शिवलोकात पोहोचले, जिथे कोणत्याही आजार, दुःख, भूक किंवा तहान नसते आणि भेदभावाची बुद्धीही उरत नाही.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ८५

नाहीं काम क्रोध द्वंद्व दुःख । मद मत्सर नाही निःशंक ।
जेथीचे गोड उदक । अमृताहून कोटगुणें ॥ ८५ ॥

सार्थ भावार्थ:

जिथे काम, क्रोध, दुःख, मद, मत्सर काहीही नाही आणि तिथले पाणी अमृतापेक्षाही कोटी पटीने गोड आहे.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ८६

जेथे सुरतरूंची वनें अपारे । सुरभीची बहुत खिल्लारें ।
चिंतामणीची धवलागारें । भक्ताकारणें निर्मिली ॥ ८६ ॥

सार्थ भावार्थ:

जिथे कल्पवृक्षांची वने, कामधेनूंचे कळप आणि चिंतामणीचे भव्य वाडे भक्तांसाठी निर्माण केलेले आहेत.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ८७

जेथे वोसणतां बोलती शिवदास । तें तें प्राप्त होय तयांस ।
शिवपद सर्वदा अविनाश । महानंदा तेथे पावली ॥ ८७ ॥

सार्थ भावार्थ:

जिथे शिवभक्तांनी सहज उच्चारलेली गोष्टही त्यांना लगेच प्राप्त होते, अशा अविनाशी शिवलोकात महानंदा पोहोचली.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ८८

हे कथा परम सुरस । पराशर सांगे भद्रसेनास ।
म्हणे हे कुमर दोघे निःशेष । कुक्कुट मर्कट पूर्वीचे ॥ ८८ ॥

सार्थ भावार्थ:

ही अत्यंत रसाळ कथा पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला सांगितली आणि म्हणाले, "हे तुझे दोघे मुलगे पूर्वजन्मीचे तेच कोंबडा आणि माकड आहेत!"

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ८९

कंठी रुद्राक्षधारण । भाळीं विभूति चर्चेन ।
त्याच पूर्वपुण्येकरून सुधर्म तारक उपजले ॥ ८९ ॥

सार्थ भावार्थ:

"पूर्वजन्मी महानंदेच्या संगतीमुळे त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष व कपाळावर विभूती लागली होती. त्याच पुण्याच्या फळाने आज ते 'सुधर्म' आणि 'तारक' म्हणून तुमच्या घरी जन्माला आले आहेत."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ९०

हे पुढे राज्य करतील निर्दोष । बत्तीसलक्षणी डोळस ।
शिवभजनीं लाविती बहुतांस । उद्धरतील तुम्हांतें ॥ ९० ॥

सार्थ भावार्थ:

"हे पुढे जाऊन उत्तम राज्य कारभार करतील, अनेक लोकांना शिवभक्तीला लावतील आणि तुमचाही उद्धार करतील."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ९१

अमात्यसहित भद्रसेन । गुरूसी घाली लोटांगण ।
म्हणे इतुकेन मी धन्य । सुपुत्र उदरीं जन्मले ॥ ९१ ॥

सार्थ भावार्थ:

हे ऐकून राजा भद्रसेन व प्रधानाने गुरूंना साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाले, "आमच्या पोटी असे सुपुत्र जन्माला आले, यातच आम्ही धन्य झालो."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ९२

भद्रसेन बोलत पुढती । हे राज्य किती वर्षे करिती ।
आयुष्यप्रमाण किती । सांगा यथार्थ गुरुवर्या ॥ ९२ ॥

सार्थ भावार्थ:

राजा भद्रसेन पुढे विचारू लागला, "गुरुदेव, हे मुले किती वर्षे राज्य करतील? यांचे एकूण आयुष्य किती आहे, ते कृपया खरे सांगा."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ९३

बहुत करितां नवस । येवढाच पुत्र आम्हांस ।
परम प्रियकर राजस । प्राणांहून आवडे बहु ॥ ९३ ॥

सार्थ भावार्थ:

"खूप नवस-सायास केल्यानंतर मला हा एकच मुलगा झाला आहे. तो मला माझ्या प्राणांपेक्षाही जास्त प्रिय आहे."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ९४

तुमच्या आगमनेंकरून । स्वामी मज समाधान ।
तरी या पुत्राचे आयुष्यप्रमाण । सांगा स्वामी मज तत्त्वतां ॥ ९४ ॥

सार्थ भावार्थ:

"आपल्या आगमनाने मला मोठे समाधान मिळाले आहे. तर स्वामी, कृपा करून माझ्या या पुत्राचे नेमके आयुष्य किती आहे ते सांगा."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ९५

ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख । परी तुम्हांसी ऐकतां वाटेल दुःख ।
हे सभा सकळीक । दुःखार्णवीं पडेल पै ॥ ९५ ॥

सार्थ भावार्थ:

ऋषी म्हणाले, "मी जे सांगेन ते सत्यच सांगेन, पण ते ऐकून तुम्हाला खूप दुःख होईल आणि संपूर्ण सभा शोकसमुद्रात बुडेल."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ९६

प्रत्ययसदृश बोलावे वचन । नातरी आंगास येते मूर्खपण ।
तुम्हां वाटेल विषाहून । विशेष ते गोष्टी ॥ ९६ ॥

सार्थ भावार्थ:

"गुरूने नेहमी सत्य व प्रचिती देणारेच बोलावे, नाहीतर मूर्खपणा ठरतो. परंतु ही गोष्ट तुम्हाला विषापेक्षाही कडू वाटेल."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ९७

भद्रसेन म्हणे सत्यवचन । बोलावया न करावा अनमान ।
तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे । पूर्ण झाली असती जाण पां ॥ ९७ ॥

सार्थ भावार्थ:

भद्रसेनाने सत्य सांगण्याचा हट्ट धरल्यावर पराशर ऋषी म्हणाले, "तुझ्या मुलाला आज बारा वर्षे पूर्ण झाली आहेत."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ९८

आजपासोनि सातवे दिवशी । मृत्यु पावेल या समयासी ।
राव ऐकतां धरणीसी । । मूर्च्छा येऊनि पडियेला ॥ ९८ ॥

सार्थ भावार्थ:

"आजपासून सातव्या दिवशी, याच वेळी तुझा मुलगा मृत्यू पावेल!" हे भयंकर वाक्य ऐकताच राजा भद्रसेन जमिनीवर मूच्छित होऊन पडला.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ९९

अमात्यासहित त्या स्थानीं । दुःखाग्नीत गेले आहाळोनी ।
अंतःपुरीं सकळ कामिनी । आकांत करिती आक्रोशें ॥ ९९ ॥

सार्थ भावार्थ:

प्रधानाव्यतिरिक्त सर्व सभासद दुःखाच्या आगीत होरपळून निघाले आणि राजवाड्यातील सर्व स्त्रिया आक्रंदून रडू लागल्या.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १००

करूनियां हाहाकार । वक्षःस्थळ पिटी नृपवर ।
मग रायासी पराशर । सावध करोनि गोष्ट सांगे ॥ १०० ॥

सार्थ भावार्थ:

राजा छाती बडवून दुःखाने हाहाकार करू लागला. तेव्हा पराशर ऋषींनी राजाला सावध केले आणि पुढे काय करावे हे सांगू लागले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १०१

नृपश्रेष्ठा न सोडी धीर । ऐक एक सांगतो विचार ।
जें पंचभूते नव्हती समग्र । शाशमित्र नव्हते तै ॥ १०१ ॥

सार्थ भावार्थ:

पराशर ऋषी भद्रसेन राजाला म्हणाले, "हे श्रेष्ठ राजा, धीर सोडू नकोस. मी तुला एक विचार सांगतो तो ऐक. जेव्हा पंचमहाभूते (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) आणि सूर्य-चंद्रही नव्हते,

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १०२

नव्हता मायामय विकार । केवळ ब्रह्ममय साचार ।
तेथे झालें स्फुरण जागर । अहंब्रह्म म्हणोनियां ॥ १०२ ॥

सार्थ भावार्थ:

जेव्हा माया किंवा कोणताही विकार नव्हता, सर्वत्र केवळ परब्रह्मच भरलेले होते; तिथे 'अहंब्रह्म' (मी ब्रह्म आहे) असे पहिले स्फुरण झाले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १०३

ते ध्वनि माया सत्य । तेथोनि जाहलें महत्तत्त्व ।
मग त्रिविध अहंकार होत । शिव इच्छेकरूनिया ॥ १०३ ॥

सार्थ भावार्थ:

तो ध्वनी म्हणजेच माया मानली गेली आणि त्यातून महत्तत्त्व उत्पन्न झाले. त्यानंतर भगवान शिवाच्या इच्छेने सात्त्विक, राजस आणि तामस असे तीन प्रकारचे अहंकार निर्माण झाले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १०४

सत्त्वांशें निर्मिला पीतवर्सन । रजशें सृष्टिकर्ता द्रुहिण ।
तमांशे रुद्र परिपूर्ण । संर्गस्थित्यंत करविता ॥ १०४ ॥

सार्थ भावार्थ:

सात्त्विक अंशातून पीतांबरधारी विष्णू, रजोगुणाच्या अंशातून सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव आणि तमोगुणाच्या अंशातून सृष्टीची निर्मिती, स्थिती व लय करणारे परिपूर्ण रुद्र निर्माण झाले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १०५

विघीस म्हणे सृष्टि रची पूर्ण । येरू म्हणे मज नाहीं ज्ञान ।
मग शिवें तयालागून । चारी वेद उपदेशिले ॥ १०५ ॥

सार्थ भावार्थ:

शिवाने ब्रह्मदेवाला सृष्टीची निर्मिती करण्यास सांगितले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की, मला याचे ज्ञान नाही; म्हणून शिवाने त्यांना चार वेदांचा उपदेश केला.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १०६

चहूं वेदांचे सार पूर्ण । तो हा रुद्राध्याय परम पावन ।
त्याहूनि विशेष गुह्य ज्ञान । भुवनत्रयी असेना ॥ १०६ ॥

सार्थ भावार्थ:

चारही वेदांचे संपूर्ण सार म्हणजे हा परम पवित्र 'रुद्राध्याय' आहे. याहून अधिक श्रेष्ठ आणि गूढ ज्ञान तिन्ही लोकांत दुसरे कोणतेही नाही.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १०७

बहुत करी हा जतन । त्याहून आणिक थोर नाहीं साधन ।
हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून । श्रीशंकर स्वयें बोले ॥ १०७ ॥

सार्थ भावार्थ:

हे ज्ञान जपून ठेव, यापेक्षा मोठे कोणतेही साधन नाही. हा रुद्राध्याय प्रत्यक्ष माझेच (शिव) रूप आहे, असे श्रीशंकरांनी स्वतः सांगितले आहे.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १०८

जे रुद्राध्याय ऐकती पढती । त्यांच्या दर्शनें जीव उद्धरती ।
मग कमलोद्भव एकांती । सप्तपुत्रां सांगे रुद्र हा ॥ १०८ ॥

सार्थ भावार्थ:

जे लोक रुद्राध्यायाचे श्रवण व पठण करतात, त्यांच्या दर्शनानेही इतर जीवांचा उद्धार होतो. पुढे ब्रह्मदेवाने एकांतात आपल्या सात मानसपुत्रांना या रुद्राध्यायाचा उपदेश केला.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १०९

मग सांप्रदायें ऋषीपासोन । भूतली आला अध्याय जाण ।
थोर जप तप ज्ञान । त्याहून अन्य नसेचि ॥ १०९ ॥

सार्थ भावार्थ:

त्यानंतर ऋषींच्या परंपरेतून हा अध्याय पृथ्वीतलावर आला. या रुद्राध्यायापेक्षा श्रेष्ठ असा जप, तप किंवा ज्ञान दुसरे कोणतेही नाही.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ११०

जो हा अध्याय जपे संपूर्ण । त्याचेनि दर्शने तीर्थे पावन ।
स्वर्गींचे देव दर्शन । त्याचे घेऊ इच्छिती ॥ ११० ॥

सार्थ भावार्थ:

जो मनुष्य हा अध्याय संपूर्ण जपतो, त्याच्या दर्शनाने सर्व तीर्थे पवित्र होतात आणि स्वर्गातील देवही त्याचे दर्शन घेण्याची इच्छा धरतात.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १११

जप तप शिवार्चन । याहूनि थोर नाहीं जाण ।
रुद्रमहिमा अगाध पूर्ण । किती म्हणोनि वर्णावा ॥ १११ ॥

सार्थ भावार्थ:

जप, तप आणि शिवपूजा यापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. या रुद्राचा महिमा अत्यंत अगाध आणि परिपूर्ण आहे, त्याचे वर्णन किती म्हणून करावे?

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ११२

रुद्रमहिमा वाढला फार । ओस पडिलें भानुपुत्रनगर ।
पाश सोडोनि यमकिंकर । रिते हिंडो लागले ॥ ११२ ॥

सार्थ भावार्थ:

भूतलावर रुद्रमहिमा खूप वाढला, त्यामुळे यमलोक (यमपुरी) ओस पडला. यमदूत आपले पाश टाकून रिकामे फिरू लागले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ११३

मग यमें विधी लागी पुसोन । अभक्तिकृत्या निर्मिली दारुण ।
तिणे कुतर्कवादी भेदी लक्षून । त्यांच्या हृदयीं संचरली ॥ ११३ ॥

सार्थ भावार्थ:

मग यमदेवाने ब्रह्मदेवाला विचारून 'अभक्ती' नावाची भयंकर कृत्या निर्माण केली. ती कृत्या कुतर्क करणाऱ्या आणि भेद बुद्धी ठेवणाऱ्या लोकांच्या हृदयात जाऊन बसली.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ११४

त्यांसी मत्सर वाढविला विशेष । वाटे करावा शिवद्वेष ।
तेणें ते जावोनि यमपुरीस । महानरकी पडले सदा ॥ ११४ ॥

सार्थ भावार्थ:

त्या कृत्येने लोकांमध्ये मत्सर वाढवला आणि त्यांना शिवाचा द्वेष करायला लावले. त्यामुळे ते शिवद्वेष्टी लोक यमलोकात जाऊन महानरकात पडू लागले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ११५

यम सांगे दूतांप्रती । शिवद्वेषी जे पापमती ।
ते अल्पायुषी होती । नाना रीतीं जाचणी करा ॥ ११५ ॥

सार्थ भावार्थ:

यमदेवाने आपल्या दूतांना सांगितले की, जे पापी लोक शिवाचा द्वेष करतात, ते अल्पायुषी होतात; त्यांना नरकात नेऊन विविध प्रकारे त्रास द्या.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ११६

शिव थोर विष्णु लहान । हरि विशेष हर गौण ।
ऐसे म्हणती जे त्यांलागून । आणोनि नरकी घालावें ॥ ११६ ॥

सार्थ भावार्थ:

"शिव श्रेष्ठ आणि विष्णू लहान," किंवा "विष्णू श्रेष्ठ आणि शिव गौण," असा भेद जे मानतात, त्यांना पकडून नरकात टाका.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ११७

रुद्राध्याय नावडे ज्यांसी । कुंभीपाकीं घालावे त्यांसी ।
रुद्रानुष्ठाने आयुष्यासी । वृद्धि होय निर्धारें ॥ ११७ ॥

सार्थ भावार्थ:

ज्यांना रुद्राध्याय आवडत नाही, त्यांना कुंभीपाक नरकात टाकावे. कारण रुद्रानुष्ठानाने नक्कीच आयुष्याची वृद्धी होते.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ११८

याकरितां भद्रसेना अवधारीं । अयुत रुद्रावर्तने करी ।
शिवावरी अभिषेकधार धरी । मृत्यु दूरी होय साच ॥ ११८ ॥

सार्थ भावार्थ:

"म्हणून हे भद्रसेना, ऐक! तू दहा हजार (अयुत) रुद्रावर्तने कर आणि शिवलिंगावर अभिषेकाची धार धर, त्यामुळे मृत्यु नक्कीच दूर पळून जाईल.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी ११९

अथवी शतघट स्थापून । दिव्यवृक्षांचे पल्लव आणून ।
रुद्रे उदक अभिमंत्रून । अभिषिंचन पुत्रा करी ॥ ११९ ॥

सार्थ भावार्थ:

अथवा शंभर कलश स्थापन करून, त्यात पवित्र वृक्षांची पाने टाकून आणि रुद्राध्यायाने ते पाणी अभिमंत्रित करून तुझ्या पुत्रावर त्याचा अभिषेक कर.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १२०

नित्य दहा सहस्र आवर्तनें पूर्ण । क्षोणीपाळा करी सप्तदिन ।
रायें धरिलें दृढ चरण । सद्‌गद होवोनि बोलत ॥ १२० ॥

सार्थ भावार्थ:

रोज दहा हजार आवर्तने याप्रमाणे सात दिवस हे अनुष्ठान कर." हे ऐकून राजा भद्रसेनाने पराशर ऋषींचे पाय घट्ट पकडले आणि गद्गद होऊन तो बोलू लागला:

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १२१

सकळऋषिरत्नमंडितपदक । स्वामी तू त्यांत मुख्य नायक ।
काळ मृत्यु भय शोक । गुरु रक्षी त्यांपासूनी ॥ १२१ ॥

सार्थ भावार्थ:

"हे स्वामी, सर्व ऋषीरूपी रत्नांमध्ये तुम्ही मुख्य नायक आहात. काळ, मृत्यू, भय आणि शोकापासून गुरूच शिष्याचे रक्षण करतात.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १२२

तरी त्वां आचार्यत्व करावें पूर्ण । तुजसवें जे आहेत ब्राह्मण ।
आणीक सांगसी ते बोलावून । आतांचि आणितों आरंभीं ॥ १२२ ॥

सार्थ भावार्थ:

म्हणून तुम्ही स्वतः या अनुष्ठानाचे मुख्य आचार्यपद स्वीकारावे. तुमच्यासोबत असलेले ब्राह्मण आणि इतर ज्यांना बोलावायला सांगाल, त्यांना मी आत्ताच बोलावून अनुष्ठान सुरू करतो."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १२३

मग सहस्र विप्र बोलावून । ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ति पूर्ण ।
न्यासध्यानयुक्त पढून । गुरूपासून जे आले ॥ १२३ ॥

सार्थ भावार्थ:

मग राजाने एक हजार ब्राह्मणांना बोलावले, ज्यांची रुद्रानुष्ठानावर पूर्ण भक्ती होती आणि ज्यांनी गुरूंकडून न्यास-ध्यानासह वेदांचे शिक्षण घेतले होते.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १२४

परदारा आणि परधन ज्यांस । वमनाहूनि नीच पूर्ण ।
विरक्त सुशील गेलिया प्राण । दुष्टप्रतिग्रह न घेती ॥ १२४ ॥

सार्थ भावार्थ:

ज्यांना परस्त्री आणि परधन हे उलटीपेक्षाही (वमनाहून) अधिक नीच वाटत असे, जे विरक्त, चारित्र्यवान होते आणि प्राण गेला तरी दुष्ट लोकांचे दान घेत नसत.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १२५

जे शापानुग्रहसमर्थ । सामर्थ्ये चालों न देती मित्ररथ ।
किंवा साक्षात उमानाथ । पुढे आणोनि उभा करिती ॥ १२५ ॥

सार्थ भावार्थ:

जे शाप किंवा अनुग्रह देण्यास समर्थ होते, ज्यांच्या तपोबलाने सूर्याचा रथही थांबत असे, किंवा जे स्वतःच्या सामर्थ्याने साक्षात शंकराला समोर आणून उभे करू शकत होते,

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १२६

ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण । बैसला व्यासपिता घेऊन ।
सहस्र घट मांडून । अभिमंत्रोनि स्थापिले ॥ १२६ ॥

सार्थ भावार्थ:

अशा श्रेष्ठ लक्षणयुक्त ब्राह्मणांना घेऊन महर्षी व्यासांचे पिता (पराशर ऋषी) बसले आणि त्यांनी हजार कलश मांडून मंत्रांनी ते अभिमंत्रित करून स्थापन केले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १२७

स्वर्धुनीचे सलिल भरलें पूर्ण । त्यांत आम्रपल्लव घालून ।
रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण । अनुष्ठान दिव्य मांडिलें ॥ १२७ ॥

सार्थ भावार्थ:

कलशांत गंगेचे पवित्र पाणी भरून त्यात आंब्याची पाने घातली. ब्राह्मणांनी मोठ्या रुद्रघोषाने मंत्रोच्चार केला आणि अद्भूत दिव्य अनुष्ठान सुरू केले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १२८

शास्त्रसंख्या झाले दिवस । सातवे दिवशीं माध्यान्हीं आला चंडांश ।
मृत्युसमय येतां धरणीस । बाळ मूर्च्छित पडियेला ॥ १२८ ॥

सार्थ भावार्थ:

शास्त्रात सांगितल्याप्रमाणे दिवस पूर्ण झाले. सातव्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आला, तेव्हा मृत्यूची वेळ येताच तो राजपुत्र (सुधर्म) जमिनीवर मूर्च्छित होऊन पडला.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १२९

एक मुहूर्त निचेष्टित । चलनवलन राहिलें समस्त ।
परम घाबरला नृपनाथ । गुरु देत नाभीकरा ॥ १२९ ॥

सार्थ भावार्थ:

तो बाळ एक मुहूर्त (सुमारे ४८ मिनिटे) निपचित पडला होता, त्याची सर्व हालचाल थांबली होती. राजा भद्रसेन अत्यंत घाबरला, तेव्हा गुरू पराशरांनी त्याला धीर दिला.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १३०

रुद्रोदक शिंपोन । सावध केला राजनंदन ।
त्यासी पुसती वर्तमान । वर्तलें तेंचि सांगत ॥ १३० ॥

सार्थ भावार्थ:

अभिमंत्रित रुद्रोदक शिंपडून राजपुत्राला सावध केले गेले. त्याला काय घडले असे विचारले असता, तो प्रत्यक्ष घडलेला प्रसंग सांगू लागला.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १३१

एक काळपुरुष भयानक थोर । ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर ।
विक्राळ दाढा भयंकर । नेत्र खदिरांगारासारिखे ॥ १३१ ॥

सार्थ भावार्थ:

बाळ म्हणाला, "एक अत्यंत भयंकर काळपुरुष (यमाचा दूत) आला होता; ज्याच्या उभ्या जटा, कपाळावर शेंदूर, विक्राळ दाढा आणि खैराच्या निखाऱ्यासारखे लाल डोळे होते.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १३२

तो मज घेऊन जात असतां । चौघे पुरुष धांवोनि आले तत्त्वतां ।
पंचवदन दशभुज त्यांची साम्यता । कमळभवांडी दुजी नसे ॥ १३२ ॥

सार्थ भावार्थ:

तो मला बांधून घेऊन जात असताना, चार दिव्य पुरुष धावत आले. त्यांना पाच तोंडे आणि दहा हात होते. या ब्रह्मांडात त्यांच्यासारखे दुसरे कोणीही नव्हते.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १३३

ते तेजे जैसे गभस्ती । दिगंततम संहारिती ।
भस्म अंगीं व्याघ्रांबर दिसती । दशहस्ती आयुधे ॥ १३३ ॥

सार्थ भावार्थ:

त्यांचे तेज सूर्यासारखे होते, जे दाही दिशांचा अंधार दूर करत होते. त्यांच्या अंगाला भस्म, नेसायला वाघाचे कातडे आणि दहा हातांत शस्त्रे होती.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १३४

ते महाराज येऊन । मज सोडविले तोडोनि बंधन ।
त्या काळपुरुषासी धरून । करीत ताडण गेले ते ॥ १३४ ॥

सार्थ भावार्थ:

त्या महान शिवदूतांनी येऊन माझे बंधन तोडून मला सोडवले आणि त्या काळपुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १३५

ऐसें पुत्रमुखीचे ऐकतां उत्तर । भद्रसेन करी जयजयकार ।
ब्राह्मणांसी घाली नमस्कार । आनंदाश्रू नेत्रीं आले ॥ १३५ ॥

सार्थ भावार्थ:

मुलाच्या तोंडून हे उत्तर ऐकताच राजा भद्रसेनाने भगवान शिवाचा जयजयकार केला, सर्व ब्राह्मणांना नमस्कार केला आणि त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १३६

अंगी रोमांच दाटले । मग विचरणी गडबडा लोळे ।
शिवनाम गर्जत तये वेळे । देव सुमनें वर्षती ॥ १३६ ॥

सार्थ भावार्थ:

राजाच्या अंगावर रोमांच उभे राहिले, तो ब्राह्मणांच्या चरणी गडबडा लोळू लागला. त्या वेळी सर्वत्र शिवनामाचा गजर झाला आणि स्वर्गातून देवांनी फुलांचा वर्षाव केला.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १३७

अनेक वाचे गजर । डंका गर्जे अवघ्यांत थोर ।
मुखद्वयाचीं महासुस्वर । मृदंगवायें गर्जती ॥ १३७ ॥

सार्थ भावार्थ:

मुखाने अनेक जयघोष सुरू झाले, भव्य नगारे गाजू लागले आणि दोन्ही बाजूंनी वाजणारे मृदंग अत्यंत मधुर आवाजात वाजू लागले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १३८

अनेक वाद्यांचे गजर । शिवलीला गाती अपार ।
शृंगे भृंगे काहाळ थोर । सनया अपार वाजती ॥ १३८ ॥

सार्थ भावार्थ:

विविध वाद्यांचा गजर सुरू झाला, लोक शिवलीला गाऊ लागले. शिंगे, तुताऱ्या, काहाळ आणि सनईचे सूर गूंजू लागले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १३९

चंद्रानना धडकती भेरी । नाद न माये नभादरीं ।
असो भद्रसेन यावरी । विधियुक्त होम करीतसे ॥ १३९ ॥

सार्थ भावार्थ:

ढोल आणि भेरींच्या आवाजाने आकाश भरून गेले. यानंतर राजा भद्रसेनाने यथासांग विधियुक्त होम (यज्ञ) केला.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १४०

षड्रस अन्नें शोभिवंत । अलंकार दिव्य वस्त्रे देत ।
अमोलिक वस्तु अद्भुत । अणोनि अर्पि ब्राह्मणांसी ॥ १४० ॥

सार्थ भावार्थ:

राजाने ब्राह्मणांना सहा रसांनी युक्त भोजन दिले, सुंदर दागिने, दिव्य वस्त्रे आणि अथांग अमूल्य वस्तू आणून अर्पण केल्या.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १४१

दक्षिणेलाग भांडारें । मुक्त केलीं राजेंद्रे ।
म्हणे आवडे तितुके भरा एकसरे । मागे पुढे पाहूं नका ॥ १४१ ॥

सार्थ भावार्थ:

राजाने खजिना मोकळा केला आणि सांगितले, "तुम्हाला हवे तितके धन भरून घ्या, मागे-पुढे पाहू नका."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १४२

सर्व याचक केले तृप्त । पुरे पुरे हेचि ऐकिली मात ।
धनभार झाला बहुत । म्हणोनि सांडिती ठायी ठायीं ॥ १४२ ॥

सार्थ भावार्थ:

राजाने सर्व याचकांना पूर्णपणे तृप्त केले. "आता पुरे, पुरे!" असे शब्द ऐकू येऊ लागले. धनाचा भार जास्त झाल्यामुळे लोक वाटेत ठिकठिकाणी धन सोडून देऊ लागले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १४३

ब्राह्मण देती मंत्राक्षता । विजय कल्याण हो तुझिया सुता ।
ऐसा अति आनंद होत असतां । तों अद्भुत वर्तलें ॥ १४३ ॥

सार्थ भावार्थ:

ब्राह्मणांनी "तुझ्या पुत्राचा विजय असो व कल्याण होवो," असा आशीर्वाद देऊन मंत्राक्षता घातल्या. असा आनंदोत्सव सुरू असतानाच एक अद्भुत घटना घडली.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १४४

वसंत येत सुगंधवनीं । कीं काशीक्षेत्रावरी स्वर्धुनी ।
की श्वेतोत्पले मृडानी । रैमणलिंग अर्चिजे ॥ १४४ ॥

सार्थ भावार्थ:

जसा सुवासिक वनात वसंत ऋतू यावा, काशीक्षेत्रात गंगा वाहावी, किंवा पार्वतीने पांढऱ्या कमलांनी शिवलिंगाची पूजा करावी,

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १४५

कीं निर्दैवास सांपडे चिंतामणी । कीं क्षुधितापुढे क्षीराब्धि या धावुनी ।
तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणीं । नारदमुनि पातला ॥ १४५ ॥

सार्थ भावार्थ:

किंवा अभागी माणसाला चिंतामणी मिळावा, भुकेलेल्या समोर क्षीरसागर धावून यावा; तसे त्या क्षणी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र नारदमुणी तिथे प्रकट झाले!

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १४६

वाल्मीक सत्यवतीनंदन । औत्तानपादी कयाधुहृदयरत्न ।
हे शिष्य ज्याचे त्रिभुवनीं जाण । वैद्य जे कां सर्वातें ॥ १४६ ॥

सार्थ भावार्थ:

महर्षी वाल्मिकी, व्यास (सत्यवतीनंदन), ध्रुव (औत्तानपादी), आणि प्रल्हाद (कयाधुपुत्र) हे तिन्ही लोकांत प्रसिद्ध असलेले ज्ञानी महर्षी ज्यांचे शिष्य होते,

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १४७

जो चतुःषष्टिकलाप्रवीण निर्मळ । चतुर्दशविद्या करतळमळ ।
ज्याचे स्वरूप पाहतां केवळ । नारायण दुसरा कीं ॥ १४७ ॥

सार्थ भावार्थ:

जे ६४ कलांमध्ये प्रवीण, १४ विद्या लीलया जाणणारे आणि ज्यांचे रूप पाहताच प्रत्यक्ष दुसरे श्रीविष्णूच भासत असत,

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १४८

हैं कमळभवांड मोडोनी । पुनः सृष्टि करणार मागुतेनी ।
अन्याय विलोकतां नयनीं । दंडे ताडील शक्रादिकां ॥ १४८ ॥

सार्थ भावार्थ:

जे संपूर्ण ब्रह्मांड नष्ट करून पुन्हा नवीन सृष्टी निर्माण करण्यास समर्थ होते आणि अन्याय होताना दिसल्यास इंद्रादी देवांनाही दंड देणारे होते,

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १४९

तो नारद देखोनि तेच क्षणीं । कुंडांतूनि निघे मूर्तिमंत अग्नी ।
दक्षिणाग्नि गार्हपत्य आहवनी । उभे ठाकले देखतां ॥ १४९ ॥

सार्थ भावार्थ:

त्या नारदमुनींना पाहताच यज्ञाच्या कुंडातून गार्हपत्य, आहवनीय आणि दक्षिणाग्नी हे तिन्ही अग्नी मूर्तिमंत रूपात प्रकट होऊन उभे राहिले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १५०

पराशरादि सकळ ब्राह्मण । प्रधानासहित भद्रसेन ।
धांवोनि धारती चरण । ब्रह्मानंदें उचंबळले ॥ १५० ॥

सार्थ भावार्थ:

पराशर ऋषी, सर्व ब्राह्मण, प्रधान आणि राजा भद्रसेन यांनी धावत जाऊन नारदांचे पाय धरले; सर्वजण ब्रह्मानंदाने उचंबळून आले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १५१

दिव्य गंध दिव्य सुमनीं । षोडशोपचारे पूजला नारदमुनी ।
राव उभा ठाके कर जोडोनी । म्हणे स्वामी अतींद्रियद्रष्टा तूं ॥ १५१ ॥

सार्थ भावार्थ:

दिव्य गंध आणि फुलांनी नारदमुनींची षोडशोपचार पूजा करण्यात आली. राजा हात जोडून म्हणाला, "स्वामी, तुम्ही भूत, भविष्य आणि वर्तमान जाणणारे अतींद्रियद्रष्टे आहात.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १५२

त्रिभुवनी गमन तुझे सर्व । कांहीं देखीलें सांग अपूर्व ।
नारद म्हणे मार्गी येता शिव । दूत चौघे देखिले ॥ १५२ ॥

सार्थ भावार्थ:

तुमचे तिन्ही लोकांत मुक्त गमन असते, तुम्ही काही आश्चर्यकारक पाहिले असल्यास सांगा." नारद म्हणाले, "मी वाटेने येत असताना चार शिवदूतांना पाहिले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १५३

दशभुज पंचवदन । तिहीं मृत्यु नेला बांधोन ।
तुझ्या पुत्राचे चुकलें मरण । रुद्रानुष्ठाने धन्य केलें ॥ १५३ ॥

सार्थ भावार्थ:

त्या दहा हात आणि पाच तोंडे असलेल्या शिवदूतांनी यमदूताला (मृत्यूला) बांधून नेले. तुझ्या पुत्राचा मृत्यू टळला आहे, या रुद्रानुष्ठानाने सर्व धन्य झाले."

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १५४

तंव पुत्ररक्षणार्थ ते वेळां । शिवें वीरभद्र मुख्य पाठविला ।
मज देखतां मृत्युस पुसू लागला । शिवसुत ऐका ते ॥ १५४ ॥

सार्थ भावार्थ:

नारद पुढे म्हणाले, "तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले होते. माझ्यासमोरच वीरभद्र मृत्यूला (यमदूताला) विचारू लागला, ते ऐका:

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १५५

तू कोणाच्या आज्ञेकरून । आणीत होतासी भद्रसेननंदन ।
त्यास दहा सहस्र वर्षे पूर्ण । आयुष्य असे निश्चयें ॥ १५५ ॥

सार्थ भावार्थ:

'तू कोणाच्या आज्ञेने भद्रसेनाच्या पुत्राला घेऊन जात होतास? त्याला तर नक्कीच १०,००० वर्षांचे आयुष्य आहे!

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १५६

तो सार्वभौम होईल तत्त्वतां । रुद्रमहिमा तुज ठाऊक असतां ।
शिवमर्यादा उल्लंघूनि तत्त्वतां । कैसा आणत होतासी ॥ १५६ ॥

सार्थ भावार्थ:

तो पुढे चक्रवर्ती राजा होणार आहे. तुला रुद्राचा महिमा माहीत असताना शंकराची मर्यादा ओलांडून तू त्याला कसा घेऊन जात होतास?'

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १५७

मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन । पत्रिका पाहिली वाचून ।
तंव द्वादशवर्षी मृत्युचिन्ह । गंडांतर थोर होते ॥ १५७ ॥

सार्थ भावार्थ:

मग यमदेवाने (सूर्यनंदन) चित्रगुप्ताला विचारून भविष्यपत्रिका वाचून पाहिली. त्यात मुलाच्या वयाच्या १२ व्या वर्षी भयंकर मृत्यूयोग (गंडांतर) होता.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १५८

ते महत्पुण्ये निरसूनि सहज । दहासहस्र वर्षे करावें राज्य ।
मग तो सूर्यनंदन महाराज । स्वापराधे कष्टी बहू ॥ १५८ ॥

सार्थ भावार्थ:

परंतु या महापुण्यामुळे (रुद्रानुष्ठानामुळे) तो मृत्यूयोग टळला असून आता तो १०,००० वर्षे राज्य करेल. हे कळल्यावर यमदेव आपल्या चुकीमुळे अत्यंत दुःखी झाला.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १५९

मग उभा ठाकून कृतांत । कर जोडोनि स्तवन करीत ।
हे अपणार्धव हिमनगजामात । अपराध न कळत घडला हा ॥ १५९ ॥

सार्थ भावार्थ:

मग यमदेवाने हात जोडून शिवाची स्तुती केली, 'हे पार्वतीपती महादेवा, नकळत माझ्याकडून हा अपराध घडला, मला क्षमा करा.'

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १६०

ऐसें नारदें सांगता ते क्षणीं । रायें पायांवर घातली लोळणी ।
आणीक सहस्र रुद्र करूनी । महोत्साह करीतसे ॥ १६० ॥

सार्थ भावार्थ:

नारदमुनींनी हे सांगताच राजा भद्रसेनाने त्यांच्या पायांवर लोळण घेतली आणि पुन्हा हजार रुद्रावर्तने करून मोठा उत्सव साजरा केला.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १६१

शतरुद्र करितां निःशेष । शतायुषी होय तो पुरुष ।
ह्य अध्याय पढतां निर्दोष । तो शिवरूप याच देहीं ॥ १६१ ॥

सार्थ भावार्थ:

१०० रुद्रावर्तने केल्याने मनुष्य शंभर वर्षे जगतो. आणि जो हा अध्याय दोषमुक्तपणे वाचतो, तो या शरीरातच शिवरूप बनतो.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १६२

तो येथेचि झाला मुक्त । त्याच्या तीर्थे तरती बहुत ।
असो यावरी ब्रह्मसुत । अंतर्धान पावला ॥ १६२ ॥

सार्थ भावार्थ:

असा मनुष्य जिवंतपणीच मुक्त होतो आणि त्याच्या चरणोदकाने अनेक जीवांचा उद्धार होतो. एवढे सांगून नारदमुनी गुप्त झाले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १६३

आनंदमय शक्तिनंदन । रायें शतपद्म धन देऊन ।
तोषावला गुरु संपूर्ण । ऋषींसहित जाता झाला ॥ १६३ ॥

सार्थ भावार्थ:

पराशर ऋषी अत्यंत आनंदी झाले. राजाने गुरूंना शंभर पद्म (अथांग) धन देऊन तृप्त केले आणि गुरू पराशर सर्व ऋषींसह निघून गेले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १६४

हे भद्रसेनआख्यान जे पढती । त्यांस होय आयुष्य संतती ।
त्यांसी काळ न बाधे अंतीं । वंदोनि नेती शिवपदा ॥ १६४ ॥

सार्थ भावार्थ:

जे लोक हे भद्रसेनाचे आख्यान (कथा) वाचतात, त्यांना दीर्घ आयुष्य व संतती प्राप्त होते. शेवटी काळाचे भय राहत नाही आणि शिवदूत त्यांना आदराने शिवलोकी नेतात.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १६५

दशशत कपिलदान । ऐकतां पढतां घडे पुण्य ।
केलें असेल अभक्ष्य भक्षण । सुरापान ब्रह्महत्या ॥ १६५ ॥

सार्थ भावार्थ:

ही कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने हजार कपिला गाईंचे दान केल्याचे पुण्य मिळते. नकळत अभक्ष्य भक्षण, मद्यपान किंवा ब्रह्महत्येसारखे पाप झाले असल्यास,

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १६६

एवं महापापपर्वत तत्त्वतां । भस्म होती श्रवण करितां ।
हा अध्याय त्रिकाळ वाचितां । गंडांतरें दूर होती ॥ १६६ ॥

सार्थ भावार्थ:

ते महापापांचे पर्वतही या कथेच्या श्रवणाने जळून भस्म होतात. हा अध्याय तिन्ही सांजा वाचल्यास आयुष्यातील सर्व संकटे व गंडांतरे दूर होतात.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १६७

यावरी कलियुगी निःशेष । शिवकीर्तनाचा महिमा विशेष ।
आयुष्यहीन लोकांस । अनुष्ठान हेंचि निर्धारें ॥ १६७ ॥

सार्थ भावार्थ:

कलियुगात शिवकीर्तनाचा विशेष महिमा आहे. अल्पायुषी लोकांसाठी हेच रुद्रानुष्ठान एकमेव समर्थ साधन आहे.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १६८

मग तो राव भद्रसेन । सुधर्म पुत्रास राज्य देऊन ।
युवराज्य तारकालागून । देता झाला ते काळीं ॥ १६८ ॥

सार्थ भावार्थ:

पुढे राजा भद्रसेनाने आपला मुलगा 'सुधर्म' याला मुख्य राज्य आणि प्रधानाचा मुलगा 'तारक' याला युवराजपद दिले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १६९

मग प्रधानासमवेत राव जाणा । जाता झाला तपोवना ।
शिव अनुष्ठान रुद्रध्याना । करितां महारुद्र तोषला ॥ १६९ ॥

सार्थ भावार्थ:

नंतर राजा भद्रसेन प्रधानाला सोबत घेऊन तपोवनात गेला. तिथे त्यांनी शिवानुष्ठान आणि रुद्रध्यान केले, ज्यामुळे भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न झाले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १७०

विमानी बैसवूनि त्वरित । राव प्रधान नेले मिरवित ।
विधिलोकीं वैकुंठीं वास बहुत । स्वेच्छेकरूनि राहिले ॥ १७० ॥

सार्थ भावार्थ:

शिवाने विमानात बसवून राजा आणि प्रधानाला आदराने शिवलोकी नेले. ते आपल्या इच्छेने ब्रह्मलोक, वैकुंठ आणि शिवलोकात आनंदाने राहिले.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १७१

शेवटी शिवपदासी पावून । राहिले शिवरूप होऊन ।
हा अकरावा अध्याय जाण । स्वरूप एकादश रुद्रांचे ॥ १७१ ॥

सार्थ भावार्थ:

शेवटी ते शिवपद प्राप्त करून शिवरूपच झाले. हा अकरावा अध्याय म्हणजे एकादश (११) रुद्रांचेच प्रत्यक्ष स्वरूप आहे.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १७२

हा अध्याय करितां श्रवण । एकादश रुद्रा समाधान ।
की हा कल्पद्रुम संपूर्ण । इच्छिले फळ देणार ॥ १७२ ॥

सार्थ भावार्थ:

या अध्यायाचे श्रवण केल्याने अकरा रुद्रांना समाधान मिळते. हा अध्याय इच्छित फळ देणाऱ्या कल्पवृक्षासारखा आहे.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १७३

मृत्युंजयजप रुद्रानुष्ठान । त्यास न बाधी ग्रहपीडा विघ्न ।
पिशाचबाधा रोग दारुण । न बाधीच सर्वथाही ॥ १७३ ॥

सार्थ भावार्थ:

जो महामृत्युंजय जप आणि रुद्रानुष्ठान करतो, त्याला ग्रहपीडा, विघ्ने, पिशाचबाधा किंवा भयंकर रोग यांचा अजिबात त्रास होत नाही.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १७४

येथे जो मानील अविश्वास । तो होईल अल्पायुषी तामस ।
हें निंदी तो चांडाळ निःशेष । त्याचा विटाळ न व्हावा ॥ १७४ ॥

सार्थ भावार्थ:

जो यावर अविश्वास दाखवेल, तो अल्पायुषी व तामसी बनेल. जो याची निंदा करेल तो पूर्णपणे चांडाळ समजावा, त्याचा विटाळही होऊ देऊ नये.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १७५

त्यास प्रसवोनि वांझ झाली माता । त्याची संगती न धरावी तत्त्वता ।
त्यासी संभाषण करिता । महापातक जाणिजे ॥ १७५ ॥

सार्थ भावार्थ:

अशा निंदकाला जन्म देऊन त्याची आई जणू वांझच राहिली असे समजावे. त्याची संगत धरू नये आणि त्याच्याशी बोलणे हेसुद्धा महापाप मानले जाते.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १७६

ते आपुल्या गृहास न आणावे । आपण त्यांच्या सदनास न जावें ।
ते त्यजावे जीवेभावे । जेवीं सुशील हिंसकगृह ॥ १७६ ॥

सार्थ भावार्थ:

अशा लोकांना आपल्या घरी आणू नये आणि आपणही त्यांच्या घरी जाऊ नये. जसे सज्जन मनुष्य हिंसक प्राण्यांचे घर सोडतो, तसे यांना मनापासून सोडून द्यावे.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १७७

जो प्रत्यक्ष भक्षितो विष । जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस ।
त्यांसी मृत्यु आला या गोष्टीस । संदेह कांहीं असेना ॥ १७७ ॥

सार्थ भावार्थ:

जो माणूस प्रत्यक्ष विष खात आहे, त्याच्या पंगतीला जे मूर्ख जेवायला बसतात, त्यांचा मृत्यू अटळ आहे यात काही शंका नाही.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १७८

असो सर्वभावें निश्चित । अखंड पहावें शिवलीलामृत ।
हें न घडे तरी त्वरित । हा अध्याय तरी वाचावा ॥ १७८ ॥

सार्थ भावार्थ:

म्हणून सर्व भावाने अखंड शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन-श्रवण करावे. हे पूर्ण शक्य नसेल तर रोज किमान हा (११ वा) अध्याय तरी नक्की वाचावा.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १७९

या अध्यायाचें करितां अनुष्ठाने । तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य ।
त्याचे घरीं अनुदिन । ब्रह्मानंद प्रगटेल ॥ १७९ ॥

सार्थ भावार्थ:

या अध्यायाचे अनुष्ठान केल्याने रोज रुद्र केल्याचे पुण्य मिळते आणि त्याच्या घरी रोज ब्रह्मानंद प्रगट होतो.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १८०

अपर्णाहृदयाब्जमिलिंद । श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद ।
जो जगदानंदमूळकंद । अभंग न विटे कालत्रयीं ॥ १८० ॥

सार्थ भावार्थ:

पार्वतीच्या हृदयकमळातील भ्रमर असणारे भगवान शिव आणि श्रीधरस्वामी यांच्या कृपाप्रसादाने मिळणारा हा ब्रह्मानंद तिन्ही काळात कधीही विटत नाही (कमी होत नाही).

श्री शिवलीलामृत santvani.co.in
ओवी १८१

शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सज्जन अखंड । एकादशाध्याय गोड हा ॥ १८१ ॥

सार्थ भावार्थ:

स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तरखंडावर आधारित असलेल्या या महान 'शिवलीलामृत' ग्रंथातील हा अत्यंत गोड असा ११ वा अध्याय सर्व सज्जनांनी अखंड श्रवण करावा.

श्री शिवलीलामृत santvani.co.in
अध्याय १० वा अध्याय १२ वा