निजमंडपीं शिशुपाळ । करीत होता गदारोळ । भीमकी घेऊनि गेला गोपाळ । ऎकोन विकळ पडियेला ॥ १ ॥
स्वतःच्या विवाह मंडपात शिशुपाल थाटमाटात तयारी करत होता. श्रीकृष्णाने रुक्मिणीला पळवून नेल्याचे ऐकताच तो मूछित होऊन जमिनीवर पडला.
पांडुरवर्ण झाले डोळे । मुखींहूनि लाळ गळे । सेवक धरिती आंगबळें । गात्रें विकळें पडियेली ॥ २ ॥
त्याचे डोळे पांढरे पडले, तोंडाला लाळ सुटली. त्याचे सर्व अवयव गळून पडले होते आणि सेवक त्याला ताकदीने सावरत होते.
भीमकी अप्राप्तीचे बण । ह्रदयीं लागले दारुण । घायेंवीण घेतला प्राण । अकालमरण वोढवलें ॥ ३ ॥
रुक्मिणी न मिळाल्याचे भयंकर बाण त्याच्या हृदयात टोचले. कोणत्याही शस्त्राच्या घावाशिवाय साक्षात अकाल मृत्यू आल्यासारखी त्याची अवस्था झाली.
वोखेटवाणें दिसे मुख । नाडी तुटल्या नि:शेष । कृष्णधाकाची धुकधुक । ह्रदयामाजी उरली असे ॥ ४ ॥
त्याचा चेहरा अतिशय कुरूप व केविलवाणा दिसत होता, हाताच्या नाड्या पार क्षीण झाल्या होत्या. केवळ श्रीकृष्णाच्या धाकाची धुकधुक त्याच्या हृदयात उरली होती.
महाशब्द मंडपद्वारीं । मिळालिया नगर-नारी । माता येऊनि रुदन करी । कपाळ करीं पिटीत ॥ ५ ॥
मंडपाच्या दारात नगरस्त्रींचा मोठा आक्रोश सुरू झाला. शिशुपालाची आई धावत आली आणि डोके पिटून रडू लागली.
सिद्धीं नपवेचि गे शोभन । वायां गेले वरमायपण । अंबिका क्षोभली गे जाण । वराचे प्राण वांचोत कां ॥ ६ ॥
"हा मंगलप्रसंग सिद्धीस गेला नाही, माझे नवरदेवाची आई असणे व्यर्थ गेले! अंबादेवी कोपली आहे, आता माझ्या मुलाचे प्राण तरी वाचोत!"
थोर वोडवलें दु:ख । न देखेंचि सुनमुख । बुडालें सोहळ्याचें सुख । हरिखीं विख कालविलें ॥ ७ ॥
"माझ्यावर भयंकर दुःख कोसळले, मला सुनेचे तोंड पाहायला मिळाले नाही. आनंदाच्या सोहळ्यात विषाचा कालवा झाला."
अगे हा रुक्मिया दुर्बुद्धी । न पाहेचि लग्नशुद्धी । मृत्युपंचकाचे संधी । लग्नसिद्धि मांडिली ॥ ८ ॥
"हा दुष्ट बुद्धीचा रुक्मी लग्नाचा मुहूर्त व दिशा पाहत नव्हता. त्याने मृत्युपंचकाच्या योगावर लग्न ठरवले."
कृष्ण ज्योतिषी गे निका । वश नोहे पांचां पंचकां । काळ साधिला नेटका । सम्यो देखा तो जाणे ॥ ९ ॥
"कृष्ण मात्र उत्तम ज्योतिषी व ज्ञानी आहे. तो पंचमहाभूतांच्या तावडीत सापडणारा नाही. त्याने अचूक वेळ व मुहूर्त साधून योग्य समयी कार्य केले."
तेणेंचि साधिली गे वेळ । साधोनि नेली भीमकबाळ । आमुचें करंटें कपाळ । आतां शिशुपाळ वांचवा ॥ १० ॥
"त्यानेच योग्य वेळ साधून रुक्मिणीला नेले. आमचे नशीबच करंट निघाल, आता फक्त माझ्या शिशुपालाचे प्राण वाचवा."
विलाप करूनि अनेक । शिंपिलें शिशुपाळचें मुख । वारा घालिती एक । झाला नावेक सावध ॥ ११ ॥
असा अनेक प्रकारचा विलाप करून त्यांनी शिशुपालाच्या तोंडावर पाणी शिंपडले. लोकांनी वारा घातल्यावर तो थोडा सावध झाला.
उठूनि बैसला एकसरें । श्वास घालता पैं थोरें । दु:ख ह्रदयींचें नावरे । नेत्रद्वारें जळ चाले ॥ १२ ॥
तो एकदम उठून बसला नि मोठे उसासे टाकू लागला. हृदयातील दुःख न आवरल्यामुळे त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
शिशुपाळा आलें रुदन । न धरत चालिलें स्फुंदन । धीरें आवरूनियां जाण । शहाणपणा मांडिले ॥ १३ ॥
शिशुपाल हुंदके देऊन रडू लागला. पण मग धीर धरून आणि स्वतःला सावरून तो मोठेपणाचे नाटक करू लागला.
नोवरी नेली रे सुंदर । पडिले समर्थासीं वैर । कृष्ण नेटका झूंजार । आणी बळिभद्र महाबळी ॥ १४ ॥
"सुंदर नवरी तर पळवून नेली आणि समर्थ देवांशी वैर ओढवले! कृष्ण चतुर योद्धा आहे नि बलराम तर महाबली आहे."
हेच दोघे नावरती । येर यादव ते किती । ऎसें विचारूनि चित्तीं । काय वीराप्रती बोलिला ॥ १५ ॥
"हे दोघेच कोणाला आवरत नाहीत, मग बाकीचे यादव कितीही असले तरी काय! असे मनात विचार करून तो वीरांना म्हणाला:"
सौन्य पालाणा पालाणा । घाव घाला रे निशाणा । रथ संजोगोनि आणा । रणांगणां जाऊं वेगीं ॥ १६ ॥
"सैन्य सज्ज करा, नगाऱ्यांवर घाव घाला! रथ जोडून आणा, आपण लगेच रणांगणात जाऊया!"
सन्नद्ध अक्रूनियां दळ । रथीं चढला शिशुपाळ । नगरद्वारा आले सकळ । पुढें घायाळ भेटले ॥ १७ ॥
सैन्याला सज्ज करून शिशुपाल रथावर चढला. सर्वजण नगराच्या वेशीवर पोहोचले, तोच त्यांना युद्धातून पळून आलेले घायाळ सैनिक भेटले.
घायीं तुटले सबळ । अशुद्धें झाले बंबाळ । बणीं भेदलें कपाळ । वीर विकळ पडताती ॥ १८ ॥
ते वीर घावांनी तुटले होते, रक्ताने माखले होते. बाणांनी कपाळ भेदल्यामुळे वीर विकळ होऊन पडत होते.
वीरी घेतलें घायवारें । म्हणती पळा रे पळा रे । मारिले जाल रे बळीभद्रें । साह्य दुसरें कोणी न येत ॥ १९ ॥
घावांनी भयभीत झालेले सैनिक म्हणत होते, "पळा, पळा! बलरामाने सर्वांना झोडपून काढले आहे, तिथे कोणीही मदतीला येणार नाही!"
एकीं घेतला भेदरा । एक कांपती थरथरां । करूं नको गा बलिभद्रा । दास डिंगर आम्ही तुझे ॥ २० ॥
काहींनी मोठा धसका घेतला होता, काही थरथर कापत होते नि "बलरामा, मारू नकोस, आम्ही तुझे दास आहोत!" असे गयावया करत होते.
एकचे तुटले पैं हात । एकीं विचकले दांत । एक कण्हत कुंथत । तवा देत पैं आले ॥ २१ ॥
कोणाचे हात तुटले होते, कोणाचे दात पडले होते, तर काहीजण कण्हत व तापाने फणफणत पळत येत होते.
एक घायीं जर्जर बहुत । एक हंबत हुंबत । एकांची लोंबती आतें । घायीं कोते अडकलीं ॥ २२ ॥
काहीजण घावांनी जर्जर झाले होते, काही विव्हळत होते, काहींची आतडी बाहेर लोंबत होती नि शस्त्रांचे तुकडे अंगात रुतले होते.
एक रडत रडत । एक अत्यंत चरफडित । एक पाणी जी मागत । खुणा हात दाउनी ॥ २३ ॥
काहीजण रडत होते, काही अस्वस्थ होऊन तडफडत होते, तर काहीजण हाताने खुणा करून पाण्यासाठी याचना करत होते.
मस्तक फुटोनि वाहे रुधिर । एकाचें अर्ध तुटले शिर । ऎसाचे घायीं बुडाले तीर । तेणें वीर तळमळतीं ॥ २४ ॥
डोके फुटून रक्त वाहत होते, काहींची अर्धी डोकी छाटली गेली होती. घावात बाण रुतल्यामुळे वीर तळमळत होते.
भले गौरविले वर्हाडी । थितीं गेलीं लेणीं लुगडीं । एक नागवी उघडीं । मेलीं मढीं वोढिती ॥ २५ ॥
अशा प्रकारे या वऱ्हाड्यांचा चांगलाच 'सन्मान' झाला होता! अंगावरील कपडे-दागिने गमावून काहीजण नागडे उघडे होऊन प्रेते ओढत होते.
घायाळा घालोनि वोडणी । धनुष्यदंडाच्या अडणीं । उचलोनि दोघीं चौघीं जणीं । वीरश्रेणी आणिल्या ॥ २६ ॥
घायाळांना ढालींवर व धनुष्यांवर टाकून चार-चार जण मिळून त्या वीरांना उचलून आणत होते.
एक मार्गी झालें पुरें । एकाचें आणिले खटारें । वीर आपटिले जी वीरें । बळिभद्रे मारिले ॥ २७ ॥
काहीजण वाटेतच मरण पावले, काहींची प्रेते गाड्यांतून आणली गेली. बलरामाने वीरांवर वीर आपटून सर्वांना झोडपून काढले होते.
राये खोचले मुगुटाचे । अत्यंत प्राण विकळ त्यांचे । सेवक उचलिती पायांचे । डोळे मोरकुंचे वारिती ॥ २८ ॥
मुकुट धारण केलेले राजे वर्मी टोचले गेले होते, त्यांचे प्राण कंठाशी आले होते. सेवक त्यांना पायांशी धरून उचलत होते नि डोळ्यांवर वारा घालत होते.
देखोनि दचकला शिशुपाळ । धांकिन्नलें त्याचें दळ । राजे मारिले सबळ । प्रबळ बळ यादवांचे ॥ २९ ॥
हे दृश्य पाहून शिशुपाल दचकला आणि त्याचे सैन्य भयभीत झाले. बलवान राजे मारले गेले होते नि यादवांचे बळ अथांग दिसत होते.
युद्धीं झाले पराङ्मुख । राजे भंगले अनेक । आले जरासंधादिक । मोडले कटक घेउनी ॥ ३० ॥
अनेक राजे युद्धात पराभूत होऊन माघार घेत पळून आले होते. जरासंध इत्यादी राजेही उध्वस्त झालेले सैन्य घेऊन परतले होते.
भेटला शिशुपाळ सन्मुख । अत्यंत कोमाइलें त्याचे मुख । बुडलें सोहळ्याचें सुख । ह्रदयीं दु:ख भीमकीचें ॥ ३१ ॥
जरासंधाला समोर शिशुपाल भेटला, ज्याचे तोंड पूर्ण कोमेजले होते. लग्नाचा आनंद मावळला होता नि हृदयात रुक्मिणी गमावण्याचे दुःख दाटले होते.
दु:खे मुख काळवंडलें । दोन्ही ओंठ वाळले । लाजा न बोलवे बोलें । तें देखिलें जरासंधें ॥ ३२ ॥
दुःखाने त्याचे तोंड काळे पडले होते, दोन्ही ओठ सुकले होते नि लाजेने तोंडातून शब्द फुटत नव्हता. हे जरासंधाने पाहिले.
मग म्हणे पुरुषपंचानना । व्यर्थ खेद कां करिसी मना । प्राप्ताप्राप्ताची गणना । आधीन कोणा पैं नाहीं ॥ ३३ ॥
मग जरासंध म्हणाला, "हे वीरा, मनात व्यर्थ खेद का करतोस? कोणती गोष्ट मिळणे किंवा न मिळणे हे कोणाच्याही हातात नसते."
संसार म्हणजे खांबसूत्र । चौर्यायंशीं लक्ष पुतळ्या विचित्र। त्यांचा सूत्रधारी ईश्वर । त्याचिया इच्छें वर्तिजे ॥ ३४ ॥
"हा संसार म्हणजे जणू बाहुल्यांचा खेळ आहे, ८४ लक्ष जीव या बाहुल्या आहेत नि त्यांचा सूत्रधार साक्षात ईश्वर आहे. त्याच्या इच्छेने सर्व चालते."
आपण राहोनियां दूरी । हालवी प्राचीनाची दोरी । भूतें तदनुसार सारी । निजव्यापारी वर्तती ॥ ३५ ॥
"तो ईश्वर लांब राहून पूर्वकर्माची (प्राक्तनाची) दोरी हालवतो नि सर्व प्राणी त्यानुसार आपापले व्यवहार करत राहतात."
तेथें सुखदु:ख निजतंत्र । मांडूनि ठेविलें स्वतंत्र । ते ते तिये गती पात्र । अहोरात्र होताती ॥ ३६ ॥
"तिथे सुख नि दुःख स्वतंत्र नियमाने मांडले आहे. सर्व जीव अहोरात्र आपापल्या कर्मांनुसार त्या सुखा-दुःखाला प्राप्त होतात."
येथें यश आलियाचे सुख । अथवा अपेशचें दु:ख । अहंपणें मानिती मूर्ख । कर्ता देख तो नव्हे ॥ ३७ ॥
"येथे यश मिळाले तर आनंद आणि अपयश आले तर दुःख हे केवळ मूर्ख लोक अहंकाराने मानतात; कारण प्रत्यक्ष कर्ता मनुष्य नसतोच."
येथें कर्ता जो मी म्हणे । तो पडे सुखदु:खांचे नागवणे । जन्ममरणांसी अवतणें । दिधलें तेणें सर्वथा ॥ ३८ ॥
"जो स्वतःला कर्ता मानतो, तो सुख-दुःखाच्या जाळ्यात फसतो आणि त्याने स्वतःच जन्म-मरणाला आमंत्रण दिलेले असते."
अहंकर्तेपणाचा भावो । तोचि सुखदु:खांसी ठावो । जन्ममरणाच निर्वाहो । तेणेंचि पाहाहो होतसे ॥ ३९ ॥
"स्वतःकडे कर्तृत्व घेणे हेच सुख-दुःखाचे मूळ आहे नि त्यानेच जन्म-मरणाचा संसार चालू राहतो."
यालागीं अहंकर्तव्यता । मनीं न धरावी सर्वथा । भीमकीप्राप्तीची व्यथा । दुर्गमता येवों नेदी ॥ ४० ॥
"म्हणून मनात कर्तृत्वाचा अहंकार धरू नकोस. रुक्मिणी न मिळाल्याची व्यथा मनात ठेवून अस्वस्थ होऊ नकोस."
म्यांचि पाहें पां केवळ । तेवीस अक्षौहिणी दळ । युद्ध केलें सत्रा वेळ । एक वेळ जयो आला ॥ ४१ ॥
"माझेच पाहा ना! मी २३ अक्षौहिणी सैन्य घेऊन श्रीकृष्णाशी १७ वेळा युद्ध केले, पण मला केवळ एकाच वेळी विजय मिळाला!"
भंग झालियाचे दु:ख । अथवा यश आलियाचे सुख । हें न मानूनियां देख । यथासुखें वर्तावे ॥ ४२ ॥
"म्हणून पराभवाचे दुःख किंवा यशाचा आनंद मनात न ठेवता समाधानाने राहावे."
एवं सुखदु:ख जेम आहे । तें तवं काळाधीन पाहें । तो काळ ज्यासी साह्य होये । तोची लाहे यशातें ॥ ४३ ॥
"हे सुख-दुःख काळाच्या अधीन असते. ज्याला काळ अनुकूल असतो, त्यालाच यश प्राप्त होते."
आजि तुज युद्धासी जातां । यश न ये गा सर्वथा । काळ साह्य श्रीकृष्णनाथा । झाला तत्त्वतां निजबळें ॥ ४४ ॥
"आज तू युद्ध करायला गेलास तर तुला यश मिळणार नाही, कारण आज काळ साक्षात श्रीकृष्णनाथाला अनुकूल आहे."
काळ साह्य झालेपणीं । प्राप्त झाली बा रुक्मिणी । मजसकट राजे राणी । तृणप्राय जिंकिले ॥ ४५ ॥
"काळ अनुकूल असल्यामुळेच त्याला रुक्मिणी मिळाली आणि माझ्यासारख्या सर्व राजांना त्याने तृणासारखे लीलया जिंकले."
तो जंव काळ साह्य नाहीं । तंववरी युद्ध करिशील कायी । वीर झोडिजेतील घायीं । योद्धे ठायी पडतील ॥ ४६ ॥
"जोपर्यंत काळ अनुकूल नाही, तोपर्यंत युद्ध करून काय फायदा? तुझे वीर मारले जातील नि योद्धे जागीच प्राणाला मुकतील."
जंव अनुकूळ नाहीं काळ । तोंवरी काय करिशील बळ । सिद्धी न पवे गा सकळ । श्रम केवळ पावशील ॥ ४७॥
"जोपर्यंत काळ अनुकूल होत नाही, तोपर्यंत शक्ती दाखवून काय उपयोग? तुझे कार्य सिद्धीस जाणार नाही, उलट व्यर्थ कष्ट मिळतील."
यालागीं धीर धरीं शहाणपणीं । जंव होय काळसाह्याची मांडणी । मग यादव जिंकोन अर्धक्षणीं । केवीं रणीं राहातील ॥ ४८ ॥
"म्हणून शहाणपणाने धीर धर! जेव्हा काळ आपल्याला अनुकूल होईल, तेव्हा आपण यादवांना अर्ध्या क्षणात जिंकू."
यापरी राजमित्र जरासंध । करीत शिशुपाळासी बोध । मग सोडोनि युद्धक्रोध । निजनगरासी निघाला ॥ ४९ ॥
अशा प्रकारे मित्र जरासंधाने शिशुपालाला उपदेश केला. मग युद्धाचा राग सोडून ते आपापल्या नगराकडे निघाले.
शिशुपाळासी युद्धाआंत । जीवेंचि घेता कृष्णनाथ । आजिचा चुकविला जी अनर्थ । हित मानित मदघोष ॥ ५० ॥
"जर शिशुपाल युद्धात गेला असता तर कृष्ण त्याचा जीवच घेता! आज जरासंधाने हा अनर्थ टाळला," असे मानून शिशुपालाचा बाप दमघोष उपकृत झाला.
तो म्हणे जरासंधासी । उत्तीर्ण नव्हे उपकारासी । तुवां वाचविले शिशुपाळासी । पुत्रदानासी तूं दाता ॥ ५१ ॥
दमघोष जरासंधाला म्हणाला, "मी तुझ्या या उपकारातून कधीही उतराई होऊ शकत नाही. तू शिशुपालाला वाचवून त्याला जणू जीवनदान दिले आहेस."
ऎसें मानुमियां सुख । परतला जी दमघोष । घेऊनि सोयरे सेवक । एकेंएक परतले ॥ ५२ ॥
असे मानून दमघोष समाधानी झाला आणि सोयरे व सेवकांना घेऊन मागे फिरला.
युद्धीं यादवीं मारितां । राजे उरले जे झुंजतां । तिहीं मानूनियां हिता । मग सर्वथा निघाले ॥ ५३ ॥
यादवांच्या मारातून जे राजे जिवंत उरले होते, त्यांनी माघार घेण्यातच आपले हित मानले नि ते निघून गेले.
घयीं जर्जर नेंओं किती । नागविली सैन्यसंपत्ती । आपुलालिया नगराप्रती । वेगें भूपती निघाले ॥ ५४ ॥
घावांनी जर्जर झालेले आणि सैन्यसंपत्ती गमावलेले ते सर्व राजे आपापल्या नगराकडे वेगाने निघून गेले.
मग परतला शिशुपाळ । राजे चालिले सकळ । रुक्मिया कोपला प्रबळ । सन्नद्ध दळ तेणें केले ॥ ५५ ॥
मग शिशुपाल व सर्व राजे परत फिरले; पण रुक्मिणीचा भाऊ रुक्मी अत्यंत क्रोधाने खवळला नि त्याने स्वतःचे सैन्य सज्ज केले.
धुर रणीं होय विन्मुख । तेव्हांचि त्याचें काळें मुख । कवण वांचल्याचें सुख । घेऊनि विख मरावें ॥ ५६ ॥
रुक्मी म्हणाला, "जो रणांगणातून पाठ दाखवून पळतो, त्याचे तोंड काळे होते! अशा जगण्यात कसले सुख? त्यापेक्षा विष खाऊन मरलेले बरे!"
जरासम्ध शिशुपाळ देखतां । सकल राजेही ऎकतां । उभा करोनि भीमकपिता । थोर गर्जता तो झाला ॥ ५७ ॥
जरासंध, शिशुपाल नि सर्व राजांदेखत, स्वतःच्या भीमक वडिलांना उभे करून रुक्मी मोठ्याने गर्जना करू लागला:
तुम्ही सांडिले पुरुषार्था । मी तंव नेऊ नेदी राजदुहिता । रणी जिणोनि कृष्णनाथा । भीमकी आता आणीन ॥ ५८ ॥
"तुम्ही तुमचा पुरुषार्थ सोडून पळालात, पण मी माझ्या बहिणीला जाऊ देणार नाही! रणांगणात कृष्णाला जिंकून मी आताच रुक्मिणीला परत आणतो."
कृष्ण विभांडोनि बाणी । हिरोनि नाणींच रुक्मिणी । तरी स्वधर्म सांडिजे ब्राह्मणीं । मजलागोनी तो दोष ॥ ५९ ॥
"मी जर कृष्णाचा बाणांनी पराभव करून रुक्मिणीला परत आणले नाही, तर ब्राह्मणांनी स्वधर्म सोडल्याचे जे पाप लागते, ते मला लागो!"
जे करिती सांधुनिंदा । त्या पापाची मज आपदा । र्णीं न जिंकितां गोविंदा । जरी मी नुसधा परतेन ॥ ६० ॥
"गोविंदाला जिंकल्याशिवाय जर मी असाच रिकाम्या हाताने परतलो, तर संतांची निंदा करणाऱ्याला जे पाप लागते, ते मला लागो!"
विद्या होऊन गर्वा येती । विकल्पूनि गुरुसी निंदिती । तीं तीं पापें मज होती । जरी मी श्रीपती न जिंके ॥ ६१ ॥
"जर मी कृष्णाला जिंकले नाही, तर विद्या शिकून गर्वाने गुरूंना निंदणाऱ्याला जे पाप मिळते, ते सर्व पाप मला लाभो!"
केवळ पूज्य मातापिता । त्यांतें पुत्र हाणे लाता । तीं तीं पापें मजचि आतां । जरी श्रीकृष्णनाथा न जिंके ॥ ६२ ॥
"आई-वडिलांना लाथा मारणाऱ्या पुत्राला जे भयंकर पाप लागते, ते पाप मला लागो जर मी कृष्णाला जिंकले नाही तर!"
देखोनि सधुजन्नंसी । दोष आरोपिती त्यासी । तीं तीं पापें सजसी । जरी मी कृष्णासी न जिंकें ॥ ६३ ॥
"सज्जनांना पाहून त्यांच्यावर खोटे दोष ठेवणाऱ्याला जे पाप लागते, ते सर्व पाप मला मिळो जर मी कृष्णाचा पराभव केला नाही तर!"
कृष्ण न जिंकितां रणीं । घेऊनि न येतां रुक्मिणि । पुरीं न प्रवेशें कौंडणीं । मुख परतोनी न दाखवी ॥ ६४ ॥
"कृष्णाला जिंकल्याशिवाय आणि रुक्मिणीला परत आणल्याशिवाय मी कौंडिण्यपुरात पाऊल टाकणार नाही नि कोणालाही तोंड दाखवणार नाही!"
ऎसी वाहूनियां आण । कवचेम लेइला । वेगें घेऊनि धनुष्यबाण । म्हणे आंगवण पहा माझी ॥ ६५ ॥
अशी भयंकर शपथ घेऊन रुक्मीने चिलखत परिधान केले नि धनुष्य-बाण हातात धरून म्हणाला, "आता माझी ताकद पाहा!"
क्रुष्ण अज्ञानाची आदी । त्यासी ह्रदयीं नाहीं बुद्धी । पर्ण पाहे राक्षसविधीं । तें मी सिद्धी जाऊं नेदीं ॥ ६६ ॥
"कृष्ण हा अज्ञानाचे मूळ आहे, त्याच्या हृदयात बुद्धी नाही! तो राक्षसविवाहाच्या पद्धतीने लग्न करू पाहतो आहे, पण मी त्याचे हे कार्य सिद्धीस जाऊ देणार नाही."
कृष्ण गर्वित एकलेपणीं । दुजियातें दृष्टीं नाणी । हिरोनि नेली माझी बहिणी । तो मी बणीं दंडीन ॥ ६७ ॥
"कृष्ण गर्वाने उधळला आहे नि दुसऱ्या कोणाला गणत नाही! त्याने माझी बहीण पळवून नेली आहे, त्याला मी युद्धात शिक्षा करीन."
रागें कांपत थरथरां । दांत खातसे करकरां । धूम्र निघत नेत्रद्वारा । रहंवरा चढिन्नला ॥ ६८ ॥
रागाने त्याचे शरीर थरथर कापत होते, तो दात करकर खात होता नि डोळ्यांतून जणू धूर निघत होता. अशा आवेशात तो रथावर चढला.
रथीं बैसला मदगर्वित । वेगे सारथ्याते म्हणत । चपळ चौताळो दें रथ । कृष्णनाथ जेथें असे ॥ ६९ ॥
रथात बसून तो अभिमानी रुक्मी सारथ्याला म्हणाला, "जिथे कृष्ण आहे, तिथे वेगाने रथ हाक!"
आजि कृष्णासी सन्नद्ध । करणें असे द्वंद्वयुद्ध । अगर्वी धरितो गर्वम्द । बुद्धिमंद श्रीकृष्ण ॥ ७० ॥
"आज त्या बुद्धिमंद कृष्णाशी मला थेट द्वंद्वयुद्ध करायचे आहे. जो उगीच गर्वाने फुगला आहे, त्याचा गर्व मी उतरवतो."
अजि माझ्या तिखट बाणीं । कृष्ण खिळीन रणांगणीं ।चोरूनि नेतो माझी बहिणी । कैसेनि रुक्मिणी जिरेल ॥ ७१ ॥
"माझ्या तीक्ष्ण बाणांनी मी कृष्णाला रणांगणात खिळवून टाकीन! माझी बहीण चोरून नेणे त्याला कसे पचते ते मी पाहतो."
सैन्य अवलोकिले दृष्टीं । वीर चालिले जगजेठी । अश्वगजरथांचिया थातीं । शस्त्रें मुष्टीं झळकती ॥ ७२ ॥
त्याने आपल्या सैन्याकडे पाहिले, जिथे घोडे, हत्ती व रथांच्या रांगा आणि हातात शस्त्रे धरलेले वीर चालले होते.
चतुरंग सैन्य सकळ । एक अक्षौहिणी दळ । सन्नद्ध करूनियां सबळ । संख्या केवळ परियेसा ॥ ७३ ॥
त्याने संपूर्ण एक 'अक्षौहिणी' चतुरंग सैन्य सज्ज केले होते. त्या सैन्याची संख्या ऐका:
दोन लक्ष अठरा सहस्र । सातशें अधिक वीर । संख्या अक्षौहिणीप्रकार । केला निर्धार श्रीव्यासें ॥ ७४ ॥
महर्षी व्यासांनी सांगितल्याप्रमाणे एका अक्षौहिणी सैन्यात २,१८,७०० सैनिक असतात.
किती गज किती रथ । अश्व पदाती समस्त । विभाग संख्या सुनिश्चित । पुराणोक्त सांगेन ॥ ७५ ॥
त्यात किती हत्ती, किती रथ, घोडे नि पायदळ असते, त्याचा पुराणातील विभाग सांगतो:
एकवीस सहस्र आठ शत । सत्तरी संख्या जी रथ । तितुकेचि गजभार उन्नत । सैन्य आंत चालती ॥ ७६ ॥
त्यात २१,८७० रथ आणि तितकेच (२१,८७०) मत्त हत्ती असतात.
एक लक्ष सहस्र नव । तीन शतें पन्नास अश्व । पायांचे वीर अभिनव । सांगेन सर्व परियेसा ॥ ७७ ॥
घोड्यांची संख्या १,०९,३५० असते; आणि पायदळ सैनिकांची संख्या पुढे सांगतो:
पासष्ट सहस्र सा शतें । एक दशक अधिक तेथें । वीर पायांचे भिडते । युद्धीं पुरते निजगडे ॥ ७८ ॥
पायदळ सैनिकांची संख्या ६५,६१० असते. हे सर्व युद्धात प्रवीण असे शूर सैनिक असतात.
इतुकी सैन्याची मिळणी । तया नांव एक अक्षौहिणी । संख्या बोलिली पुराणीं । महामुनी श्रीव्यासें ॥ ७९ ॥
या संपूर्ण सैन्याला मिळून 'एक अक्षौहिणी' सैन्य म्हणतात, असे व्यासमुनींनी पुराणात स्पष्ट केले आहे.
ऎसें निजसैन्य अद्भुत । त्यामाजी रुक्मिया विराजीत । साह्य आले राजे दक्षिणाद्वत । वीर गर्जत महाबळी ॥ ८० ॥
अशा अथांग सैन्यासह रुक्मी निघाला होता. त्याला दक्षिण महाराष्ट्रातील इतर राजेही मदतीला आले होते आणि महाबली वीर गर्जना करत होते.
रणीं जिणोनि जरासंध । मीनले गद हलायुध । अवघे करिती विनोद । थोर आल्हाद जेत्यांचा ॥ ८१ ॥
तिकडे जरासंधाचा पराभव करून गद आणि बलराम एकत्र आले होते आणि विजयाच्या आनंदाने आपापसात विनोद करत होते.
यादव मिळोनि थोर थोर । करिती परतावयाचा विचार । येतां देखोनि पारखे भार । मग सामोरे लोटले ॥ ८२ ॥
यादव वीर आता घरी परतण्याचा विचार करत होते, तोच त्यांना शत्रूचे नवे सैन्य चालून येताना दिसले; त्यामुळे ते पुन्हा सामोरे गेले.
दोन्ही सैन्यां झाला मेळू । घायीं उठला हलकल्लोळू । वाजंत्र्यांचा ध्वनी प्रबळू । रणवेताळू खवळला ॥ ८३ ॥
दोन्ही सैन्यांची गाठ पडली, घावांचा प्रचंड गदारोळ माजला, वाद्यांचा गजर झाला नि रणांगणात उत्साह खवळला.
कोपें चालिला रुक्मिया वीरू । ठाकोनि आला यादवभारू । तेथें न देखे शारंगधरू । रथ सत्वरू पेलिला ॥ ८४ ॥
क्रोधाने रुक्मी चालून आला, त्याने यादवांच्या सैन्याला वेढले; पण तिथे कृष्ण दिसत नसल्यामुळे त्याने आपला रथ वेगाने पुढे ढकलला.
एकाएकीं एकला चक्रपाणी । दुरोनि देखिला नयनी । एके रथीं कृष्णरुक्मिणी । देखोनि मनीं प्रज्वळला ॥ ८५ ॥
दुरून त्याला एकाच रथात श्रीकृष्ण नि रुक्मिणी बसलेले दिसले. ते दृश्य पाहून रुक्मी मनात क्रोधाने पेटून उठला!
सांडोनि गोत्रकुटुंबासी । जेवी वैरागी निघे योगासी । तेवीं सैन्य सांडोनि यादवांपाशीं । एके रथेंसीं धांविन्नला ॥ ८६ ॥
जसा वैरागी कुटुंबाला सोडून योगासाठी निघतो, तसा रुक्मी आपले सैन्य यादवांच्या सैन्यापाशी सोडून एकट्या रथाने थेट कृष्णाकडे धावला!
धनुष्य मांडूनि मांडणीं । गुण वाइला तत्क्षणीं । बाण लावूनियां गुणी । वोढी काढोनि चालिला ॥ ८७ ॥
त्याने धनुष्याला प्रत्यंचा लावली, बाण जोडला नि कानापर्यंत ताणून तो कृष्णावर चालून गेला.
श्रीकृष्ण देवांचा आदिदेवो । ईश्वर नियंता नेणे प्रभावो । कुमती धरोनिया मदगर्वो । काय पाहा वो बोलत ॥ ८८ ॥
जो श्रीकृष्ण देवांचा देव आणि ईश्वराचा नियंता आहे, त्याचा प्रभाव न जाणता तो दुर्मती रुक्मी गर्वाने काय बोलू लागला ते पाहा:
कृष्णासी म्हणे राहें साहें । माझा यावा आला पाहें । चोरी करुन पळसी काये । कोण माय राखेल ॥ ८९ ॥
तो कृष्णाला म्हणाला, "थांब, थांब! माझा वार पाहा! माझी बहीण चोरून कुठे पळतोस? आता तुला कोण वाचवणार?"
जगामाजी तूं चोर होसी । चोरूनि दिसों नेदिसी मागासी । आजि मी पावलों लागासी । केउता जासी निजचोरा ॥ ९० ॥
"तू जगात मोठा चोर आहेस! चोरी करून माग मागे पडू देत नाहीस, पण आज मी तुझ्या मागावर आलो आहे; आता कुठे पळून जाशील चोरा?"
उद्देशें देवा इंद्रादिकीं । होम कीजे अग्निमुखीं । ते अवघे तूं खाशी शेखीं । अग्निमुखीं कांहीं नुरे ॥ ९१ ॥
"इंद्रादी देवांच्या नावाने अग्नीत जो होम केला जातो, तो सर्व हविर्भाग तूच खाऊन टाकतोस नि अग्नीत काही उरू देत नाहीस!"
देव म्हणती आम्हांसी पावले । त्यांसी ठकवूनि हव्य त्वां नेलें । तें काउळें मत येथें च चाले । सांडीं वहिलें भीमकीसी ॥ ९२ ॥
"देव वाट पाहत राहतात नि तू त्यांना फसवून हविर्भाग चोरतोस! तुझे हे लबाडीचे चाळे इथे चालणार नाहीत, रुक्मिणीला लगेच सोडून दे!"
जन्मोनियां यादववंशी । कुळगोत्रा नाश करिसी । बुडविलें नांवरूपासी । जाती तुजपाशीं तवं नाहीं ॥ ९३ ॥
"यादववंशात जन्माला येऊन तू कुळाचा नाश करत आहेस. तू आपले नाम-रूप बुडवले आहेस आणि तुझ्याकडे कोणती जात-पातच उरली नाही!"
भोग अवघेचि भोगांसी । आणि योगिया म्हणविसी । मूळमाया ते तुजपाशीं । वेष धरिसी कपटाचा ॥ ९४ ॥
"तू सर्व भोगांचा उपभोग घेतोस नि स्वतःला योगी म्हणवतोस! मूळ माया तुझ्याकडेच आहे आणि तू कपटाचा वेष धारण करतोस."
तुझिया कपटाची झाडणी । करावया आलों मी गुणी । झाडणी करीन रणांगणीं । झणीं पळोन जाशील ॥ ९५ ॥
"तुझ्या या कपटाचा हिशोब चुकता करायला मी बाण घेऊन आलो आहे! रणांगणात तुझा असा समाचार घेईन की तू पळून जाशील."
सांडीं सांडीं माझी बहिणी । नाहीं तरी खोंचीन तिखट बाणीं । तीन बाण लावूनि गुणीं । चक्रपाणीं विंधिला ॥ ९६ ॥
"माझ्या बहिणीला सोड, नाहीतर तीक्ष्ण बाणांनी तुला टोचीन!" असे म्हणत त्याने तीन बाण मारून श्रीकृष्णाला भेदले.
शार्ङ्ग टणत्कारूनि हरी । सा बाण घेतले करीं । तीन सोडूनि माझारीं । धनुष्य करीं छेदिलें ॥ ९७ ॥
श्रीकृष्णाने आपल्या शार्ङ्ग धनुष्याचा टणत्कार केला नि हातात सहा बाण घेतले. तीन बाण मारून त्याने वाटेतच रुक्मीचे धनुष्य तोडून टाकले!
सवेंचि सोडिलें आठ बाणांसी । चारी चहूं वारूंसी । सारथी पाडूनि धरणीसी । ध्वजस्तंभ छेदिला ॥ ९८ ॥
लगेच कृष्णाने आठ बाण सोडले- चार बाणांनी रुक्मीचे चार घोडे मारले, एका बाणाने सारथ्याला खाली पाडले नि एकाने त्याचा ध्वजस्तंभ तोडला.
रुक्मिया कोपा चढिन्नला भारी । पंच बाण घेतले करीं । रागें सोडिले कृष्णावरी । बळें निर्धारीं विंधित ॥ ९९ ॥
रुक्मी अत्यंत रागावला, त्याने हातात पाच बाण घेतले नि क्रोधाने ते कृष्णावर मारले.
कृष्ण धनुर्वाडा निजगडी । अचुक संधानपरवडी । पांचही बाण वाणें तोडी । धनुष्य पाडी छेदुनी ॥ १०० ॥
पण अचूक धनुर्धारी श्रीकृष्णाने बाणाने ते पाचही बाण तोडले आणि रुक्मीचे दुसरे धनुष्यही कापून पाडले.
आणीक धनुष्य घेतलें वेगें । सन्मुख विंधों आला रागें । तेंही तोडिलें श्रीरंगे । आणीक वेगें घेतलें ॥ १०१ ॥
रुक्मीने लगेच दुसरे धनुष्य घेतले नि बाण मारू लागला, पण श्रीरंगाने तेही तोडले. त्याने तिसरे धनुष्य घेतले,
बाण लावोनियां वोढी । तेंही कृष्ण सवेंचि तोडी । जें जें धनुष्य रुक्मिया काढी । तें तें तोडी श्रीकृष्ण ॥ १०२ ॥
रुक्मी बाण लावून प्रत्यंचा ताणत असे, तोच कृष्ण ते तोडून टाकी! रुक्मी जे जे धनुष्य हातात घेई, ते ते श्रीकृष्ण तोडून टाकत असे.
धनुष्य घेतलें घाव टाळुनी । अग्निअस्त्र लाविलें गुणीं । धूम्र कोंदला दिशा व्यापुनी । ज्वाळा गगनीं न समाती ॥ १०३ ॥
मग रुक्मीने घाव चुकवून दुसरे धनुष्य घेतले नि त्यावर 'अग्न्यस्त्र' जोडले. आकाशात धूर कोंदला आणि आगीच्या ज्वाला सर्वत्र पसरल्या.
पर्जन्यास्त्र सोडिलें हरी । मेघ वर्षती मुसळधारी । अग्नि शांत क्षणामाझारीं । वेगे श्रीहरी पैं केला ॥ १०४ ॥
तेव्हा श्रीहरीने लगेच 'पर्जन्यास्त्र' सोडले, मुसळधार पाऊस पडला आणि ती आग क्षणात शांत झाली.
येरें वायव्यास्त्र लाविलें गुणीं । झझामारुत सुटला रणीं । वार्यानें जाऊं पाहे अवनी । टाळीं कानी बैसलीं ॥ १०५ ॥
मग रुक्मीने 'वायव्यास्त्र' सोडले, भयंकर वादळी वारा सुटला नि कानठळ्या बसवणारा आवाज झाला.
पर्वतास्त्र सोडी श्रीकृष्ण । वारा सांडिला बुझोन । येरें वज्रस्त्र सोडून । गिरी ताडून सांडिले ॥ १०६ ॥
कृष्णाने 'पर्वतास्त्र' सोडून वारा शांत केला; तेव्हा रुक्मीने 'वज्रास्त्र' सोडून त्या पर्वतांचे तुकडे केले.
रुक्मिया कोपला महाथोर । कृष्णासी म्हणे स्थिर स्थिर । गुणीं लाविलें उद्रास्त्र । महारुद्र प्रगटला ॥ १०७ ॥
रुक्मी अत्यंत खवळला नि "कृष्णा, थांब थांब!" असे म्हणत त्याने 'रुद्रास्त्र' जोडले, ज्यामुळे साक्षात भयंकर रुद्र रूप प्रगट झाले.
दाढा विक्राळा तिखटा । माथां मोकळीया जटा । काळिमा चालिलीसे कंठा । मिशा पिंगटा आरक्त ॥ १०८ ॥
विक्राळ दाढा, मोकळ्या जटा, काळा कंठ आणि लाल-पिवळ्या मिशा असलेले ते भयंकर रूप दिसू लागले.
कृष्ण अस्त्रविद्याचतुर । बाणीं योजिया भस्मासुर । बाण देखोनि पळे रुद्र । धाके थोर कांपत ॥ १०९ ॥
पण अस्त्रविद्येत चतुर असलेल्या कृष्णाने बाणात 'भस्मासुर' योजला! तो बाण पाहताच ते रुद्र रूप भीतीने कापत पळून गेले!
रुक्मिया आणिक शस्त्र विचारी । तंव कृष्णें धनुष्य छेदिलें करीं । सरली कोदंडसमग्री । रथावरी कांही नाहीं ॥ ११० ॥
रुक्मी दुसरे शस्त्र वापरण्याचा विचार करत होता, तोच कृष्णाने त्याच्या हातातील धनुष्य कापून टाकले. आता रुक्मीकडे धनुष्य-बाण काहीही उरले नाही.
सरली धनुष्याची वोढी । परिघ घेऊन घातली उडी । कृष्ण विंधोनि परिघ तोडी । अपरवदी घायांची ॥ १११ ॥
धनुष्य संपल्यावर रुक्मीने हातात 'परिघ' (लोखंडी दंडा) घेऊन उडी मारली; पण कृष्णाने बाण मारून तो परिघही तोडून टाकला.
परिघ तुटलियापाठीं । रागें पट्टिश घेऊनि उठी । न धरत पातला उठाउठी । कृष्णदृष्टी सूदला ॥ ११२ ॥
परिघ तुटल्यावर रुक्मी क्रोधाने 'पट्टिश' (शस्त्र) घेऊन धावला नि कृष्णासमोर आला.
कृष्णें विंधिलें कठीण बाणां । पट्टिश उडविला गगना । सवेचि शूळ घेऊनि ताणी । हाणी कृष्णा पै आला ॥ ११३ ॥
कृष्णाने कठीण बाण मारून ते पट्टिश आकाशात उडवून दिले; तेव्हा रुक्मी लगेच 'त्रिशूळ' ताणून कृष्णावर हाणायला आला.
दांत खातसे कराकरा । शूळ भोवंडी गरगरां । साहें म्हणे शार्ङ्गधरा । घायें पुरा करीन ॥ ११४ ॥
तो दात करकर खात त्रिशूळ फिरवत म्हणाला, "शार्ङ्गधरा थांब! एकाच घावात तुझा अंत करतो!"
कृष्णें बाण सोडिला पाहीं । शूळ तोडिला तीं ठायीं । सवेचि पाडिला भोई । तीं ठायीं त्रिखंड ॥ ११५ ॥
कृष्णाने बाण सोडला नि तो त्रिशूळ वाटेतच तोडून त्याचे तीन तुकडे करून जमिनीवर पाडले.
शूळ वाया गेलां थोरा । रुक्मिया चुरी दोनी कर । सवेचि घेवोनि तोमर । कृष्णासमोर धांविन्नला ॥ ११६ ॥
त्रिशूळ व्यर्थ गेल्यामुळे रुक्मी हात चोळू लागला नि लगेच 'तोमर' (भाला) घेऊन कृष्णासमोर धावला.
साहें म्हणे कृष्णनाथा । तोमर हाणों आलों माथां । माझारीं विंधिला येतायेता । घायें मागुता सारिला ॥ ११७ ॥
"कृष्णा थांब, डोक्यात भाला मारतो!" असे म्हणत तो येत असतानाच कृष्णाने बाण मारून त्याला मागे ढकलले.
बाण आदळला थोर । छेदून पाडिला तोमर । रुक्मिया म्हणे मर मर । शक्ति थोर काढिली ॥ ११८ ॥
तो बाण जोरात आदळला नि तोमर कापून पडला; तेव्हा रुक्मी "मर! मर!" असे म्हणत स्वतःची 'शक्ती' (विशेष शस्त्र) काढून पुढे आला.
शक्ति घेऊनियां हातीं । म्हणे कृष्ण तुझा पाड किती । रणीं लावीन रे ख्याती । भद्रजाती लोटला ॥ ११९ ॥
हातात शक्ती शस्त्र घेऊन तो म्हणाला, "कृष्णा, तुझी काय ताकद? तुला माझी ख्याती दाखवतो!"
कृष्ण जे जे बाण सोडी । शक्तिहस्तें रुक्मिया तोडी । रथ धरी मकरतोंडीं । शक्ति भोवंडां हाणावया ॥ १२० ॥
कृष्ण जे जे बाण सोडत होता, ते ते रुक्मी त्या शक्तीने तोडत होता. तो कृष्णाच्या रथाजवळ आला नि शक्ती शस्त्र मारण्यासाठी फिरवू लागला.
कृष्णें बाण सोडिला तिधारा । रुक्मियासी लागला पिसारा । मागें सारिला अउड बाण । शक्ति अंबरा उडविली ॥ १२१ ॥
तेव्हा कृष्णाने 'तिधारा' बाण सोडला नि असा प्रहार केला की रुक्मीच्या हातातील ती शक्ती थेट आकाशात उडून गेली!
रुक्मियाची क्षीण शक्ति । साह्य आले दक्षिणापती । तिहीं हांकिला श्रीपती । सैन्यसंपत्ति निवार ॥ १२२ ॥
रुक्मीची ताकद क्षीण झालेली पाहून दक्षिणेतील राजे त्याच्या मदतीला धावले आणि त्यांनी सैन्यासह श्रीकृष्णाला वेढले.
कृष्ण नेटका झुंजार । बाणीं त्रासिले महावीर । आठ बाणीं खोंचली धुर । हाहाकार ऊठीला ॥ १२३ ॥
पण समर्थ योद्धा असलेल्या कृष्णाने बाणांनी त्या महावीरांना त्रस्त केले नि आठ बाण मारून शत्रूच्या सैन्यात हाहाकार माजवला!
बाण सोडिले निर्व्यंग । घायीं निवटिलें चातुरंग । त्याच्या सैन्या झाला भंग । रणीं श्रीरंग खवळला ॥ १२४ ॥
कृष्णाने अचूक बाण मारून शत्रूचे चतुरंग सैन्य कापून काढले. शत्रूच्या सैन्याचा भंग झाला नि रणांगणात श्रीरंग खवळून उठला.
बाण वरुषे शार्ङ्गधर । सैन्या झाला थोर मार । कोपें खवळला रुक्मिया वीर । साटोप दुर्धर मांडिला ॥ १२५ ॥
श्रीकृष्ण बाणांचा वर्षाव करत सैन्याचा संहार करत होता; ते पाहून रुक्मी वीर पुन्हा क्रोधाने खवळला नि त्याने भयंकर आव आणला.
कृष्ण मारीन हें निर्धारीं । वोडण खांडें घेतलें करीं । पतंग जैसा दीपावरी । तैशापरी धाविन्नला ॥ १२६ ॥
"मी कृष्णाला नक्की मारीन!" असा निश्चय करून त्याने हातात ढाल नि तलवार घेतली नि दिव्यावर पतंग झेपावतो, तसा तो कृष्णावर धावून गेला!
रुक्मिया महावीर नेटक । वोडण स्वर्गाचा साधक । थरक सरक दावी चवक । अति नि:शंक निजगडा ॥ १२७ ॥
रुक्मी हा चपळ योद्धा होता; तो ढाल सावरत, वेगाने हालचाली करत नि निसंकोचपणे पुढे सरसावला.
वोडण धडकोनि आदळीत । खर्ग तोलोनि तळपत । उल्लाळ देऊनि उसळत । हात मिरवत खर्गाचा ॥ १२८ ॥
तो ढाल आदळत, तलवार लखलखवत नि उड्या मारत आपल्या तलवारीची चमक दाखवत होता.
कृष्ण जे जे बाण सोडी । खर्गधारीं तितुके तोडी । चारी मारावया घोडीं । रथाबुडी रिघो आला ॥ १२९ ॥
कृष्ण जे बाण सोडत होता, ते सर्व बाण रुक्मी तलवारीने तोडत होता आणि रथाचे चारही घोडे मारण्यासाठी रथाच्या अगदी जवळ पोहोचला!
दारुक सारथी निजगडा । रथें करूं पाहा रगडा । कृष्णें विंधिला कुर्हाडा । रथाबुडीं येऊ नेदी ॥ १३० ॥
दारुक सारथ्याने त्याला रथाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला; तितक्यात कृष्णाने तीक्ष्ण बाण मारून त्याला रथाजवळ येण्यापासून रोखले.
बाण आदळला सत्राणें । आडवें वोडण धरिलें तेणें । वाडण भेदूनियां बाणें । शिरींच मुगुट पाडिला ॥ १३१ ॥
कृष्णाचा बाण इतक्या ताकदीने आदळला की रुक्मीने आडवी ढाल धरली; पण बाणाने ती ढाल भेदून रुक्मीच्या डोक्यावरील मुकुट खाली पाडला!
कोण आला रुक्मियासी । वेगें धाविन्नला मोकळे कैशीं । हात घांसूनि भूमीसी । हातवशी खर्गातें ॥ १३२ ॥
मुकुट पडल्यामुळे केस सुटले, तरीही रुक्मी क्रोधाने हात जमिनीवर घासून पुन्हा तलवार हातात धरून वेगाने धावला!
कृष्णासी म्हणे देख देख । घायी छेदीन रे मस्तक । विकट देऊनियां हांक । वेगीं सन्मुख लोटला ॥ १३३ ॥
तो कृष्णाला म्हणाला, "पाहा, पाहा! एकाच घावात तुझे मस्तक उडवतो!" असे म्हणत भयंकर हाक मारून तो थेट समोर आला.
कृष्णें विंधिला तिखट बाण । तिळप्राय केलें वोडण । खर्ग छेदूनियां जाण । अणुप्रमाण तें केलें ॥ १३४ ॥
तेव्हा कृष्णाने असा तीक्ष्ण बाण मारला की रुक्मीची ढाल नि तलवार कापून तिचे तिळाएवढे बारीक तुकडे करून टाकले!
बाण वर्षला घनदाट । रुक्मिया भुलविला आली वाट । रथ लोटूनिया घडघडाट । मौर्व्या कंठ बांधिला ॥ १३५ ॥
कृष्णाने बाणांचा असा दाट वर्षाव केला की रुक्मी वाटच विसरला! मग कृष्णाने रथ पुढे ढकलून धनुष्याच्या दोरीने (प्रत्यंचेने) रुक्मीचा गळा बांधून टाकला!
धनुष्य घालूनियां गळां । वोढोनि आणिला घायातळा । कांपिन्नला भीमकबाळा । घनसांवळा देखतसे ॥ १३६ ॥
गळ्यात धनुष्य अडकवून त्याला ओढत आणून मारण्याच्या टोकावर ठेवले! हे पाहून रुक्मिणी थरथर कापू लागली नि त्या घनसावळ्या कृष्णाकडे पाहू लागली.
दाटोनि आणिलें जी क्रोधआ । झळफळित काढिली गदा । म्हणे याच्या करीन शिरच्छेदा । येरी गदागदां कांपतसे ॥ १३७ ॥
कृष्णाने क्रोधाने आपली तळपणारी गदा बाहेर काढली नि "याचे मस्तक उडवतो!" असे म्हणाला. ते पाहून रुक्मिणी गदागदा कापू लागली.
काहीं न बोलवे सर्वथा । म्हणोनि चरणी ठेविला माथा । कृपाळुवा जगन्नाथा । यासी सर्वथा न मारावें ॥ १३८ ॥
तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता, म्हणून तिने श्रीकृष्णाच्या चरणांवर डोके ठेवले नि प्रार्थना केली, "हे दयाळू जगन्नाथा, माझ्या या भावाला मारू नका!"
कृष्ण म्हणे परतीं सर । येणें निंदा केली थोर । याचेम छेदीन मी शिर । म्हणोनि शस्त्र उचलिलें ॥ १३९ ॥
कृष्ण म्हणाला, "तू बाजूला हो! याने माझी मोठी निंदा केली आहे, मी याचे मस्तक उडवणारच!" असे म्हणून त्याने शस्त्र उचलले.
तिखट देखोनि शस्त्रधारा । चरण न सोडीच सुंदरा । बोलोनि मृदु मंजुळ उत्तरा । गदाधरा विनविलें ॥ १४० ॥
शस्त्राची तीक्ष्ण धार पाहून ती सुंदरी रुक्मिणी कृष्णाचे पाय सोडत नव्हती; ती गोड नि नम्र शब्दांत गदाधराला विनंती करू लागली:
सुरां असुरां तूं दुर्धर । योगिमाजी योगेश्वर । विश्वनियंता इश्वर । वेदां पार न कळेचि ॥ १४१ ॥
"तू देव नि असुरांनाही अजिंक्य आहेस, योग्यांचा योगेश्वर आणि विश्वाचा नियंता परमेश्वर आहेस, ज्याचा पार वेदांनाही कळत नाही."
ऎशियासी तुज युद्धीं । आवळूं पाहे हा अहंबुद्धी । पिता अवगणूनि तूंतें निंदी । होय अपराधी सर्वथा ॥ १४२ ॥
"अशा तुला हा अहंकारी भाऊ युद्धात जिंकू पाहत होता! याने वडिलांचे न ऐकता तुझी निंदा केली, हा पूर्ण अपराधी आहे."
हा अभिमानिया मारिशी रणीं । माय प्राण सोडील तत्क्षणीं । होईल लौकिक टेहणी । माहेर येथूनि तुटेल पूर्ण ॥ १४३ ॥
"पण या अभिमानी भावाला जर तुम्ही मारले, तर माझी आई तत्क्षणी प्राण सोडेल! लोकांत माझी निंदा होईल नि माझे माहेर कायमचे तुटेल."
जेथूनि उठे निंदा क्रोधू । त्या लिंगादेहाचा करीं छेदू । मारूं नको ज्येष्ठ बंधू । लोकाविरुद्ध न करावें पूर्ण ॥ १४४ ॥
"ज्यातून निंदा नि क्रोध निर्माण होतो, त्या याच्या अहंकाराचा (लिंगदेहाचा) नाश करा; पण माझ्या मोठ्या भावाला मारू नका, लोकांविरुद्ध वागू नका."
धरिलिया कृष्णाकांस । द्यावा दों पक्षीं उल्हास । नादवावें सावकाश । येथें तेथें समत्वें ॥ १४५ ॥
"कृष्णाचा आश्रय घेतलेल्या स्त्रीला सासर नि माहेर दोन्हीकडे आनंद मिळाला पाहिजे. तुम्ही दोन्हीकडे समान दृष्टीने सुख द्यावे."
न धरत चाललें स्फुंदन । नेत्रीं लोटले जीवन । झालें कृष्णचरणक्षालन । जगज्जीवन हांसिन्नला ॥ १४६ ॥
तिच्या तोंडून हुंदके सुटले, डोळ्यांतून अश्रू वाहू लागले नि कृष्णाचे पाय अश्रूंनी धुतले गेले! ते पाहून जगज्जीवन श्रीकृष्ण हसला.
देखोनि बोलाची चातुरी । मग उचलली दोहीं करीं । आलिंगिली प्रीतीं थोरी । बंधू न मारीं सर्वथा ॥ १४७ ॥
तिचे हे चतुर नि भावुक बोलणे पाहून कृष्णाने दोन्ही हातांनी रुक्मिणीला उचलून धरले, प्रेमाने आलिंगन दिले नि "तुझ्या भावाला मारत नाही!" असे आश्वासन दिले.
मस्तकवपना आणा पाणी । नाही आड ना विहीरवणी । घाला वाटेचें वाटावणी । विनोद मेहुणीं मांडिला ॥ १४८ ॥
कृष्ण थट्टेने म्हणाला, "याचे डोके शहाणे करण्यासाठी पाणी आणा! पण विहिरीचे पाणी कशाला, वाटेतील साचलेले पाणी वापरा!" अशा प्रकारे मेहुण्या-मेहुण्यात विनोद रंगला.
अर्धखांड अर्धमिशी । पांच पाट काढिले शिसीं । विरूप केलें रुक्मियासी । गळां रथेसीं बांधिला ॥ १४९ ॥
कृष्णाने रुक्मीची अर्धी दाढी व अर्धी मिशी काढली नि डोक्यावर पाच चट्टे मारून (शेंडी कापून) त्याला विद्रूप केले आणि रथाला बांधून ठेवले!
रुक्मिणीसी म्हणे श्रीकृष्ण । पाहें बंधूचें वदन । वेगें करीं लिंबलोण । सकळ जन हांसती ॥ १५० ॥
श्रीकृष्ण रुक्मिणीला म्हणाला, "पाहिलेस तुझ्या भावाचे तोंड? आता लवकर याची लिंबू-मीठ ओवाळणी कर!" हे पाहून सर्व लोक हसू लागले.
रुक्मियाचें विरूपकरण । यापरी करी श्रीकृष्ण । बळिराम येऊनि आपण । बंधमोचन करील त्यासी ॥ १५१ ॥
अशा प्रकारे श्रीकृष्णाने रुक्मीला विद्रूप केले. पुढे बलराम स्वतः येऊन त्याला या बंधनातून सोडवेल.
परिहारमिषें प्रबोध । भीमकीसी करील हलायुध । एका जनार्दनीं विनोद । परमानंद प्रगटेल ॥ १५२ ॥
मग समजूत काढण्याच्या निमित्ताने बलराम रुक्मिणीला आत्मज्ञानाचा बोध करेल. संत एकनाथ (एका जनार्दनी) म्हणतात की, हा प्रसंग परमानंद प्रगट करणारा आहे.