३१. भक्तास पाय दिले
विराळ गावापासून पाच किलोमीटर अंतरावर 'कुनकी' नावाचे एक गाव आहे. तेथे एक पांगळा मनुष्य राहत होता. लहानपणापासूनच त्यास चालता येत नसल्यामुळे हाताने सरपटत त्याने आपली ३५-४० वर्षे घालवली होती. तो नेहमी दुःखाने विचार करत असे की, पूर्वजन्मीच्या कोणत्या पापामुळे मी पांगळा झालो?
“केले कर्म झाले तेचि भोगा आले” – संत एकनाथ महाराज
असा विचार करून तो सातत्याने भगवंताचे नामस्मरण करत असे. श्री समर्थ धोंडूतात्या कुनकी गावी आले की हा पांगळा माणूस सरपटत येऊन तात्यांचे दर्शन घेत असे. तात्यांचे नाव घेतल्याशिवाय तो अन्न ग्रहण करत नसे.
इ.स. १९०४ (शके १८२६) साली एक अघटित घटना घडली. कुनकीची काही माणसे बैलगाडीतून तात्यांच्या दर्शनासाठी विराळला निघाली, तेव्हा त्यांच्यासोबत हा पांगळाही आला. तात्यांच्या चरणी दंडवत घालताच तात्यांनी विचारले, “काय रे? तुझे कसे काय चालले आहे? बरे आहे ना!”
तो आसवांनी भरलेल्या नेत्रांनी म्हणाला, “महाराज! माझ्यासारख्या पांगळ्या मनुष्याने जगण्यात काय अर्थ आहे? पूर्वजन्मीच्या पापामुळे मी पांगळा झालो.” त्याची ती दुःखावस्था पाहून तात्यांचे अंतःकरण द्रवले. तात्या म्हणाले, “काय रे, तुला पाय पाहिजेत का? पाहिजे असतील तर मी तुला पाय देतो.”
“धन्य ते संसारी । दयावंत जे अंतरी ।।
येथे उपकारासाठी । आले घर ज्या वैकुंठी।।” – संत तुकाराम महाराज
श्री समर्थ धोंडूतात्यांनी त्या पांगळ्या मनुष्याच्या डोक्यावरून हात फिरवला व त्यास उठून उभे राहण्यास सांगितले. आणि काय चमत्कार! तो सरळ उठून उभा राहिला! त्याचा पांगळेपणा पूर्णपणे नाहीसा झाला. आनंदाश्रूंनी तो तात्यांच्या चरणी लोटंगण घालू लागला.
परंतु, या परोपकारात श्री तात्यांच्या पायातील सर्व शक्ती क्षीण होऊन गेली. त्यांनी आपले दोन्ही पाय त्या भक्ताला दिले होते. तेव्हापासून (वयाच्या ७४ व्या वर्षापासून) समाधीपर्यंत श्री समर्थ धोंडूतात्या महाराज फक्त बसलेल्या अवस्थेतच राहिले. त्यांना स्वतः उठून उभे राहता आले नाही. संतांच्या परोपकाराची भूमिका किती विशाल असते हेच या प्रसंगातून दिसून येते!
“तैसी बांधिली सोडीत । बुडाली काढीत ।
सांकडी फेडीत । आर्ताचिया।।” – संत ज्ञानेश्वर महाराज
३२. मेण्यामध्ये बसून प्रवास
तात्यांनी आपले पाय भक्तास दिले आणि ते उभे राहू शकत नाहीत ही वार्ता सर्वत्र पसरली. उंबरज संस्थानाचे दुसरे महंत श्री लक्ष्मण महाराज विराळ येथे आले. दोन संतांची भेट झाली आणि प्रेमाचा संवाद रंगला.
उंबरजला परत जाताना तात्या लक्ष्मण महाराजांना म्हणाले, “मला आता उभे राहता येत नाही, तर माझे घोडे तुम्ही भेट म्हणून घेऊन जा.” लक्ष्मण महाराजांनी ते सप्रेम स्वीकारले आणि म्हणाले, “महाराज, प्रवासासाठी मी तुमच्याकरिता एक मेणा पाठवून देतो, त्याचा स्वीकार करावा.”
थोड्याच दिवसांत लक्ष्मण महाराजांनी एक सुंदर मेणा तयार करून तात्यांना अर्पण केला. तेव्हापासून (इ.स. १९०४, वयाच्या ७४ व्या वर्षापासून) श्री समर्थ धोंडूतात्या महाराज मेण्यात बसून प्रवास करू लागले.
उंबरजचे मूळ पुरुष श्री नामदेव महाराज इ.स. १८८८ मध्ये समाधिस्थ झाले होते. त्यांच्या अंत्येष्टीच्या वेळी तात्यांनी अभिषेकविधी करून लक्ष्मण महाराजांना संस्थानाधिपती म्हणून गादीवर बसवले होते.
३३. श्री तात्यांचे अवतार कार्य
संतांचे अवतार कार्य केवळ जडजीवांच्या उद्धारासाठी आणि लोकोपकारासाठी असते.
“अवतार तुम्हा धराया कारण ।
उद्धराया जन जडजीव।।” – संत तुकाराम महाराज
अज्ञानाने मोहित झालेल्या जीवाला जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करणे, समाजाला सन्मार्गाला लावणे हेच तात्यांच्या अवताराचे मुख्य कार्य होते. तात्यांचे ध्यान, जप, पूजा व योगासनांची कीर्ती चोहीकडे पसरली होती.
“वाऱ्याहाती माप चाले सज्जनांचे ।
कीर्तिमुख त्याचे नारायण।।” – संत तुकाराम महाराज
अशा तात्यांच्या कीर्तीमुळे डोंगरशेळकी (ता. उदगीर) येथील ग्रामस्थांची दृढ भक्ती तात्यांच्या चरणी जडली.
३४. श्री तात्यांना निमंत्रण
इ.स. १९२६ (शके १८४८) साली डोंगरशेळकी येथे श्रावण महिन्यात महादेवाच्या देवळापुढील ओट्यावर 'पांडवप्रताप' ग्रंथाचे वाचन ठेवले होते. ग्रंथसमाप्तीनिमित्त भव्य भंडारा (गावजेवण) आयोजित करून, प्रमुख पाहुणे म्हणून पूज्य श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांना आणण्याचे ग्रामस्थांनी ठरवले.
डोंगरशेळकीचे लोक तात्यांना निमंत्रण देण्यासाठी गेले. तात्या त्यावेळी धामणगाव येथे होते. तेथे भेट घेऊन विनंती केली असता, तात्यांनी सहाव्या दिवशी डोंगरशेळकीस येण्याचे आश्वासन दिले.
सहाव्या दिवशी डोंगरशेळकीहून ३०-३५ माणसे तात्यांना आणण्यासाठी विराळला पोहोचली. ९५ वर्षांचे वयोवृद्ध तात्या मुखासनावर सूर्यासारखे तेजस्वी दिसत होते. गोरी अंगकांती, शुभ्र दाढी-मिशा, कपाळावर गंधाचे आडवे पट्टे आणि हातात रुद्राक्ष माळ अशा अत्यंत दिव्य रूपात तात्या विराजमान होते. दर्शनानंतर डोंगरशेळकीच्या लोकांनी निघण्याची विनंती केली आणि मेणा बाहेर काढण्यात आला.
३५. समाजाला व्यसनापासून परावृत्त
तात्या मेण्याच्या जवळ आले आणि म्हणाले, “माझा मेणा चालवण्यासाठी पवित्र अंतःकरणाची व सद्वर्तनाची माणसे हवी आहेत. कोणत्याही व्यसनी माणसाने माझ्या मेण्याला स्पर्श करू नका! केवळ निर्व्यसनी माणसांनीच पुढे या.”
हे ऐकून व्यसनी माणसे मागे सरकली. त्यांनी अनुतापाने तात्यांसमोर शपथ घेतली, “महाराज! आजपासून आम्ही कोणत्याही वाईट व्यसनाला स्पर्श करणार नाही आणि व्यसनी माणसांची संगतीही करणार नाही. आम्हाला क्षमा करा.”
त्यांचा हा दृढ निश्चय पाहून तात्यांनी त्यांना मेणा उचलण्याची परवानगी दिली.
“तो आधी जरी दुराचारी । तरी सर्वोत्तमचि अवधारी ।
जैसा बुडाला महापूरी । न मरतु निघाला।।” – संत ज्ञानेश्वर महाराज
अनुतापाने माणसाचे मन शुद्ध होते. त्या भक्तांनी आयुष्यभर व्यसनमुक्तीचा नियम पाळून तात्यांची कृपा संपादन केली.
३६. भाग गेला शीण गेला
शिष्यांनी तात्यांना अलवार उचलून मेण्यात बसवले. “पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम” या जयघोषात मेणा उचलण्यात आला. लोक भजन-अभंग म्हणत जलद गतीने डोंगरशेळकीकडे चालू लागले.
तात्यांचे दर्शन आणि वाटेतील सहवास यांमुळे सर्वांचा थकवा पळून गेला व सर्वांना अलौकिक आनंदाची प्राप्ती झाली.
“आता कोठे धावे मन । तुझे चरण देखिलिया ।।
भाग गेला शीण गेला । अवघा झाला आनंद।।” – संत तुकाराम महाराज
संत एकनाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे संतांच्या दर्शनाने अनंत जन्मांचा शीण नाहीसा होतो आणि जीवनात परमानंद प्राप्त होतो.