२५. जीवंत समाधीचा विचार
श्री समर्थ तात्यांनी संजीवन समाधी घेण्याचा विचार करून विराळ येथील मठाच्या प्रांगणामध्ये विवराप्रमाणे छोटेसे भुयार निर्माण केले. ती जागा व्यवस्थित बांधून घेऊन समाधिस्थल तयार केले व आत जाण्यासाठी एक छोटेसे द्वार (खिडकी) ठेवले.
समाधिस्थलावर मंदिर बांधले व तीन फूट उंचीची आणि दीड फूट रुंदीची श्री दत्तात्रेयांची मूर्ती आणली. त्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी आचारसंपन्न वैदिक ब्राह्मण मंडळींना पाचारण करून, त्यांच्याकडून होम-हवन व विधीपूर्वक त्या मंदिरामध्ये समाधिस्थलाच्या वरच्या बाजूला दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना इ.स. १९१८ (शके १८४०) साली केली. म्हणजेच जीवंत समाधी घेण्याचे ठरवूनच श्री तात्यांनी ही सर्व योजना आखलेली होती.
२६. सूर्योपासक का दत्तोपासक?
श्री समर्थ तात्या नियमाने सूर्याची आराधना करत, सूर्यास दुर्वा वाहत आणि सूर्यनमस्कार घालत. असे असूनही त्यांनी सूर्यदेवतेची प्रतिष्ठापना न करता दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपल्या मठात का केली?
त्याचे कारण म्हणजे तात्यांचे श्रीगुरु सखाराम महाराज काशीकर यांनी आपल्या जीवनात श्री क्षेत्र पंढरीची आषाढी पायी वारी सतत ३५ वर्षे केली होती. त्यांनी देखील नवा लोहा (विठ्ठलवाडी) येथे श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली होती. यावरून त्यांचे श्रीगुरु देखील दत्तोपासक होते.
त्याच श्रीगुरूंनी आपल्या हाताने रुद्राक्षांची माळ तात्यांच्या गळ्यात घातलेली होती. म्हणून तात्या रुद्राक्षांच्या माळेचा जप करत असत. स्नानानंतर आपल्या कपाळी चंदनाचा आडवा गंध लावत आणि सकाळी व संध्याकाळी संध्या करताना (गायत्री मंत्राचा जप करताना) भाळी विभूतीचे आडवे पट्टे व सर्वांगास विभूती लावून संध्या करत असत. अर्थात रुद्राक्षांची माळ व विभूतीचे पट्टे हे तात्यांचे आवडते लेणे होते.
श्री तात्यांची नित्य पंचायतन पूजा होती; म्हणजेच पूजेमध्ये मुख्य पाच देव होते. मध्यभागी दत्तात्रेयांची मूर्ती, बाजूला सूर्य, गणपती, विठ्ठल आणि श्रीगुरु अशी मांडणी करून ते पूजा करत असत. पूजेमधील गणपतीची मूर्ती चाळीस तोळे चांदीची होती व सूर्याच्या चांदीच्या बारा प्रतिमा होत्या.
तात्यांच्या पूजेत श्री दत्तात्रेयांची मूर्ती मुख्य स्थानी होती; कारण ब्रह्मा, विष्णु आणि महेश (सृजिता, पाळिता आणि हर्ता) या तिन्ही देवांचा समन्वय श्री गुरुदेवांच्या मूर्तीत आहे. आपल्या श्रीगुरूंप्रमाणेच श्री तात्यांनी मठात श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीची स्थापना केली. पूजेत दत्तमूर्ती असणे आणि प्रतिवर्षी दत्तजयंतीचा सोहळा थाटात साजरा करणे, यावरून श्री समर्थ धोंडूतात्या महाराज हे दत्तोपासकही होते हे सिद्ध होते.
२७. "तुम्ही इथे मरणार नाही"
श्री समर्थ तात्यांची आवडीने सेवा करणारा कोळनूर गावचा एक लोभाजी नावाचा भक्त होता. हा लोभाजी सात्त्विक स्वभावाचा व विनोदी होता. वारकरी संप्रदायाच्या नियमाने चालणारा, गळ्यात तुळशीची माळ, भाळी गोपीचंदनाचा गंध, दररोज नियमाने भजन, पूजन व ग्रंथश्रवण करणारा तो एकनिष्ठ सेवक होता.
मठाचे बांधकाम चालू असताना एके दिवशी काही भक्तांनी चौकोनी दगड बैलगाडीतून आणून दिले. तसेच वाकरड गावच्या एका भक्ताने छन्नीने घोळलेला एक सुंदर दगड डोक्यावरून आणलेला या लोभाजीने पाहिला.
श्री तात्या ज्या वेळी श्मश्रू (हजामत) करण्यासाठी बसले, तेव्हा तो न्हावी म्हणाला, “तात्याजी, तुम्ही हे भरपूर बांधकाम करत आहात आणि जिवंतपणी समाधी बांधून मरणाची सर्व तयारी अगोदरच करता; परंतु 'तुम्ही इथे मरणार नाही.' तुमचे मरणाचे ठिकाण दुसरीकडेच आहे. आपल्याला दक्षिण दिशेला जावे लागणार, मग इथे बांधकामाचा एवढा सायास कशाला करता?” असे बोलत त्याने श्मश्रू केली.
पुढे चालून या न्हावी भक्ताचे शब्द देवाने सार्थ केले! विराळगावच्या दक्षिण दिशेला सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरशेळकी गावात श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांनी समाधी घेऊन सदाचे वास्तव्य केले.
२८. दगड घेऊन मनोरथ पुरविले
श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांची कीर्ती ऐकून आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी वाकरड (ता. कंधार) गावचे एक गृहस्थ नेहमी तात्यांच्या दर्शनास येत असत. बरेच दिवस गेल्यानंतर तात्या त्यांना म्हणाले, “अहो, तुम्ही माझ्याकडे नेहमी येता पण रिकाम्या हातानेच येता. रिकाम्या हाताने न येता काही तरी घेऊन येत जा.”
ते म्हणाले, “महाराज, काय आणू? आज्ञा द्यावी.” तात्या म्हणाले, “माझे नाव धोंडू असल्यामुळे मला धोंडा (दगड) आवडतो. तेव्हा तुम्ही येताना लहान-मोठा कसा तरी दगड आणत जा.” ही आज्ञा प्रमाण मानून ते गृहस्थ प्रत्येक वेळी दर्शनाला येताना दगड घेऊन येऊ लागले.
काही दिवसांनंतर त्यांची दृढ भक्ती पाहून तात्या प्रसन्न झाले व म्हणाले, “तुम्हाला काय पाहिजे ते मागा.”
“या संतांचे हे देणे । कल्पतरुहुनि दुणे ।
परिसापरीस अगाध देणे । चिंतामणी ठेंगणा।।” – संत तुकाराम महाराज
ते गृहस्थ म्हणाले, “महाराज, माझी वयाची बरीच वर्षे गेली पण मला संतती नाही. आपल्या कृपेने मला पुत्रप्राप्ती व्हावी.”
तात्या म्हणाले, “तुम्हाला मुलगा होईल, काळजी करू नका. पण एक व्रत पाळावे लागेल. दररोज नित्यनियमाने गावच्या मारुतीला पाणी घालून अकरा प्रदक्षिणा घाला व वद्य एकादशीला माझ्या भेटीला या.”
त्या गृहस्थांनी हे व्रत निष्ठेने पाळले. थोड्याच दिवसांत त्यांची पत्नी गरोदर राहिली. नवमास पूर्ण झाल्यावर त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. नेहमीप्रमाणे ते एकादशीस विराळ येथे तात्यांच्या दर्शनास आले व आणलेला दगड मठात ठेवून उभे राहिले.
तात्या त्यांना पाहताच म्हणाले, “अहो, तुम्ही इकडे आला आहात आणि तिकडे घरी पत्नी प्रसूत होऊन देवाने मुलगा दिला आहे. आता घरी जा!” ते आनंदाने घरी आले. संततीप्राप्तीने घरातील सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
“वयसेंचिये शेवटी । एकचि विये वांझोटी ।
मग ते मोहाची त्रिपुटी । नाचो लागे।।” – संत ज्ञानेश्वर महाराज
२९. श्री तात्यांचा आशीर्वाद
श्री समर्थ तात्यांनी आजपर्यंत ज्या ज्या भक्तांना आशीर्वाद दिले, ते सर्व सत्य ठरले. तात्यांच्या मुखातून निघालेला शब्द कधीही असत्य होत नसे. संतांचे बोल आणि प्रतिज्ञा स्वतः भगवान सत्य करतात.
श्री तात्या प्रवासात असोत वा एकांतात, ते निरंतर रुद्राक्षाची माळ हातात घेऊन गायत्री मंत्राचा जप करत असत. जपाच्या अखंड तपश्चर्येमुळे त्यांच्या वाचेचे तप इतके दृढ झाले होते की:
“नातरी चतुराननाचिये वाचे ।
काय आहाती लटकिया अक्षरांचे साचे ?।।” – संत ज्ञानेश्वर महाराज
म्हणजे ब्रह्मदेवाच्या वाणीतील शब्द जसे कधी खोटे ठरत नाहीत, तसेच तात्यांचे आशीर्वाद असत. संत तुकाराम महाराजांच्या शब्दांत सांगायचे तर:
“लटिके वचन । नाही, देही उदासीन।।” – संत तुकाराम महाराज
अशा सत्यवादी तात्यांच्या आशीर्वादाने हजारो भक्तांचे मनोरथ पूर्ण होत असत.
३०. संतदर्शनाचे महात्म्य
श्री समर्थ तात्यांनी विराळजवळ करडील्याची दहा एकर जमीन विकत घेऊन तेथे विहीर खोदली. भरपूर पाणी लागले. हा उत्कर्ष पाहून काही दुष्ट लोक तात्यांचा द्वेष व निंदा करू लागले.
एकदा कुनकी गावचे तीन माणसे सोनवळा गावास चालले होते. वाटेत विराळ आले असता एक जण म्हणाला, “तात्यांच्या दर्शनाला लोक लांबून येतात, आपणही दर्शन घेऊन जाऊ.” पण उरलेल्या दोघांनी तात्यांची कुचेष्टा करत दर्शन नाकारले.
टवाळखोर चौघांशी त्यांची भेट झाली आणि ते निंदा करत बसले. तो एकटा माणूस न बोलता जाऊन तात्यांचे दर्शन घेऊन आला. नंतर ते तिघे सोनवळ्याकडे निघाले. वाटेत खूप ढग साचून अंधार झाला आणि पाऊस-विजा सुरू झाल्या.
ज्याने तात्यांचे दर्शन घेतले होते, तो लघुशंकेसाठी मागे थांबला. उरलेले दोघे थोडे पुढे जातात तोच आकाशातून कडाडलेली वीज त्या दोघांवर पडली आणि ते दोघेही जागीच मृत्यूमुखी पडले! ज्याने दर्शन घेतले होते तो सुखरूप वाचला.
“संतासी जो करी छळण । अथवा करी जो उद्धटपण ।
किंवा करी जो हेळण । तत्काळ पतन तो पावे।।” – संत एकनाथ महाराज
निंदा करणाऱ्या उरलेल्या लोकांना या घटनेचा खूप पश्चाताप झाला. त्यांनी टवाळी सोडून दिली आणि पुढील आयुष्यात श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे अनन्यभावाने शिष्य होऊन सेवा करू लागले.