॥ जय हरी विठ्ठल – श्री समर्थ धोंडूतात्या महाराज प्रसन्न ॥ संतवाणी डिजिटल लायब्ररी २०२६
🚩 प्रतिपंढरपूर - डोंगरशेळकी धाम

श्री समर्थ धोंडूतात्या महाराज महाचरित्र

भाग ४: सर्पदंश, मातेची कुशी धन्य, देणगीचा सत्कार्यात विनियोग, पंढरी वारी आणि बोरीगावाहून धान्य.

भाग ४: सर्पदंश, पंढरी वारी व मठाचे काम (प्रकरण १६ ते २१)


या भागात समाविष्ट प्रकरणे:

  • प्रकरण १६: सर्पदंश - विषबाधा निष्प्रभ करण्याचा अलौकिक प्रसंग.
  • प्रकरण १७: मातेची कुशी धन्य - मातोश्री गंगाबाईंचे भाग्य आणि मातृमहिमा.
  • प्रकरण १८: देणगीचा सत्कार्यामध्ये विनियोग - निस्वार्थी वृत्ती व लोककल्याण.
  • प्रकरण १९: वैदिक कर्माचे अधिकारी - शास्त्रसंमत साधना आणि अधिकार.
  • प्रकरण २०: श्रीक्षेत्र पंढरीस आले - पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीची पावन वारी.
  • प्रकरण २१: बोरीगावाहून धान्य - अन्नदानासाठी बोरीगावाहून आलेल्या धान्याची कथा.

१९. वैदिक कर्माचे अधिकारी

"ब्राह्मणांनी यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह या षट्कर्माचे आचरण करावे." या शास्त्रविधानाप्रमाणे श्री तात्या स्वधर्माचे आचरण करीत नित्य व नैमित्तिक कर्माचे यथासांग अनुष्ठान करू लागले.

श्री तात्या वैदिक कर्माचे उत्कृष्ट अधिकारी होते. त्याचे कारण असे की, कोणत्याही वैदिक कर्माचा अधिकारी होण्यासाठी खालील चार गोष्टी असाव्या लागतात:

  • १) अर्थी: कर्म करण्याची इच्छा असलेले.
  • २) समर्थ: कर्म करण्याचे सामर्थ्य असलेले.
  • ३) विद्वान: कर्म करण्याचे पूर्ण ज्ञान असलेले.
  • ४) शास्त्रापर्युदस्त: शास्त्राने निषिद्ध न मानलेले.

या चार अंगांनी जे युक्त असतात, त्यांनाच वैदिक कर्माचे अधिकारी मानले जाते. यापैकी एक अंग जरी उणे असेल, तर ते वैदिक कर्माचे अधिकारी होऊ शकत नाहीत. श्री तात्यांच्या ठिकाणी हे चारही अंग परिपूर्ण असल्याकारणाने त्यांची वैदिक कर्माचे उत्कृष्ट अधिकारी म्हणून चोहीकडे ख्याती झाली.

२०. श्री क्षेत्र पंढरीस आले

श्री तात्यांचे श्रीगुरु सखाराम महाराज काशीकर हे पंढरी यात्रेवरून परत येत असताना तुळजापूर येथे आषाढ वद्य एकादशी, इ.स. १८८३ (शके १८०५) साली समाधिस्थ झाले.

श्री तात्यांना ही वार्ता समजताच ते काही मंडळींना सोबत घेऊन कंधार तालुक्यातील लोहा या गावी आले. आपल्या श्रीगुरूंच्या अंत्येष्टी संस्कारानंतरचे सर्व उत्तरकार्य विधिवत करून, नवा लोहा (विठ्ठलवाडी) येथील विठ्ठल मंदिरामध्ये श्री तात्यांनी ब्राह्मणभोजन दिले.

त्यानंतर काही मंडळींसह तुळजापुरास जाऊन, ज्या स्थानी श्री सखाराम महाराज काशीकर यांचे देहावसान झाले होते, त्या स्थानी आपल्या श्रीगुरुस्मरणाप्रीत्यर्थ श्री तात्यांनी समाधीचे बांधकाम केले. तेथून पुढे ते श्री क्षेत्र पंढरीस आले; चंद्रभागेचे स्नान करून श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि परत विराळ येथे आले. श्री तात्यांच्या वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी त्यांच्या श्रीगुरूंचे प्रयाण झाले.

२१. बोरीगावाहून धान्य

श्री समर्थ तात्या नामदेव महाराजांच्या भेटीनिमित्त उंबरज (ता. कंधार) येथे गेले. तेथे उंबरजशेजारी असलेल्या 'बोरी' गावचे एक सावकार आले होते. त्यांनी या दोन्ही महात्म्यांचे दर्शन घेतले व आपली घरगुती अडचण मांडली, “महाराज! मला माझ्या दोन कन्यांचा विवाह करावयाचा आहे, सोयरीक वगैरे ठरलेली आहे. दोन लग्ने असल्याकारणाने खर्च जास्त लागणार आहे. त्यासाठी मला आपल्याकडून कर्जाच्या स्वरूपात काही रक्कम हवी आहे. ती आपण द्याल तर फार चांगले होईल.”

त्या सावकाराची ही विनवणी ऐकून नामदेव महाराजांनी तात्यांना ती रक्कम देण्यास सांगितले. त्यावेळी श्री तात्यांनी बोरीच्या सावकारास ती रक्कम दिली, ज्यामुळे त्या सावकाराने आपल्या उभय कन्यांचा विवाह सोहळा थाटात पार पाडला.

श्री तात्यांनी दिलेल्या रक्कमेचा मोबदला म्हणून, श्री तात्या आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त करत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील गावजेवणासाठी (पंगतीसाठी) लागणारा सर्व खर्च ते बोरीकर सावकार करू लागले. प्रतिवर्षी ते बोरी गावाहून बैलगाड्यांवर धान्य व माल घेऊन येऊन हा पुण्यतिथी सोहळा व्यवस्थितपणे साजरा करत असत.

प्रतिवर्षी हाच क्रम त्या सावकारांनी प्रामाणिकपणे चालू ठेवला. पुढे श्री समर्थ धोंडूतात्या महाराज विराळचा त्याग करून डोंगरशेळकीस आल्यानंतर, तात्यांच्या आज्ञेवरून त्या सावकारांनी हा क्रम थांबवला; कारण डोंगरशेळकी ग्रामस्थांनी हा सर्व खर्च करण्याचे कबूल केले होते!

२२. पूजेतील दुर्वा

श्री समर्थ तात्यांनी काही भक्तमंडळींना सांगून शेतातील बरीचशी दुर्वा (हराळी) आणवून घेतली व त्या आणलेल्या दुर्वांच्या लहान लहान जुड्या करून आपल्या लाकडी कपाटामध्ये ठेवून देऊ लागले.

धान्याचे पोते घरी ठेवून परत जाताना एका शेजाऱ्याने हे पाहिले आणि चकित होऊन विचारले, “तात्या, हे काय करता?” तात्या म्हणाले, “अरे, उन्हाळ्यामध्ये घरी खाण्यासाठी तू कोठारात धान्य साठवून ठेवतोस; त्याप्रमाणे मी माझ्या नित्याच्या पूजेमध्ये ज्या दुर्वा वाहतो, त्या उन्हाळ्यातही मिळून वाहता याव्यात म्हणून कपातात साठवून ठेवतो आहे.”

तेव्हा त्या व्यक्तीच्या लक्षात आले की, श्री तात्यांची नित्यपूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची किती सूक्ष्म आणि पूर्वतयारी असते!

२३. मठाचे बांधकाम

श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांनी मठ बांधण्याचे ठरवले. विराळ गावातील मारुती मंदिराशेजारी एका नाभिकाचे (न्हाव्याचे) घर होते, ज्या घरारामुळे तात्यांनी घेतलेली जागा अवकोन (असुविधाजनक) होत होती. त्यावेळी श्री तात्यांनी त्या न्हाव्याची जागा स्वतः घेऊन, त्या न्हाव्यास दुसरे व्यवस्थित घर बांधून दिले.

मारुती मंदिराशेजारील आपल्या जागेचा आराखडा चौकोनी करून, त्या जागेवर इ.स. १८९४ (शके १८१६) साली विराळच्या मठाच्या बांधकामास सुरुवात केली. सर्व भक्तांनी या बांधकामात मोठे सहकार्य केले. आजूबाजूच्या खेड्यांतील भाविकांनी बैलगाडीने, तर काही भक्तांनी स्वतःच्या डोक्यावरून दगड आणून मदत केली. पुढे इ.स. १९०२ (शके १८२४) सालापर्यंत विराळच्या मठाचे बरेचसे बांधकाम पूर्ण झाले.

२४. विशाल वृक्ष

विराळ मठाचे बांधकाम सुरू असताना भाविक दगड, मोठे लाकडी वासे, कड्या व इतर साहित्य पुरवू लागले. विराळच्या सीमेवर (तिठ्यावर) एक विशाल वृक्ष होता. त्या वृक्षात भूत-पिशाच्चांचे वास्तव्य असावे की काय, कोणास ठाऊक! पण तो वृक्ष अनेक वर्षांपासून तेथे फोफावलेला होता.

काही व्यक्तींनी तो वृक्ष तोडण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. जुने वयोवृद्ध लोक सांगत की, त्या वृक्षावर घाव घालताच त्यातून विचित्र व भेसूर आवाज निघत असत. ती जागा भयावह असल्याने कोणीही त्या वृक्षास तोडण्यास धजत नसे.

श्री धोंडूतात्या मठाचे बांधकाम करत आहेत हे पाहून गावकऱ्यांनी व शेतमालकाने विचार केला की, तो वृक्ष तात्यांना मठाच्या बांधकामासाठी द्यावा. त्यांनी तात्यांना तशी विनंती केली. तात्यांनी होकार दिला आणि काही लाकूडतोड्यांसह ते त्या वृक्षाखाली आले. तात्यांनी वृक्षास उजव्या हाताने स्पर्श केला आणि त्याच्या बुडाशी पाठ टेकवून बसले. तात्यांच्या आज्ञेवरून लाकूडतोड्यांनी दर्शन घेऊन झाड तोडण्यास सुरुवात केली.

लाकूडतोड्यांनी पहिला घाव घालताच वृक्षातून तोच विचित्र आवाज उमटला, ज्यामुळे सर्व लोक घाबरले. त्यावेळी तात्यांनी सर्वांना धीर देऊन शांत केले. तात्यांच्या उपस्थितीत सर्वांनी मिळून तो वृक्ष तोडून टाकला आणि त्याचे लाकूड विराळच्या मठाच्या बांधकामात वापरले.

“करिता विचार । तो हा दृढ संसार ।
ब्रह्मादिका पार । नुल्लंघवे सामर्थ्ये।।” – संत तुकाराम महाराज

भगवंताने गीतेच्या १५ व्या अध्यायात संसाररुपी वृक्षाचे वर्णन केले आहे. हा संसारवृक्ष अतिशय विशाल व कठीण आहे; ब्रह्मादिकांनाही तो छेदणे अशक्य होते. असा कठीण संसारवृक्ष ज्या श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांनी आपल्या स्व-सामर्थ्याने मुळासकट तोडून टाकला, त्यांच्यासमोर या झाडाची काय कथा!

❮ भाग ३ मागे अनुक्रमणिका भाग ५ वाचा ➔

🚩 जय हरी विठ्ठल!

श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांची ही पावन कथा सर्व भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा.

॥ श्री समर्थ धोंडूतात्या महाराज प्रसन्न ॥