॥ जय हरी विठ्ठल – श्री समर्थ धोंडूतात्या महाराज प्रसन्न ॥ संतवाणी डिजिटल लायब्ररी २०२६
🚩 प्रतिपंढरपूर - डोंगरशेळकी धाम

श्री समर्थ धोंडूतात्या महाराज महाचरित्र

भाग ३: नैष्ठिक ब्रह्मचर्य, तारुण्यकाल, अखंड भक्ती, गायत्री जप उपासना आणि सूर्यगती अवरोध.

भाग ३: नैष्ठिक ब्रह्मचर्य व सूर्यगती अवरोध (प्रकरण ११ ते १५)


या भागात समाविष्ट प्रकरणे:

  • प्रकरण ११: नैष्ठिक ब्रह्मचर्य - संसाराच्या मोहात न पडता घेतलेला अखंड ब्रह्मचर्याचा संकल्प.
  • प्रकरण १२: तारुण्यकाल - नियमित व्यायाम, योगासने व योगाभ्यासाची कडक शिस्त.
  • प्रकरण १३: श्री तात्यांची भक्ती - नामात तल्लिन राहून केलेली विठ्ठल भक्ती.
  • प्रकरण १४: श्री तात्यांची उपासना - दैनिक १२-शे (१२०0) गायत्री मंत्रांचा अनुष्ठानपूर्वक जप.
  • प्रकरण १५: सूर्यगती अवरोध - तपोबलाच्या प्रभावाने सूर्यगती थांबवण्याचा अलौकिक प्रसंग.

१३. तात्यांची भक्ती

श्री तात्यांनी आपल्या जीवनामध्ये भक्तीची वेल बहरावी, फुलावी आणि फळावी यासाठी भगवद्भक्तांचा सहवास, भगवंताची व भक्तांची नित्यसेवा, एकादशीला उपवास करणे, भगवंताशी संबंधित उत्सव साजरे करणे, भगवंताच्या यशोकथांचे श्रवण-पठण करून त्यांचा प्रचार करणे, अविरत भक्तीने भगवंताचे पूजन करणे आणि भगवंताच्या श्रेष्ठ गुणांचे गायन अशा शुद्ध भक्तीच्या मार्गाने आपला काळ घालवण्यास सुरुवात केली.

ज्याप्रमाणे डोळे असूनही मनुष्याला रात्रीच्या वेळी नीट दिसत नाही, पण दिवा आणल्याबरोबर वाट उमजू लागते; त्याप्रमाणे भगवद्भक्ती करणाऱ्यांचे जीवनपथ आत्मप्रकाशाने उजळून निघतात. श्री तात्या अशी भगवद्भक्ती सातत्याने करीत राहिले म्हणून त्यांचे जीवन आत्मप्रकाशाने उजळून निघाले. कारण हरिभक्ती हेच खरे भाग्य आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात:

“निजभाग्याची परमजोडी । महासुखाची आवडी गाढी ।
सकळ गोडीयांची परमगोडी । भक्ती रोकडी श्रीहरीची।।” – संत एकनाथ महाराज

या भक्तीच्या बळावरच ते सामर्थ्यवान होऊन 'समर्थ' या संज्ञेला पात्र झाले. या भक्तीने त्यांनी देवाला आपलासा केला. इतकेच नव्हे तर या भक्तीसाधनाने श्री तात्या कर्तुम्, अकर्तुम् व अन्यथाकर्तुम् अशा त्रिविध शक्तीने संपन्न झाले.

१४. श्री तात्यांची उपासना

श्री समर्थ तात्या ब्रह्मचर्य व्रतस्थ राहून नित्य नियमाने आसने, सूर्यनमस्कार व गायत्री मंत्राचा बाराशे जप करीत असत. श्री मारुती महाराज लोहेकर लिहितात:

आणिक तयाचा नेम जाण । नित्य करी सूर्य आराधन ।
या संकल्पविधी पूजनावीन । नघे अन्न कालत्रयी ।। ८

आणखी एक त्यांचा नेम असा की ते नित्य सूर्यदेवतेची आराधना करीत आणि सकाळ, दुपार व संध्याकाळी संध्यावंदनाचा संकल्पविधी पूर्ण केल्याशिवाय अन्न सेवन करीत नसत.

श्री तात्यांनी सूर्य-आराधना करण्याचे कारण म्हणजे—श्रीगुरुमुखाने सूर्योपासकांचे मत त्यांच्या ऐकण्यात आले होते की, एका सूर्यावाचून सर्व देव अंध आहेत; सूर्यच सर्वांचे प्रकाशन करतो. दीप आणि रत्नादी पदार्थ हे अन्य पदार्थांचे प्रकाशन करतात, परंतु तेही सूर्याचेच अंश आहेत. दुसऱ्याच्या हिताकरिता स्वतःसारखे भ्रमण करणारा सूर्याशिवाय दुसरा देव कोणीही नाही.

सर्व वैदिक कर्मे कालाधीन आहेत आणि तो भूत, भविष्य व वर्तमान काळ सूर्यगतीच्या अधीन आहे. ज्यांच्या कोपाने सर्व भस्म होऊन जाईल, अशी सूर्यदेवता उपासकांना आणि भक्तांना लवकर प्रसन्न होते. याच सूर्यदेवाने प्रसन्न होऊन पांडवांना अक्षयपात्र दिलेले होते, त्यामुळे त्यांच्या नशिबी आलेला वनवास त्यांना अवघड गेला नाही.

“जगाचे आंध्य फेडितु । श्रियेची राऊळे उघडितु ।
निघे जैसा भास्वतु । प्रदक्षिणे।।” – संत ज्ञानेश्वर महाराज

सूर्य जसा जगाचा आंधळेपणा नाहीसा करीत, लक्ष्मीची मंदिरे म्हणजे कमळे विकसित करीत आणि सृष्टीशोभेची मंदिरे उघडी करीत पृथ्वीप्रदक्षिणेला निघतो; अशी ही सूर्यदेवता अत्यंत परोपकारी आहे. अशी सूर्यमहती जाणून श्री समर्थ तात्या नित्य नियमाने सूर्य-आराधना करू लागले. त्यामुळे त्यांच्या अंगी अचिंत्य दैवी शक्ती उदयास आली.

१५. सूर्यगती अवरोध

एके दिवशी भाद्रपद महिन्यातील वद्य सप्तमी दिवशी श्राद्धदिन होता. पितर म्हणून बाहेरगावच्या ब्राह्मण मंडळींना आमंत्रण दिलेले होते. ती ब्राह्मण मंडळी वेळेवर हजर राहिली नाही आणि नियम तर असा आहे की, सूर्यास्ताच्या आत सर्व विधी परिपूर्ण झाला पाहिजे.

तेव्हा मातोश्री चिंतायुक्त होऊन तात्यांना म्हणाल्या, “धोंडू, सूर्य तर मावळायला गेला आणि आणखी ब्राह्मण मंडळी आलेली नाही. तेव्हा आपला विधी कसा पूर्ण होणार?” तात्या म्हणाले, “आई, तू काही काळजी करू नकोस. आपला श्राद्धविधी पूर्ण झाल्याशिवाय मी सूर्यदेवतेला मावळू देणार नाही.”

असे बोलून त्यांनी तुळशीच्या ओट्याशेजारी (वृंदावनाजवळ) एक दगड ठेवला व त्या दगडाच्या पूर्व दिशेला हळूहळू सरकत असलेल्या छायेपुढे आपल्या हातामध्ये संध्येची पळी घेऊन दक्षिण-उत्तर एक रेषा ओढली. आईच्या हाती श्राद्धविधीचे सर्व साहित्य एका पात्रावर मांडून ते पात्र रेषेच्या पूर्व दिशेला ठेवावयास सांगितले.

मातोश्रींनी पूजेचे पात्र ठेवताच श्री तात्या आईच्या शेजारी तुळशीच्या ओट्यावर उभे राहून मावळत्या सूर्याकडे पाहत, हात जोडून म्हणाले, “हे सूर्यनारायणा, तुम्हाला माझा नमस्कार असो. आज माझी एक विनंती आहे की, या धोंड्याची छाया (सावली) मी ओढलेल्या रेषेच्या पुढे जाऊ देऊ नका व श्राद्धविधीच्या साहित्यपात्रावर सावली पडू देऊ नका. आमचा सर्व विधी तुमच्या कृपाप्रकाशात पूर्ण होऊ द्या.” ही त्यांची नम्र प्रार्थना!

इतक्यात पाहुणे-ब्राह्मण मंडळी आली. तेव्हा मातोश्रींना आनंद झाला. श्री तात्यांनी निवांतपणे सर्व श्राद्धविधी परिपूर्ण केले, ब्राह्मणभोजन झाले आणि त्यांना विडा व दक्षिणा देऊन तात्यांनी त्यांचे आदरपूर्वक दर्शन घेतले.

ती ब्राह्मण मंडळी एकमेकांशी बोलू लागली की, 'अहो, भोजनापूर्वीच सूर्य मावळायला गेलेला दिसला आणि आपले भोजन झाले तरी सूर्य तेथेच कसा? का मावळत नाही?' असे बोलत ते आश्चर्य व्यक्त करू लागले.

तेव्हा श्री तात्या आईसह घराबाहेर तुळशी-वृंदावनाजवळ आले. सर्व ब्राह्मण मंडळी पाहतच होती. मातोश्रींनीही पाहिले आणि आश्चर्य करू लागल्या की, माझ्या धोंडूने धोंडा ठेवून रेषा ओढली, तर माझ्या धोंडूची 'लक्ष्मणरेषा' सूर्याने उल्लंघन केलेली नाही; केवढे हे आश्चर्य!

श्री तात्यांनी सूर्यदेवतेकडे पाहून नमस्कार केला आणि तो दगड उचलला. तेव्हा एका क्षणातच सूर्य मावळला आणि गडद अंधकार पसरला! श्री तात्यांची ही आश्चर्यजनक कृती पाहून सर्व ब्राह्मण मंडळीच्या अंगावर रोमांच उभे राहिले व मातोश्रींच्या नेत्रांत आनंदाश्रू आले. धन्य तात्यांचे सामर्थ्य आणि धन्य त्यांची निष्ठा! असा संतांचा महिमा सामान्यांना अनाकलनीय व अवर्णनीय आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात:

“संतांचा महिमा तो बहु दुर्गम ।
शाब्दीकांचे काम नाही येथे।।” – संत तुकाराम महाराज

१६. सर्पदंश

एके दिवशी श्री तात्यांच्या पायाला सर्पदंश झाला. तो सर्पदंश झालेला सर्वांनी पाहिला व ताबडतोब त्या सापास मारले. नंतर त्यांना नागमंत्र्याकडे न्यावे की नागमंत्र्यासच इकडे बोलवावे, अशा विचारात घाबरे होऊन सर्व जण धावपळ करू लागले.

तेव्हा तात्या निर्भय होऊन लोकांना म्हणाले, “तुम्ही घाबरू नका. विषाची मला काहीही भीती वाटत नाही. कारण विष आमचा मावळा आहे. अर्थात लक्ष्मी आमची माता आहे व नारायण आमचे पिता आहेत. माता लक्ष्मीचा जन्म समुद्रामध्येच झालेला असल्यामुळे लक्ष्मी व विष हे दोघे बहीण-भाऊ लागतात; म्हणजेच विष माझे मातुल (मामा) आहे. त्यामुळे ते मला काहीही बाधा करू शकणार नाही. फक्त तुम्ही मला स्नान घाला.”

असे बोलत असतानाच त्यांचे अंग काळेनिळे झाले. तेव्हा सर्व जण घाबरून विचार करू लागले की, सर्पदंश झाल्यानंतर पाण्याचे फार वैरीपण असते आणि तात्या तर स्नान घाला म्हणतात, तर काय करावे? पण यांचे सामर्थ्य काही वेगळेच आहे, असा विचार करून भीत-भीत त्यांना स्नान घातले.

स्नानानंतर श्री तात्या गायत्री मंत्राचा जप करू लागले. सर्व मंडळी पाहतच होती की, काळेनिळे झालेले अंग जसा जसा गायत्री मंत्राचा जप वाढू लागला, तसतशी त्यांची अंगकांती पूर्ववत गोरी व तेजःसंपन्न होऊ लागली. हे केवढे आश्चर्य!

खरोखर, साधुसंत सोडून जगातील सर्व मानवमात्रांना एक साप डंखलेला आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात:

“लोभ सर्प डंखला करू काय ।
स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय।।” – संत एकनाथ महाराज

या 'लोभ' नावाच्या सर्पदंशामुळे सर्वांना भुली पडलेली आहे, ज्यामुळे लोक आपल्या स्वरूपस्थितीस दुरावत आहेत. परंतु श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांना मात्र या सापाची बाधा होऊ शकली नाही. त्याचे कारण:

“गुरु गारुडी आला धाऊनी । बोध वैराग्याचे पाजिले पाणी ।
विवेक अंजन घातले नयनी । सोहम् शब्दे वाजवी नामध्वनी।।” – संत एकनाथ महाराज

१७. मातेची कुशी धन्य

सदाचारसंपन्न, सत्त्वशाली वैदिक ब्राह्मण म्हणून श्री तात्यांची प्रसिद्धी व कीर्ती चोहीकडे पसरली. आपल्या पवित्र आचरणाने समाजाचे मन वेधून ते सर्वांचे आवडते झाले. प्रत्येक सत्कार्यामध्ये त्यांना मानाचे पहिले स्थान देऊन लोक त्यांचा गौरव करू लागले व गुरुदक्षिणेच्या रूपाने धन-द्रव्य देऊ लागले.

तसेच गावोगावचे भाविक भक्त श्री तात्यांना आवडीने आपल्या गावी घेऊन जाऊ लागले. तेव्हा वयाच्या चोविसाव्या वर्षी (इ.स. १८५४ सालापासून) त्यांनी घोड्यावरून भ्रमंती सुरू केली.

आपला मुलगा सद्गुणी, सदाचारसंपन्न, कीर्तिवंत आणि धनवंत पाहून मातोश्री गंगाबाई आपल्या पतीवियोगाचे दुःख विसरल्या आणि श्री तात्यांकडे पाहून 'आपली कुशी धन्य झाली' असे वाटून जीवनाचा काळ आनंदाने भगवद्भक्तीमध्ये घालवू लागल्या.

विशाल सागरामध्ये ज्याप्रमाणे लाकडाचे ओंडके एकत्र येतात आणि काही काळ बरोबर वाहत राहिल्यानंतर एकमेकांपासून दूर जातात; त्याप्रमाणे नातेवाईक, सोयरे आणि संपत्ती यांचा संयोग-वियोग होत असतो. हा वियोग अटळ असतो.

त्याप्रमाणेच या जगत् प्रवाहाच्या नियमानुसार मातोश्री गंगाबाई इ.स. १८६० (शके १७८२) साली वैकुंठवासी झाल्या. श्री तात्यांना त्यांच्या वयाच्या तिसाव्या वर्षी मातोश्रींचा वियोग घडला.

१८. देणगीचा सत्कार्यामध्ये विनियोग

श्री तात्यांना गुरुदक्षिणा द्यावी म्हणून सर्व भाविक भक्त देणगी देऊ लागले. हे पाहून तात्यांचे कोळनूरचे लोभाजी न्हावी आणि समवयस्क मित्र जांबचे नागादेव—या दोघांनी विचारले, “महाराज, तुम्ही आपल्या शिष्यमंडळींकडून व भाविक भक्तांकडून ही दक्षिणा व देणगी कशासाठी घेता?”

कारण श्री तात्या नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रतस्थ राहून, इंद्रियोपयोगाचा अवरोध करून भगवद्भक्तीमध्ये वेळ घालवत होते.

तेव्हा तात्या म्हणाले, “मी वैदिक ब्राह्मण आहे, म्हणून वेदविधानाप्रमाणे कर्माचे अनुष्ठान करीत राहणे हा माझा स्वधर्म आहे. कपिलाषष्ठी, सिंहस्थ पर्वणी, चंद्र-सूर्याची ग्रहणे अशा पर्वकाळात प्रयागादी तीर्थांचे स्नान, पुण्यपावन क्षेत्रांना भेट, तीर्थयात्रा, देवदर्शन व संतदर्शन या सर्व गोष्टी माझ्या हातून घडाव्यात अशी अपेक्षा आहे. या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी शरीरसामर्थ्याबरोबर द्रव्यसामर्थ्याचीही नितांत गरज असते.”

“म्हणून मी या देणगीचा स्वीकार करीत आहे आणि हे द्रव्य घेऊन माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्ताने प्रतिवर्षी अखंड हरिनाम सप्ताह करून अन्नदान करीत आहे.”

“जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ।
उदासीन विचारे वेंच करी।।” – संत तुकाराम महाराज

“संत तुकाराम महाराजांच्या या वचनाप्रमाणे मी द्रव्याचा योग्य विनियोग सत्कार्यामध्ये करीत आहे.” असे श्री तात्यांचे समाधानकारक उत्तर ऐकून नागादेव व लोभाजी संतुष्ट झाले. त्यांनी तात्यांना दक्षिणा देऊन दर्शन घेतले आणि आयुष्यभर तात्यांच्या निकटवर्ती राहून सेवा केली.

❮ भाग २ मागे अनुक्रमणिका भाग ४ वाचा ➔

🚩 जय हरी विठ्ठल!

श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांची ही पावन कथा सर्व भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा.

॥ श्री समर्थ धोंडूतात्या महाराज प्रसन्न ॥