ॐ नमो सद्गुनरु तूं ज्योतिषी । एकात्मतेचें घटित पाहसी ।
चिद्ब्रदह्मेंसी लग्न लाविशी । ॐ पुण्येंसी तत्त्वतां ॥ १ ॥
हे सद्गुरू, तुला नमस्कार असो! तू आत्मज्ञानाचा खरा ज्योतिषी आहेस, तू जीवाचे आणि शिवाचे ऐक्य (एकात्मता) पाहतोस आणि सर्व पुण्याच्या बळाने जीवाचे लग्न साक्षात चैतन्यब्रह्माशी लावून देतोस.
वधूवरां लग्न लाविती । हें देखिलें असे बहुतीं ।
आपुली आपण लग्नप्राप्ती । हे अलक्ष्य गती गुरुराया ॥ २ ॥
जगामध्ये वधू आणि वराचे लग्न लावून दिलेले अनेकांनी पाहिले आहे, परंतु स्वतःचेच स्वतःशी लग्न लावून देणे (जीवात्म्याचे परमात्म्याशी ऐक्य करणे) ही हे गुरुराया, तुझी अलौकिक आणि अगाध लीला आहे.
लग्न लाविती हातवटी । पांचां पंचकांची आटाटी ।
चुकवूनि काळाची काळदृष्टी । घटिका प्रतिष्ठी निजबोधें ॥ ३ ॥
पंचमहाभूतांची आणि पंचज्ञानेंद्रियांची धडपड थांबवून, काळाची दृष्ट चुकवून, आत्मज्ञानाच्या शुभमुहूर्तावर तू हे ऐक्याचे लग्न लावण्याची खरी हातोटी दाखवतोस.
चहूं पुरुषार्थांचें तेलवण । लाडू वळिले संपूर्ण ।
अहंभावाचें निंबलोण । केलें जाण सर्वस्वें ॥ ४ ॥
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांची हळद लावून, पूर्णत्वाचे लाडू वळले आहेत आणि अहंकाराची दृष्ट (निंबलोण) काढून सर्वस्व ओवाळून टाकले आहे.
साधनचतुष्ट्याचा सम्यक । यथोक्त देऊन मधुपर्क ।
जीवभावाची मूद देख । एकाएक सांडविली ॥ ५ ॥
विवेक, वैराग्य, शमादी सहा संपत्ती आणि मुमुक्षुत्व या साधनचतुष्टयाचा योग्य मधुपर्क देऊन, जिवाचा अज्ञानाचा भास किंवा मर्यादा एकदम नाहीशी करून टाकली.
विषयसुख मागें सांडे । तेंचि पायातळीं पायमांडे ।
सावधान म्हणसी दोंहीकडे । वचन धडफुडें तें तुझें ॥ ६ ॥
विषयसुखाचा त्याग झाला आणि तेच जणू पायाखालील पायघड्या (पायमांडे) बनले; अंतःकरणात आणि बाह्य जगात दोन्हीकडे 'सावधान' म्हणणारे तुझे स्पष्ट वचनच गुंजत आहे.
व्यवधानाचें विधान तुटे । सहजभावें अंत्रपटु फिटे ।
शब्द उपरमोनि खुंटे । मुहूर्त गोमटे पैं तुझें ॥ ७ ॥
द्वैताचा आणि मनावरील विक्षेपाचा पडदा आपोआप दूर झाला, सहजावस्थेमुळे मधला अंतरपट (पडदा) फिटला, सर्व शब्द जिथे शांत होतात असा अत्यंत शुभ मुहूर्त तू आणलास.
अर्धमात्रा समदृष्टी । निजबिंबीं पडे गांठी ।
ऐक्यभावाच्या मीनल्या मुष्टी । लग्नकसवटी अनुपम ॥ ८ ॥
समदृष्टीची अर्धमात्रा प्राप्त होऊन स्वतःच्या मूळ आत्मस्वरूपाशी गाठ पडली; जिवा-शिवाच्या ऐक्याची मूठ बांधली गेली, हा लग्नाचा अनुपम सोहळा संपन्न झाला.
तेथ काळा ना धवळा । गोरा नव्हे ना सांवळा ।
नोवरा लक्षेना डोळां । लग्नसोहळा ते ठायीं ॥ ९ ॥
तिथे नवरदेव काळा नाही, पांढरा नाही, गोरा नाही किंवा सांवळाही नाही; चर्मचक्षूंना तो दिसतच नाही, असा हा अलौकिक लग्नसोहळा आहे.
परी नवल कैसें कवतिक । दुजेनवीण एकाएक ।
एकपणीं लग्न देख । लाविता तूं निःशेख गुरुराया ॥ १० ॥
पण हे गुरुराया, तुझे कौतुक किती सांगावे! दुसऱ्या कोणाचीही गरज न ठेवता, एकाच आत्मतत्त्वात तू हे अद्वैत लग्न पूर्णपणे लावून देतोस.
तुज गुरुत्वें नमूं जातां । तंव आत्मा तूंचि आंतौता ।
आंतु कीं बाहेर पाहों जातां । सर्वीं सर्वथा तूंचि तुं ॥ ११ ॥
तुला गुरू मानून नमस्कार करायला जावे तर आत राहणारा अंतरात्मा तूच आहेस; आत आणि बाहेर पाहिले तरी सर्वत्र केवळ तू नि तूच भरलेला आहेस.
तुझें तूंपण पाहतां । माझें मीपण गेलें तत्त्वतां ।
ऐसें करूनियां गुरुनाथा । ग्रंथकथा करविसी ॥ १२ ॥
तुझे गुरुत्व पाहाताना माझे मीपण (अहंकार) समूळ नष्ट झाले; हे गुरुनाथा, असे अद्वैत घडवून आणून तूच माझ्याकडून या ग्रंथाची कथा सांगवून घेत आहेस.
मागील कथासंगती । सप्तमाध्यायाचे अंतीं ।
अवधूतें यदूप्रती । कथा कापोती सांगीतली ॥ १३ ॥
मागील कथेच्या संदर्भाने, सातव्या अध्यायाच्या शेवटी अवधूतांनी राजा यदूला पारव्याची (कपोताची) कथा सांगितली होती.
पृथ्वी-आदिअंतीं चोखट । कपोतापर्यंत गुरु आठ ।
सांगीतले अतिश्रेष्ठ । गुरु वरिष्ठ निजबोधें ॥ १४ ॥
पृथ्वीपासून सुरुवात करून कपोतापर्यंत एकूण आठ श्रेष्ठ गुरूंची माहिती आत्मज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत स्पष्टपणे सांगितली.
उरल्या गुरूंची स्थिती । अवधूत सांगेल यदूप्रती ।
तेथें सावधान ठेवा चित्तवृत्ती । श्रवणें स्थिति तद्बोधें ॥ १५ ॥
आता उरलेल्या गुरूंचे वर्णन अवधूत यदूला सांगतील; तिथे आपली चित्तवृत्ती एकाग्र ठेवा, जेणेकरून श्रवणाने आत्मबोध प्राप्त होईल.
श्रीब्राह्मण उवाच ।
सुखमैन्द्रियकं राजन् स्वर्गे नरक एव च ।
देहिनां यद्यथा दुःखं तस्मान्नेच्छेत तद् बुधः ॥ १ ॥
श्रीब्राह्मण (अवधूत) म्हणाले — हे राजा, स्वर्गात मिळणारे इंद्रियसुख असो वा नरकात मिळणारे दुःख, ते सर्व देहधाऱ्यांसाठी शेवटी दुःखालाच कारणीभूत ठरते; म्हणूनच विचारवंत पुरुषाने त्या विषयसुखाची मुळीच इच्छा करू नये.
श्रवणीं सादरता यदूसी । देखोनि सुख जालें ब्राह्मणासी ।
तेणें सुखें निरूपणासी । उल्हासेंसी करीतसे ॥ १६ ॥
राजा यदूची श्रवणातील आदरवृत्ती पाहून अवधूत ब्राह्मणाला मोठा आनंद झाला आणि ते अत्यंत उल्हासाने पुढील निरूपण करू लागले.
तो म्हणे राया सावधान । विषयसुखाचें जें सेवन ।
तें स्वर्गनरकीं गा समान । नाहीं अनमान ये अर्थी ॥ १७ ॥
ते म्हणाले — हे राजा, सावध होऊन ऐक! विषयसुखाचे सेवन करणे हे स्वर्ग आणि नरक दोन्ही ठिकाणी सारखेच आहे, यात काहीही संशय नाही.
भोगितां उर्वशीसी । जें सुख स्वर्गीं इंद्रासी ।
तेंचि विष्ठेमाजीं सूकरासी । सूकरीपासीं निश्चित ॥ १८ ॥
स्वर्गात इंद्राला उर्वशीचा उपभोग घेताना जे विषयसुख मिळते, तेच विषयसुख नरकात वा विष्ठेत डुकराला डुकरीपासून मिळते.
हें जाणोनि साधुजन । उभय भोगीं न घालिती मन ।
नेदवे प्रेतासी आलिंगन । तेवीं साधुजन विषयांसी ॥ १९ ॥
हे जाणून साधु पुरुष स्वर्ग आणि नरक दोन्ही भोगण्याकडे मन वळवत नाहीत; प्रेताला जसे कोणी मिठी मारत नाही, तसे साधू विषयसुखाला स्पर्शही करत नाहीत.
जीत सापु धरावा हातीं । हें प्राणियांसी नुपजे चित्तीं ।
तेवीं विषयांची आसक्ती । साधु न धरिती सर्वथा ॥ २० ॥
जिवंत सापाला हातात धरावे असे कोणाच्याही मनात येत नाही, तशीच साधू पुरुष विषयांची आसक्ती मुळीच धरत नाहीत.
जैसें न प्रार्थितां दुःख । प्राणी पावताति देख ।
तैसें न इच्छितां इंद्रियसुख । भोगवी आवश्यक अदृष्ट ॥ २१ ॥
कोणीही न मागता जसे प्राण्यांना दुःख मिळते, तसेच इच्छा न करताही प्रारब्धानुसार (अदृष्टामुळे) इंद्रियसुख किंवा अन्न आपोआप मिळते.
मज दुःखभोगु व्हावा । हें नावडे कोणाच्या जीवा ।
तें दुःख आणी अदृष्ट तेव्हां । तेवीं सुखाचा यावा अदृष्टें ॥ २२ ॥
मला दुःख मिळावे असे कोणालाही वाटत नाही, तरीही प्रारब्ध ते दुःख आणतेच; तसेच सुखाचा लाभही प्रारब्धानेच होतो.
ऐसें असोनि उद्योगु करितां । तेणें आयुष्य नाशिलें सर्वथा ।
यालागीं सांडूनि विषयआस्था । परमार्था भजावें ॥ २३ ॥
असे असताना केवळ विषयसुखासाठी धडपड करण्यात पूर्ण आयुष्य वाया जाते; म्हणूनच विषयांची आशा सोडून परमार्थाचे भजन करावे.
केवळ झालिया परमार्थपर । म्हणसी आहारेंवीण न राहे शरीर ।
येच निर्धारीं साचार । गुरु 'अजगर' म्यां केला ॥ २४ ॥
"केवळ परमार्थ केला तर अन्नाशिवाय शरीर कसे टिकणार?" असे जर विचारशील, तर याच गोष्टीचा निश्चय करण्यासाठी मी 'अजगराला' गुरू मानले आहे.
ग्रासं सुमृष्टं विरसं महान्तं स्तोकमेव वा ।
यदृच्छयैवापतितं ग्रसेदाजगरोऽक्रियः ॥ २ ॥
उत्तम चवीचे, बेचव, भरपूर किंवा अगदी थोडे असे जे काही अन्न प्रारब्धाने आपोआप समोर येईल, ते अजगराप्रमाणे कोणतीही हालचाल न करता निष्कामपणे भक्षण करावे.
उद्योगेंवीण आहारु । अयाचित सेवी अजगरु ।
डंडळोनि न सांडी धीरु । निधडा निर्धारु पैं त्याचा ॥ २५ ॥
अजगर कोणताही उद्योग न करता, न मागता आपोआप मिळालेला आहार घेतो; अन्न न मिळाले तरी तो ढळत नाही आणि आपला धीर सोडत नाही.
स्वभावें तो मुख पसरी । सहजें पडे जें भीतरीं ।
सरस नीरस विचारु न करी । आहार अंगीकारी संतोषें ॥ २६ ॥
तो सहज तोंड उघडून पडतो; आत जे पडेल ते गोड आहे की बेचव, असा विचार न करता समाधानाने भक्षण करतो.
तैसीचि योगियांची गती । सदा भाविती आत्मस्थिती ।
यदृच्छा आलें तें सेवती । रसआसक्ती सांडूनि ॥ २७ ॥
तीच योग्याची गती असते; ते नेहमी आत्मज्ञानात मग्न असतात आणि रसाची आसक्ती सोडून प्रारब्धाने मिळेल ते खातात.
योगियांचा आहारु घेणें । काय सेविलें हें रसना नेणे ।
रसना-पंगिस्त नाहीं होणें । आहारु सेवणें निजबोधें ॥ २८ ॥
योगी अन्न भक्षण करतात, पण काय खाल्ले हे जिभेला कळूही देत नाहीत; ते जिभेचे चोचले पुरवत नाहीत, तर केवळ शरीर टिकवण्यासाठी अन्न घेतात.
आंबट तिखट तरी जाणे । परी एके स्वादें अवघें खाणें ।
सरस नीरस कांहीं न म्हणे । गोड करणें निजगोडियें ॥ २९ ॥
आंबट-तिखट कळत असूनही सर्व अन्न एकाच भावनेने खातात; चांगले-वाईट न म्हणता आत्मसुखाच्या गोडीने ते अन्न तृप्त करतात.
मुख पसरिलिया निर्धारा । स्वभावें रिघालिया वारा ।
तोचि आहारु पैं अजगरा । तेणेंचि शरीरा पोषण ॥ ३० ॥
अजगराने तोंड उघडल्यावर केवळ वारा पोटात गेला तरी तोच त्याचा आहार बनतो आणि शरीराचे पोषण होते.
तैशीच योगियांची स्थिति । वाताशनें सुखें वर्तती ।
आहारालागुनी पुढिलांप्रती । न य काकुलती सर्वथा ॥ ३१ ॥
तशीच योग्यांची स्थिती असते; केवळ हवेवरही ते आनंदात राहू शकतात आणि अन्नासाठी कोणासमोरही लाचार होत नाहीत.
थोडें बहु सरसनिरसासी । हें कांहीं म्हणणें नाहीं त्यासी ।
स्वभावें जें आलें मुखासी । तें सावकाशीं सेवितु ॥ ३२ ॥
थोडे असो वा भरपूर, चविष्ट असो वा बेचव; आपोआप जे समोर आले ते ते शांतपणे स्वीकारतात.
शयीताहानि भूरीणि निराहारोऽनुपक्रमः ।
यदि नोपनमेद्ग्रासो महाहिरिव दिष्टभुक् ॥ ३ ॥
अजगराप्रमाणे दैवयोगाने अन्न मिळाले नाही तर कोणतीही खटाटोप न करता अनेक दिवस निराहार राहून एकाच ठिकाणी पड राहवे.
अजगरासी बहु काळें । यदृच्छा आहारु न मिळे ।
तरी धारणेसी न टळे । पडिला लोळे निजस्थानीं ॥ ३३ ॥
अजगराला खूप दिवस अन्न मिळाले नाही तरी तो अस्वस्थ होत नाही, आपल्या ठिकाणी शांत पडून राहातो.
तैसें योगियासी अन्न । बहुकाळें न मिळे जाण ।
तरी करूनियां लंबासन । निद्रेंविण निजतु ॥ ३४ ॥
तसेच योग्याला खूप काळ अन्न मिळाले नाही तरी तो नामाजप किंवा ध्यानात शांतपणे बसून राहातो.
निद्रा नाहीं तयासी । परी निजे निजीं अहर्निशीं ।
बाह्य न करी उपायासी । भक्ष्य देहासी अदृष्टें ॥ ३५ ॥
त्याला निद्रा नसते, पण तो रात्रंदिवस आत्मस्वरूपात विश्रांती घेतो; अन्नासाठी तो बाह्य उपाय करत नाही, प्रारब्धानेच देहाला अन्न मिळते.
अदृष्टीं असेल जें जें वेळें । तें तें मिळेल तेणें काळें ।
यालागीं त्याचें ज्ञान न मैळे । धारणा न ढळें निजबोधें ॥ ३६ ॥
ज्या वेळी प्रारब्धात असेल तेव्हा ते मिळेल; यामुळे त्याचे आत्मज्ञान मलीन होत नाही नि चित्त स्थिर राहते.
ओजःसहोबलयुतं बिभ्रद् देहमकर्मकम् ।
शयानो वीतनिद्रश्च नेहेतेन्द्रियवानपि ॥ ४ ॥
अजगर सर्व सामर्थ्य, धैर्य आणि शक्तीने युक्त असा देह ठेवूनही निष्क्रिय पडून राहतो; इंद्रिये असूनही तो कोणत्याही कर्माची इच्छा करत नाही.
अजगरासी बळ उदंड । देहो पराक्रमें प्रचंड ।
परी न करी उद्योगाचें बंड । पसरूनि तोंड पडिलासे ॥ ३७ ॥
अजगरामध्ये प्रचंड बळ आणि मोठा देह असतो, तरीही तो भक्ष्यासाठी धावपळ न करता शांत पडून राहातो.
तैसाचि योगिया केवळ । शरीरीं असे शारीर बळ ।
बुद्धिही असे अतिकुशळ । इंद्रियबळ पटुतर ॥ ३८ ॥
तसाच योगी पुरुषाच्या शरीरात ताकद, बुद्धी अत्यंत तीक्ष्ण नि इंद्रिये समर्थ असतात.
आहारालागीं सर्वथा । हेतु स्फुरों नेदी चित्ता ।
कायावाचा तत्वतां । नेदी स्वभावतां डंडळूं ॥ ३९ ॥
तरीही अन्नासाठी तो मनात इच्छा निर्माण होऊ देत नाही आणि काया व वाचेला अस्वस्थ होऊ देत नाही.
स्वप्नजागृती मुकला । सुषुप्ती सांडोनि निजेला ।
शून्याचा पासोडा झाडिला । निजीं पहुडला निजत्वें ॥ ४० ॥
तो जागृती, स्वप्न नि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या अखंड आत्मरूपात विश्रांती घेतो.
मुनिः प्रसन्नगम्भीरो दुर्विगाह्यो दुरत्ययः ।
अनन्तपारो ह्यक्षोभ्यस्तिमितोद इवार्णवः ॥ ५ ॥
मुनी हा समुद्रासारखा प्रसन्न, गंभीर, समजण्यास अत्यंत कठीण, अथांग, अनंत, संतापहीन आणि स्थिर पाण्याचा असावा.
'समुद्र' जो गुरु करणें । उसकीं परिस पां लक्षणें ।
गंभीरत्व पूर्णपणें । निर्मळ असणें इत्यादि ॥ ४१ ॥
समुद्राला गुरू मानण्याची लक्षणे ऐक — पूर्ण गंभीर असणे, निर्मळ असणे इत्यादी.
समुद्र सदा सुप्रसन्न । योगी सदा पसन्नवदन ।
केव्हाही धुसमुशिलेपण । नव्हेजाण निजबोंधें ॥ ४२ ॥
समुद्र जसा सदा प्रसन्न असतो, तसा योगी सदा प्रसन्नमुद्रा असलेला असतो; आत्मज्ञानामुळे त्याच्या चेहऱ्यावर कधीही अस्वस्थता येत नाही.
मीनल्या सरितांचें समळ जळ । समुद्र डहुळेनी अतिनिर्मळ ।
तैसीं नाना कर्में करितां सकळ । सदा अविकळ योगिया ॥ ४३ ॥
नद्यांचे गढूळ पाणी येऊन मिळाले तरी समुद्र मलीन होत नाही, तसा योगी नाना कर्मे करूनही सदा विकाररहित व निर्मळ राहातो.
जळें गंभीर सागर । योगिया स्वानुभवें गंभीर ।
वेळा नुल्लंघी सागर । नुल्लंघी योगीश्वर गुरुआज्ञा ॥ ४४ ॥
पाशामुळे समुद्र गंभीर असतो, तर योगी स्वानुभावाने गंभीर असतो; समुद्र जसा मर्यादा सोडत नाही, तसा योगी गुरूची आज्ञा मोडत नाही.
समुद्रीं न रिघवे भलत्यासी । तो बुडवी जळकल्लोळेंसी ।
योगिया बुडवी संसारासी । भावें त्यापासीं गेलिया ॥ ४५ ॥
समुद्रात कोणालाही सहज शिरता येत नाही, तो लाटांमध्ये बुडवतो; पण योग्याकडे भावाने गेले असता तो संसारालाच बुडवून टाकतो (संसारातून मुक्त करतो).
रिगतीमागी जाणें जळीं । तो समुद्रीं करी आंघोळी ।
येरांसी लाटांच्या कल्लोळीं । कासाकुळी करीतसे ॥ ४६ ॥
मार्ग समजून पाण्यात उतरणारा समुद्रात स्नान करतो, तर इतरांना लाटा अस्वस्थ करतात.
तैसीचि योगियासी । सलगी न करवे भलतियासी ।
आपभयें भीती आपैसी । तो भाविकांसी सुसेव्य ॥ ४७ ॥
तशीच योग्याशी कोणालाही सहजासहजी सलगी करता येत नाही; पण भाविकांसाठी तो अतिशय सुलभ नि सेवा करण्यायोग्य असतो.
जाहल्या धनवंतु वेव्हारा । उपायीं नुल्लंघे सागरा ।
तैसें नुल्लंघवे योगीश्वरा । नृपां सुरनरां किन्नरां ॥ ४८ ॥
कितीही धनवान व्यापारी असला तरी तो समुद्राला जिंकू शकत नाही; तसे राजा, देव वा मानव योग्याला जिंकू शकत नाहीत.
मळु न राहे सागरीं । लाटांसरिसा टाकी दुरी ।
तैसाचि मळु योगियाभीतरीं । ध्यानें निर्धारीं न राहे ॥ ४९ ॥
समुद्रात कचरा टिकत नाही, तो लाटांनी बाहेर फेकतो; तसाच योग्याच्या मनात ध्यानामुळे कसलाही दोष किंवा मळ टिकत नाही.
समुद्रीं मीनली ताम्रपर्णी । तेथ जाहली मुक्ताफळांची खाणी ।
योगिया मिनली श्रद्धा येऊनि । तेथ मुक्तखाणी मुमुक्षां ॥ ५० ॥
ताम्रपर्णी नदी समुद्राला मिळाली की मोत्यांची खाण बनते; तशी योग्याला श्रद्धा मिळाली की मुमुक्षूंसाठी ती मुक्तीची खाण बनते.
जो समुद्रामाजीं रिघोनि राहे । तो नानापरीचीं रत्ने लाहे ।
योगियांमाजीं जो सामाये । त्याचे वंदिती पाये चिद्रत्नें ॥ ५१ ॥
समुद्रात शिरणारा रत्ने प्राप्त करतो, तसा योग्यामध्ये जो सामावतो त्याचे पाय ज्ञानी पुरुष वंदन करतात.
जैशी समुद्राची मर्यादा । कोणासी न करवे कदा ।
तैशी योगियांची मर्यादा । शास्त्रां वेदां न करवे ॥ ५२ ॥
समुद्राची सीमा जशी कोणाला ठरवता येत नाही, तशी योग्याची अथांगता शास्त्रे व वेदही पूर्ण सांगू शकत नाहीत.
प्रवाहेंवीण जळ । समुद्रीं जेवीं निश्चळ ।
मृत्युभयेंवीण अचंचळ । असे केवळ योगिया ॥ ५३ ॥
प्रवाहाशिवाय समुद्रातील पाणी जसे निश्चल असते, तसा योगी मृत्यूच्या भयाशिवाय पूर्ण अचंचल असतो.
समुद्रीं प्रवाहो नव्हे कहीं । सदा पूर्ण ठायींच्या ठायीं ।
तैसे योगिया जन्ममरण नाहीं । परिपूर्ण पाहीं सर्वदा ॥ ५४ ॥
समुद्राला जसा पाण्याचा अखंड साठा असतो, तसा योगी जन्म-मरणापासून मुक्त असून सदा परिपूर्ण असतो.
समुद्रलक्षणें साधितां । अधिक दशा आली हातां ।
ते योगियाची योग्यता । परिस तत्त्वतां सांगेन ॥ ५५ ॥
समुद्राचे गुण अभ्यासत असताना योग्याची त्याहूनही अधिक योग्यता स्पष्ट होते, ती ऐक.
समुद्रामाजीं जळ । लाटांखालीं अतिचंचळ ।
योगिया अंतरी अतिनिश्चळ । नाहीं तळमळ कल्पना ॥ ५६ ॥
समुद्राचे वरचे पाणी लाटांमुळे चंचल असते, पण योग्याचे अंतःकरण आतून अत्यंत निश्चल असते, तिथे कसलीही तळमळ नसते.
समुद्र क्षोभे वेळोवेळे । योगिया क्षोभेना कवणें काळें ।
सर्वथा योगी नुचंबळें । योगबळें सावधु ॥ ५७ ॥
समुद्र वादळाने क्षोभून उठतो, पण योगी कोणत्याही काळात क्षोभत नाही, तो योगबळाने नेहमी स्थिर राहातो.
समुद्रीं भरतें पर्वसंबंधें । योगिया परिपूर्ण सदानंदें ।
समुद्रीं चढूवोहटू चांदें । योगिया निजबोधें सदा सम ॥ ५८ ॥
समुद्राला पौर्णिमेला भरती येते, पण योगी सदा आनंदाने परिपूर्ण असतो; समुद्रात ओहोटी-भरती होते, पण योगी आत्मज्ञानाने सदा समान राहातो.
समुद्र सर्वांप्रति क्षार । तैसा नव्हे योगीश्वर ।
तो सर्वां जीवांसी मधुर । बोधु साचार पैं त्याचा ॥ ५९ ॥
समुद्र सर्वांसाठी खारा (खारट) असतो, पण योगी तसा नसतो; त्याचा बोध सर्व जीवांना अत्यंत गोड नि शांत करणारा असतो.
जयासी बोधु नाहीं पुरता । अनुभव नेणे निजात्मता ।
त्यासी कैंची मधुरता । जेवीं अपक्वता सेंदेची ॥ ६० ॥
ज्याला पूर्ण ज्ञान नाही, त्याला ही गोडी कशी कळणार? जसा कच्चा शेंडगा (कडू फळ) कडूच लागतो.
सागरीं वरुषल्या घन । वृथा जायें तें जीवन ।
तैसा योगिया नव्हे जाण । सेविल्या व्यर्थपण येवों नेदी ॥ ६१ ॥
समुद्रावर पाऊस पडला तर ते पाणी व्यर्थ जाते, पण योग्याची सेवा केली तर तो ती सेवा कधीही व्यर्थ जाऊ देत नाही.
अल्पही योगिया होये घेता । तेणें निवारी भवव्यथा ।
यालागीं मुमुक्षीं सर्वथा । भगवद्भिक्तां भजावें ॥ ६२ ॥
योग्याने थोडाही स्वीकार केला तरी तो संसाराचे दुःख दूर करतो; म्हणूनच मुमुक्षूंनी नेहमी भगवद्भक्तांची सेवा करावी.
समृद्धकामो हीनो वा नारायणपरो मुनिः ।
नोत्सर्पेत न शुष्येत सरिद्भिरिव सागरः ॥ ६ ॥
इच्छा पूर्ण झालेला असो वा दरिद्री असो, नारायणपर असलेला मुनी समुद्राप्रमाणे नद्या आल्यामुळे जसा वाढत नाही आणि नद्या आटल्यामुळे जसा सुकत नाही, तसाच तो आनंद वा शोकाने बदलत नाही.
वर्षाकाळीं सरिता सकळ । घेऊनि आल्या अमूप जळ ।
तेणें हरुषेजेना प्रबळ । न चढे जळ जळाब्धीं ॥ ६३ ॥
पावसाळ्यात सर्व नद्या भरपूर पाणी घेऊन आल्या तरी समुद्र हुरळून जात नाही आणि पाणी वर चढत नाही.
ग्रीष्मकाळाचिये प्राप्ती । सरितांचे यावे राहती ।
ते मानूनियां खंती । अपांपती वोहटेना ॥ ६४ ॥
उन्हाळ्यात नद्यांचे पाणी येणे बंद झाले तरी समुद्र दुःखी होऊन आटून जात नाही.
तैसेंचि योगियांच्या ठायीं । नाना समृध्दि आलिया पाहीं ।
अहंता न धरी देहीं । गर्वु कांहीं चढेना ॥ ६५ ॥
तसेच योग्याकडे कितीही समृद्धी व संपत्ती आली तरी तो शरीराचा अहंकार धरत नाही आणि त्याला गर्व होत नाही.
समृध्दि वेंचिलिया पाठीं । खंती नाहीं योगिया पोटीं ।
तो नारायणपरदृष्टीं । सुखसंतुष्टी वर्ततू ॥ ६६ ॥
ती समृद्धी निघून गेली तरी योग्याच्या मनात दुःख होत नाही; तो नेहमी भगवंताच्या ध्यानात सुखी राहातो.
संपत्तीमाजीं असतां । मी संपन्नु हें नाठवे चित्ता ।
दरिद्र आलिया दरिद्रता । नेणे सर्वथा योगिया ॥ ६७ ॥
संपत्तीत असताना "मी श्रीमंत आहे" असे त्याला वाटत नाही आणि गरिबी आली तरी तो दरिद्र मानत नाही.
दरिद्र आणि संपन्नता । दोन्ही समान त्याचिया चित्ता ।
नाहीं प्रपंचाची आसक्तता । नारायणपर तत्त्वतां निजबोधें ॥ ६८ ॥
गरिबी आणि श्रीमंती दोन्ही त्याच्या चित्ताला समान असतात; त्याला प्रपंचाची आसक्ती नसून तो केवळ भगवद्भावात असतो.
या प्रपंचाचा कठिण लागु । नाशासी मूळ स्त्रीसंगु ।
येचिविषी गुरु पतंगू । केला चांगु परियेसीं ॥ ६९ ॥
या प्रपंचाचा पाश अत्यंत कठीण आहे आणि विनाशाचे मुख्य मूळ स्त्रीसंगातील आसक्ती आहे; याविषयी मी 'पतंगाला' (पाखराला) गुरू केले, ते ऐक.
दृष्ट्वा स्त्रियं देवमायां तद्भावैरजितेन्द्रियः ।
प्रलोभितः पतत्यन्धे तमस्यग्नौ पतङ्गवत् ॥ ७ ॥
देवमायेसारख्या स्त्रियांच्या हावभावांनी ज्याची इंद्रिये जिंकली गेलेली नाहीत असा प्रलोभित झालेला पुरुष पतंगाप्रमाणे घनघोर अंधारात किंवा अग्नीत जाऊन पडतो.
दैवी गुणमयी जे माया । तिचें सगुणस्वरूप त्या स्त्रिया ।
तेथ प्रलोभ उपजला प्राणियां । भोग भोगावया स्त्रीसुखें ॥ ७० ॥
ईश्वराची जी त्रिगुणात्मक माया आहे, तिचे प्रत्यक्ष रूप म्हणजे स्त्रिया होत; तिथे माणसाला स्त्रीसुख भोगण्याचे प्रलोभन निर्माण होते.
हावभावविलासगुणीं । व्यंकट कटाक्षांच्या बाणीं ।
पुरुषधैर्य कवच भेदोनि । हृदयभवनीं संचरती ॥ ७१ ॥
स्त्रियांचे हावभाव आणि तिरक्या कटाक्षांचे बाण पुरुषाच्या धैर्याचे कवच भेदून त्याच्या हृदयात शिरतात.
दारुण कटाक्षांच्या घायीं । पुरुषधैर्य पाडिलें ठायीं ।
योषिताबंदीं पाडिले नाहीं । भोगकारागृहीं घातले ॥ ७२ ॥
कटाक्षांच्या जखमांमुळे पुरुषाचे धैर्य खचते आणि तो स्त्रीच्या मोहात पडतो व उपभोगाच्या तुरुंगात बंदिस्त होतो.
स्त्रीभोगाचें जें सुख । तें जाण पां केवळ दुःख ।
तोंडीं घालितां मधुर विख । परिपाकीं देख प्राणांतू ॥ ७३ ॥
स्त्रीसुखाचा उपभोग म्हणजे केवळ दुःखच आहे; तोंडात घालताना गोड लागणारे विष शेवटी प्राणांत घडवते, तसा हा प्रकार आहे.
दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ।
बळें आलिगूं जातां पैं गा । मरणमार्गा लागले ॥ ७४ ॥
दिव्याच्या ज्योतीला स्पर्श करण्यात पतंगाला काय सुख मिळणारे? तिला कवटाळायला जाताच तो मृत्यूच्या मार्गाला लागतो.
पुढिला पतंग निमाला देखती । तरी मागिल्या दीपीं अतिआसक्ती ।
तेवीं स्त्रीकामें एक ठकती । एकां अतिप्रीती पंतगन्यायें ॥ ७५ ॥
पुढचा पतंग जळताना पाहूनही मागचे पतंग जसे दिव्यावर तुटून पडतात, तसेच एकाला स्त्रीसंगाने दुःखी होताना पाहूनही दुसरे लोक मोहात पडतात.
तेवीं विवेकहीन मूर्खा । लोलुप्य उपजे स्त्रीसुखा ।
तत्संसर्गें मरण लोकां । न चुके देखा सर्वथा ॥ ७६ ॥
तसेच विवेक नसलेल्या मूर्खाला स्त्रीसुखाची लालसा सुटते आणि त्या संगाने लोकांचा विनाश टळत नाही.
दीप-रूपाचेनि कोडें । पतंग जळोनि स्नेहीं बुडे ।
तेवीं स्त्रीसंगे अवश्य घडे । पतन रोकडें अंधतमीं ॥ ७७ ॥
दिव्याच्या रूपाला भुलून पतंग जसा तेलात/आगीत जळून मरतो, तसेच स्त्रीसंगाने माणसाचे घोर अंधारात पतन होते.
योषिद्धिरण्याभरणाम्बरादि द्रव्येषु मायारचितेषु मूढः ।
प्रलोभितः त्मा ह्युपभोगबुद्ध्या पतङ्गवन्नश्यति नष्टदृष्टिः ॥ ८ ॥
मायेने निर्माण केलेल्या स्त्री, सुवर्ण, दागिने व वस्त्रे इत्यादी पदार्थांत उपभोगबुद्धीने भुललेला, विवेक गमावलेला मूढ मनुष्य पतंगाप्रमाणे नष्ट होतो.
पहा पां कांता आणि सोनें । वस्त्रें आभरणें रत्नेष ।
मायेनें रचिलीं पडणें । पतनाकारणें जनांच्या ॥ ७८ ॥
स्त्री, सोने, वस्त्रे, दागिने आणि रत्ने हे सर्व मायेने लोकांना पाडण्यासाठी पसरलेले पाश आहेत.
एकली योषिता नरकीं घाली । सुवर्णलोभे नरकु बळी ।
रत्नेंो भूषणें तत्काळीं । नरकमेळीं घालिती ॥ ७९ ॥
केवळ स्त्रीची आसक्ती नरकात ढकलते, सोन्याचा लोभ अधिक भयंकर नरक देतो आणि रत्ने व दागिने तत्काळ विनाशाकडे नेतात.
ते अवघेचि अनर्थकारी । मीनले योषिताशरीरीं ।
ते देखतांचि पुरंध्री । जनांसी उरी मग कैंचेनि ॥ ८० ॥
हे सर्व अनर्थकारी घटक स्त्रीच्या रूपात एकत्र आलेले असतात; मग त्या स्त्रीला पाहताच माणसाचा विवेक कसा टिकणार?
अंगीं वेताळसंचारा । त्यावरी पाजिलिया मदिरा ।
मग डुल्लत नाचतां त्या नरा । वोढावारा पैं नाहीं ॥ ८१ ॥
अंगात वेताळ संचारलेला असताना त्याला दारू पाजली, तर तो माणूस जसा बेभान होऊन नाचतो;
कां भांडाचे तोंडीं भंडपुराण । त्यावरी आला शिमग्याचा सण ।
मग करितां वाग्विटंबन । आवरी कोण तयासी ॥ ८२ ॥
किंवा भानगडी माणसाच्या तोंडात असभ्य भाषा असताना वर शिमग्याचा सण आला, तर त्याला कोण आवरणार?
हो कां मोहक मदिरा सर्वांसी । त्यांतु घातलें उन्मादद्रव्यासी ।
सेवन करितां त्या रसासी । पारु भ्रमासी पैं नाहीं ॥ ८३॥
किंवा मोह पाडणाऱ्या दारूत आणखी मादक पदार्थ मिसळला, तर ते प्याल्यावर भ्रमाला सीमा उरत नाही;
तैसें सोलीव मोहाचें रूप । तें जाण योषितास्वरूप ।
त्याहीवरी खटाटोप । वस्त्रें पडप भूषणें ॥ ८४ ॥
तसेच मोहाचे मूळ रूप म्हणजे स्त्री; आणि त्यावर पुन्हा वस्त्रे व दागिन्यांचा नटवेपणा!
काजळ कुंकूं अलंकार । लेऊनि विचित्र पाटांबर ।
वनिता शोभित सुंदर । मायेचे विकार विकारले ॥ ८५ ॥
काजळ, कुंकू, अलंकार आणि रेशमी वस्त्रे नेसून स्त्री सुंदर दिसते, जे मायेचेच विकार आहेत.
माया अजितेंद्रिया बाधी । दासांसंमुख नव्हे त्रिशुद्धी ।
ज्याची अतिप्रीति गोविंदीं । त्यासी कृपानिधि रक्षिता ॥ ८६ ॥
ही माया केवळ अजितेद्रिय (इंद्रिये न जिंकलेल्या) लोकांनाच बाधते; पण ज्याची गोविंदावर अतिशय प्रीती आहे, त्याला कृपानिधी परमेश्वर सुरक्षित ठेवतो.
कैसा रीतीं रक्षी भक्त । मूळीं आत्मा आत्मी नाहीं तेथ ।
स्त्रीरूपें भासे भगवंत । भक्त रक्षित निजबोधें ॥ ८७ ॥
देव भक्ताचे रक्षण कसा करतो? भक्ताला स्त्रीमध्येही साक्षात भगवंतच दिसतो, त्यामुळे तो मोहापासून वाचतो.
वनिता देखोनि गोमटी । विवेकाची होय नष्ट दृष्टी ।
प्रलोभें उपभोगा देती मिठी । ते दुःखकोटी भोगिती ॥ ८८ ॥
सुंदर स्त्री पाहून ज्याची विवेकदृष्टी नष्ट होते आणि जो उपभोगासाठी धावतो, तो करोडो दुःखे भोगतो.
देखोनि दीपरूपीं झगमगी । उपभोगबुद्धि पतंगी ।
उडी घालितां वेगीं । जळोनि आगीं नासती ॥ ८९ ॥
दिव्याची झगमग पाहून पतंग उपभोगबुद्धीने वेगाने उडी मारतो आणि जळून खाक होतो.
एवं योषितारूपें माया । उपभोग भुलवी प्राणियां ।
जे विमुख हरीच्या पायां । त्यांसीच माया भुलवितु ॥ ९० ॥
अशी स्त्रीरूपातील माया प्राण्यांना भुलवते; जे भगवंताच्या चरणांपासून विमुख आहेत, त्यांनाच ही माया जाळ्यात ओढते.
मधुकरीचेनि विंदाणें । मधुकर म्यां गुरु करणें ।
दुःख नेदितां कार्य साधणें । तींहि लक्षणें परिस पां ॥ ९१ ॥
आता भुंग्याची (मधुकराची) युक्ती पाहून मी भुंग्याला गुरू केले; कोणालाही त्रास न देता आपले काम कसे साधावे, ती लक्षणे ऐक.
स्तोकं स्तोकं ग्रसेद् ग्रासं देहो वर्तेत यावता ।
गृहानहिंसन्नातिष्ठेद् वृत्तिं माधुकरीं मुनिः ॥ ९ ॥
मुनीने भुंग्याप्रमाणे घरच्यांना त्रास न देता, शरीराच्या निर्वाहापुरता थोडा थोडा आहार भिक्षेने गोळा करावा.
भ्रमरु रिघोनि पुष्पामधीं । फुल तरी कुचुंबों नेदी ।
आपुली करी अर्थसिद्धी । चोखट बुद्धि भ्रमराची ॥ ९२ ॥
भुंगा फुलावर बसतो, पण फुलाला थोडीही इजा न पोहोचवता आपला मध गोळा करतो; ही भुंग्याची चतुर बुद्धी आहे.
तैसेच योगियाची परी । ग्रासमात्र घरोघरीं ।
भिक्षा करूनि उदर भरी । पीडा न करी गृहस्थां ॥ ९३ ॥
तशीच योग्याची रीत असते; तो घरोघरी जाऊन केवळ एका आहारापुरती भिक्षा मागतो आणि गृहस्थाला कसलाही त्रास देत नाही.
प्राणधारणेपुरतें । योगी मागे भिक्षेतें ।
समर्थ दुर्बळ विभागातें । न मनूनि चित्तें सर्वथा ॥ ९४ ॥
केवळ प्राण जगवण्यासाठी योगी भिक्षा मागतो; श्रीमंत-गरीब असा भेदभाव तो मनात ठेवत नाही.
रिघोनि कमळिणीपाशीं । भ्रमरु लोभला आमोदासी ।
पद्म संकोचे अस्तासी । तेंचि भ्रमरासी बंधन ॥ ९५ ॥
कमळावर बसून भुंगा त्याच्या सुवासात रंगून जातो; सूर्य मावळताच कमळ मिटते आणि तो भुंगा त्यात बंदिस्त होतो.
जो कोरडें काष्ठ भेदोनि जाये । तो कमळदळीं गुंतला ठाये ।
प्रिया दुखवेल म्हणौनि राहे । निर्गमु न पाहे आपुला ॥ ९६ ॥
जो भुंगाण कोरडे लाकूड कोरून पार जाऊ शकतो, तो कमळाच्या नाजूक पाकळ्यांना इजा होईल म्हणून आतच अडकून राहतो!
तैसाचि जाण संन्यासी । एके ठायीं राहिल्या लोलुप्येंसीं ।
तेंचि बंधन होये त्यासी । विषयलोभासी गुंतला ॥ ९७ ॥
तसाच संन्यासी एकाच ठिकाणी आसक्तीने राहिला तर तेच त्याचे बंधन बनते आणि तो विषयात गुंततो.
अणुभ्यश्च महद्भ्य-श्च शास्त्रेभ्यः कुशलो नरः ।
सर्वतः सारमादद्यात् पुष्पेभ्य इव षट्पदः ॥ १० ॥
भुंगा जसा लहान-मोठ्या सर्व फुलांमधून मध गोळा करतो, तसा प्रगल्भ माणसाने लहान-मोठ्या सर्व शास्त्रांमधून सार गोळा करावे.
अतिलहान सुमन जें कांहीं । भ्रमरा तेथ उपेक्षा नाहीं ।
रिघोनि त्याच्याही ठायीं । आमोद पाहीं सेवितु ॥ ९८ ॥
अत्यंत लहान फूल असले तरी भुंगा त्याचा अनादर करत नाही, तिथूनही तो सुवास ग्रहण करतो.
थोराथोरा ज्या कमळिणी । विकासल्या समर्थपणीं ।
त्यांच्याही ठायीं रिघोनी । सारांश सेवुनी जातसे ॥ ९९ ॥
मोठ्या फुललेल्या कमळांतूनही तो सार (मध) घेऊन निघून जातो.
तैसाचि योगिया नेटकु । शास्त्रदृष्टी अतिविवेकु ।
न करी लहान थोर तर्कु । सारग्राहकू होतसे ॥ १०० ॥
तसाच सुज्ञ योगी सर्व शास्त्रांचा अभ्यास करून, लहान-मोठा असा भेद न करता केवळ मुख्य सार ग्रहण करतो.
वेदांतीं ब्रह्मस्थिती । बोलिली मानी यथानिगुतीं ।
इतर स्तोत्रीं ब्रह्मव्युत्पत्ती । तेही अतिप्रीतीं मानितू ॥ १०१ ॥
वेदांतातील ब्रह्मज्ञान तो स्वीकारतो आणि इतर स्तोत्रांतील ज्ञानही आवडीने ग्रहण करतो.
पंडितांचें वचन मानी । साधारणु बोलिला हितवचनीं ।
तेहीं अतिआदरें मानुनी । सार निवडूनि घेतसे ॥ १०२ ॥
विद्वानांचे बोलणे असो किंवा साध्या माणसाचे हिताचे शब्द असोत, तो आदराने त्यातील सार निवडतो.
प्रीती होआवी पतीच्या मानसीं । कुळवधू मानी सासुसासर्यांंसी ।
मान देतसे त्यांच्या दासासी । तेचि प्रीतीसी लक्षूनि ॥ १०३ ॥
पतीचे प्रेम मिळावे म्हणून कुळवधू जशी सासू-सासऱ्यांना नि त्यांच्या सेवकांनाही मान देते;
भेसळल्या क्षीरनीरासी । निवडुनि घेईजे राजहंसीं ।
तैसा विवेकयुक्त मानसीं । सारभागासी घेतसे ॥ १०४ ॥
दूध आणि पाणी एकत्र केले तरी राजहंस जसा दूध वेगळे करून पितो, तसा विवेकशील पुरुष केवळ सार घेतो.
सर्वभूतीं भगवद्भावो । हा सारभागु मुख्य पहा हो ।
हे निष्ठा ज्यासि महाबाहो । त्यासी अपावो स्वप्नीं नाहीं ॥ १०५ ॥
सर्व प्राण्यांत भगवद्भाव ठेवणे हाच मुख्य सारभाग आहे; ही निष्ठा ज्याच्याजवळ आहे, त्याला स्वप्नातही संकट येत नाही.
भरलेया जगाआंतु । सारभागी तो योगयुक्तु ।
यदूसि अवधूत सांगतु । गुरुवृत्तांसु लक्षणें ॥ १०६ ॥
सर्व जगात जो सार ग्रहण करतो तोच खरा योगी होय; असे अवधूत यदूला गुरूंचे वर्णन सांगत आहेत.
गुरुत्वें म्यां मानिली माशी । ऐके राया दो प्रकारेंसी ।
एक ते मोहळमासी । ग्रामवासी दूसरी ॥ १०७ ॥
हे राजा, मी माशीला दोन प्रकारे गुरू मानले — १. मधाची माशी (मधुमाशी) आणि २. घरातील माशी.
सायन्तनं श्वस्तनं वा न सङ्गृह्णीत भिक्षितम् ।
पाणिपात्रोदरामत्रो मक्षिकेव न सङ्ग्रही ॥ ११ ॥
भिक्षूने माशीप्रमाणे संध्याकाळच्या किंवा दुसऱ्या दिवसाच्या भिक्षेचा संग्रह करू नये; आपले हात हेच पात्र आणि पोट हेच भांडे समजावे.
पहा पां घरींची माशी । बैसल्या साखरेचे राशीं ।
हातीं धरोनि घाली मुखाशी । संग्रहो तिसी पैं नाहीं ॥ १०८ ॥
घरातील माशी साखरेच्या राशीवर बसली तरी हाताने तोंडात टाकते, पण साठवून ठेवत नाही.
हे होईल सायंकाळा । हे भक्षीन प्रातःकाळां । ऐसा संग्रहो वेगळा । नाहीं केला मक्षिका ॥ १०९ ॥
"हे संध्याकाळी खाईन, हे सकाळी खाईन" असा साठा माशी कधीही करत नाही.
तैशी योगसंन्यासगती । प्राप्तभिक्षा घेऊनि हातीं ।
तिसी निक्षेपु मुखाप्रती । संग्रहस्थिति त्या नाहीं ॥ ११० ॥
तशीच संन्याशाची वृत्ती असावी; मिळालेली भिक्षा खाऊन तृप्त व्हावे, साठा करून ठेवू नये.
भिक्षेलागीं पाणिपात्र । सांठवण उदरमात्र ।
या वेगळें स्वतंत्र । नाहीं घरपात्र सांठवणें ॥ १११ ॥
भिक्षेसाठी हात हेच भांडे आणि साठवण्यासाठी केवळ पोट! याव्यतिरिक्त वस्तू साठवण्याचे भांडे नसावे.
सायन्तनं श्वस्तनं वा न सङ्गृह्णीत भिक्षुकः ।
मक्षिका इव सङ्गृह्णन् सह तेन विनश्यति ॥ १२ ॥
मधुमाशीप्रमाणे पुढील काळासाठी भिक्षा साठवणारा भिक्षूक त्या संग्रहासह नष्ट होतो.
सायंकाळ-प्रातःकाळासी । भक्ष्यसंग्रहो नसावा भिक्षूसी ।
संग्रहें पावती नाशासी । येविषीं मधुमाशी गुरु केली ॥ ११२ ॥
भिक्षूने सकाळ-संध्याकाळसाठी अन्न साठवू नये; साठवण्याने विनाश होतो, म्हणूनच मी मधमाशीला गुरू केले.
रिघोनि नाना संकटस्थानांसी । मधुसंग्रहो करी मधुमाशी ।
तो संग्रहोचि करी धातासी । मधु न्यावयासी जैं येती ॥ ११३ ॥
मधमाशी अनेक बिकट ठिकाणी जाऊन मध साठवते, पण तोच साठा शेवटी तिच्या नाशाला कारणीभूत ठरतो.
संग्रहो यत्नाचिया चाडा । मोहळ बांधिती अवघडां कडां ।
ते दुर्गमीं रिगु करिती गाढा । अर्थचाडा मधुहर्ते ॥ ११४ ॥
मधमाशा मोठ्या कष्टाने कड्या कपारीत पोळे बांधतात, पण मध काढणारे लोक लोभाने तिथे पोहोचतातच.
कां झाडितां मोहळासी । नाशु होतसे मसियांसी ।
संग्रहाची जाती ऐशी । जीवाघातासी करवितु ॥ ११५ ॥
मध काढताना माशांना मारून टाकले जाते; साठवणूक करण्याची सवयच जिवाचा घात करते!
ऐसें देखोनिया जनीं । भक्तभिक्षुकयोगीसज्जनीं ।
संग्रहो न करावा भरंवसेनी । नाशु निदानीं दिसतसे ॥ ११६ ॥
हे पाहून साधक, भिक्षू व संतांनी कोणत्याही गोष्टीचा साठा करू नये, कारण त्यात विनाश ठरलेला आहे.
आचारावें सत्कर्म । संग्रहावा शुद्ध धर्म ।
हेंचि नेणोनियां वर्म । धनकामें अधम नाशती ॥ ११७ ॥
सत्कर्म आचरावे आणि धर्माचा साठा करावा; हे न जाणता धनाच्या लोभाने अज्ञानी लोक नष्ट होतात.
अर्थ विनाशाचें फळ । दुसरें एक नाशाचें मूळ ।
विशेष नाशाचें आहळबाहळ । स्त्री केवळ वोळख पां ॥ ११८ ॥
धनाचा संचय विनाशाला कारणीभूत आहे, तसेच विनाशाचे दुसरे मुख्य मूळ म्हणजे स्त्रीसंगाची आसक्ती.
मूळ नाशासि जीविता । कनक आणि योषिता ।
जंव जंव यांची आसक्तता । तंव तंव चढता भवरोगु ॥ ११९ ॥
आयुष्याच्या विनाशाचे मूळ म्हणजे 'कनक' (सुवर्ण/धन) आणि 'कामिनी' (स्त्री); यांची आसक्ती वाढेल तितका संसाराचा रोग वाढतो.
कनक आणि कामिनी । ज्यासी नावडे मनींहुनी ।
तोचि जनार्दनू जनीं । भरंवसेंनी ओळख पां ॥ १२० ॥
ज्याच्या मनात धन नि स्त्रीचा लोभ उरत नाही, तोच जगात साक्षात जनार्दन (परमात्मा) होय!
जो सुख इच्छील आपणासी । तेणें नातळावें स्त्रियेसी ।
येचिविषयीं मदगजासी । गुरु विशेषीं म्यां केला ॥ १२१ ॥
ज्याला स्वतःचे कल्याण हवे असेल त्याने स्त्रीसंगापासून दूर राहावे; यासाठी मी 'मत्त हत्तीला' (मदगजाला) गुरू केले.
पदापि युवतीं भिक्षुर्न स्पृशेद् दारवीमपि ।
स्पृशन् करीव बध्येत करिण्या अङ्गसङ्गतः ॥ १३ ॥
भिक्षूने लाकडाची पुतळी असली तरी तरुण स्त्रीला पायानेही स्पर्श करू नये; हत्ती जसा हस्तिणीच्या स्पर्शाने जाळ्यात बांधला जातो, तसा मनुष्य बांधला जातो.
पहा पां षष्टिहायन भद्रजाती । त्यांपुढें मनुष्य तें किंती ।
ते हस्तिणीचे अंगसंगतीं । बंधन पावती मनुजांचें ॥ १२२ ॥
साठ वर्षांचा प्रचंड हत्ती माणसांपुढे अथांग ताकदीचा असतो, पण तो हस्तिणीच्या स्पर्शाच्या मोहामुळे माणसांच्या बेड्यांत अडकतो!
जो दृष्टीं नाणी मनुष्यांसी । तो स्त्रियां वश केला मानवांसी ।
त्यांचेनि बोलें उठी बैसी । माथां अंकुशीं मारिजे ॥ १२३ ॥
जो हत्ती माणसांना जुमानत नाही, तो हस्तिणीच्या मोहाने माणसांचा गुलाम बनतो नि डोक्यावर अंकुश खातो.
एवं जिणावया संसारासी । जे स्वधर्मनिष्ठ संन्यासी ।
तिंही देखोनि योषितांसी । लागवेगेंसी पळावें ॥ १२४ ॥
म्हणून संसार जिंकू इच्छिणाऱ्या संन्याशांनी स्त्रीचा प्रसंग दिसताच वेगाने लांब पळावे.
नको स्त्रियांची भेटी । नको स्त्रियांसी गोष्टी ।
स्त्री देखतांचि दिठीं । उठाउठीं पळावें ॥ १२५ ॥
स्त्रीची भेट नको, तिची चर्चा नको; स्त्री दिसताच तिथून निघून जावे.
पळतां पळतां पायांतळी । आल्या काष्ठाची पुतळी ।
तेही नातळावी कुशळीं । निर्जीव स्त्री छळी पुरुषातें ॥ १२६ ॥
पळताना पायाखाली लाकडाची स्त्रीची पुतळी आली तरी तिला स्पर्श करू नये, कारण ती निर्जीव पुतळीही पुरुषाच्या मनात विकार उठवते.
अनिरुद्धें स्वप्नीं देखिली उखा । तों धरूनि नेला चित्ररेखा ।
बाणासुरें बांधिला देखा । कृष्णा सखा जयाचा ॥ १२७ ॥
श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्धाने स्वप्नात उषेला पाहिले, तर चित्ररेखेने त्याला पळवून नेले नि बाणासुराने त्याला बंदिस्त केले!
त्यासी सोडवणेलागीं हरी । धांवतां आडवा आला कामारी ।
युद्ध जालें परस्परीं । शस्त्रास्त्री दारुण ॥ १२८ ॥
त्याला सोडवण्यासाठी श्रीकृष्ण धावले तेव्हा शंकर आडवे आले आणि प्रचंड युद्ध झाले.
एवं हरिहरां भिडतां । जो बांधला स्वप्नींचिया कांता ।
तो सहसा न सुटेची शोचितां । इतरांची कथा कायसी ॥ १२९ ॥
केवळ स्वप्नातील स्त्रीमुळे अनिरुद्ध बंदिस्त झाला नि हरि-हरांचे युद्ध घडले; तिथे सामान्य माणसाची काय कथा?
पहा पां स्वप्नींचिया कांता । अनिरुद्धासी केली निरुद्धता ।
मा साचचि स्त्री हाती धरितां । निर्गमता त्या कैचा ॥ १३० ॥
स्वप्नातील स्त्रीने माणसाला अडकवून टाकले, तर प्रत्यक्ष स्त्रीचा संग करणाऱ्याची सुटका कशी होणार?
'पुरुष' आपणया म्हणविती । सेखीं स्त्रियांचे पाय धरिती ।
त्यांसी कैसेनि होईल मुक्ती । स्त्रीसंगतीं अधःपात ॥ १३१ ॥
स्वतःला पुरुष म्हणवणारे शेवटी स्त्रीचे दास बनतात; अशांना मुक्ती कशी मिळणार? स्त्रीसंगाने पतनच होते.
नाधिगच्छेत् स्त्रियं प्राज्ञः कर्हिचिन्मृत्युमात्मनः ।
बलाधिकैः स हन्येत गजैरन्यैर्गजो यथा ॥ १४ ॥
बुद्धिवान पुरुषाने स्त्रीला स्वतःचा मृत्यू मानून तिचा कधीही संग करू नये; दुसऱ्या बलवान हत्तींकडून जसा हत्ती मारला जातो, तसा तो मारला जातो.
क्रीडतां गजींमाजीं गजपती । त्यावरी सबळ भद्रजाती ।
येऊनियां युद्ध करिती । निजबळें मारिती तयातें ॥ १३२ ॥
हस्तिणीशी खेळणाऱ्या हत्तीवर इतर बळकट हत्ती हल्ला करतात आणि त्याला मारून टाकतात.
तो मारोनियां हस्ती । त्या हस्तिणी समस्ती ।
सबळ भोगी भद्रजाती । नाशाप्रती स्त्री मूळ ॥ १३३ ॥
त्याला मारून ते बळकट हत्ती त्या हस्तिणीला पळवतात; विनाशाचे मूळ स्त्रीच ठरते.
अहल्येचिया संगतीं । गौतमें विटंबिला अमरपती ।
भस्मासुरासी नाशप्राप्ती । स्त्रीसंगतीस्तव जाली ॥ १३४ ॥
अहल्येच्या प्रसंगाने इंद्राची दुर्दशा झाली, तर मोहिनीच्या रूपाने भस्मासुराचा संहार झाला.
देखोनि तिलोत्तमा उत्तम वधू । सुंद उपसुंद सखे बंधु ।
स्त्रीअभिलाषें चालिला क्रोधु । सुहृदसंबंधू विसरले ॥ १३५ ॥
तिलोत्तमेला पाहून सुंद आणि उपसुंद हे सख्खे भाऊ स्त्रीच्या लोभाने परस्परांचे शत्रू बनले.
मग स्त्रीविरहें युद्धाचे ठायीं । दोघे निमाले येरयेरांचे घायीं ।
शेखीं स्त्रीभोगुही नाहीं । मरणमूळ पाहीं योषिता ॥ १३६ ॥
आपापसांत युद्ध करून दोघेही मारले गेले; स्त्रीचा उपभोगही मिळाला नाही नि मरण ओढवले!
ऐसीच पूर्वकल्पींची कथा । अवतारी श्रीकृष्ण नांदतां ।
तेणें शिशुपाळ गांजोनि सर्वथा । हिरोनि कांता पैं नेली ॥ १३७ ॥
पूर्वकल्पात श्रीकृष्णाने शिशुपालाला हरवून रुक्मिणीला हस्तगत केले होते.
एवं सुरनरपशूंप्रती । नाशासी मूळ स्त्रीसंगती ।
तिचेनि संगें गृहासक्ती । कलहप्राप्ती स्त्रीमूळ ॥ १३८ ॥
देव, मानव नि पशूंसाठी विनाशाचे मुख्य मूळ स्त्रीसंगतीच आहे; त्यामुळे कलह व संसारात आसक्ती निर्माण होते.
ग्राम्य स्त्रियांचे संगतीं जाणें । तो बैसला मरणा धरणें ।
मरण आल्याही न करणें । जीवेंप्राणें स्त्रीसंगु ॥ १३९ ॥
विषयसंगात गुंतणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे होय; प्राण गेला तरी कुसंग करू नये.
वेश्येचे संगती जातां । बळाधिक्य करी घाता ।
निरंतर स्वपत्नी भोगितां । नाहीं बाधकता हें न म्हणे ॥ १४० ॥
वेश्यागमन विनाशाकडे नेते; पण स्वतःच्या पत्नीशीही अति-आसक्ती बाधकच ठरते.
अविश्रम स्त्री सेवितां । कामु पावे उन्मत्तता ।
उन्मत्त कामें सर्वथा । अधःपाता नेइजे ॥ १४१ ॥
सतत कामोपभोगात राहिल्याने कामवासना उन्मत्त बनवते आणि माणसाचे पतन करते.
एवं हा ठावोवरी । स्त्रीसंग कठिण भारी ।
क्वचित्संगु जाल्यावरी । नरकद्वारीं घालील ॥ १४२ ॥
स्त्रीसंगाचा पाश इतका भयंकर आहे की थोडीही आसक्ती नरकाच्या दारात ढकलते.
नरकीं घालील हे वार्ता । उद्धाराची कायसी कथा ।
नरकरूप ग्राम्य योषिता । पाहें सर्वथा निर्धारें ॥ १४३ ॥
जी गोष्ट नरकात ढकलते, ती उद्धार कसा करणार? म्हणून विषयवासना नरकरूपच जाणावी.
स्त्री आणि दुसरा अर्थु । हाचि ये लोकीं घोर अनर्थु ।
येणें अंतरला निजस्वार्थु । शेखीं करी घातु प्राणाचा ॥ १४४ ॥
'कामिनी' आणि 'कांचन' (स्त्री नि धन) हेच जगातील दोन मोठे अनर्थ आहेत; यामुळे परमार्थ अंतरतो नि जिवाचा घात होतो.
न देयं नोपभोग्यं च लुब्धैर्यद् दुःखसञ्चितम् ।
भुङ्क्ते तदपि तच्चान्यो मधुहेवार्थविन्मधु ॥ १५ ॥
कृपण माणसाने दुःखा कष्टाने साठवलेले धन तो स्वतः खात नाही आणि दानही करत नाही; मधमाशीचा मध जसा दुसराच नेतो, तसे ते धन भलतेच भोगतात.
स्वयें खाये ना धर्मु न करी । घरच्यांसी खाऊं नेदी दरिद्री ।
मधुमक्षिकेच्या परी । संग्रहो करी कष्टोनि ॥ १४५ ॥
कृपण माणूस स्वतः खात नाही, धर्म करत नाही नि घरच्यांनाही देत नाही; तो मधमाशीप्रमाणे कष्टाने साठा करतो.
माशा मोहळ बांधिती बळें । माजीं सांचले मधाचे गोळे ।
तें देखोनि जगाचे डोळे । उपायबळें घेवों पाहाती ॥ १४६ ॥
माशा कष्टाने पोळे बनवून मध साठवतात; पण ते पाहून लोक युक्तीने तो मध काढून घेतात.
मग झाडींखोडीं अरडींदरडीं । जेथिंच्या तेथ जगु झोडी ।
भरती मधाचिया कावडी । ते सेविती गोडी श्रीमंत ॥ १४७ ॥
लोक झाडांवरून वा कड्यांवरून माशा पळवून मधाच्या कावडी भरतात नि श्रीमंत लोक त्याचा आस्वाद घेतात!
माशा मधु न खाती काकुळतीं । झाडित्याचे हात माखती ।
स्वा दु श्रीमंत सेविती । ज्यांसी लक्ष्मीपती प्रसन्न ॥ १४८ ॥
माशांना मध मिळत नाही, काढणाऱ्याचे हात मळतात आणि उपभोग मात्र तिसराच घेतो!
तैसेंचि कृपणाचें यक्षधन । नाहीं दान धर्मसंरक्षण ।
त्यातें तस्कर नेती मारून । त्यांसही दंडून राजा ने ॥ १४९ ॥
तद्वतच कंजूषाचे धन दानधर्मात जात नाही; ते चोर मारून नेतात किंवा राजा जप्त करतो!
जे शिणोनि संग्रह करिती । त्यांसी नव्हे भोगप्राप्ती ।
ते द्रव्यें अपरिग्रही सेविती । दैवगती विचित्र ॥ १५० ॥
जे कष्टाने साठा करतात त्यांना भोग मिळत नाही, तर निष्काम/भाग्यवान लोक त्याचा उपभोग घेतात.
प्रयासें गृहस्थ करवी अन्न । तें संन्यासी न शिणतां जाण ।
करूनि जाय भोजन । अदृष्ट प्रमाण ये अर्थी ॥ १५१ ॥
गृहस्थ कष्टाने स्वयंपाक बनवतो, पण संन्यासी न कष्ट करता येतो नि जेवून जातो! हे सर्व प्रारब्धाचे फळ आहे.
यालागीं दैवाधीन जो राहे । तो संग्रहाची चाड न वाहे ।
तें अदृष्टचि साह्य आहे । कृपणता वायें करिताति ॥ १५२ ॥
म्हणूनच जो प्रारब्धावर विश्वास ठेवतो तो साठा करत नाही; कंजूषपणा करणे व्यर्थ आहे.
सुदुःखोपार्जितैर्वित्तैराशासानां गृहाशिषः ।
मधुहेवाग्रतो भुङ्क्ते यतिर्वै गृहमेधिनाम् ॥ १६ ॥
अत्यंत दुःखाने साठवलेल्या अन्नाचा व धनाचा उपभोग गृहस्थाच्या आधी संन्यासी (यती) घेतो, जसा मधमाशीचा मध मध काढणारा आधी घेतो.
दुःखें उपार्जूनि वित्त । गृहसामग्री नाना पदार्थ ।
त्याचे पाक करवी गृहस्थ । निजभोगार्थ आवडीं ॥ १५३ ॥
गृहस्थ दुःखाने पैसे कमवून घरात उत्तम पदार्थ व स्वयंपाक बनवतो.
तेथ समयीं आला अतिथ । संन्यासी ब्रह्मचारी अन्नार्थ ।
गृहस्थाआधीं तो सेवित । तोंड पाहत गृहमेधी ॥ १५४ ॥
पण तिथे ऐन वेळी संन्यासी अतिथी म्हणून येतो नि गृहस्थाच्या आधी ते भोजन करतो, तर गृहस्थ पाहत राहतो!
जैसें दवडून मोहळमाशियांसी । मधुहर्ता मधु प्राशी ।
तैसें होय गृहस्थासी । नेती संन्यासी सिद्धपाकु ॥ १५५ ॥
माशांना पळवून मध काढणारा जसा मध खातो, तसेच संन्यासी येऊन तयार स्वयंपाक ग्रहण करतात.
समयीं पराङ्मुसख झालिया यती । सकळ पुण्यें क्षया जाती ।
यथाकाळीं आलिया अतिथी । स्वधर्मु रक्षिती सर्वथा ॥ १५६ ॥
आलेल्या यतीला विन्मुख घालवले तर पुण्य नष्ट होते; म्हणूनच अतिथीची सेवा करणे हा गृहस्थाचा धर्म आहे.
अर्थसंग्रहाची बाधकता । तुज म्यां सांगितली तत्त्वतां ।
मृग गुरु केला सर्वथा । तेही कथा परियेसी ॥ १५७ ॥
धन साठवण्याचे दोष मी तुला सांगितले; आता मी 'हरणाला' (मृग) गुरू मानले, ती कथा ऐक.
ग्राम्यगीतं न शृणुयाद् यतिर्वनचरः क्वचित् ।
शिक्षेत हरिणाद् बधान् मृगयोर्गीतमोहितात् ॥ १७ ॥
वनात राहणाऱ्या संन्याशाने (यतीने) विषययुक्त ग्राम्य गीते ऐकू नयेत; पारध्याच्या गाण्याला भुलून जाळ्यात अडकलेल्या हरणाकडून हा धडा शिकावा.
ग्राम्यजनवार्ता । कां ग्राम्य स्त्रियांच्या गीता ।
ऐके जो कां तत्त्वतां । बंधन सर्वथा तो पावे ॥ १५८ ॥
जो विषयांच्या गप्पा वा विषययुक्त गाणी ऐकतो, तो पूर्णपणे बंधनात अडकतो.
अखंड पाहतां दीपाकडे । घंटानादें झालें वेंडें ।
मृग पाहों विसरला पुढें । फांसीं पडे सर्वथा ॥ १५९ ॥
पारध्याच्या तालाला नि दिव्याला भुलून हरिण पुढे काय आहे हे विसरते नि फाशीत अडकते.
ग्राम्य योषितांचे गीत । ऐकतां कोणाचें भुलेना चित्त ।
मृगाच्या ऐसा मोहित । होय निश्चित निजस्वार्था ॥ १६० ॥
विषययुक्त गाणी ऐकून कोणाचे चित्त भुलणार नाही? माणूस हरणासारखा स्वतःचा परमार्थ विसरून जाळ्यात सापडतो.
जो बोलिजे तापसांचा मुकुटी । ज्यासी स्त्रियांसी नाहीं भेटगोष्टी ।
तो ऋष्यश्रृंग उठाउठी । स्त्रीगीतासाठीं भुलला ॥ १६१ ॥
तपस्वी लोकांमध्ये श्रेष्ठ असणारा ऋष्यशृंग ऋषी, ज्याने कधी स्त्री पाहिली नव्हती, तोसुद्धा स्त्रीच्या गाण्याने भुलला!
नृत्यवादित्रगीतानि जुषन् ग्राम्याणि योषिताम् ।
आसां क्रीडनको वश्य ऋष्यशृङ्गो मृगीसुतः ॥ १८ ॥
स्त्रियांचे नाच, गाणे व वाद्य ऐकून हरणीच्या पोटी जन्मलेला ऋष्यशृंग ऋषी त्या स्त्रियांच्या हातचे खेळणे बनला.
मधुर वीणागुणाक्वणित । ग्राम्य स्त्रियांचें गीत नृत्य ।
देखतां पुरुष वश्य होत । जैसें गळबंधस्थ वानर ॥ १६२ ॥
गोड वीणा नि गाणे-नाच पाहून माणूस गळ्यात दोरी बांधलेल्या माकडासारखा स्त्रीच्या वश होतो.
जो तपसांमाजीं जगजेठी । जो जन्मला मृगीच्या पोटीं ।
जो नेणे स्त्रियांची भेटीगोष्टी । न पाहे दृष्टीं योषिता ॥ १६३ ॥
जो तपातील महाश्रेष्ठ, हरणीच्या पोटी जन्मलेला आणि ज्याला स्त्री काय असते हेही माहीत नव्हते;
तो ऋष्यश्रृंग स्त्रीदृष्टीं । वश्य जाहला उठाउठी ।
धांवे योषितांचे पाठोवाठीं । त्यांचे गोष्टीमाजी वर्ते ॥ १६४ ॥
तो ऋष्यशृंगही स्त्रीच्या नजरेला भुलून तिच्या मागे धावू लागला नि तिच्या तालावर नाचू लागला!
गारुड्याचें वानर जैसें । स्त्रियांसंगें नाचे तैसें ।
प्रमदादृष्टीं जाहला पिसें । विवेकु मानसें विसरला ॥ १६५ ॥
गारुड्याच्या माकडाप्रमाणे तो स्त्रीच्या संगतीत नाचू लागला आणि आपला सर्व विवेक विसरला.
विसरला तपाचा खटाटोपु । विसरला विभांडक बापु ।
विसरला ब्रह्मचर्यकृत संकल्पु । स्त्रियानुरूपु नाचतु ॥ १६६ ॥
तो स्वतःचे तप, वडील विभांडक ऋषी आणि ब्रह्मचर्याचे व्रत सर्व काही विसरून गेला!
स्त्रीबाधे एवढा बाधु । संसारी आणिक नाहीं गा सुबुद्धु ।
नको नको स्त्रियांचा विनोदु । दुःखसंबंधु सर्वांसी ॥ १६७ ॥
विषयवासनेसारखा भयंकर अडथळा संसारात दुसरा नाही; म्हणूनच विषयसुखाचा विलास दुःखालाच कारणीभूत ठरतो.
वारिलें नाइकावें ग्राम्य गीता । हे सत्य सत्य गा सर्वथा ।
तेथ हरिकीर्तन कथा । जाहल्या परमार्थतां ऐकावें ॥ १६८ ॥
विषययुक्त गाणी ऐकू नयेत हे त्रिवार सत्य आहे; त्याऐवजी भगवंताचे कीर्तन नि कथा मनापासून ऐकाव्यात.
रामनामें विवर्जित । ग्रामणीं बोलिजे तें ग्राम्य गीत ।
तें नाइकावें निश्चित । कवतुकें तेथ न वचावें ॥ १६९ ॥
ज्या गाण्यात रामनाम नाही ते विषयगीत ऐकू नये नि कौतुकानेही तिकडे जाऊ नये.
मीन गुरु करणें । तेंही अवधारा लक्षणें ।
रसनेचेनि लोलुप्यपणें । जीवेंप्राणे जातसे ॥ १७० ॥
आता 'माशाला' (मीन) गुरू का मानले, ते ऐक; जिभेच्या चोचल्यांमुळे माशाचा प्राण कसा जातो, ते पाहा.
जिह्वयातिप्रमाथिन्या जनो रसविमोहितः ।
मृत्युमृच्छत्यसद्बुाधिर्मीनस्तु बडिशैर्यथा ॥ १९ ॥
अतिशय चंचल असणाऱ्या जिभेच्या आस्वादात भुललेला अज्ञानी माणूस माशाप्रमाणे गळाला लागून मृत्यू पावतो.
अर्थ संग्रहें जीवघातु । स्त्रिया-आसक्तीं अधःपातु ।
रसनालोलुप्यें पावे मृत्यु । त्रिविध घातु जीवासी ॥ १७१ ॥
धन साठवण्याने जिवाचा घात होतो, स्त्री-आसक्तीने पतन होते आणि जिभेच्या चोचल्यांमुळे मृत्यू येतो; हे तीन मोठे घात आहेत.
ज्यासी रसनालोलुप्यता गाढी । त्यासी अनर्थुचि जोडे जोडी ।
दुःखाच्या भोगवी कोडी । रसनागोडी बाधक ॥ १७२ ॥
ज्याला जिभेची लालसा जास्त, त्याला अनर्थच प्राप्त होतात; जिभेची गोडी कोट्यवधी दुःखांना आमंत्रण देते.
रसना आमिषाची गोडी । लोलुप्यें मीनु गिळी उंडी ।
सवेंचि गळु टाळू फोडी । मग चरफडी अडकलिया ॥ १७३ ॥
मांसाच्या तुकड्याच्या लोभाने मासा गळ गिळतो; गळ टाळूत रुतताच तो तडफडू लागतो!
पाहतां रस उत्तम दिसत । भीतरीं रोगांचे गळ गुप्त ।
रस आसक्तीं जे सेवित । ते चडफडित भवरोगी ॥ १७४ ॥
चव उत्तम लागते, पण आत रोगांचे गुप्त गळ लपलेले असतात; जे रसात अडकतात ते संसारात तडफडतात.
गळीं अडकला जो मासा । तो जिता ना मरे चरफडी तैसा ।
तेवीं रोगु लागल्या माणसा । दुर्दशा भोगित ॥ १७५ ॥
गळाला लागलेला मासा जसा तडफडतो, तसा जिभेच्या आहारी गेलेला माणूस रोगांनी ग्रासून दुर्दशा भोगतो.
जो रसनालोलुप्यप्रमादी । त्यासी कैंची सुबुद्धी ।
जन्ममरणें निरवधी । भोगी त्रिशुद्धी रसदोषें ॥ १७६ ॥
जो जिभेचा गुलाम आहे त्याला सद्बुद्धी कशी मिळणार? तो जन्म-मरणाचा फेराच भोगत राहतो.
रस सेविलियासाठीं । भोगवी जन्मांचिया कोटी ।
हें न घडे म्हणसी पोटीं । राया ते गोठी परियेसीं ॥ १७७ ॥
जिभेची चव कोट्यवधी जन्म भोगायला लावते; हे कसे घडते ते ऐक.
इंद्रियांची सजीवता । ते रसनेआधीन सर्वथा ।
रसनाद्वारें रस घेतां । उन्मत्तता इंद्रियां ॥ १७८ ॥
सर्व इंद्रियांची ताकद जिभेवर अवलंबून असते; जिभेतून रस मिळताच इंद्रिये उन्मत्त होतात.
मातली जे इंद्रियसत्ता । ते नेऊन घाली अधःपाता ।
रसना न जिणतां सर्वथा । भवव्यथा चुकेना ॥१७९॥
इंद्रियांचा उपभोग घेण्याची सवय माणसाला अधोगतीला नेते. जोपर्यंत जिभेवर (रसनेवर) ताबा मिळवला जात नाही, तोपर्यंत संसाराची दुःखपरंपरा संपत नाही.
आहारेंवीण देह न चले । सेविल्या इंद्रियवर्गु खवळे ।
रसनाजयाचें मूळ कळे । तैं दुःखें सकळें मावळतीं ॥१८०॥
अन्नाशिवाय शरीर चालत नाही आणि अन्न ग्रहण केले की इंद्रिये खवळतात. जिभेच्या चापल्याचे मूळ शोधून त्यावर विजय मिळवला की सर्व दुःखांचा अंत होतो.
इन्द्रियाणि जयन्त्याशु निराहारा मनीषिणः ।
वर्जयित्वा तु रसनं तन्निरन्नस्य वर्धते ॥२०॥
आहार न घेता निराहार राहिल्याने बुद्धिमान पुरुषांची इतर सर्व इंद्रिये लवकर जिंकली जातात, परंतु जिभेची (रसनेची) आसक्ती अन्नाचा त्याग केल्याने उलट अधिक वाढते.
आहार वर्जूनि साधक । इतर इंद्रियें जिंतिलीं देख ।
तंव तंव रसना वाढे अधिक । ते अजिंक न जिंकवे ॥१८१॥
साधकाने आहाराचा त्याग करून इतर इंद्रियांवर विजय मिळवला तरी जिभेची चव घेण्याची सवय अधिक प्रबळ होते, ती सहजासहजी जिंकता येत नाही.
इंद्रियांसी आहाराचें बळ । तीं निरहारें झालीं विकळ ।
तंव तंव रसना वाढे प्रबळ । रसनेचें बळ निरन्नें ॥१८२॥
इंद्रियांना अन्नामुळे बळ मिळते, अन्नाशिवाय ती क्षीण होतात. परंतु निराहार राहिल्याने जिभेची चव घेण्याची ताकद उलट अधिक वाढते.
तावत् जितेन्द्रियो न स्याद् विजितान्येन्द्रियः पुमान् ।
न जयेद्रसनं यावज्जितं सर्वं जिते रसे ॥२१॥
जोपर्यंत जिभेवर विजय मिळवला जात नाही, तोपर्यंत इतर सर्व इंद्रिये जिंकूनही माणसाला पूर्णपणे जितेंद्रिय म्हणता येत नाही. रसनेवर विजय मिळवला की सर्व इंद्रिये जिंकली जातात.
निरन्नें इंद्रियें जिंतली । तीं जिंतलीं हे मिथ्या बोली ।
अन्न घेतांचि सरसावलीं । सावध जाहलीं निजकर्मी ॥१८३॥
उपवास करून इंद्रिये जिंकली असे म्हणणे खोटे आहे, कारण अन्न पोटात जाताच सर्व इंद्रिये पुन्हा जागी होतात व आपापल्या विषयात प्रवृत्त होतात.
जंव रसना नाहीं जिंकिली । तंव जितेंद्रिय मिथ्या बोली ।
जैं साचार रसना जिंकली । तैं वाट मोडिली विषयांची ॥१८४॥
जोपर्यंत जिभेवर ताबा मिळवला नाही तोपर्यंत स्वतःला जितेंद्रिय म्हणवणे व्यर्थ आहे. खऱ्या अर्थाने जिभेवर ताबा मिळवला की विषयांचा मार्ग बंद होतो.
विषयाआंतील गोडपण । रसनेआंतील जाणपण ।
दोहींसी ऐक्य केल्या जाण । रसना संपूर्ण जिंतिली ॥१८५॥
विषयांमधील गोडी आणि जिभेची चव घेण्याची शक्ती या दोन्हींचा भगवद्भावात लय केला की रसनेवर पूर्ण विजय मिळवता येतो.
सर्वां गोडियांचें गोड आहे । ते गोडीस जो लागला राहे ।
त्यासीचि रसना वश्य होये । रसअपाये न बाधिती ॥१८६॥
सर्व आनंदांचा जो मूळ परमानंद आहे, त्या भगवद्रसात जो रंगून जातो, त्याची जिभेची आसक्ती कायमची नष्ट होते व त्याला विषयरस बाधित करत नाहीत.
रसनाजितांचें वाधावणें । तेणें ब्रह्मसायुज्यीं पडे ठाणें ।
सोहळा परमानंदे भोगणें । रसना जेणें जिंतिली ॥१८७॥
जिभेवर विजय मिळवणाऱ्या साधकाची प्रगती थेट ब्रह्मसायुज्य मुक्तीपर्यंत होते आणि तो अखंड परमानंदाचा सोहळा अनुभवतो.
पिङ्गला नाम वेश्यासीद् विदेहनगरे पुरा ।
तस्या मे शिक्षितं किञ्चिन्निबोध नृपनन्दन ॥२२॥
अवधूत म्हणतात, हे नृपनंदना यदू, प्राचीन काळी विदेह (जनक) नगरीत पिंगला नावाची एक वेश्या राहत होती. तिच्याकडून मी जो थोडा उपदेश शिकलो, तो तू ऐक.
अवधूत म्हणे नृपनंदना । वेश्या गुरु म्यां केली जाणा ।
तिच्या शिकलों ज्या लक्षणां । विचक्षणा अवधारीं ॥१८८॥
दत्तात्रेय अवधूत यदूला सांगतात की, मी पिंगला नावाची वेश्या माझी गुरू मानली आणि तिच्याकडून जे आत्मज्ञानाचे लक्षण शिकलो ते लक्षपूर्वक ऐक.
पूर्वी विदेहाचे नगरीं । पिंगला नामें वेश्या वास करी ।
तिसी आस निरासेंवरी । वैराग्य भारी उपजलें ॥१८९॥
पूर्वी विदेह (जनक) नगरीत पिंगला नावाची वेश्या राहत होती. दुराशेचा शेवट झाल्यानंतर तिच्या अंतःकरणात तीव्र वैराग्य निर्माण झाले.
सा स्वैरिण्येकदा कान्तं सङ्केत उपनेष्यती ।
अभूत् काले बहिर्द्वारि बिभ्रती रूपमुत्तमम् ॥२३॥
ती स्वेच्छाचारिणी वेश्या एका संध्याकाळी संकेतस्थळी (आपल्या घरी) येणाऱ्या प्रियकराला भेटण्यासाठी उत्तम वस्त्र-अलंकारांनी सजून आपल्या घराच्या दारात उभी राहिली.
ते स्वैरिणी स्वेच्छाचारी । सायंकाळीं उभी द्वारीं ।
नाना अळंकारअंबरीं । श्रृंगारकुसरी शोभत ॥१९०॥
ती स्वैरिणी स्त्री सायंकाळच्या वेळी अनेक प्रकारचे अलंकार व वस्त्रे परिधान करून शृंगार करून ग्राहकाच्या आशेने दारात उभी राहिली.
आधींच रूप उत्तम । वरी श्रृंगारिली मनोरम ।
करावया ग्राम्यधर्म । पुरुष उत्तम पहातसे ॥१९१॥
तिचे सौंदर्य आधीच उत्तम होते, त्यावर तिने सुंदर शृंगार केला होता. विषयोपभोगासाठी ती एखाद्या श्रीमंत पुरुषाची वाट पाहत होती.
मार्ग आगच्छतो वीक्ष्य पुरुषान् पुरुषर्षभ ।
तान् शुल्कदान्वित्तवतः कान्तान् मेनेऽर्थकामुका ॥२४॥
हे पुरुषश्रेष्ठा, रस्त्याने जाणाऱ्या, धन आणि शुल्क देण्यास समर्थ अशा कामुक पुरुषांना पाहून ती त्यांना आपला ग्राहक मानू लागली.
सगुण सुरूप धनवंत । कामकौशल्यें पुरवी आर्त ।
अर्थ देऊनि करी समर्थ । ऐसा कांत पहातसे ॥१९२॥
ती सुंदर, गुणवान, धनवंत आणि कामकला प्रवीण अशा श्रीमंत पुरुषाचा शोध घेत होती, जो तिला भरपूर धन देऊन तिची तृप्ती करेल.
ऐक गा पुरुषश्रेष्ठा । पुरुष येतां देखे वाटा ।
त्यासी खुणावी नेत्रवेंकटा । कामचेष्टा दावूनि ॥१९३॥
हे पुरुषश्रेष्ठा यदू, रस्त्याने येणाऱ्या पुरुषांना पाहून ती कटाक्ष टाकून व कामचेष्टा दाखवून त्यांना आपल्याकडे आकर्षित करत होती.
आगतेष्वपयातेषु सा सङ्केतोपजीविनी ।
अप्यन्यो वित्तवान् कोऽपि मामुपैष्यति भूरिदः ॥२५॥
पुरुष येत-जात असताना ती संकेतजीविका चालवणारी स्त्री विचार करू लागली की, आता एखादा दुसरा भरपूर धन देणारा श्रीमंत पुरुष माझ्याकडे येईल.
येत्या पुरुषास हाणी खडा । एकासी म्हणे घ्या जी विडा ।
डोळा घाली जात्याकडा । एकापुढां भंवरी दे ॥१९४॥
येणाऱ्या पुरुषांकडे ती खडा मारणे, विडा ऑफर करणे, डोळा मारणे व नखरे करणे अशा नाना प्रकारच्या कटाक्षांनी भुलवत होती.
ठेवूनि संकेतीं जीवित । ऐसे नाना संकेत दावित ।
पुरुष तिकडे न पाहात । येत जात कार्यार्थी ॥१९५॥
आपले जीवन या संकेतांवर ठेवलेली ती स्त्री अनेक खुणा करत होती, परंतु लोक आपापल्या कामासाठी येत-जात असल्याने तिच्याकडे लक्ष देत नव्हते.
गेल्या पुरुषातें निंदित । द्रव्यहीन हे अशक्त ।
रूपें विरूप अत्यंत । उपेक्षित धिक्कारें ॥१९६॥
निघून गेलेल्या पुरुषांची ती मनात निंदा करत असे की, हे दरिद्र, कुरूप व शक्तीहीन लोक माझी उपेक्षा करून निघून गेले.
आतां येईल वित्तवंत । अर्थदानीं अतिसमर्थ ।
माझा धरोनियां हात । कामआथर्त पुरवील ॥१९७॥
ती विचार करे की, आता एखादा धनाढ्य व कामुक पुरुष येईल, माझा हात धरून माझी धनाची व कामाची इच्छा पूर्ण करेल.
एवं दुराशया ध्वस्त निद्रा द्वार्यवलम्बती ।
निर्गच्छन्ती प्रविशती निशीथं समपद्यत ॥२६॥
अशा दुराशेमुळे तिची झोप उडून गेली. ती दारात उभी राहून कधी घरात जाई तर कधी बाहेर येई. असे करता करता मध्यरात्र झाली.
ऐसें दुराशा भरलें चित्त । निद्रा न लगे उद्वेगित ।
द्वार धरोनि तिष्ठत । काम वांछित पुरुषांसीं ॥१९८॥
अशा प्रकारे वाईट आशेने तिचे चित्त व्यापल्यामुळे तिला झोप लागली नाही आणि ती कामुक पुरुषांची वाट पाहत दारात उभी राहिली.
रिघों जाय घराभीतरीं । सांचल ऐकोनि रिघे बाहेरी ।
रिघतां निघतां येरझारी । मध्यरात्री पै झाली ॥१९९॥
घरात जावे तर पाऊलांचा आवाज ऐकून पुन्हा बाहेर यावे. अशा येण्या-जाण्याच्या फेऱ्यांमध्ये मध्यरात्र उलटून गेली.
सरली पुरुषाची वेळ । रात्र झाली जी प्रबळ ।
निद्रा व्यापिले लोक सकळ । पिंगला विव्हळ ते काळीं ॥२००॥
पुरुषांच्या येण्याची वेळ संपली, मध्यरात्र झाली आणि सर्व लोक निद्राधीन झाले, तेव्हा पिंगला आशेच्या भंगाने अत्यंत व्याकुळ झाली.
तस्या वित्ताशया शुष्यद्वक्त्राया दीनचेतसः ।
निर्वेदः परमो जज्ञे चिन्ताहेतुः सुखावहः ॥२७॥
धनाच्या आशेने तिचे तोंड सुकले, मन हताश झाले. परंतु त्याचवेळी तिच्या मनात एक महान सुखावह वैराग्य आणि चिंता उत्पन्न झाली.
तुटला आशेचा जिव्हाळा । सुकले वोंठ वाळला गळा ।
कळा उतरली मुखकमळा । खेदु आगळा चिंतेचा ॥२०१॥
धनाची आशा सुटल्यामुळे तिचे ओठ व घसा सुकला, मुखकमळाची कांती उतरली आणि तिच्या मनात चिंतचे तीव्र दुःख निर्माण झाले.
वित्त न येतचि हाता । तेणें ते झाली दीनचित्ता ।
वैराग्यें परम वाटली चिंता । सुखस्वार्था ते हेतु ॥२०२॥
धन हाती न आल्यामुळे तिचे चित्त दीन झाले, परंतु या चिंतेतूनच तिला आत्मसुखाला कारणीभूत ठरणारे महान वैराग्य प्राप्त झाले.
तस्या निर्विण्णचित्ताया गीतं श्रृणु यथा मम ।
निर्वेद आशापाशानां पुरुषस्य यथा ह्यसिः
न ह्यङ्गाजातनिर्वेदो देहबन्धं जिहासति ।
यथा विज्ञानरहितो मनुजो ममतां नृप ॥२८॥
त्या विरक्त झालेल्या पिंगलेने जे गीत गायिले ते तू माझ्याकडून ऐक. हे राजा, जशी तलवार दोरी कापते, तसेच वैराग्य माणसाच्या आशापाशांचा छेद करते. वैराग्याशिवाय मनुष्य देहाचा मोह सोडू शकत नाही.
कैसें वैराग्य उपजलें तिसी । जे चिंतीत होती विषयासी ।
त्या विटली विषयसुखासी । छेदक आशेसी वैराग्य ॥२०३॥
ज्या विषयसुखाची ती आस धरत होती, त्याच विषयांचा तिला वीट आला आणि तिच्या मनात आशेचा छेद करणारे वैराग्य उपजले.
तेणें वैराग्यें विवेकयुक्त । पिगलेनें गाइलें गीत ।
तें आइक राया समस्त । चित्तीं सुचित्त होऊनि ॥२०४॥
त्या विवेकयुक्त वैराग्याने पिंगलेने जे आत्मचिंतनाचे गाणे गायिले, ते हे राजा, तू एकाग्रचित्ताने ऐक.
ऐक राया विवेकनिधी । वैराग्य नाहीं ज्याचे बुद्धीं ।
त्यासी जन्ममरणाची आधिव्याधी । प्रतिपदीं बाधकु ॥२०५॥
हे विवेकनिधी राजा ऐक, ज्याच्या बुद्धीत वैराग्य नाही, त्याला प्रत्येक पावलावर जन्म-मरणाच्या आधिव्याधींचा त्रास होतो.
अनुतापु नाहीं ज्यासी । विवेक नुपजे मानसीं ।
तो संसाराची आंदणी दासी । आशापाशीं बांधिजे ॥२०६॥
ज्याच्या मनात पश्चात्ताप व विवेक उत्पन्न होत नाही, तो संसाराचा गुलाम बनून आशेच्या पाशात कायमचा बांधला जातो.
त्यासी मोहममतेची गाढी । घालिजे देहबुद्धीची बेडी ।
अहोरात्र विषय भरडी । अर्ध घडी न राहे ॥२०७॥
त्याला मोह-ममतेची भक्कम बेडी पडते व तो रात्रंदिवस विषयोपभोगात भरडला जातो, त्याला अर्धा क्षणही शांती मिळत नाही.
जराजर्जरित वाकळे । माजीं पडले अखंड लोळे ।
फुटले विवेकाचे डोळे । मार्गु न कळे विध्युक्त ॥२०८॥
म्हातारपणाने जर्जर झालेला मनुष्य संसारात अखंड तळमळत राहतो. त्याचा विवेक नष्ट झाल्यामुळे त्याला सन्मार्ग दिसत नाही.
त्यासी अव्हासव्हा जातां । अंधकूपीं पडे दुश्चिता ।
तेथूनि निघावया मागुता । उपावो सर्वथा नेणती ॥२०९॥
भलत्याच मार्गाने जाताना तो मोहाच्या अंधारमय विहिरीत पडतो आणि तेथून बाहेर पडण्याचा उपाय त्याला समजत नाही.
तेथ काया-मनें-वाचें । निघणें नाहीं जी साचें ।
तंव फणकाविला लोभविंचें । चढणें त्याचें निवार ॥२१०॥
मन-काय-वाचेने त्यातून सुटका होत नाही, तोच लोभरूपी विंचू त्याला दंश करतो आणि त्याचे दुःख अधिकच वाढते.
तेथ निंदेचिया तिडका । आंत बाहेर निघती देखा ।
वित्तहानीचा थोर भडका । जळजळ देखा द्वेषाची ॥२११॥
तेथे निंदेच्या वेदना आत-बाहेर निघतात, धननाशाचा भडका उडतो व द्वेषाची आग भडकू लागते.
अभिमानाचे आळेपिळे । मोहउळमासे येती बळें ।
तरी विषयदळणें आगळें । दुःखें लोळे गेहसेजे ॥२१२॥
अभिमान व मोहाचे जाळे त्याला घट्ट आवळते. विषयांच्या दळणात भरडला जाऊन तो दुःखाने तळमळत राहतो.
ऐशीं अवैराग्यें बापुडीं । पडलीं देहाचे बांदवडीं ।
भोगितां दुःखकोडी । सबुड बुडीं बुडालीं ॥२१३॥
अशा प्रकारे वैराग्याशिवाय दुर्दैवी जीव देहाच्या तुरुंगात पडतात आणि करोडो दुःखांच्या डोहात बुडून जातात.
पहा पां नीच सर्व वर्णांसी । निंद्य कर्में निंदिती कैशीं ।
वैराग्य उपजलें वेश्येसी । देहबंधासी छेदिलें ॥२१४॥
पहा, नीच समजल्या जाणाऱ्या वेश्येला जेव्हा वैराग्य प्राप्त झाले, तेव्हा तिने देहबंधनाचा छेद करून स्वतःचा उद्धार केला.
देहबंध छेदी त्या उक्ती । वेश्या बोलिली नाना युक्ती ।
झाली पिंगलेसी विरक्ती । चक्रवर्ती परीस पां ॥२१५॥
देहाचे बंधन तोडणाऱ्या अनेक युक्त्या ती वेश्या बोलू लागली, पिंगलेला राजांपेक्षाही श्रेष्ठ अशी तीव्र विरक्ती झाली.
पिङ्गलोवाच - श्लोक २९ वा
अहो मे मोहविततिं पश्यताविजितात्मनः ।
या कान्तादसतः कामं कामये येन बालिशा ॥२९॥
पिंगला म्हणाली, अहाहा! माझे मन अजिंक्य राहिल्यामुळे माझ्या मोहाचा विस्तार तर पहा! मी मूर्ख स्त्री या क्षुद्र आणि असत्य कामुक पुरुषाची कामना करत राहिले.
मिथ्या मोहाचा विस्तार । म्यां वाढविला साचार ।
माझ्या मूर्खपणाचा पार । पाहतां विचार पांगुळे ॥२१६॥
माझ्या मूर्खपणामुळे मी खोट्या मोहाचा विस्तार वाढवला. माझ्या अज्ञानाचा विचार केला तर बुद्धीही चकित होते.
नाहीं अंतःकरणासी नेम । अपार वाढविला भ्रम ।
असंतपुरुषांचा काम । मनोरम मानितां ॥२१७॥
अंतःकरणाला संयम नव्हता, त्यामुळे मी भलतेच भ्रम वाढवले आणि तुच्छ असंत पुरुषांची सेवा करण्यातच सुख मानले.
जरी स्त्रीसी पुरुष पाहिजे । तरी जवळील पुरुष न लाहिजे ।
हेंचि मूर्खपण माझें । सदा भुंजे असंतां ॥२१८॥
स्त्रीला पती हवा असेल तर जवळच असलेल्या परमात्मा पतीला सोडून दूर राहणाऱ्या असंत पुरुषांशी रमण करणे हे माझे मूर्खपण होते.
सन्तं समीपे रमणं रतिप्रदं वित्तप्रदं नित्यमिमं विहाय ।
अकामदं दुःखभयादिशोक मोहप्रदं तुच्छमहं भजेऽज्ञा ॥३०॥
माझ्या अगदी जवळ राहणाऱ्या, नित्य आनंद, प्रीती आणि आत्मधन देणाऱ्या भगवंताला सोडून, मी अज्ञानी स्त्री दुःख, भय, शोक आणि मोह देणाऱ्या तुच्छ कामुकाची सेवा करत राहिले.
संतपुरुषाची प्राप्ती । जवळी असतां नेणें आसक्ती ।
ज्यासी केलिया रती । कामनिवृत्ती तत्काळ ॥२१९॥
संत आणि परमात्मा अगदी जवळ असताना मी त्यांच्याशी प्रीती केली नाही, ज्यांच्याशी प्रीती केल्याने कामवासना तत्काळ नष्ट होते.
काम निवर्तवूनि देख । अनिवार पुरवी नित्य सुख ।
चित्तदाता तोचि एक । अलोलिक पैं देणें ॥२२०॥
कामाचा अंत करून जो अखंड नित्यसुख देणारा आहे, तो चित्तदाता परमात्माच एकमेव अलौकिक सुख देणारा आहे.
सकळ ऐश्वर्य निजपदेंसीं । संतोषोनि दे रतीसी ।
रमवूं जाणे नरनारींसीं । रमणु सर्वांसी तो एकु ॥२२१॥
आपल्या निजपदाचे सर्व ऐश्वर्य जो प्रसन्न होऊन देतो, जो सर्वांचा एकच प्रिय पती आहे, त्या परमात्म्याला मी विसरले.
सांडोनि ऐसिया कांतासी । माझी मूढता पहा कैसी ।
नित्य अकामदा पुरुषासी । कामप्राप्तीसी भजिन्नलें ॥२२२॥
अशा परमात्मा पतीला सोडून माझी मूढता पहा की, मी असंत व अकामद पुरुषांची सेवा करत राहिले.
आपुला पूर्ण न करवे काम । ते मज केवीं करिती निष्काम ।
त्यांचेनि संगें मोहभ्रम । दुःख परम पावलें ॥२२३॥
जे पुरुष स्वतःची कामवासना पूर्ण करू शकत नाहीत, ते मजला निष्काम कसे करतील? त्यांच्या संगाने मला केवळ मोह व दुःखच मिळाले.
त्यांचेनि सुख नेदवेच मातें । परी झाले दुःखाचेचि दाते ।
भयशोकआधिव्याधींतें । त्यांचेनि सांगातें पावलें ॥२२४॥
त्यांच्यापासून मला सुख मुळीच मिळाले नाही, उलट ते दुःखाचे दाते ठरले. त्यांच्या संगतीने मला भय, शोक व व्याधी मिळाल्या.
अहो मयाऽऽत्मा परितापितो वृथा साङ्केत्यवृत्त्यातिविगर्ह्यवार्तया ।
स्त्रैणान्नरादर्थतृषोनुशोच्यान् क्रीतेन वित्तं रतिमात्मनेच्छती ॥३१॥
अहो! मी वेश्यावृत्तीच्या निंद्य धंद्याने व्यर्थ स्वतःला संतापात ढकलले. धनतृष्णेने आंधळी होऊन मी देह विकून कामातुर नराकडून सुख मिळवू पाहत होते.
जारपुरुषापासोनि सुख । इच्छितें ते मी केवळ मूर्ख ।
वृथा परितापू केला देख । मज असुख म्यां दीधलें ॥२२५॥
कामुक पुरुषांकडून सुख इच्छिणारी मी केवळ मूर्ख होते. मी व्यर्थ संताप केला आणि स्वतःच स्वतःला दुःखात लोटले.
स्त्रैण पुरुष ते नराधम । वेश्यागामी त्याहूनि अधम ।
त्यांत कृपणु तो अधमाधम । तयांचा संगम मी वांच्छीती ॥२२६॥
कामुक पुरुष अधम असतात, वेश्यागामी त्याहून अधम आणि त्यात कृपण असणारा अत्यंत अधम असतो; अशा पुरुषांची मी इच्छा करत होते.
जितुक्या अतिनिंदका वृत्ती । मज आतळतां त्या भीती ।
योनिद्वारें जीविकास्थिती । नीच याती व्यभिचारु ॥२२७॥
माझा हा व्यभिचाराचा धंदा अत्यंत निंद्य व नीच होता, ज्याचा विचार करतानाही भीती वाटते.
अल्प द्रव्य जेणें देणें । उसकी जाती कोण हें नाहीं पाहणें ।
याहोनि काय लाजिरवाणें । निंदित जिणें पैं माझें ॥२२८॥
थोडेसे पैसे देणाऱ्या पुरुषाची जात-कुळ न पाहता देह अर्पण करणे यापेक्षा अधिक लाजीरवाणे निंद्य जिणे कोणते असू शकते?
जया पुरुषासी देह विकणें । तें अत्यंत हीनदीनपणें ।
काय सांगों त्याची लक्षणें । सर्वगुणें अपूर्ण ॥२२९॥
पैशांसाठी स्वतःचा देह विकणे हे अत्यंत हीनदीनपण आहे. अशा कामुक पुरुषांची लक्षणे सर्व गुणांनी अपूर्ण असतात.
वित्त नेदवे कृपणता । काम न पुरवे पुरता ।
प्रीति न करवे तत्त्वतां । भेटी मागुती तो नेदी ॥२३०॥
त्यांच्या जवळ औदार्य नसते, ते काम पूर्ण करू शकत नाहीत व खरी प्रीतीही करत नाहीत. ते पुन्हा भेटही देत नाहीत.
ऐशियापासाव सुख । वांछितां वाढे परम दुःख ।
जळो त्याचें न पाहें मुख । वोकारी देख येतसे ॥२३१॥
अशा पुरुषांपासून सुख इच्छिल्याने परम दुःख वाढते. त्यांचे तोंड पाहण्याचीही मला शिसारी येत आहे.
एवं जारपुरुषाची स्थिती । आठवितां चिळसी येती ।
पुरे पुरे ते संगती । चित्तवृत्ति विटली ॥२३२॥
कामुक पुरुषांची स्थिती आठवली तरी अंगावर काटा येतो आणि वीट येतो. आता त्यांची संगती नकोशी झाली आहे.
यदस्थिभिर्निर्मितवंशवश्य स्थूणं त्वचा रोमनखैः पिनद्धम् ।
क्षरन्नवद्वारमगारमेतद् विण्मूत्रपूर्णं मदुपैति कान्या ॥३२॥
हाड पाठीचा कणा असलेल्या, कातडी, केस आणि नखांनी मढवलेल्या, नवद्वारांतून मळ वाहणाऱ्या आणि विष्ठा-मूत्राने भरलेल्या या देहाशी माझ्याशिवाय दुसरी कोणती मूर्ख स्त्री रमण करेल?
नरशरीर गृह सांकडें । आढीं पाखाड्या नुसधीं हाडें ।
अस्थींच्या मेढी दोंहीकडे । वोलेनि कातडें मढियेलें ॥२३३॥
हे मानवी शरीर म्हणजे हाडांचे खांब, कातड्याचे आच्छादन आणि नऊ दारे असलेले एक लहानसे घरच आहे.
त्यासी सर्वांगीं सगळे । दिधले रोमावळिचे खिळे ।
घालूनि नखाचे खोबळे । अग्रीं आंगवळे बूजिले ॥२३४॥
त्या शरीरावर केसांचे खिळे ठोकले आहेत, नखांच्या खोबळ्या बसवून शेवटाला बंद केले आहे.
अस्थि मांस चर्मबांधा । सर्वांगीं आवळूनि दिधला सांधा ।
रंगीत चर्मरसना स्वादा । पुढिले बांधा बांधिली ॥२३५॥
हाडे, मांस आणि कातडी यांनी हे शरीर बांधले आहे आणि जिभेच्या स्वादासाठी त्याला पुढचे बंधन दिले आहे.
वायुप्रसरणपरिचारें । केलीं प्राणापानरंध्रें ।
वरिले डळमळीत शिखरें । बालांकुरें लाविलीं ॥२३६॥
वायूच्या प्रवाहासाठी प्राण व अपानाची छिद्रे केली आहेत, डोक्यावर केसांचे अंकुर लावले आहेत.
बुजूनि भीतरील सवडी । बांधाटिलें नवनाडीं ।
विष्ठामूत्रांची गाढी । नित्य परवडी सांठवण ॥२३७॥
आत नऊ नाड्यांचे जाळे विणले आहे आणि त्यात विष्ठा व मूत्राची नित्य सांठवण केली आहे.
भीतरिले अवकाशीं । दुर्गंधि ऊठली कैसी ।
तेचि प्रवाह अहर्निशीं । नवद्वारांसी वाहताति ॥२३८॥
शरीराच्या आतील पोकळीत केवढी दुर्गंधी भरली आहे! तीच दुर्गंधी रात्रंदिवस नऊ द्वारांतून बाहेर वाहत असते.
अखंड पर्हावे वाहती मळें । देखोनि ज्याचें तो कांटाळे ।
अहर्निशीं धुतां जळें । कदा निर्मळे ते नव्हती ॥२३९॥
सतत घाण वाहणारे हे शरीर पाहून कोणालाही कंटाळा येईल. पाण्याने रात्रंदिवस धुतले तरी ते कधी स्वच्छ होत नाही.
सांगतांचि हे गोष्टी । ओकारी येतसे पोटीं ।
ऐशियास मी भुलल्यें करंटी । विवेक दृष्टीं न पाहें ॥२४०॥
ही गोष्ट सांगतानाही पोटात ओकारी येते. अशा अपवित्र देहाला मी मूर्ख स्त्री भुलले होते.
अस्थिमांसाचा कोथळा । विष्ठामूत्राचा गोळा ।
म्यां आलिंगिला वेळोवेळां । जळो कंटाळा न येतसे ॥२४१॥
हाडे आणि मांसाची पिशवी, विष्ठा व मूत्राचा गोळा असलेल्या देहाला मी वारंवार आलिंगन दिले, मला त्याचा कंटाळा आला नाही याबद्दल मलाच आश्चर्य वाटते.
विदेहानां पुरे ह्यस्मिन्नहमेकैव मूढधीः ।
यान्यमिच्छन्त्यसत्यस्माद् आत्मदात् काममच्युतात् ॥३३॥
या विदेहनगरात माझ्यासारखी मूर्ख मी एकच आहे, जी स्वतःला अर्पण करणाऱ्या अविनाशी अच्युत भगवंताला सोडून कामुक असंत पुरुषांची इच्छा करत होते.
ये विदेहाचे नगरीं । मूर्ख मीचि एक देहधारी ।
हृदयस्थ सांडूनि श्रीहरी । असंतां नरीं व्यभिचारु ॥२४२॥
या विदेहाच्या नगरीत माझ्यासारखी मूर्ख मी एकच आहे, जिने हृदयात राहणाऱ्या श्रीहरीला सोडून नीच पुरुषांशी व्यभिचार केला.
असंत पुरुष नेणों किती । म्यां भोगिले अहोरातीं ।
सुख न पवेंची निश्चितीं । रति भगवंतीं जंव नाहीं ॥२४३॥
मी अनेक असंत पुरुषांचा उपभोग घेतला, पण भगवंताच्या ठिकाणी प्रीती जोडल्याशिवाय खरे सुख कधीच मिळाले नाही.
जो निकटवर्ती हृदयस्थु । पुरुषीं पुरुषोत्तम अच्युतु ।
वीर्यच्युतीवीण रमवितु । संतोंषें देतु निजात्मना ॥२४४॥
हृदयात राहणारा जो अच्युत पुरुषोत्तम आहे, तो वीर्यपाताशिवाय नित्य आनंदाने जिवाला तृप्त करतो.
अच्युतें ज्यासि निजसुख दिधलें । ते सुख च्यवेना कांहीं केलें ।
ऐशिया हृदयस्था विसरलें । आणिक भुललें अकामदा ॥२४५॥
अच्युत भगवंताने दिलेले निजसुख कधीही नष्ट होत नाही. अशा अंतर्यामी परमात्म्याला विसरून मी तुच्छ पुरुषांवर भुलले.
अकामद ते नाशवंत । त्यांसी संग केलिया दुःखचि देत ।
कैसें माझें मूर्ख चित्त । त्यासी आसक्त पैं होतें ॥२४६॥
नाशवंत पुरुष सुख देऊ शकत नाहीत, त्यांचा संग केवळ दुःख देतो. माझे चित्त किती मूर्ख होते की ते त्यांच्यावर आसक्त झाले.
त्या आसक्तीची झाली तडातोडी । लागली अच्युतसुखाची गोडी ।
ज्याचें सुख भोगितां चढोवढी । घडियाघडी वाढतें ॥२४७॥
आता ती विषयासक्ती तुटली असून मला अच्युत भगवंताच्या सुखाची गोडी लागली आहे, जे सुख क्षणाक्षणाला वाढत जाते.
सुहृत् प्रेष्ठतमो नाथ आत्मा चायं शरीरिणाम् ।
तं विक्रीयात्मनैवाहं रमेऽनेन यथा रमा ॥३४॥
माझा अंतरात्मा, सर्व प्राण्यांचा परम प्रिय सुहृद आणि स्वामी अच्युत आहे. त्यालाच स्वतःला अर्पण करून मी लक्ष्मीप्रमाणे त्याच्याशीच नित्य रमण करेन.
जो सोयरा माझा हृदयस्थु । सुख प्रीति प्रिय अच्युतु ।
तोचि अंतरात्मा सर्वगतु । नाथ कांतु तो माझा ॥२४८॥
माझ्या हृदयात राहणारा अच्युतच माझा खरा सोयरा, प्रियकर आणि सर्वव्यापी अंतरात्मा पती आहे.
त्यासीच आपुले संवसाटी । विकत घेईन उठाउठी ।
परमानंदें देईन मिठी । गोठी चावटी सांडोनी ॥२४९॥
त्या परमात्म्यालाच मी स्वतःला अर्पण करून नित्य आपलंसं करेन आणि व्यर्थ गप्पा सोडून त्याला परमानंदाने मिठी मारीन.
रमा झाली पायांची दासी । मी भोगीन अनारिसी ।
सर्वकाळ सर्वदेशीं । सर्वरूपेसीं सर्वस्वें ॥२५०॥
लक्ष्मी ज्या भगवंताच्या पायांची दासी झाली, त्याच परमात्म्याचा मी सर्वकाळ, सर्व ठिकाणी सर्वभावाने उपभोग घेईन.
कियत् प्रियं ते व्यभजन् कामा या कामदा नराः ।
आद्यन्तवन्तो भार्याया देवा वा कालविद्रुताः ॥३५॥
पतीला कामसुख देणारे हे नाशवंत पुरुष किंवा काळाच्या मुखात पडणारे देव तरी स्त्रीला काय सुख देणार? त्यांचे सुख तर क्षणभंगुर आहे.
सांडूनि हृदयस्था अच्युतातें । वरावें वरां निर्दैवांतें ।
तंव तो द्वैतभये भयचकिते । काळग्रस्ते सर्वदा ॥२५१॥
हृदयात राहणाऱ्या अच्युताला सोडून अभागी पुरुषांचा स्वीकार केला तर ते स्वतःच काळाच्या भयाने ग्रस्त असतात.
जे निजभयें सर्वदा दुःखी । ते भार्येसी काय करिती सुखी ।
अवघीं पडलीं काळमुखीं । न दिसे ये लोकीं सुखदाता ॥२५२॥
जे पुरुष स्वतःच भयात व दुःखात जगतात, ते आपल्या पत्नीला काय सुख देणार? ते सर्व काळाच्या मुखात पडलेले आहेत.
असो नराची ऐशी गती । करूं अमरांमाजीं अमरपती ।
विळांत ते चौदा निमती । पदच्युति अमरेंद्रा ॥२५३॥
सामान्य माणसांची गोष्ट सोडा, देवांचा राजा इंद्र हाही काळाच्या चक्रात पदच्युत होतो.
एवं सुर नरलोक लोकीं । आत्ममरणें सदा दुःखी ।
ते केवीं भार्येसी करिती सुखी । भजावें मूर्खीं ते ठायीं ॥२५४॥
अशा प्रकारे देव आणि मानव सर्वच मृत्युच्या भ्याने दुःखी आहेत, ते पत्नीला सुख कसे देणार? म्हणून त्यांच्यामागे लागणे मूर्खपणाचे आहे.
धन्य माझी भाग्यप्राप्ती । येचि क्षणीं येचि रातीं ।
झाली विवेकवैराग्यप्राप्ती । रमापति तुष्टला ॥२५५॥
माझे भाग्य धन्य आहे की, याच क्षणी व याच रात्री मला विवेक आणि वैराग्य प्राप्त झाले आणि श्रीपती माझ्यावर प्रसन्न झाला.
नूनं मे भगवान् प्रीतो विष्णुः केनापि कर्मणा ।
निर्वेदोऽयं दुराशाया यन्मे जातः सुखावहः ॥३६॥
नक्कीच माझ्या एखाद्या पूर्वपुण्यामुळे किंवा भगवंताच्या कृपेने माझ्या दुराशेचा अंत होऊन मला सुखदायक वैराग्य प्राप्त झाले आहे.
ये जन्मींचें माझें कर्म । पाहतां केवळ निंद्य धर्म ।
मज तुष्टला पुरुषोत्तम । पूर्वजन्मसामग्रीं ॥२५६॥
या जन्मातील माझे कर्म निंद्यच होते, परंतु पूर्वजन्मीच्या काही पुण्याईमुळे पुरुषोत्तम माझ्यावर प्रसन्न झाला.
मज कैंचे पूर्वजन्मीं साधन । ज्याचें नाम पतितपावन ।
कृपाळु जो जनार्दन । त्याचे कृपेन हें घडलें ॥२५७॥
माझे पूर्वजन्मीचे साधन काय असणार? परंतु जो पतितपावन आणि कृपाळू जनार्दन आहे, त्याच्या कृपेनेच हे घडले आहे.
दुष्ट दुराशा व्यभिचारु । भगद्वारा चालवीं संसारु ।
तिसी मज वैराग्ययुक्त विचारु । विष्णु साचारु तुष्टला ॥२५८॥
वेश्याव्यवसायाचा दुष्ट व निंद्य मार्ग चालवणाऱ्या मला भगवंताच्या कृपेनेच वैराग्ययुक्त विवेक प्राप्त झाला आणि विष्णू प्रसन्न झाला.
जरी असतें पूर्वसाधन । तरी निंद्य नव्हतें मी आपण ।
योनिद्वारा कर्माचरण । पतित पूर्ण मी एक ॥२५९॥
जर माझे पूर्वसाधन असते तर मी वेश्या व्यवसायात पडलेच नसते. मी कर्मानी पूर्णपणे पतित होते.
यापरी मी पूर्ण पतित । पतितपावन जगन्नाथ ।
तेणें कृपा करून येथ । केलें विवेकयुक्त वैरागी ॥२६०॥
मी पूर्ण पतित असले तरी जगन्नाथ पतितपावन आहे. त्याने कृपा करून मला विवेक आणि वैराग्य दिले.
तेणें वैराग्यविचारें देख । दुष्ट दुराशेचें फिटलें दुःख ।
मज झालें परम सुख । निजसंतोख पावलें ॥२६१॥
त्या वैराग्य आणि विचारांमुळे दुष्ट दुराशेचे दुःख नष्ट झाले आणि मला आत्मसंतोषाचे परम सुख मिळाले.
हे दुःख आदळतां अंगासी । वैराग्य नुपजे अभाग्यासी ।
भगवंतें कृपा केली कैसी । दुःखें निजसुखासी दीधलें ॥२६२॥
अंगावर दुःख आदळले तरी अभागी माणसाला वैराग्य येत नाही, परंतु भगवंताने अशी कृपा केली की दुःखातूनच मला आत्मसुख दिले.
मैवं स्युर्मन्दभाग्यायाः क्लेशा निर्वेदहेतवः ।
येनानुबन्धं निर्हृत्य पुरुषः शममृच्छति ॥३७॥
दुराशा सोडल्याशिवाय माणसाला शांती मिळत नाही. कमनशिबी माणसाला दुःखातून वैराग्य प्राप्त होत नाही, पण मला हे क्लेश वैराग्याचे कारण ठरले.
अंगीं आदळतां दुःखद्वंद्व । अभाग्यासी ये सबळ क्रोध ।
थिता विवेक होय अंध । भाग्यमंद ते जाणा ॥२६३॥
दुःख अंगावर आले की अभागी माणसाला मोठा क्रोध येतो आणि त्याचा उरलासुरला विवेकही आंधळा होतो.
दुःख देखतांचि दृष्टी । ज्यासी वैराग्य विवेकेंसी उठी ।
तेणें छेदूनि स्नेहहृदयगांठी । पावे उठाउठी निजसुख ॥२६४॥
परंतु दुःख पाहताच ज्याच्या मनात विवेक आणि वैराग्य जागे होते, तो मोहाची गाठ तोडून तात्काळ निजसुख प्राप्त करतो.
पुरुषांसी परमनिधान । विवेकयुक्त वैराग्य जाण ।
तेणें होऊनियां प्रसन्न । समाधान पावती ॥२६५॥
मानवासाठी विवेकयुक्त वैराग्य हीच परम संपत्ती आहे, तिच्यामुळे प्रसन्नता व समाधान प्राप्त होते.
मी पूर्वी परम अभाग्य । महापुरुषांचे जें निजभाग्य ।
तें भगवंतें दिधलें वैराग्य । झालें श्लाघ्य मी तिहीं लोकीं ॥२६६॥
मी पूर्वी अभागी होते, पण महापुरुषांचे जे भाग्य ते वैराग्य भगवंताने मला दिले, त्यामुळे मी तिन्ही लोकांत धन्य झाले.
तेनोपकृतमादाय शिरसा ग्राम्यसङ्गताः ।
त्यक्त्वा दुराशाः शरणं व्रजामि तमधीश्वरम् ॥३८॥
भगवंताचे हे उपकार शिरावर घेऊन, मी विषयवासनांचा आणि दुराशेचा त्याग करते आणि त्या सर्वेश्वर श्रीकृष्णाला शरण जाते.
कृपा करोनि भगवंते । निजवैराग्य दिधलें मातें ।
तेणें सांडविलें दुराशेतें । ग्राम्य विषयातें छेदिलें ॥२६७॥
भगवंताने कृपा करून मला वैराग्य दिले, त्यामुळे माझी दुराशा सुटली व ग्राम्य विषयवासनांचा छेद झाला.
तो उपकार मानूनियां माथां । त्यासी मी शरण जाईन आतां ।
जो सर्वाधीश नियंता । त्या कृष्णनाथा मी शरण ॥२६८॥
तो भगवंताचा उपकार मस्तकी धरून मी आता त्यालाच शरण जाते. जो सर्व विश्वाचा नियंता आहे, त्या कृष्णनाथाला मी शरण आहे.
सन्तुष्टा श्रद्दधत्येतद्यथालाभेन जीवती ।
विहराम्यमुनैवाहमात्मना रमणेन वै ॥३९॥
आता मी समाधानी होऊन, प्रारब्धाने जे मिळेल त्यात राहून, माझ्या अंतरात्मा परमेश्वरासोबतच नित्य आनंदात रमण करेन.
शरण गेलियापाठीं । सहज संतुष्ट मी ये सृष्टीं ।
स्वभावें सत्श्रध्दा पोटीं । जीविका गांठी अदृष्ट ॥२६९॥
भगवंताला शरण गेल्यानंतर मी पूर्ण समाधानी झाले आहे. माझ्या पोटी सत्श्रद्धा असून प्रारब्धाने जे मिळेल त्यात मी तृप्त आहे.
मुनीश्वर भोगिती निजात्मा । त्या मी भोगीन आत्मयारामा ।
जो का पुरवी निष्कामकामा । तो परमात्मा वल्लभू ॥२७०॥
मुनीश्वर ज्या आत्मरामाचा उपभोग घेतात, त्याच आत्मरामाशी मी रमण करेन. तो निष्काम भक्तांची इच्छा पूर्ण करणारा परमात्मा माझा पती आहे.
ब्रह्मादिक समर्थ असती । ते सांडूनियां निश्चितीं ।
भगवद्भाजनाची स्थिती । अतिप्रीती कां म्हणसी ॥२७१॥
ब्रह्मादिक समर्थ देव असताना त्यांना सोडून भगवंताच्या भजनातच एवढी प्रीती का, असे कोणी विचारेल.
मजसारिखिया दुराचारी । जड जीवांतें उद्धरी ।
तारकु तोचि भवसागरीं । स्वामी श्रीहरि कृपाळु ॥२७२॥
तर माझ्यासारख्या दुराचारी व जड जिवांचा उद्धार करणारा आणि भवसागरातून तारून नेणारा कृपाळू स्वामी श्रीहरी हा एकच आहे.
संसारकूपे पतितं विषयैर्मुषितेक्षणम् ।
ग्रस्तं कालाहिनाऽऽत्मानं कोऽन्यस्त्रातुमधीश्वरः ॥४०॥
संसाररुपी अंधाऱ्या विहिरीत पडलेल्या, विषयांनी आंधळ्या झालेल्या आणि कालरूपी सर्पाने गिळलेल्या या जिवाला त्या ईश्वराशिवाय दुसरा कोण वाचवू शकेल?
संसारलक्षण कूप अंध । तेथ विषयदृष्टीं विषयांध ।
पडोनि गेले अधाध । बुद्धिमंद उपायीं ॥२७३॥
संसाररूपी अंधाऱ्या विहिरीत पडलेले, विषयवासनेने आंधळे झालेले आणि अज्ञानी जीव उपायांच्या बाबतीत मंदबुद्धी ठरतात.
ते कल्पनाजळीं बुडाले । वासनाकल्लोळीं कवळले ।
दंभमदादि जळचरीं तोडिले । तृष्णेच्या पडले कर्दमीं ॥२७४॥
ते कल्पनेच्या पाण्यात बुडतात, वासनेच्या लाटांत सापडतात, दंभ व मदाच्या जलचरांकडून तोडले जातात आणि तृष्णेच्या चिखलात रुततात.
दुःखाच्या खडकीं आदळले । स्वर्गपायरीसी अडकले ।
तेथूनिही एक पडले । निर्बुजले भवदळें ॥२७५॥
ते दुःखाच्या खडकावर आदळतात, स्वर्गाच्या पायरीवर अडकतात आणि तेथूनही खाली पडतात.
नास्तिकें गेलीं सबुडबुडीं । कर्मठीं धरिल्या कर्मदरडी ।
वेदबाह्य तीं बापुडीं । पडलीं देव्हडीतळवटीं ॥२७६॥
नास्तिक लोक संसारात पूर्ण बुडून जातात, कर्मठ कर्माच्या कड्याला धरून राहतात आणि वेदबाह्य जीव खाली पडतात.
निंदेचे शूळ कांटे । फुटोनि निघाले उफराटे ।
द्वेषाचे पाथर मोटे । हृदय फुटे लागतां ॥२७७॥
निंदेचे काटे उलटून टोचतात, द्वेषाचे मोठे दगड छातीवर बसल्यामुळे अंतःकरण फुटून जाते.
कामाची उकळी प्रबळ । भीतरूनि बाहेरी ये सबळ ।
तेणें डहळलें तें जळ । होय खळबळ जीवासी ॥२७८॥
कामाची उकळी आतून प्रबळ होऊन बाहेर येते, त्यामुळे संसाराचे पाणी ढवळून निघते आणि जिवाची धांदल उडते.
सुटले क्रोधाचे चिरे । वरी पडिल्या उरी नुरे ।
वनितामगरीं नेलें पुरें । विवरद्वारें आंतौतें ॥२७९॥
क्रोधाचे धोंडे अंगावर पडले की प्राण उरत नाही आणि कामुकतेची सुसर जिवाला ओढून विषयांच्या बिळात नेते.
तेथ अवघियांसी एकसरें । गिळिलें काळें काळअतजगरें ।
विखें घेरिलें थोरें घोरें । ज्ञान पाठिमोरें सर्वांसी ॥२८०॥
तेथे सर्वांना काळाच्या अजगराने गिळून टाकले आहे. विषयांच्या घोर विषाने वेढल्यामुळे सर्वांचे ज्ञान नष्ट झाले आहे.
सर्प चढलिया माणुसा । गूळ कडू लागे कसा ।
निंब खाये घसघसां । गोड गूळसा म्हणौनि ॥२८१॥
ज्या माणसाला सर्प चावला आहे, त्याला गूळ कडू लागतो आणि तो कडुनिंब गोड समजून आवडीने खातो.
केवळ विषप्राय विषयो कडू । तो प्रपंचिया जाला गोडू ।
अमृतप्राय परमार्थ गोडू । तो जाला कडू विषयिकां ॥२८२॥
त्याप्रमाणे विषासारखा कडू असणारा विषय प्रपंचिकांना गोड वाटतो आणि अमृतासारखा गोड असणारा परमार्थ विषयांध लोकांना कडू वाटतो.
कूपाबाहेर वासु ज्यांसी । ते न देखती कूपाआंतुलांसी ।
कूपांतले बाहेरिलांसी । कदाकाळेंसी न देखती ॥२८३॥
विहिरीबाहेर राहणारे लोक विहिरीतील जिवांना पाहत नाहीत आणि विहिरीतील जीव बाहेरील जगाला पाहू शकत नाहीत.
ऐसिया पीडतयां जीवांसी । काढावया धिंवसा नव्हे कोणासी ।
तुजवांचोनि हृषीकेशी । पाव वेगेंसीं कृपाळुवा ॥२८४॥
अशा संसारात पीडित झालेल्या जिवांना बाहेर काढण्याचे धैर्य कोणातही नाही. हे कृपाळू हृषीकेशा, तूच वेगाने धावून ये!
एवं दुःखकूपपतितां । हृदयस्थु भगवंतुचि त्राता ।
धांव पाव कृष्णनाथा । भवव्यथा निवारीं ॥२८५॥
अशा प्रकारे दुःखकुपात पडलेल्या जिवांचा पाठीराखा हृदयात राहणारा भगवंतच आहे. हे कृष्णनाथा, धावून ये आणि भवव्यथा निवारण कर!
ऐसें जाणोनि तत्त्वतां । त्याच्या चरणा शरण आतां ।
शरण गेलिया सर्वथा । सहज भवव्यथा निवारे ॥२८६॥
हे सत्य जाणून आता मी भगवंताच्या चरणांना शरण जाते. त्याला शरण गेल्यावर संसाराची सर्व दुःख-व्यथा आपोआप नष्ट होते.
आत्मैव ह्यात्मनो गोप्ता निर्विद्येत यदाखिलात् ।
अप्रमत्त इदं पश्येद्ग्रस्तं कालाहिना जगत् ॥४१॥
माणूस जेव्हा सर्व विषयांतून विरक्त होतो, तेव्हा तो स्वतःच स्वतःचा रक्षक बनतो. सावध होऊन त्याने या काळाच्या मुखात पडलेल्या जगाकडे पाहिले पाहिजे.
ऐसें कळलें जी तत्त्वतां । येथ आपणचि आपणिया त्राता ।
सर्व पदार्थीं सर्वथा । निर्वेदता दृढ जाहल्या ॥२८७॥
सर्व पदार्थांबद्दल दृढ वैराग्य निर्माण झाले की, या संसारात माणूस स्वतःच स्वतःचा रक्षक बनतो हे तत्त्व मला कळले आहे.
दृढ वैराग्यता ते ऐसी । विषयो टेंकल्या अंगासी ।
चेतना नव्हे इंद्रियांसी । निद्रितापासीं जेवीं रंभा ॥२८८॥
दृढ वैराग्य असे असावे की विषय अंगाला टेकले तरी इंद्रियांत विकार निर्माण होत नाही, जसे निद्रिस्त माणसाजवळ रंभा आली तरी फरक पडत नाही.
अथवा वमिलिया अन्ना । जेवीं वांछीना रसना ।
तेवीं विषय देखोनि मना । न धरी वासना आसक्ती ॥२८९॥
किंवा ओकलेल्या अन्नाची जशी जिभेला इच्छा होत नाही, तसे विषयांना पाहून मनात वासना व आसक्ती निर्माण होऊ नये.
तें वैराग्य कैसेनि जोडे । तरी सावधान पाहतां रोकडें ।
जग काळें गिळिलें चहूंकडे । वेगळें पडे तें नाहीं ॥२९०॥
हे वैराग्य कसे प्राप्त होते? तर सावध होऊन पाहिले असता हे सर्व जग काळाने गिळलेले दिसते, त्यातून काहीही वेगळे राहत नाही.
पिता पितासह काळें नेले । पुत्रपौत्रां काळें गिळिलें ।
वैराग्य नुपजे येणें बोलें । तरी नागवले नरदेहा ॥२९१॥
वडील व खापरपणजोबांना काळाने नेले, मुले व नातवांना काळाने गिळले; हे पाहूनही वैराग्य येत नसेल तर मनुष्यदेहाचा जन्म व्यर्थ गेला.
मृत्युलोक याचें नांव । अनित्य स्वर्गाची काइसी हांव ।
वैराग्येंवीण निर्दैव । झाले सर्व सर्वथा ॥२९२॥
या लोकाचे नावच मृत्युलोक आहे, मग अनित्य स्वर्गाची इच्छा कशाला? वैराग्याशिवाय सर्व जीव पूर्णपणे दुर्दैवी ठरले आहेत.
श्रीब्राह्मण उवाच - श्लोक ४२ वा
एवं व्यवसितमतिर्दुराशां कान्ततर्षजाम् ।
छित्त्वोपशममास्थाय शय्यामुपविवेश सा ॥४२॥
अवधूत म्हणाले: अशा प्रकारे पिंगलेने पुरुषांच्या दुराशेचा छेद केला, शांतता प्राप्त केली आणि ती आपल्या शय्येवर निवांत बसली.
अवधूत म्हणे यदूसी । धन्य भाग्य तये वेश्येसी ।
वैराग्य उपजलें तिसी । विवेकेंसी निजोत्तम ॥२९३॥
अवधूत यदूला म्हणतात, त्या पिंगला वेश्येचे भाग्य धन्य आहे! तिच्या मनात विवेकासह उत्तम वैराग्य उत्पन्न झाले.
एवं विवंचूनि निजबुद्धी । परपुरुषदुराशा छेदी ।
ज्याचेनि संगें आधिव्याधी । बहु उपाधी बाधक ॥२९४॥
अशा प्रकारे स्वतःच्या बुद्धीने विचार करून तिने कामुक पुरुषांची दुराशा तोडून टाकली, ज्यांच्या संगाने अनेक उपाधी व व्याधी त्रास देतात.
जे उपाधिचेनि कोडें । जन्ममृत्यूचा पुरु चढे ।
दुःखभोगाचें सांकडें । पाडी रोकडें जीवासी ॥२९५॥
ज्या उपाधीमुळे जन्म-मरणाचा पूर येतो आणि जिवाला कठीण दुःखभोगात पडावे लागते.
येणें वैराग्यविवेकबळें । छेदूनि दुराशेचीं मूळें ।
उपरमु पावली एके वेळे । निजात्मसोहळे ते भोगी ॥२९६॥
या वैराग्य व विवेकाच्या बळाने दुराशेची मुळे तोडून ती एका क्षणात विरक्त झाली आणि आत्मसुखाचा सोहळा अनुभवू लागली.
नित्य सिद्धु सुखदाता । तो हृदयस्थु कांत आश्रितां ।
विकल्प सांडूनि चित्ता । वेगीं हृदयस्था मानली ॥२९७॥
जो नित्य सिद्ध व सुखदाता अंतर्यामी पती आहे, त्याला तिने संशय सोडून मनापासून आपलेसे केले.
त्यासी देखतां अनुभवाचे दिठीं । ऐक्यभावें घातली मिठी ।
निजसुख पावली गोरटी । उठाउठीं तत्काळ ॥२९८॥
अनुभवाच्या दृष्टीने त्याला पाहताच तिने ऐक्यभावाने मिठी मारली आणि ती सुंदर पिंगला तत्काळ आत्मसुख पावली.
बोलु घेऊनि गेला बोली । लाज लाजोनियां गेली ।
दृष्य द्रष्टा दशा ठेली । वाट मोडिली विषयांची ॥२९९॥
तिथे शब्दांचा व्यापार संपला, लाजही लज्जित होऊन निघून गेली, दृश्य व द्रष्टा ही अवस्था लयाला गेली आणि विषयांचा मार्ग बंद झाला.
सुखें सुखावलें मानस । तें सुखरूप जालें निःशेष ।
संकल्प विकल्प पडिले वोस । दोघां सावकाश निजप्रीती ॥३००॥
तिचे मन आनंदाने सुखी झाले व ते पूर्णपणे सुखरूप बनले. सर्व संकल्प-विकल्प गळून पडले आणि दोघांमध्ये निरामय प्रीती निर्माण झाली.
नाबद पडलिया उदकांत । विरोनि तया गोड करीत ।
तेवीं निराशीं पावोनि भगवंत । समरसत स्वानंदे ॥३०१॥
साखर जशी पाण्यात पडताच विरघळून पाण्याला गोड करते, तशी दुराशा सुटल्यावर पिंगला भगवंताशी स्वानंदात समरस झाली.
तेथ हेतूसी नाहीं ठावो । निमाला भावाभावो ।
वेडावला अनुभवो । दोघां प्रीती पाहाहो निवार ॥३०२॥
तिथे कोणतीही हेतू-वासना उरली नाही, भावाभाव मावळला, अनुभव थक्क झाला आणि दोघांचे असीम प्रेम जुळून आले.
सांडूनि मीतूंपणासी । खेंव दिधलें समरसीं ।
मग समाधीचिये सेजेशी । निजकांतेंसी पहुडली ॥३०३॥
मी-तूपणाचा त्याग करून तिने समरसतेची मिठी मारली आणि समाधीच्या शय्येवर आपल्या निजपतीसह निवांत विश्रांती घेतली.
झणें मायेची लागे दिठी । यालागीं स्फूर्तीचिया कोटी ।
निंबलोण गोरटी । उठाउठी वोवाळी ॥३०४॥
तिला मायेची दृष्ट लागू नये म्हणून स्फूर्तीच्या कोटी दीपांनी तिने तात्काळ निंबलोण ओवाळून टाकले.
ऐसी समाधिशेजेशीं । पिंगला रिघे निजसुखेंसीं ।
अवधूत म्हणे यदूसी । वैराग्यें वेश्येसी उपरमु ॥३०५॥
अशा समाधीच्या शय्येवर पिंगला आत्मसुखात निमग्न झाली. अवधूत यदूला म्हणतात, वैराग्याने वेश्येला पूर्ण शांती मिळाली.
वैराग्ये छेदिले आशापाश । पिंगला जाहली गा निराश ।
निराशेसी असमसाहस । सुखसंतोष सर्वदा ॥३०६॥
वैराग्याने सर्व आशापाश छेदले गेले आणि पिंगला पूर्ण निराश (आशा-रहित) झाली. अशा नैराश्यामुळे तिला नित्य सुख व संतोष मिळाला.
आशा हि परमं दुःखं नैराश्यं परमं सुखम् ।
यथा सञ्छिद्य कान्ताशां सुखं सुष्वाप पिङ्गला ॥४३॥
आशा हेच परम दुःख आहे आणि नैराश्य (आशा सुटणे) हेच परम सुख आहे. पिंगलेने कामुकाची आशा सोडून सुखपूर्वक निद्रा घेतली.
आशा तेथ लोलुप्यता । आशेपाशीं असे दीनता ।
आशा तेथ ममता । असे सर्वथा नाचती ॥३०७॥
आशा असते तिथे आसक्ती, दीनता व ममता सर्व प्रकारे नाचत असतात.
आशेपाशीं महाशोक । आशा करवी महादोख ।
आशेपाशीं पाप अशेख । असे देख तिष्ठत ॥३०८॥
आशेच्या जवळ मोठा शोक, मोठे दोष आणि सर्व प्रकारची पापे वास करून असतात.
आशेपाशीं अधर्म सकळ । आशा मानीना विटाळ ।
आशा नेणे काळवेळ । कर्म सकळ उच्छेदी ॥३०९॥
आशेच्या पोटी सर्व अधर्म असतो, ती विटाळ मानत नाही, वेळ-काळ पाहत नाही आणि सर्व सत्कर्मां नष्ट करते.
आशा अंत्यजातें उपासी । नीचसेवन आशेपाशीं ।
आशा न सांडी मेल्यासी । प्रेतापाशीं नेतसे ॥३१०॥
आशा नीच लोकांची सेवा करायला लावते आणि मरणानंतरही प्रेताच्या पाठीशी लागून राहते.
आशा उपजली अनंतासी । नीच वामनत्व आलें त्यासी ।
आशें दीन केलें देवांसी । कथा कायसी इतरांची ॥३११॥
परमेश्वर असलेल्या विष्णूलाही जेव्हा आशा उपजली, तेव्हा त्याला वामन होऊन याचक व्हावे लागले. आशेने देवांनाही दीन केले, मग इतरांची काय कथा?
जगाचा जो नित्य दाता । तो आशेनें केला भिकेसवता ।
वैर्याजचे द्वारीं झाला मागता । द्वारपाळता तेणें त्यासी ॥३१२॥
जो जगाचा नित्य दाता आहे, त्याला आशेने भिकारी बनवले आणि वैऱ्याच्या (बळीच्या) दारात द्वारपाल म्हणून उभे केले.
आशा तेथ नाहीं सुख । आशेपाशीं परम दुःख ।
आशा सर्वांसी बाधक । मुख्य दोष ते आशा ॥३१३॥
आशा आहे तिथे सुख नाही, आशेजवळ परम दुःख असते. आशा हीच सर्वांना बाधक असणारा मुख्य दोष आहे.
ज्याची आशा निःशेष जाये । तोचि परम सुख लाहे ।
ब्रह्मादिक वंदिती पाये । अष्टमा सिद्धि राहे दासीत्वें ॥३१४॥
ज्याची आशा पूर्णपणे नष्ट होते, तोच परम सुख प्राप्त करतो. ब्रह्मादिक देव त्याच्या पाया पडतात आणि अष्टसिद्धी त्याची दासी बनून राहते.
निराशांचा शुद्ध भावो । निराशांपाशीं तिष्ठे देवो ।
निराशांचें वचन पाहाहो । रावो देवो नुल्लंघी ॥३१५॥
निराश पुरुषाचा भाव अतिशय शुद्ध असतो, त्याच्याजवळ देव तिष्ठत राहतो आणि त्याचा शब्द राजा व देवही मोडू शकत नाहीत.
निराश तोचि सद्बुाद्धि । निराश तोचि विवेकनिधी ।
चारी मुक्ती पदोपदीं । नैराश्य आधीं वंदिती ॥३१६॥
निराश मनुष्यच खरी सद्बुद्धी व विवेकाचा साठा असतो. चारी मुक्ती पावलोपावली त्याला वंदन करतात.
निराशा तीर्थांचें तीर्थ । निराशा मुमुक्षूचा अर्थ ।
निराशेपाशीं परमार्थ । असे तिष्ठत निरंतर ॥३१७॥
नैराश्य हे सर्व तीर्थांचे तीर्थ आहे, मुमुक्षूंचे खरे धन आहे आणि परमार्थाची प्राप्ती नैराश्यापाशी निरंतर असते.
जाण नैराश्यतेपाशीं । वैराग्य होऊन असे दासी ।
निराश पहावया अहर्निशीं । हृषीकेशी चिंतितु ॥३१८॥
नैराश्यापाशी वैराग्य दासी बनून राहते आणि निराश भक्ताला पाहण्यासाठी हृषीकेश रात्रंदिवस उत्सुक असतो.
निराश देखोनि पळे दुःख । निराशेमाजीं नित्यसुख ।
निराशेपाशीं संतोख । यथासुखें क्रीडतु ॥३१९॥
नैराश्य पाहताच दुःख पळून जाते, नैराश्यात नित्यसुख वास करते आणि तेथे परम संतोष आनंदाने क्रीडा करतो.
नैराश्याचे भेटीसी पाहाहो । धांवे वैकुंठीचा रावो ।
नैराश्याचा सहज स्वभावो । महादेवो उपासी ॥३२०॥
निराश भक्ताला भेटण्यासाठी वैकुंठाचा राजा धावत येतो आणि साक्षात महादेवही नैराश्याच्या सहज स्वभावाची उपासना करतो.
निराशेपाशीं न ये आधी । निराशेपाशीं सकळ विधी ।
सच्चिदानंदपदीं । मिरवे त्रिशुद्धी निराशु ॥३२१॥
निराश माणसाजवळ कोणतीही आधिव्याधी येत नाही, त्याला सर्व विधी अनुकूल होतात व तो सच्चिदानंद पदावर विराजमान होतो.
ऐकोनि निराशेच्या नावां । थोरला देवो घेतसे धांवा ।
त्या देवोनियां खेंवा । रूपनांवा विसरला ॥३२२॥
नैराश्याचे नाव ऐकताच थोरला देव धाव घेतो आणि त्याला मिठी मारून आपले रूप-नाव विसरून जातो.
ते निराशेचा जिव्हाळा । पावोनि वेश्या पिंगला ।
जारपुरुषाशेच्या मूळा । स्वयें समूळा छेदिती झाली ॥३२३॥
अशा नैराश्याचा जिव्हाळा प्राप्त करून पिंगला वेश्येने कामुक पुरुषांच्या आशेची मुळे स्वतःहून समूळ तोडून टाकली.
जें आशापाशांचें छेदन । तेंचि समाधीचें निजस्थान ।
ते निज समाधी पावोन । पिंगला जाण पहुडली ॥३२४॥
आशापाशांचा छेद करणे हेच समाधीचे मूळ स्थान आहे. ती निजसमाधी प्राप्त करून पिंगला विश्रांतीस पावली.
सर्व वर्णामाजीं वोखाटी । कर्म पाहतां निंद्य दृष्टीं ।
ते वेश्या पावन झाली सृष्टीं । माझे वाक्पुटीं कथा तिची ॥३२५॥
सर्व वर्णांमध्ये अत्यंत नीच व कर्माने निंद्य असलेली वेश्या जगात पावन झाली; तिची ही पवित्र कथा माझ्या वाणीतून मी सांगितली.
यालागीं वैराग्यापरतें । आन साधन नाहीं येथें ।
कृष्ण थापटी उद्धवातें । आल्हादचित्तें प्रबोधी ॥३२६॥
यास्तव वैराग्याशिवाय दुसरे कोणतेही श्रेष्ठ साधन नाही, असे सांगून श्रीकृष्ण उद्घवाला प्रेमाने कुरवाळून प्रबुद्ध करतात.
अवधूत सांगे यदूसी । प्रत्यक्ष वेदबाह्यता वेश्येसी ।
ते निराशा होतां मानसीं । निजसुखासी पावली ॥३२७॥
अवधूत यदूला सांगतात की, प्रत्यक्ष वेदबाह्य असलेली वेश्याही मनात नैराश्य निर्माण होताच निजसुखाला प्राप्त झाली.
यालागीं कायावाचाचित्तें । उपासावें निराशेतें ।
यापरतें परमार्थातें । साधन येथें दिसेना ॥३२८॥
म्हणून काया, वाचा आणि मनाने नैराश्याचीच उपासना करावी. परमार्थात यापेक्षा श्रेष्ठ दुसरे कोणतेही साधन नाही.
इतर जितुकीं साधनें । तितुकीं निराशेकारणें ।
ते निराशा साधिली जेणें । परमार्थ तेणें लुटिला ॥३२९॥
इतर जितकी साधने आहेत ती सर्व नैराश्य प्राप्त करण्यासाठीच आहेत. ज्याने नैराश्य साध्य केले, त्याने परमार्थाचा खजिना लुटला.
कृपा जाकळिलें अवधूतासी । यदूसी धरोनियां पोटासी ।
निराशता हे जे अशी । अवश्यतेसीं साधावी ॥३३०॥
कृपेने भारावून गेलेल्या अवधूताने यदूला पोटाशी धरले आणि सांगितले की, हे नैराश्य अवश्य साध्य केले पाहिजे.
एका जनार्दना शरण । उसकी कृपा परिपूर्ण ।
तोचि आशापाश छेदून । समाधान पाववी ॥३३१॥
एकनाथ महाराज म्हणतात, मी माझे गुरू जनार्दन स्वामींना शरण आलो आहे. त्यांच्या परिपूर्ण कृपेनेच सर्व आशापाश तुटून अंतःकरणाला पूर्ण समाधान लाभते.