हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिना म्हणजे सण-उत्सव आणि विविध व्रतांची पर्वणी मानली जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी, सुखी संसारासाठी आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी श्री मंगळागौरीचे व्रत अत्यंत निष्ठेने व उत्साहाने साजरे करतात. गौरी म्हणजेच साक्षात पराशक्ती जगदंबा पार्वती. निसर्गाने हिरवा शालू नेसलेल्या या पावन काळात श्री मंगळागौरीची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते.
"मांगल्य, पावित्र्य आणि शुचितेचा त्रिवेणी संगम म्हणजे मंगळागौर! पार्वतीसारखे जन्मांतराचे सौभाग्य लाभावे आणि संसारावर आनंदाची सावली राहावी यासाठी हे व्रत केले जाते."
🌺 मंगळागौरी पूजनाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व
लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्षे श्रावण महिन्यातील सर्व मंगळवारी हे व्रत पाळले जाते. लग्नानंतरची पहिली मंगळागौर अत्यंत थाटामाटात साजरी केली जाते. या पूजेसाठी लग्न होऊन पाच वर्षांच्या आत असणाऱ्या सौभाग्यवती स्त्रियांनाच (ज्यांना शास्त्रात 'वपोरी-वसोळी' म्हटले जाते) आमंत्रण दिले जाते.
मंगळागौरीची पूजा म्हणजे मुख्यत्वे उमा-महेश्वराची (शिव-पार्वती) पूजा होय. पती-पत्नीमधील आत्यंतिक प्रेम, निष्ठा आणि आदर्शाचे स्मरण करण्यासाठी ही पूजा केली जाते. या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या रूपातील पार्वतीची धातूची मूर्ती आणि महादेवाची पिंड स्थापन करून षोडशोपचार पूजा केली जाते.
🛍️ आवश्यक पूजा साहित्य व १६ प्रकारची पत्रीपूजा
मंगळागौर पूजनामध्ये विविध वनस्पतींच्या पानांना (पत्री) विशेष महत्त्व आहे. प्राचीन काळी आयुर्वेदाचा प्रसार व्हावा आणि नववधूंना औषधी वनस्पतींची ओळख व्हावी या दृष्टीने १६ प्रकारच्या पत्री वाहण्याची पद्धत आहे.
इतर पूजा साहित्य: अन्नपूर्णा मूर्ती, शिवपिंड, ५ खारका, ५ सुपाऱ्या, ५ बदाम, ५ खोबऱ्याच्या वाट्या, २ वस्त्रे, १६ काडवाती, गुलाल, बुक्का, अक्षता, अत्तर, केवड्याचे कणीस, नारळ, हळद-कुंकू, पंचामृत आणि १६ विड्याची पाने.
💃 हळदीकुंकू, फराळ आणि मंगळागौरीचे ११० खेळ
संध्याकाळी सवाष्णींना हळदीकुंकवासाठी बोलावून त्यांची गव्हाने ओटी भरली जाते. रात्री सर्वांसाठी खास फराळाचे जिन्नस जसे की वाटली डाळ, मटकीची उसळ, करंज्या, चकल्या आणि लाडू बनवले जातात.
रात्रीच्या वेळी सर्व सवाष्णी एकत्र येऊन गाणी गातात आणि सुमारे ११० प्रकारचे पारंपरिक खेळ खेळतात. या खेळ प्रकारांमध्ये प्रामुख्याने:
- विविध फुगड्या: वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी (एकूण २१ प्रकार).
- हात व पायांचे खेळ: आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट.
- संवाद खेळ: करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, सवतीचे भांडण, दिंड.
हे खेळ केवळ मनोरंजनासाठी नसून, दैनंदिन घरकामात व्यस्त असणाऱ्या महिलांच्या शरीराच्या सर्व अवयवांना उत्तम व्यायाम मिळावा हा त्यामागील मुख्य शास्त्रीय उद्देश आहे.
📖 श्री मंगळागौरीची कहाणी (पावन कथा)
(पूजा झाल्यानंतर सवाष्णींनी ऐकायची पारंपरिक गोष्ट)
आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. ‘अल्लख’ म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,” असे म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला युक्ति सांगितली. “दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल”. अशी भिक्षा झोळीत घातली. बोवाचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाही असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उःशाप दिला. बोवा म्हणाले, “आपल्या नवऱ्याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळा वस्त्रं परिधान कर. रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल”. असं बोलून बोवा चालता झाला.
तिनं आपल्या पतीला सांगितलं. वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आत देवीची मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली, “वर माग” म्हणाली. “घरदार आहे, गुरंढोरं आहेत. धन द्रव्य आहे; पोटी पुत्र नाही, म्हणून दुःखी आहे.” देवी म्हणाली, “तुला संततीचं सुख नाही, मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे”. त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं “माझ्या मागच्या बाजूस जा. तिथं एक गणपती आहे. त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे, गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल” असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली.
वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, मोटभर घरी नेण्याकरिता घेतले. खाली उतरून पाहू लागला, तो आपल्या मोटेत आंबा एकच आहे. असं चार पाच वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, “तुझ्या नशिबी एकच फळ आहे”. फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली. दिवसमासा गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासा वाढू लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी ‘लग्न करा’ म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे, असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊ लागले. जाता जाता काय झालं? वाटेनं एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, “काय रांड द्वाड आहे! काय रांड द्वाड आहे! तेव्हा ती मुलगी म्हणाली, “माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे”. हे भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनांत आलं हिच्याशी भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हे घडतं कसं? त्याच दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला.
इकडे काय झालं? त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करू, म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामाभाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लाविलं. उभयतांना गौरीहरापाशी निजवलं. दोघं झोपी गेली. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. “अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कऱ्यांत शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे”. तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणं घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिऱ्हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले.
दुसरे दिवशी काय झालं? हिनं सकाळी उठुन स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली, तो आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मांडपांत आला. मुलीला खेळायला आणलं. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाही. मी त्याचे बरोबर खेळत नाही”. रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण काही पटेना. आईबापाला पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला, शेकडो लोक येऊन जेवू लागले.
इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामाला सांगू लागला, “मला असं असं स्वप्न पडलं”. मामा म्हणाला, “ठीक झालं. तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ.” परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, “इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा”. ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाही”. दासींनी यजमानणीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्यानं अंगठी ओळखली. आईबापांनीं विचारलं. “तुझ्याजवळ खूण काय आहे?” त्यानं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. “तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला” असं म्हणाली. तिनं सांगितलं. “मला मंगळागौरीचं व्रत असतं. ही सगळी तिची कृपा”. सासर माहेरची घरचीदारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं.
तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा होवो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठां उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
🪔 श्री मंगळागौरीची भावपूर्ण आरती
जय देवी मंगळागौरी । जय देवी मंगळागौरी ।
सुवासीन मी तुला पुजिते ॥ धृ. ॥
कुंकुम-तिलक माझ्या ललाटी ।
मंगल-मणी हे शोभत कंठी ।
रत्न-पाचूचा चुडा मनगटी ।
स्त्रीजन्माचे अहेव लेणे ।
तुझ्या कृपेने मला लाभते ॥ १ ॥
शीवशंकराहुनी प्रेमळ भोळा ।
दिधलासी पती तू भाग्यवतीला ।
देहाच्या देव्हारी पूजीन त्याला ।
हृदयाची आरती प्राणांच्या ज्योती ।
अमृत तेजाळ प्रीत जळते ॥ २ ॥
🕉️ समारोप
श्री मंगळागौरीचे हे व्रत केवळ एक धार्मिक विधी नसून कौटुंबिक आनंद, आरोग्य आणि स्त्रीशक्तीचा गौरव करणारा सण आहे. श्रावण महिन्यात हे पावन व्रत केल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होऊन उदंड समृद्धी प्राप्त होते. अशाच विविध सण व व्रतांची माहिती वाचण्यासाठी आमचा सन आणि उत्सव विभाग नक्की पहा.
॥ श्री मंगळागौरी देवताभ्यो नमः ॥