जेणे पृथ्वीसी धरिले । सूर्या प्रकाश उटिले । चंद्रबिंबी अमृत ठेविले । तेणे निववीत जगा तो ॥१॥
गगना पवाडू दिधला । मेरूस्तंभ उभारिला । गती पवनही उडविला । दाही दिशा फिरतसे ॥२॥
जेणे अग्नीसी दीपन । जीवनी ठेविले जीवन । आपोनिधी जळे पूर्ण । क्षीरे सागर भरियेला ॥३॥
नाना अन्नी ठेविली तृप्ती । नाना परिमळ पुष्पयाती । नाना रसस्वाद फळाप्रति । एवढी युक्ती कोणाची ॥४॥
अपार चांदणे फुलोरा । जेणे शोभविले अंबरा । पर्जन्याच्या करुनी धारा । जेणे पिकविले धरणीते ॥५॥
जेणे इंद्रादिका देवा । पदी स्थापुनी वाटिल्या सेवा । जेणे मर्दुनी दैत्य दानवा । केला सांभाळ भक्तांचा ॥६॥
जो या प्राणाते चालिता । जीवा जीवणे ज्याचिया सत्ता । मनी संकल्पाचिया चळथा । उठवी सत्ता हे कोणाची ॥७॥
जो या श्रुतीते पढविता । परमामृताते जीववीता । सूर्या अंजन लेवविता । अवघी सत्ता हे ज्याची ॥८॥
चराचर व्यापूनिया उरला । उभा विटेवरी ठाकला । निळा म्हणे तेणे केला । बुद्धी माझीये प्रकाश ॥९॥
ज्या परमेश्वराने पृथ्वी पेलली, सूर्याला प्रकाश दिला, चंद्रात अमृत ठेवले, अग्नी, जल, वायू, आकाश आणि अथांग निसर्गाची रचना केली; ज्याने देवांना पदे दिली आणि दैत्यांचा संहार करून भक्तांचे रक्षण केले, तोच चराचराला व्यापून उरणारा देव आज विटेवर उभा आहे. निळोबाराय म्हणतात, त्यानेच माझ्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश दिला आहे.