उभारिला ध्वज तिहीं लोकांवरी । ऐशी चराचरी कीर्ति ज्याची ॥१॥
ते हे निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर सोपान । मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा ॥२॥
धरुनि सगुण रुपें केली क्रीडा । बोलविला रेडा निगम वावे ॥३॥
बैसूनियां वरी चालविली भिंती । चांगदेवा प्रती दिली भेटी ॥४॥
मग वास केला अळंकापुरासी । पिंपळ द्वारासी कनकाचा ॥५॥
निळा म्हणे ज्याच्या नामें करितां घोष । नातळती दोष कळिकाळाचे ॥६॥
ज्यांनी तिन्ही लोकांत भक्तीचा आणि ज्ञानाचा ध्वज उभारला, अशी कीर्ती निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांची आहे. त्यांनी सगुण रूप धारण करून विविध लीला केल्या; रेड्याच्या मुखातून वेद वदवले, भिंतीवर बसून ती चालवली आणि चांगदेवांचा अहंकार दूर करून त्यांना भेट दिली. शेवटी सुवर्ण पिंपळाचे द्वार असलेल्या आळंदी क्षेत्री माउलींनी संजीवन समाधी घेतली. निळोबाराय म्हणतात, यांच्या नामाचा गजर केल्यास कळिकाळाचे कोणतेही दोष किंवा भय उरत नाही.