ईश्वरा नियंता निगुण । नाम रुप जया नाहीं वर्ण । विदया अविदयातीत चिदधन । आपणा जो आपण गुरुशिष्य ॥१॥
नातळोनि महदहंकार मायेसी । सहजचि गुणतीत तो अनायासीं । होणें निमणें नाहीं ज्यासी । आपण आपणासी कदा न देखे ॥२॥
नुरवुनी एक एकपण । दुजेपणा घालीत शून्य । पूर्णपणें नुरवीच पूर्ण । तत्साक्षी आपण सर्वद्रष्टा ॥३॥
ऐसिया आदि गुरुमूर्ति । आपणचि पुरुष आपण शक्ति । उमामहेश ऐशिया ख्याति । वाढउनी त्रिजगती विस्तारिली ॥४॥
मग आपण गुरु आपण शिष्य । आपण दीक्षा आपण उपदेश । दाउनी परंपरेचा मोस । अभेदज्ञानास प्रगटीतु ॥५॥
म्हणोनियां जी आदिनाथा । प्रकृति पुरुष तूंचि तें आतां । सकळ विश्वी विश्वजनिता । करिसी तत्वता निजबोध ॥६॥
शिव शक्ति निमित्य दावून । उपदेशिलें निजगुह्यज्ञान । तेणें देवोदेवि सुखसंपन्न । पावला मीन तो लाभ ॥७॥
तेणें गोरक्षीं उपदेशिला । निजात्मज्ञानीं प्रबोधिला । त्रैलोक्यमाजी गौरविला । योग दाविला विषदार्थ ॥८॥
गुह्यात़गुह्यज्ञानकथन । तेणें गहिनीतें उपदेशून । उध्दरावया दीन जन । तेणें निवृति शिक्षापिला ॥९॥
तेचि हातवटी ज्ञानेश्वरा । दिधली आदिपरंपरा । सोपान मुक्ताई वटेश्वरा । चांगया प्रसाद दिधला ॥१०॥
निळा म्हणे ऐसियापरी । नाथसांप्रदायाची थोरी । प्रगट केली ज्ञानेश्वरी । भगवदगीता उकलुनी ॥११॥
जो ईश्वर नियंता, निर्गुण, नाम-रूप आणि वर्णाच्या पलीकडचा आहे; जो ज्ञान-अज्ञानाच्या पलीकडे चिद्घन असून स्वतःच गुरू आणि शिष्य आहे; जो माया, अहंकार आणि तिन्ही गुणांच्या पलीकडचा असून ज्याला जन्म-मरण नाही; जो एकात्मतेतही द्वैत उरू देत नाही आणि सर्वकाही पाहणारा साक्षी आहे; असा आदिगुरू स्वतःच पुरुष आणि शक्ती बनून शिव-पार्वतीच्या रूपाने विश्वात विस्तारला. मग स्वतःच गुरू, शिष्य, दीक्षा आणि उपदेश बनून त्याने परंपरेचा मार्ग दाखवला. हे आदिनाथा, तूच प्रकृती आणि पुरुष असून सर्वांना आत्मज्ञान देणारा आहेस. शिवाने पार्वतीला उपदेशिलेले हे गुप्त ज्ञान मच्छिंद्रनाथांना प्राप्त झाले. त्यांनी गोरक्षनाथांना उपदेशून योगमार्ग स्पष्ट केला. गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना आणि त्यांनी दीनजनांच्या उद्धारासाठी निवृत्तीनाथांना उपदेश दिला. निवृत्तीनाथांनी हीच ज्ञानपरंपरा ज्ञानेश्वरांना दिली, तसेच सोपानदेव, मुक्ताबाई आणि चांगदेवांना हा प्रसाद मिळाला. संत निळोबाराय म्हणतात, अशा प्रकारे नाथ संप्रदायाची ही थोर परंपरा ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचा अर्थ उलगडून 'ज्ञानेश्वरी'च्या रूपाने जगात प्रकट केली.