बहुत अवतार घेतलीं सोंगें ।
बहुतां भक्तांसी तारिलें मागें ।
बहुताचि शोभला बहुतां अंगे ।
बहुतां संगे क्रीडा केली ॥१॥
मासा कांसव डुक्कर झाला ।
नृसिंह वामन होउनी ठेला ।
भक्ताचें काजीं संकटे याला ।
बहुत अवगला अवगणिया ॥२॥
एके दिवशी गोधनामागें ।
अवघाचि गिळियला होता नागें ।
त्यातें चिरुनियां निघाला वेगें ।
वांचला भाग्यें गौळियांच्या ॥३॥
एकदां वोणवा गिळितुचि आला ।
गोवळे देखोनि धाकिती त्याला ।
पसरुनी मुख तो अवघाचि प्याला ।
विराट झाला स्वरुपी हा ॥४॥
वनामाजी ब्रम्हा चोरुनी आला ।
वत्सें गोवळे घेऊनी गेला ।
अंगे आपण तैसाचि झाला ।
मिरवत आला गोकुळांत ॥५॥
इंद्राचि पांजी आपनचि खाय ।
त्याचिया क्रोधें पाउसाचे भय ।
मग उचलूनी डोंगर तळीं त्या राहे ।
गोकुळासगट नाहीं भ्याला ॥६॥
चेंडुवाच्या मिसें बुडाला डोहीं ।
काळियाचि नाथुनी आणिला पाही ।
नाचती गोवळे वोसरल्या गाई ।
आनंदासी काई उणे तेथें ॥७॥
व्देषिया म्हणोनि मामा तेचि मारी ।
विश्वासी म्हणोनी पांडवा घरीं ।
आवडत्या म्हणोनी भोगिल्या नारी ।
लाघवी मुरारी खेळ खेळे ॥८॥
निळा म्हणे हा भक्तांसाठीं ।
नाना कचाटें सोसितो आटी ।
धरुनियां भावे बैसतां पोटीं ।
सोडवी संकटी स्वामी माझा ॥९॥
श्रीकृष्णाने मत्स्य, कूर्मा, वराह, नृसिंह, वामन असे अनेक अवतार घेऊन भक्तांचे रक्षण केले. गोकुळात असताना त्याने सर्पाला फाडून गोपाळांचे प्राण वाचवले, वणवा गिळून टाकला, ब्रह्मादेवाने वासरे चोरली तेव्हा स्वतः ती रूपे घेतली, आणि गोवर्धन पर्वत उचलून इंद्राच्या कोपापासून गोकुळाचे रक्षण केले. कालिया नागाचा मर्द केला आणि कंसाचा वध केला. संत निळोबाराय म्हणतात, असा हा माझा स्वामी भक्तांसाठी संकटे सोसतो आणि भक्ती करणाऱ्याला सर्व संकटांतून सोडवतो.