परात्परा सच्चिदानंदा ।
परिपूर्णा जी आनंदकंदा ।
जगदीशा विश्रवंद्या ।
विश्वव्यापक अनंता ।।१।।
भक्तवत्सला कृपासिंधु ।
तापत्रयहरणा दीनबंधु ।
तुझ्या नामी अगाध बोधु ।
भक्त पावती भाविंक ॥२॥
परमपुरुषा गुणातीता ।
अव्यया अक्षरा जी अव्यक्ता ।
विश्रवमंगळा रुक्मिणी कांता ।
पुंडलिकवरदा पंढरीशा ॥३॥
निरंजना निर्विकारा ।
निर्विकल्पा जगदोध्दारा ।
वेदवेदांतसागरा ।
विश्रवंभरा कल्पादि ॥४॥
भावाभावविवर्जिता ।
सगुणनिर्गुणा गुणातीता ।
निळया स्वामी कृपावंता ।
चरणी माथा तुमचिये ॥५॥
हे परात्परा, सच्चिदानंदा, परिपूर्ण आनंदकंदा, जगदीशा, जगाला वंदनीय असलेल्या, विश्वव्यापका आणि अनंता! तू भक्तांवर प्रेम करणारा कृपेचा सागर आहेस, संसारातील तिन्ही ताप हरण करणारा दीनांचा बंधू आहेस. तुझ्या नामात अगाध ज्ञान सामावलेले आहे, जे भाविक भक्तांना प्राप्त होते. तू परमपुरुष, गुणातीत, अविनाशी, अव्यक्त, जगाचे कल्याण करणारा, रुक्मिणीचा पती आणि पुंडलिकाला वर देणारा पंढरीनाथ आहेस. तू निरंजन, निर्विकार, निर्विकल्प, जगाचा उद्धार करणारा, वेद आणि वेदांताचा सागर तसेच सर्व जगाचे पोषण करणारा कल्पादी परमात्मा आहेस. भावना आणि अभावाच्या पलीकडे असलेल्या, सगुण आणि निर्गुण अशा हे माझ्या स्वामी पांडुरंगा! संत निळोबाराय म्हणतात की, मी तुमच्या चरणी माझा माथा टेकवतो.