जिहीं भाव धरिला ठायीं । बुडी दिधली तुमच्या पायीं । त्यासी करुणेची करुनी साई । आपणापाशीं बैसविले ॥१॥
प्रल्हादा संकटीं रक्षिलें । ध्रुवासी अढळपदीं बैसविलें । उपमन्या नेउनियां रक्षिलें । क्षीराब्धी वैभव देउनी ॥२॥
उध्दवासी ब्रम्हरस पाजिला । अर्जुना निजबोध अर्पिला । द्रौपदीचा लळा पाळिला । वस्त्राभरणें पुरविली ॥३॥
गौळणींचे प्रिय संवाद । नित्य भक्षणें त्यांचे दुग्ध । गोवळांसवें हुंबरी साद । हमामा हुतुतु खेळणें ॥४॥
जिहीं तुमचें धरिलें प्रेम । आवडीं वदनीं गाईलें नाम । त्यांचा करुनियां संभ्रम । निजानंदा पात्र केलें ॥५॥
नामदेवा ज्ञानदेवा । निवृतित्तनाथा चांगदेवा । एकोबा तुकोबाचिया भावा । तैसेंचि वर्ता श्रीहरी ॥६॥
निळा म्हणे मी तो दीन । सकळ संतांचा चरणरेण । तुमच्या स्तवनीं ठेविलें मन । येईल चित्ता तैसें करा ॥७॥
ज्यांनी तुझ्या चरणी निष्ठा ठेवली, त्यांना तू जवळ केलेस. प्रल्हाद, ध्रुव, उपमन्यू, उद्ध्व, अर्जुन आणि द्रौपदीचा तू सांभाळ केलास. गोकुळात गोपाळांसोबत खेळलास. नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ व तुकाराम महाराजांच्या भावाला तू पावलास; निळोबाराय म्हणतात, मी संतांच्या चरणाची धूळ आहे, माझ्याबाबतीतही तुला योग्य वाटेल तसेच कर.