॥ जय जय विठ्ठल रखुमाई ॥ संतवाणी डिजिटल लायब्ररी २०२६
जीवन जगण्याचा खरा मार्ग

संत सुभाषिते व वचने

थोर संतांच्या मुखातून प्रकटलेली मानवी जीवनाला दिशा देणारी, नैतिक मूल्ये शिकवणारी अनमोल सुभाषिते आणि त्यांचे सोपे अर्थ.

अनमोल विचार

संत सुभाषित विथिका

🌸
संत तुकाराम महाराज

"मऊ मेणाहुनि आम्हीं विष्णुदास ।
कठीण वज्रास भेदू आम्हीं ॥"

अर्थ: सज्जनांशी आमचे वागणे मेणापेक्षाही मऊ असते, परंतु अन्यायाविरुद्ध लढताना आम्ही वज्रापेक्षाही कठीण बनू शकतो.

संत ज्ञानेश्वर महाराज

"जे खळांची व्यंकटी सांडो ।
तया सत्कर्मीं रती वाढो ॥"

अर्थ: या जगातील दुष्ट लोकांची वाईट बुद्धी नष्ट होवो आणि त्यांची चांगल्या कामांबद्दलची ओढ व निष्ठा वाढो.

संत चोखामेळा

"ऊंस डोंगा परी रस नव्हे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥"

अर्थ: ऊस जरी वाकडा असला तरी त्यातील रस वाकडा नसतो, तसे माणसाचे शरीर कसेही असले तरी त्याचा अंतरात्मा शुद्ध असू शकतो. बाह्य रूपाला भुलू नका.

संस्कृत सुभाषित

"कुक्कुटात् प्रति-उत्थानम् च युद्धम् च बन्धुषु संविभागम् च ।
स्वयम्-आक्रम्य भुक्तम् च चत्वारि शिक्षेत् ॥"

अर्थ: वेळेवर उठणे, नेहमी लढाईसाठी तयार राहणे, मिळालेले अन्न बांधवांमध्ये वाटून घेणे आणि स्वतः मिळवलेले अन्न खाणे हे चार गुण कोंबड्याकडून शिकण्यासारखे आहेत.

संस्कृत सुभाषित

"अहो दुर्जनसंसर्गान्मानहानिः पदे पदे ।
पावको लोहासङ्गेन मुद्गरैरभिहन्यते ॥"

अर्थ: दुष्ट माणसाच्या सहवासाने पावलोपावली अपमान होतो. तापलेल्या लोखंडाच्या सहवासामुळे पवित्र अग्नीलाही घणाचे घाव सहन करावे लागतात.

पंचतंत्र

"हीयते हि मतिस्तात हीनैः सह समागमात् ।
समैश्च समतामेति विशिष्टैश्च विशिष्टताम् ॥"

अर्थ: कनिष्ठ लोकांच्या संगतीने बुद्धी मंद होते, बरोबरीच्या लोकांच्या संगतीने ती तशीच राहते, तर विद्वान व श्रेष्ठ लोकांच्या सहवासाने ती अधिक प्रगल्भ बनते.

नीतिशतक

"साहित्यसंगीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः ।
तृणं न खादन्नपि जीवमानस्तद्भागधेयं परमं पशूनाम् ॥"

अर्थ: साहित्य, संगीत व कलेपासून वंचित असलेला माणूस म्हणजे शिंगे व शेपुट नसलेला पशूच होय. तो गवत न खाता जगतो, हे पशूंचे सुदैव आहे.

संस्कृत सुभाषित

"तृणादपि लघुस्तूलः तूलादपि च याचकः ।
वायुना किं न नीतोऽसौ मामयं प्रार्थयेदिति ॥"

अर्थ: गवतापेक्षा कापूस हलका असतो आणि कापसापेक्षा याचक (मागणारा) क्षुद्र असतो. वारा त्याला उडवून नेण्यापासून घाबरतो, कारण 'हा माझ्याकडेही काही मागेल' अशी भीती वाऱ्याला वाटते.

मालविकाग्निमित्रम् (कालिदास)

"पुराणमित्येव न साधु सर्वं न चापि नवमित्यवद्यम् ।
सन्तः परीक्ष्यान्यतरद्भजन्ते मूढः परप्रत्ययनेयबुद्धिः ॥"

अर्थ: सर्वच जुने योग्य असते असे नाही आणि नवीन आहे म्हणून ते वाईट ठरत नाही. सुज्ञ लोक स्वतः पारखून योग्य ते स्वीकारतात, तर मूर्ख लोक दुसऱ्याच्या सांगण्यावरून निर्णय घेतात.

संस्कृत सुभाषित

"दूरेऽपि श्रुत्वा भवदीयकीर्तिं कर्णौ हि तृप्तौ न च चक्षुषी मे ।
तयोर्विवादं परिहर्तुकामः समागतोऽहं तव दर्शनाय ॥"

अर्थ: तुमची कीर्ती ऐकून कानांचे समाधान झाले, पण डोळे अतृप्त राहिले. कान आणि डोळ्यांमधील हाच वाद मिटवण्यासाठी मी तुमच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी आलो आहे.

संस्कृत सुभाषित

"स्वभावं न जहात्येव साधुरापद्गतोऽपि सन् ।
कर्पूरः पावकस्पृष्टः सौरभं लभतेतराम् ॥"

अर्थ: संकटात सापडला तरी सज्जन माणूस आपला चांगला स्वभाव सोडत नाही. कापूर जळतानाही आपला सुवास अधिकच पसरवतो.

मनुस्मृती / सुभाषित

"विषादप्यमृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम् ।
अमित्रादपि सद्वृत्तं अमेध्यादपि कांचनम् ॥"

अर्थ: विषातून मिळालेले अमृत, बालकाचे चांगले विचार, शत्रूमधील चांगले गुण आणि अस्वच्छ ठिकाणाहून मिळालेले सोने - या गोष्टी नेहमी गोळा कराव्यात.

नीतिशतक

"पापान्निवारयति योजयते हिताय गुह्यं निगूहति गुणान् प्रकटीकरोति ।
आपद्गतं च न जहाति ददाति काले सन्मित्रलक्षणमिदं निगदन्ति सन्तः ॥"

अर्थ: चांगला मित्र चुकीच्या गोष्टींपासून रोखतो, हिताचे सांगतो, गुपिते जपतो, गुणांचे कौतुक करतो आणि संकटात साथ सोडीत नाही.

संस्कृत सुभाषित

"साधूनां दर्शनं पुण्यं तीर्थभूता हि साधवः ।
तीर्थं फलति कालेन सद्यः साधुसमागमः ॥"

अर्थ: संतांचे दर्शन तीर्थक्षेत्रासारखेच पुण्यदायी असते. तीर्थयात्रेचे फळ मिळायला वेळ लागतो, पण संतांच्या सहवासाचा लाभ तत्काळ होतो.

चाणक्य नीति

"प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यन्ति जन्तवः ।
तस्मात् तदेव वक्तव्यं वचने का दरिद्रता ॥"

अर्थ: गोड बोलण्याने सर्व जीव आनंदी होतात; म्हणून नेहमी प्रियच बोलावे. चांगले बोलण्यात कसला कंजूषपणा?

सुभाषित रत्नभांडागार

"भारतं पञ्चमो वेदः सुपुत्रः सप्तमो रसः ।
दाता पञ्चदशं रत्नं जामातो दशमो ग्रहः ॥"

अर्थ: महाभारत हा ५ वा वेद, गुणी मुलगा ७ वा रस, उदार मनुष्य १५ वे रत्न आणि जावई हा ९ ग्रहांनंतरचा १० वा ग्रह मानला जातो.

संस्कृत सुभाषित

"रिक्तपाणिर्न पश्येत् राजानं देवतां गुरुम् ।
दैवज्ञं भिषजं मित्रं फलेन फलमादिशेत् ॥"

अर्थ: राजा, देव, गुरू, ज्योतिषी, वैद्य आणि मित्र यांच्याकडे रिकाम्या हाताने जाऊ नये; नेहमी काहीतरी भेट किंवा फळ घेऊन जावे.

हास्य सुभाषित

"मलिनैरलकैरेतैः शुक्लत्वं प्रकटीकृतम् ।
तद्रोषादिव निर्याता वदनाद्रदनावलिः ॥"

अर्थ: काळ्या केसांनी पांढरा रंग धारण केला; जणू पांढरा असण्याचा स्वतःचा गुण केसांनी चोरल्याच्या रागानेच तोंडातील दात निघून गेले!

संस्कृत सुभाषित

"दर्शने स्पर्शने वाऽपि श्रवणे भाषणेऽपि वा ।
यत्र द्रवत्यन्तरङ्गं स स्नेह इति कथ्यते ॥"

अर्थ: ज्या व्यक्तीला पाहिल्यावर, स्पर्श केल्यावर, तिचे ऐकल्यावर वा बोलल्यावर मन आनंदून विरघळते, त्यालाच खरा स्नेह (प्रेम) म्हणतात.

संस्कृत सुभाषित

"यथा गजपतिः श्रान्तश्छायार्थी वृक्षमाश्रितः ।
विश्रम्य तं द्रुमं हन्ति तथा नीचः स्वमाश्रयम् ॥"

अर्थ: ज्याप्रमाणे थकलेला हत्ती झाडाच्या सावलीत विश्रांती घेऊन त्याच झाडाला उपटून टाकतो, तसाच नीच माणूस आश्रय देणाऱ्याचाच नाश करतो.

संस्कृत उपदेश

"चित्ते भ्रान्तिर्जायते मद्यपानाद्भ्रान्ते चित्ते पापचर्यामुपैति ।
पापं कृत्वा दुर्गतिं यान्ति मूढास्तस्मान्मद्यं नैव पेयं न पेयम् ॥"

अर्थ: मद्यपानाने बुद्धी भ्रमित होते, भ्रमित बुद्धीने पाप घडते आणि पापी लोक दुर्गतीला जातात. म्हणून दारू कधीही पिऊ नये.

सुभाषित संग्रह

"मौनं कालविलम्बश्च प्रयाणं भूमिदर्शनम् ।
भ्रुकुट्यन्यमुखी वार्ता नकारः षड्विधः स्मृतः ॥"

अर्थ: शांत राहणे, उशीर करणे, निघून जाणे, खाली पाहणे, आठी घालणे आणि भलतीच गोष्ट काढणे हे प्रत्यक्ष 'नाही' न म्हणता नकार देण्याचे ६ प्रकार आहेत.

शब्दक्रीडा सुभाषित

"साक्षरा विपरीताश्चेद्राक्षसा एव केवलम् ।
सरसो विपरीतश्चेत्सरसत्वं न मुञ्चति ॥"

अर्थ: साक्षर लोक भ्रष्ट/उलटले तर 'राक्षस' बनतात (साक्षरा उलट वाचल्यास राक्षस); पण सुसंस्कृत (सरस) माणूस उलटला तरी आपला सरसपणा आणि गोडवा सोडत नाही.

संस्कृत सुभाषित

"मृदोः परिभवो नित्यं वैरं तीक्ष्णस्य नित्यशः ।
उत्सृज्य तद्द्वयं तस्मान्मध्यां वृत्तिं समाश्रयेत् ॥"

अर्थ: जास्त मऊ वागल्यास अपमान होतो आणि अति तापटपणाने वैर निर्माण होते. म्हणूनच या दोन्ही टोकांचा त्याग करून मध्यम मार्गाचा अवलंब करावा.

हितोपदेश

"यौवनं धनसम्पत्तिः प्रभुत्वमविवेकिता ।
एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ॥"

अर्थ: तारुण्य, संपत्ती, सत्ता आणि अविवेक यांपैकी एकच गोष्ट विनाशाला पुरेशी असते; मग जिथे चारही एकत्र येतात तिथे किती अनर्थ घडेल!

संस्कृत सुभाषित

"कोऽतिभारः समर्थानां किं दूरं व्यवसायिनाम् ।
को विदेशस्तु विदुषां कः परः प्रियवादिनाम् ॥"

अर्थ: समर्थ माणसासाठी कोणतीही गोष्ट जड नसते, उद्योगी माणसासाठी कोणतेही अंतर दूर नसते. विद्वानासाठी कोणताही देश परका नसतो आणि गोड बोलणाऱ्या माणसाला कोणीही परका वाटत नाही.

संस्कृत सुभाषित

"उद्यमस्साहसं धैर्य बुद्धि: शक्तिः पराक्रमः ।
षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवः सहायकृत् ॥"

अर्थ: कष्टाळूपणा, धाडस, धैर्य, बुद्धी, ताकद आणि पराक्रम — हे सहा गुण ज्याच्याजवळ असतात, त्याला देवही मदत करतो.

महाभारत / सुभाषित

"सत्यस्य वचनं श्रेय: सत्यादपि हितं वदेत् ।
यद्भूतहितमत्यन्तमेतत्सत्यं मतं मम ॥"

अर्थ: सत्य बोलणे श्रेयस्कर आहे; परंतु सत्यापेक्षाही जे हितकारक असेल ते बोलावे. ज्याने सर्व प्राण्यांचे अत्यंत कल्याण होईल तेच खरे सत्य होय.

संस्कृत सुभाषित

"नरत्वं दुर्लभं लोके विद्या तत्र सुदुर्लभा ।
शीलं च दुर्लभं तत्र विनयस्तत्र सुदुर्लभः ॥"

अर्थ: मनुष्य जन्म दुर्मिळ आहे, त्यात विद्या मिळणे अधिक कठीण. विद्या असूनही चांगले चारित्र्य असणे दुर्मिळ, आणि एवढे सर्व असूनही नम्रता असणारा माणूस तर अत्यंत दुर्मिळ असतो.

नीतिशतक (भर्तृहरी)

"सन्तप्तायसि संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते
मुक्ताकारतया तदेव नलिनीपत्रस्थितं राजते ।
स्वात्यां सागरशुक्तिमध्यपतितं सन्मौक्तिकं जायते
प्रायेणोत्तममध्यमाधमदशा संसर्गतो जायते ॥"

अर्थ: लोखंडावर पडलेले पाणी नष्ट होते, कमळाच्या पानावर ते मोत्यासारखे चमकते आणि शिंपल्यात पडल्यास खरा मोती बनते. माणसाची उत्तम, मध्यम वा अधम अवस्था ही त्याच्या संगतीवर अवलंबून असते.

विदुर नीति

"ईर्षुर्धृणी नसन्तुष्टः क्रोधनो नित्यशङ्कितः ।
परभाग्योपजीवी च षडेते नित्यदुःखिताः ॥"

अर्थ: मत्सर करणारा, तिरस्कार करणारा, असमाधानी, रागीट, सतत शंका घेणारा आणि दुसऱ्याच्या जीवावर जगणारा — हे सहा लोक आयुष्यात नेहमी दुःखी असतात.

संस्कृत सुभाषित

"वस्त्रदानफलं राज्यं पादुकाभ्यां च वाहनम् ।
ताम्बूलाद्भोगमाप्नोति अन्नदानात्फलत्रयम् ॥"

अर्थ: वस्त्रदानाने राज्य, चपलांच्या दानाने वाहन आणि तांबूल दानाने उपभोग मिळतो; परंतु अन्नदान केल्याने या तिन्ही दानांचे फळ एकत्र प्राप्त होते.

संस्कृत सुभाषित

"खलः सर्षपमात्राणि परच्छिद्राणि पश्यति ।
आत्मनो बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यति ॥"

अर्थ: दुष्ट मनुष्य दुसऱ्याचे मोहरीएवढे लहान दोषही लगेच शोधतो; पण स्वतःचे बेलफळाएवढे मोठे दोष दिसुनही न पहिल्यासारखे करतो.

पंचतंत्र / सुभाषित

"उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः ।
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः ॥"

अर्थ: कोणतीही कामे प्रयत्नाने व कष्टानेच पूर्ण होतात, केवळ मनात विचार करून (मनोरथाने) नाही. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात प्राणी स्वतःहून येऊन शिरत नाहीत, त्यालाही शिकार करावीच लागते.

संस्कृत सुभाषित

"न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारि ।
व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानम् ॥"

अर्थ: विद्या हे असे धन आहे ज्याला चोर चोरू शकत नाही, राजा हिसकावून घेऊ शकत नाही, भावंडात त्याची वाटणी होत नाही आणि त्याचे ओझेही होत नाही. जेवढे खर्च करू (वाटत राहू) तेवढे ते रोज वाढतेच. म्हणूनच विद्याधन हे सर्व धनांत श्रेष्ठ आहे.

महोपनिषद् / हितोपदेश

"अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् ।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ॥"

अर्थ: 'हा माझा आणि हा परका' असा विचार क्षुद्र (संकुचित) बुद्धीचे लोक करतात. परंतु उदार अंतःकरणाच्या लोकांसाठी तर संपूर्ण पृथ्वी हेच एक कुटुंब असते.

सुभाषित संग्रह

"पिबन्ति नद्यः स्वयमेव नाम्भः स्वयं न खादन्ति फलानि वृक्षाः ।
नादन्ति सस्यं खलु वारिवाहाः परोपकाराय सतां विभूतयः ॥"

अर्थ: नद्या स्वतःचे पाणी स्वतः पीत नाहीत, झाडे स्वतःची फळे स्वतः खात नाहीत आणि ढग स्वतः पिकवलेले धान्य स्वतः खात नाहीत. त्याचप्रमाणे सज्जन लोकांची संपत्ती व जीवन हे दुसऱ्यांच्या कल्याणासाठीच (परोपकारासाठी) असते.

हितोपदेश

"विद्या ददाति विनयं विनयाद्याति पात्रताम् ।
पात्रत्वाद्धनमाप्नोति धनाद्धर्मं ततः सुखम् ॥"

अर्थ: विद्या माणसाला नम्रता देते, नम्रतेमुळे पात्रता (योग्यता) येते, पात्रतेमुळे धन प्राप्त होते, धनाने सत्कार्य (धर्म) घडते आणि त्यातूनच खऱ्या सुखाची प्राप्ती होते.

नीतिशतक (भर्तृहरी)

"केयूराणि न भूषयन्ति पुरुषं हारा न चन्द्रोज्ज्वलाः ।
वाण्येका समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते ॥"

अर्थ: बाहुभूषणे किंवा चंद्रासारखे चमकणारे मोत्यांचे हार माणसाची खरी शोभा वाढवत नाहीत; तर माणसाने आत्मसात केलेली आणि आत्मियतेने बोललेली 'संस्कृत/मधुर वाणी' हेच त्याचे खरे सौंदर्य व दागिना आहे.

संत तुकाराम महाराज
"मऊ मेणाहुनि आम्हीं विष्णुदास ।
कठीण वज्रास भेदू आम्हीं ॥"
संदेश: सज्जनांशी आमचे वागणे मेणापेक्षाही मऊ असते, परंतु अन्यायाविरुद्ध लढताना आम्ही वज्रापेक्षाही कठीण बनू शकतो.
✨ संतवाणी — www.santvani.co.in ✨
संत ज्ञानेश्वर महाराज
"जे खळांची व्यंकटी सांडो ।
तया सत्कर्मीं रती वाढो ॥"
संदेश: या जगातील दुष्ट लोकांची वाईट बुद्धी नष्ट होवो आणि त्यांची चांगल्या कामांबद्दलची ओढ व निष्ठा वाढो.
✨ संतवाणी — www.santvani.co.in ✨
संत चोखामेळा
"ऊंस डोंगा परी रस नव्हे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा ॥"
संदेश: ऊस जरी वाकडा असला तरी त्यातील रस वाकडा नसतो, तसे माणसाचे शरीर कसेही असले तरी त्याचा अंतरात्मा शुद्ध असू शकतो. बाह्य रूपाला भुलू नका.
✨ संतवाणी — www.santvani.co.in ✨