॥ जय जय विठ्ठल रखुमाई ॥ संतवाणी डिजिटल लायब्ररी २०२६
ग्रामविकासाची अमर संहिता

ग्रामगीता

॥ राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ॥

डिजिटल संकलन वेगाने सुरू आहे!

'ग्रामगीता' या ग्रंथातील सर्व ४१ अध्याय आणि ८ पंचके संकलित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच हा संपूर्ण ग्रंथ अभ्यासासाठी विनामूल्य उपलब्ध केला जाईल.

ग्रामगीतेचा संक्षिप्त परिचय

ग्रामगीता हा राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी रचलेला अद्वितीय ग्रंथ असून, १९५५ साली याची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. या ग्रंथाला आचार्य विनोबा भावे, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, मामासाहेब सोनोपंत दांडेकर, दादा धर्माधिकारी, श्रीपाद सातवळेकर, वि.स. खांडेकर, वि.भि. कोलते, ग.त्र्यं. माडखोलकर आणि मध्य प्रांताचे समाजकल्याणमंत्री दीनदयाल गुप्त यांच्या तब्बल नऊ ऐतिहासिक प्रस्तावना लाभल्या आहेत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची 'ग्रामगीता' म्हणजे त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या गावाचे आणि ग्रामसंस्कृतीचे नितळ रूप होय. ग्रामोन्नतीच्या तळमळीतून प्रकटलेले आर्त उद्गार म्हणजेच ग्रामगीता! या ग्रंथाचे डॉ. श्री. भा. वर्णेकर यांनी संस्कृत भाषेत श्लोकबद्ध भाषांतरही केले आहे.

"माझा देव साधनारूपाने देवळात वा वनात असला, अनुभवरूपाने तो मनात वा चिंतनात असला तरी कार्यरूपाने तो जनात आहे. विस्तीर्ण स्वरूपात पसरलेली गावे, हीच माझी दैवते आहेत. ग्रामसेवा हीच माझी पूजा आहे."
— राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज

ग्रामगीतेचे ८ पंचके (अष्टमहासिद्धी)

ग्रामगीतेमध्ये एकूण ४१ अध्यायांमध्ये ८ पंचके मांडली आहेत. ही आठ पंचके म्हणजे ग्रामजीवनाच्या विकास संकल्पनेतील अष्टमहासिद्धीच होत:

१. सद्‌धर्ममंथन
२. लोकवशीकरण
३. ग्रामनिर्माण
४. दृष्टिपरिवर्तन
५. संस्कारशोधन
६. प्रेमधर्मस्थापन
७. देवत्वसाधन
८. आदर्श जीवन

ग्रामगीतेवर महापुरुषांची पुष्पवृष्टी

• वैराग्यमूर्ती श्रीसंत गाडगेबाबा:

"तुकडोजीबाबांची 'ग्रामगीता' ही आज गीता-ज्ञानेश्वरीप्रमाणे जनतेला खरं ज्ञान देऊन खेड्यापाड्यात-झोपडीझोपडीत सुख समाधान पैदा करील, असा भरवसा वाटतो. आज अशा ग्रंथाची गावोगावी गरज आहे. भगवंताच्या गीतेचं खरं मर्म — 'सर्व जीव देवासमान समजून सेवा करा' — हे या ग्रंथाच्या रूपात आज प्रगट झालं आहे."

• आचार्य विनोबा भावे:

"श्रीसंत तुकडोजी महाराज कित्येक वर्षे अखंड जनसेवेत राबत आहेत. ग्रामीण जनतेची सेवा हा एकच ध्यास त्यांनी धरला आहे. त्यांची ही 'ग्रामगीता' स्वानुभव संमत आहे, त्यामुळे ती आपोआपच शास्त्रसंमतही झाली आहे. बाळगोपाळांना यातून चांगली प्रेरणा मिळेल यात शंका नाही."

🙏 ग्रामदेवतेला अर्पण:

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही ग्रामगीता थेट ग्रामदेवतेलाच अर्पण केली आहे. गाव सुखी व्हावा, सर्वार्थाने समृद्ध व्हावा, परस्परांचा स्नेहभाव जागावा आणि श्रमांना प्रतिष्ठा मिळावी, या आर्त तळमळीने त्यांनी ग्रामजीवनात समृद्धी आणणारी ग्रामदेवता जनमनात जागवली आहे.

सर्व ग्रंथ संपदा पाहा