डिजिटल संकलन वेगाने सुरू आहे!
'चतुःश्लोकी भागवत' या ग्रंथातील सर्व ओव्या आणि मराठी प्राकृत टीका संकलित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच हा संपूर्ण ग्रंथ अभ्यासासाठी विनामूल्य उपलब्ध केला जाईल.
ग्रंथाचा संक्षिप्त परिचय व इतिहास
चतुःश्लोकी भागवत हा शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा आयुष्यातील पहिलाच ग्रंथ आहे. आपले सद्गुरू श्री जनार्दन स्वामी यांच्या आज्ञेने व त्यांच्या सहवासात नाथांनी हा ग्रंथ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर व नाशिक-पंचवटी तपोवन येथे इ.स. १५५१ च्या सुमारास लिहिला.
हा ग्रंथ लिहून पूर्ण झाल्यावर नाथांनी तो आपल्या गुरूंना ऐकवला. ग्रंथातील अपूर्व भाव आणि रचना पाहून जनार्दन स्वामी अतिशय प्रसन्न झाले व त्यांनी नाथांना आशीर्वाद दिला — "भगवान पांडुरंग परमात्मा पुढे तुझ्या मुखातून श्रीमद्भागवताच्या एकादश स्कंधाचे प्राकृत विवेचन (एकनाथी भागवत) करून घेतील!"
म्हणती धन्य आजिचा सुदिन । जाहलें दर्शन संतांचें ॥
प्रेमळ श्रोते सर्वज्ञ निपुण । अर्थ सांगतसे प्रांजळ करून ॥
(संत महिपातीकृत - एकनाथ चरित्र)
ग्रंथरचनेची कथा व चंद्रभटजींची भेट
एके दिवशी जनार्दन स्वामी नाथांना म्हणाले, "आपण नाशिक-पंचवटी तीर्थयात्रेला जाऊन यावे अशी माझी इच्छा आहे." गुरु-शिष्यांची ही जोडी प्रवासास निघाली. वाटेत एका गावात चंद्रभट (चांदबोधला) नावाचे एक महान हरिभक्त ब्राह्मण राहतात, त्यांच्या घरी त्यांनी मुक्काम केला.
रात्री फलाहार झाल्यावर चंद्रभटांनी चतुःश्लोकी भागवताचे अत्यंत प्रेमळ व प्रांजळ विवरण केले. त्यांचा भक्तिभाव पाहून गुरु-शिष्य प्रसन्न झाले आणि चंद्रभटही त्यांच्यासोबत नाशिक पंचवटी प्रवासाला निघाले.
पंचवटीत श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतल्यानंतर जनार्दन स्वामी नाथांना म्हणाले — "नाथ, चंद्रभटजींनी आणलेल्या या चतुःश्लोकी भागवतावर तुम्ही मराठीत प्राकृत टीका लिहावी." गुर्वाज्ञा शिरासावंद्य मानून नाथांनी अत्यंत अल्प कालावधीत टीका पूर्ण केली.
फाल्गुन वद्य षष्ठी - 'पंचपर्व' इतिहास
फाल्गुन वद्य षष्ठी (नाथ षष्ठी) या एकाच शुभ दिवशी वारकरी संप्रदायात पुढील पाच महान घटना घडल्याने यास 'पंचपर्व' म्हटले जाते:
तपोवन (नाशिक) येथील एकनाथ महाराज मंदिर
नाशिक शहरातील तपोवन येथे कपिलमुनींचे तपोस्थान व कपिल संगम आहे. याच ठिकाणी श्री जनार्दन स्वामींचेही साधना स्थान होते. एकनाथ महाराजांनी आपल्या पहिल्या ग्रंथाची निर्मिती याच भूमीत करून येथेच श्री जनार्दन स्वामींच्या पादुकांची स्थापना केली.
देवगिरी (दौलताबाद) किल्ल्यातील चरणकमलांप्रमाणेच याही पवित्र मंदिरात स्वामींच्या पादुका स्थापित केलेल्या आहेत. येथे वारकरी व दत्त संप्रदायाचा एक सुरेख संगम पाहायला मिळतो.