॥ जय जय विठ्ठल रखुमाई ॥ संतवाणी डिजिटल लायब्ररी २०२६
🌸 कार्तिक वद्य त्रयोदशी विशेष

माऊली ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

आळंदी धाम येथे कार्तिकी एकादशी व त्रयोदशी दरम्यान भरणारा भव्य सोहळा आणि माऊलींच्या संजीवन समाधीचा अथांग इतिहास.

संजीवन समाधी सोहळा - आळंदी: श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या अलौकिक समाधीचा इतिहास व परंपरा


गुरुवार, शके १२१८ कार्तिक वद्य त्रयोदशी (इ.स. १२९६)... हा तोच दिवस आहे ज्या दिवशी संपूर्ण विश्वाला तत्वज्ञानाचे आणि प्रेमाचे धडे शिकविणाऱ्या ज्ञानियांचा राजा, संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपला 'संजीवन समाधी दिन' निश्चित केला होता. आजची ती पहाट आळंदीकरांसाठी आणि अवघ्या वारकरी संप्रदायासाठी डोळ्यांतून टप-टप अश्रू ढाळणारी आणि मनाला चटका लावणारी ठरली.

अवघ्या एकविसाव्या वर्षी माऊलींचे या भूतलावरील अवतार कार्य संपले होते. जगाच्या कल्याणासाठी तात्पुरत्या धारण केलेल्या या मानवी देहाची आणि आत्म्याची आता त्यांना मोकळीक करायची होती.

"कोणाचें हें घर हा देह कोणाचा ।
आत्माराम त्याचा तोचि जाणे ॥"

जनसामान्यांना नेहमी आपला देह, घर, संपत्ती, पद आणि प्रतिष्ठेचा प्रचंड अभिमान असतो. पण या मातीच्या देहाचे घर किती दिवस टिकणारे आहे आणि त्याचा खरा मालक कोण आहे, हे कोणालाच ठाऊक नसते. ज्ञानेश्वर माऊली हे खऱ्या अर्थाने 'कर्मयोगी' होते, यात कुणालाच शंका नसावी. भगवद्गीतेत अर्जुनाने भगवंताला विचारलेल्या सात कठीण प्रश्नांची उत्तरे माऊलींनी ज्ञानेश्वरीत ज्या विस्तृतपणे आणि सहजतेने दिली आहेत, त्यावरून त्यांची अथांग विद्वत्ता सिद्ध होते.

🧘‍♂️ १. कर्मयोग्यांचा अंतकाळ आणि देहमुक्ती

जे खरे योगी असतात, ते जन्मभर केवळ भगवंताचे नामस्मरण करतात. त्यांनी इंद्रियांवर पूर्ण विजय मिळवलेला असतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंपासून ते कोसो दूर असतात. त्यांच्यावर मायेचा कोणताही प्रभाव पडत नाही. जीवनात सुख असो वा दुःख, ते सर्व समबुद्धीनेच स्वीकारतात आणि अविचल राहतात.

अशा उच्च कोटीच्या योगीजनांना त्यांच्या अंतकाळाची आधीच जाणीव होते. त्यांच्या अंतःकरणात भगवंताशिवाय कोणतेच विषय शिल्लक नसल्याने, ते अपूर्ण इच्छांच्या पूर्तीसाठी पुन्हा जन्माच्या फेऱ्यात अडकत नाहीत. अंतकाळी त्यांच्या देहाला कसल्याही यातना होत नाहीत. ते मायेचे आवरण दूर सारून अत्यंत आनंदाने परमधामाकडे मार्गस्थ होतात.

🌸 २. तो अलौकिक संजीवन समाधी सोहळा

त्या संजीवन समाधी सोहळ्याचे वर्णन तरी किती आणि कसे करायचे? त्यागाची ती परिसीमा सांगण्यासाठी शब्दही तोकडे पडतात! तुळशीच्या आणि फुलांच्या पवित्र आसनावर पद्मासन घालून, योगी जेव्हा आनंदाने गुरुंना वंदन करून 'ॐ' काराचे स्मरण करतो, तेव्हा या प्रिय भक्ताला सन्मानाने नेण्यासाठी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण अवतरतात. जन्मानंतर परमेश्वराने सोपविलेले विहित कार्य उत्तमपणे पूर्ण केल्याचे सर्वोच्च समाधान या योग्याच्या चेहऱ्यावर झळकत असते.

ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यात नेमके हेच दिव्य दृश्य होते. उपस्थित सर्व संतजनांना या क्षणाची आधीच कल्पना होती; पण तरीही, तिथे उपस्थित असलेल्या कुणालाही आपला भावनावेग आणि अश्रू आवरणे शक्य होत नव्हते.

माऊलींनी आयुष्यभर त्यांना छळणाऱ्या आणि त्रास देणाऱ्यांविषयी समाधीच्या वेळीही एक अवाक्षर काढले नाही. याउलट, त्यांनाही कल्याणाचा मार्ग दाखवला. संपूर्ण जगाला समतेची वाट दाखवली. ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, हरिपाठ आणि अमृतानुभव यांसारखे अजरामर ग्रंथ जगाला अर्पण केले. माऊलींचे हे ज्ञानामृत आज शेकडो वर्षांनंतरही भक्तांना सदैव संजीवनीच देत आहे.

🚩 ३. भक्तीच्या इमारतीचा पाया आणि कळस

माऊलींचा देह जरी पंचमहाभूतांमध्ये विलीन पावला, तरीही त्यांचे आत्मरूप चैतन्य आणि उर्जा... त्याची स्पंदने आजही भागवत भक्तांना आळंदीत पावलोपावली जाणवतात. भौतिक जगातील सुखदुःखात मनःशांती कशी मिळवावी आणि आनंदी जीवन कसे जगावे, याची अचूक दिशा माऊलींनी देशाला दिली. म्हणूनच गावोगावी हरिनामाचा गजर सुरू झाला. पुढे अनेक संतांनी हा भगवद पंथ समर्थपणे पुढे नेला आणि या भक्तीच्या इमारतीवर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सुवर्ण कळस चढवला. संत बहिणाबाई यांनी याचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे:

"संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिले देवालया ।।
नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।।
जनी जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।
बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।"

आज या विश्वामध्ये भारताची ओळख एक 'आध्यात्मिक देश' म्हणून आहे. संत निवृत्तीनाथांनी माऊलींच्या मनात रोवलेल्या भक्तीच्या मोगऱ्याचा सुगंध आज जगभर पसरला आहे आणि जग भारताकडे 'विश्वगुरू' म्हणून पाहू लागले आहे.

💧 ४. आसवांच्या डोही, झाली विझू विझू ज्योती!

स्वतःच्या धाकट्या बंधूला, लाडक्या ज्ञानोबाला स्वतः संत निवृत्तीनाथांनी संजीवन समाधी स्थळाकडे हाताला धरून नेले, हा प्रसंग किती हृदयद्रावक असेल! खालील रचनेतून या भावना अत्यंत ज्वलंतपणे व्यक्त झाल्या आहेत:

समाधी घेऊन जाई ज्ञानदेव । सोहळा अपूर्व जाहला गे माये ।।
निवृत्तीनाथांनी चालविले हाती । पाहुन ती मूर्ती धन्य वाटे ।
आपण निर्गुण मागे परी दान। विश्वाचे कल्याण-निरूपण ।।
सोपान मुक्ताई जाहली व्याकुळ । मायेचे हे बळ राया बोले ।
ब्रम्हाशी ही गाठ अमृताचे ताट । फुटली पहाट ब्रम्हज्ञान ।।
नीर वाहे डोळां वैष्णव नाचतो । वैकुंठासी जातो ज्ञानराया ।
सोन्याचा पिंपळ झालासे निश्चळ । सज्जनाचे बळ समाधान ।।
गुरू देई शिष्या समाधी आपण । देवा ऐसे मन का बा केले !
पद्माचे आसन घालविले जाण । ओंकार ते पूर्ण पंचप्राण ।।
पैलतिरी हाक आली आज कानी । करूनी निर्वाणी बोलविले ।
ज्ञानाचा पुतळा तेजी विसावला । कैवल्यचि झाला भक्तजन ।।

कवी बा. भ. बोरकर यांनी तर या सोहळ्याचे अतिशय हृदयाला भिडणारे वर्णन केले आहे. 'रडणे बरे दिसणार नाही' म्हणून महत्प्रयासाने अश्रूंना थोपवून धरले, तरी त्या सार्‍यांचेच कंठ पुनःपुन्हा दाटून येत होते. ज्या निर्जीव भिंतीवर बसून चारही भावंडे चांगदेवांना भेटण्यासाठी गेली होती, ती मातीची भिंतदेखील ज्ञानोबांच्या विरहाच्या दुःखावेगाने कोसळली! एरवी कुठल्याही अडीअडचणीला धीराने सामोरे जाणारे संत आणि गंभीर वृत्तीचे सज्जनही पार गोंधळून गेले होते.

संत ज्ञानदेवांची निस्सीम भक्ती करणारे कवी बोरकर त्यांच्या समाधीचा हा कारुण्यपूर्ण प्रसंग रंगवताना म्हणतात:

ज्ञानदेव गेले तेव्हा, कोसळली भिंत।
वेद झाले रानभरी, गोंधळले संत ।।

ज्ञानदेव गेले तेव्हा, आटे इंद्रायणी ।
मराठीच्या वडातळीं, जळूं लागे पाणी।।

ज्ञानदेव गेले तेव्हा, ढळला निवृत्ती ।
आसवांच्या डोही, झाली विझू विझू ज्योती।।

ज्ञानदेव गेला तेव्हा, तडा विटे गेला ।
बाप रखमा देविवरु, कटीत वाकला ।।

ज्ञानदेव गेले तेव्हा , बापुडला नामा।
लागोपाठ भावंडें, तीं गेली निजधामा।।

माझ्या ज्ञानराजा, तें रे कळों आले आज।
भरदुपारीं ही तशी, झाली तीनसांज।।

तेव्हांच्यासारखा, पुन्हा बावला मोगरा।
भुईभर झाल्या कळ्या, तुटला आसरा।।

इथे आळंदीत , आतां ऊर फाटे।
पंढरीच्या वाटेंतही, बाभळीचे काटें।।

कळ्यांचाहि वास जिवा, जाहलासे फांस।
एकाकीं प्रवास आतां, उदास उदास।।

✨ शतशः वंदन

अशा या विश्वाच्या माउलीने केवळ आणि केवळ जनकल्याणाकरिता जन्म घेऊन, अवतार कार्य संपताच संजीवन समाधी रूपाने देहावसान केले. त्या माऊलींच्या चरणी दोन्ही हात आणि मस्तक ठेवून शतशः वंदन! 🙏🙏

॥ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ॥