कलिमाजी दैवते उघड दिसती फार । नारळ आणि शेंदूर यांचा भडिमार ॥१॥
लटिका देव लटिका भक्त लटिके सर्व वाव । सात धान्याचे धपाटे मागती काय त्यांचा बडिवार ॥२॥
तेल रांधा मागती मलिदा वरती काजळ कुंकु । फजितखोर ऐसे देव तयाचे तोंडावर थुंकु ॥३॥
तीर्थाजाती उदंड । त्याचे पाठीमागे तोंड ॥१॥
मनवासना ठेउनी घरी । तीर्था नेली भांडखोरी ॥२॥
गंगेत मारिता बुडी । मन लागले बिऱ्हाडी ॥३॥
नमस्कार करिता देवासी । मन पायपोसापाशी ॥४॥
लवकर करी प्रदक्षिणा । उशीर झालासे भोजना ॥५॥
एकाजनार्दनी स्थिर मन । नाही तव काय साधन ॥६॥
वरुषला मेघ खडकावरुता । चिखल ना तत्वता थेंब नाही ॥१॥
वाया तो प्राणी आला नरदेहा । गेला वाया पहा भक्तिवीण ॥२॥
अरण्यात जैशी सुकरे बैसती । तैसे मठाप्रति करुनी बैसे ॥ ३॥
उदय होताचि लपते उलुक । तैसा तो मुर्ख समाधी बैसे ॥४॥
एकाजनार्दनी वाया गेले सर्व । संसार ना देव दोन्ही शुन्य ॥५॥
आम्ही ब्रह्मपुरीचे ब्राह्मण । यातीकुळ नाही लहान ॥१॥
आम्हा सोवळे वोवळे नाही । विटाळ न देखो कवणे ठायी ॥२॥
आम्हा सोयरे जे जाहले । ते यातिकुळा वेगळे केले ॥३॥
एकाजनार्दनी बोधु । यातिकुळींचा फिटला संबंधु ॥४॥
कामक्रोध लोभ दंभ मद मत्सर । षड्वैरी तत्पर हेचि येथे ॥१॥
क्षुधा तृषा मोद शोक जरा मरण । षड्ऊर्मी पूर्ण देहीं हेचि ॥२॥
आशा मनिषा कल्पना इच्छा तृष्णा वासना । हे अठरा गुण जाणा देहामाजी ॥३॥
एकाजनार्दनी त्यजोनी अठरा । तोचि संसारामाजी शुद्ध ॥४॥
श्वानाचा तो धर्म करावी वसवस । भलेबुरे त्यास न कळे काही ॥१॥
वेश्यांचा धर्म द्रव्यते हरावे । भलेबुरे भोगावे न कळे कांही ॥२॥
निंदकाचा धर्म निंदाती करावी । भले बुरे त्यागावी नकळे काही ॥३॥
सज्जनांचा धर्म सर्वाभूती दया । भेदाभेद तया नकळे काही ॥४॥
संतांचा धर्म अंतरी ती शांती । एकाजनार्दनी वस्ती सर्वांठायी ॥५॥
पांथस्थ घरासी आला । प्रात:काळी उठोनि गेला ॥१॥
तैसे असावे संसारी । जैसी प्राचीनाची दोरी ॥२॥
बाळी घराचार मांडिला । तो सवेचि मोडूनि गेला ॥३॥
एका विनवी जनार्दना । ऐसे करी गा माझ्या मना ॥४॥
जया म्हणती नीच वर्ण । स्त्री शुद्रादी हीनजन ॥१॥
सर्वांभूती देव वसे । नीचाठायी काय नसे? ॥२॥
नीच कोठोनि जन्मला । पंचभूता वेगळा जाला ॥३॥
तया नाही जनन । सवेचि होत पतन ॥४॥
नीच म्हणोनि काय भुलि । एकाजनार्दनी देखिली ॥५॥
विषयवासना भाजी त्याचे मूळ । मग सुख कल्लोळ प्राप्ती तुज ॥१॥
आशेचे काबाड कल्पना सगळी । उपटोनि मुळी टाकी परती ॥२॥
भेदाचे भांडे वैराग्याचे हातें । धुवोनि सरते करी बापा ॥३॥
शांतीचेनि सवे धरी वेगे सोय । एकाजनार्दनी पाय पावशील ॥४॥
वैराग्य प्रथम असावी शांती । तेणे विरक्ति अंगी जोडे ॥१॥
हेचि मुख्यवर्म साधता साधन । येणे जनार्दन जवळी असे ॥२॥
उपासना मार्ग हेचि कर्मकांड । हेचि ब्रह्मांड जनीवनी ॥३॥
हेचि देहस्थिती विदेह समाधी । तुटती उपाधी कर्माकर्म ॥४॥
एकाजनार्दनी शांतीक्षमा दया । यांविण उपाय उपाधी ते ॥५॥
नीती सांगतो ऐका एक । दास सभेचा सेवक । मन टाळू नका एक । कोणी एक ॥१॥
सांडावरुन जाऊं नये । लांच खाऊं नये । चोहट्यात राहू नेये । कोणी एक ॥२॥
अक्रीत घेऊं नये । इमान सोडु नये । बैमान होऊं नये । कोणी एक ॥३॥
सज्जनाशी विंटू नये । नीचासवे बांटू नये । तस्कराशी पुसूं नये । कोणी एक ॥४॥
भक्तिमार्ग खंडू नये । कुभांडयासी तंडूं नये । खळासंगे भांडू नये । कोणी एक ॥५॥
सत्पुरुषाशी छळूं नये । शिवेचा गुंडा डाळूं नये । केला नेम टाळू नये । कोणी एक ॥६॥
सद्गुरु सेवा सोडूं नये । कुलंधर्मासी मोडू नये । पापद्रव्य जोडू नये । कोणी एक ॥७॥
संपत्ति आलिया माजू नये । अभिमाने फुगूं नये । सभा देखून लाजूं नये । कोणी एक ॥८॥
असत्यवाद करु नये । खोटा संग धरु नये । मोचकाशी मैत्री करु नये । कोणी एक ॥९॥
भलते भरी पडू नये । अनाचार करु नये । कपट मनी धरु नये । कोणी एक ॥१०॥
जन्मा आलिया स्वभावे । काही सार्थक करावे । ऐसे मनी विचारवे । कोणी एक ॥११॥
एकाजनार्दनी भावे । संतचरणी लीन व्हावे । सदा हरिनाम उच्चारावे । कोणी एक ॥१२॥