अगा ये मधुसूदना माधवा । अगा ये कमळापती यादवा ।
अगा श्रीधरा केशवा । अगा बांधवा द्रौपदीच्या ॥१॥
अगा विश्वव्यापका जनार्दना । गोकुळवासी गोपिकारमणा ।
अगा गुणनिधि गुणनिधाना । अगा मर्दना कंसाचिया ॥ध्रु.॥
अगा सर्वोत्तमा सर्वेश्वरा । गुणातीता विश्वंभरा ।
अगा निर्गुणा निराकारा । अगा आधारा दीनाचिया ॥२॥
अगा उपमन्यसहाकारा । अगा शयना फणिवरा ।
अगा काळकृतांत असुरा । अगा अपारा अलक्षा ॥३॥
अगा वैकुंठनिवासा । अगा अयोध्यापति राजहंसा ।
अगा ये पंढरिनिवासा । अगा सर्वेशा सहजरूपा ॥४॥
अगा परमात्मा परमपुरुषा। अगा अव्यया जगदीशा ।
अगा कृपाळुवा आपुल्या दासा । तोडीं भवपाशा तुका म्हणे ॥५॥
हे मधुसूदना, माधवा, कमळापती, यादवा आणि द्रौपदीच्या बंधू श्रीहरी, तू लवकर ये. हे विश्वव्यापका, जनार्दना, गोकुळवासी, गोपींच्या मनाला आनंद देणाऱ्या, गुणनिधी आणि कंसाचा संहार करणाऱ्या श्रीकृष्णा, तू ये. हे सर्वोत्कृष्ट सर्वेश्वरा, तिन्ही गुणांच्या पलीकडील विश्वंभरा, निर्गुणा, निराकारा आणि दीनांच्या आधारा. हे उपमन्यूला मदत करणाऱ्या, शेषनागावर शयन करणाऱ्या, असुरांचा काळ असलेल्या, अपार आणि अलक्ष देवा. हे वैकुंठनिवासा, अयोध्यापती राजहंसा, पंढरीनिवासा आणि सर्वेशा. तुकाराम महाराज म्हणतात, हे परमात्मा, परमपुरुषा, अव्यया आणि जगदीशा, तुझ्या या दासावर कृपा कर आणि माझा संसाराचा पाश पूर्णपणे तोडून टाक.