तुज न भें मी कळिकाळा । मज नामाचा जिव्हाळा ॥१॥माझा बळिया नेणसी कोण । संतां साहे नारायण ॥ध्रु.॥शंख वधिला सागरीं । वेद घेउनि आला चारी ॥२॥कूर्में दैत्य वधिला जेठी । हात पाय लपवी पोटीं ॥३॥वाराहरूप धरिलें गाढें । धरा प्रतापें धरिली दाढे ॥४॥हिरण्यकश्यप विदारिला । भक्त प्रल्हाद रक्षिला ॥५॥वामन जाला दिनानाथ । बळी पाताळीं घातला दैत्य ॥६॥छेदुनियां सहस्र भुजा । कामधेनु आणिली वोजा ॥७॥शिळा प्रतापें सागरीं तारी । स्थापी बिभीषण रावण मारी ॥८॥मारोनियां कंसराव । पिता सोडविला वसुदेव ॥९॥पांचाळीसी गांजितां वैरी । वस्त्रें आपण जाला हरी ॥१०॥गजेंद्र स्मरे राम राम । त्यासी पाववी वैकुंठधाम ॥११॥
तुका म्हणे हरिरूप जाले । पुन्हा जन्मा नाहीं आले ॥१२॥
हे काळा, मी तुला भित नाही, कारण मला हरिनामाचा जिव्हाळा आहे. माझा सांभाळ करणारा किती बळकट आहे हे तुला माहीत नाही, संतांना साहाय्य करणारा स्वतः नारायण आहे. ज्याने समुद्रात शंखासुराचा वध करून चारही वेद आणले, कूर्मरूप घेऊन दैत्याचा संहार केला, वराहरूप घेऊन पृथ्वी दाढेत धरून रक्षण केले, नृसिंह होऊन हिरण्यकश्यप फाडला आणि प्रल्हादाचे रक्षण केले, वामन होऊन बळीला पाताळात पाठवले, परशुराम होऊन सहस्त्रार्जुनाच्या भुजा छेदल्या आणि कामधेनू आणली, रामावतारात समुद्रावर शिळा तरवून रावणाचा वध केला आणि बिभीषणाला स्थापन केले, कृष्णावतारात कंसाचा वध करून वसुदेवाची सुटका केली, द्रौपदीच्या हाकेला धावून जो स्वतः वस्त्र झाला आणि गजेंद्राला वैकुंठधाम दिले. तुका म्हणतो की, जे हरिरूप झाले ते पुन्हा जन्माला आले नाहीत.