माझिया मीपणावर पडों पाषाण । जळो हें भूषण नाम माझें ।
पापा नाहीं पार दुःखाचे डोंगर । जालों ये भूमीसी ओझें ॥१॥
काय विटंबना सांगों किती । पाषाण फुटती ऐसें दुःख ।
नर नारी सकळ उत्तम चांडाळ । न पाहाती माझें मुख ॥ध्रु.॥
काया वाचा मनें अघटित । करणें चर्मचक्षु हात पाय ।
निंदा द्वेष घात विश्वासीं व्यभिचार । आणीक सांगों किती काय ॥२॥
लक्ष्मीमदें मातें घडले महा दोष । पत्नी दोनी भेदभेद ।
पितृवचन घडली अवज्ञा अविचार । कुटिल कचर वादी निंद्य ॥३॥
आणीक किती सांगों ते अवगुण । न वळे जिव्हा कांपे मन ।
भुतदया उपकार नाहीं शब्दा धीर । विषयीं लंपट हीन ॥४॥
संत महानुभाव ऐका हें उत्तरें । अवगुण अविचारें वृद्धि पापा ॥
तुका म्हणे सरतें करा पांडुरंगीं । शरण आलों मायबापा ॥५॥
माझ्या अहंकारावर दगड पडो आणि माझे नाव व मोठेपणा जळून जावो! माझ्या पापांना सीमा नाही आणि दुःखाचे डोंगर उभे राहिले आहेत, मी या धरतीला ओझे बनलो आहे. माझे दुःख इतके कठीण आहे की ते पाहून दगडही फुटतील. लोक माझे तोंड पाहण्यासही तयार नव्हते. काया, वाचा आणि मनाने माझ्या हातून केवळ निंदा, द्वेष, विश्वासघात आणि दुराचार घडला आहे. संपत्तीच्या आणि धंद्याच्या गर्वात माझ्याकडून मोठे दोष घडले, दोन पत्नींमध्ये भेद केला, वडिलांच्या शब्दांचा अनादर केला आणि मी अत्यंत कुटिल व वाद घालणारा बनलो. माझे अवगुण सांगताना माझी जीभ अडखळते आणि मन कापते. माझ्याकडे भूतदया, परोपकार किंवा धीर नव्हता, मी विषयात लंपट होतो. हे संत महानुभावहो, माझ्या अविचाराने पाप वाढले आहे; आता तुकाराम महाराज म्हणतात की, हे मायबाप पांडुरंगा, मी तुला शरण आलो आहे, आता माझा स्वीकार करून माझा उद्धार कर.