संसारापासूनि कैसें सोडविशी । न कळे हृषीकेशी काय जाणें । करितां न सरे अधिक वाट पाहीं ।
तृष्णा देशधडी केलों । भक्तिभजनभाव यांसी नाहीं ठाव । चरणीं तुझ्या अंतरलों ।
मागें पुढें रीग न पुरे चि पाहातां । अवघा अवघीं वेष्टिलों ॥१॥
आतां माझी लाज राखें नारायणा । हीन हीन लीन याचकाची ।
करितां न कळे कांहीं असतील गुण दोष । करीं होळी संचिताची ॥ध्रु.॥
इंद्रियें द्वारें मन धांवे सैरें । नांगवे करितां चि कांहीं । हात पाय कान मुख लिंगस्थान ।
नेत्र घ्राणद्वारें पाहीं । जया जैसी सोय तया तैसें होय। क्षण एक स्थिर नाहीं ।
करिती ताडातोडी ऐसी यांची खोडी । न चले माझें यास कांहीं ॥२॥
शरीरसंबंधु पुत्र पत्नी बंधु । धन लोभ मायावंत । जन लोकपाळ मैत्र हे सकळ ।
सोइरीं सज्जनें बहुतें । नाना कर्म डाय करिती उपाय । बुडावया घातपातें ।
तुका म्हणे हरी राखे भलत्या परी । आम्ही तुझीं शरणागतें ॥३॥
हे हृषीकेशी देवा, तू मला या संसारातून कसे सोडवशील हे मला कळत नाही. माझी तृष्णा संपत नाही आणि भक्ती-भजनाला मनात जागा उरली नाही, त्यामुळे मी तुझ्या चरणांपासून दुरावलो आहे. मी चारी बाजूंनी संसाराच्या पाशात वेढलो गेलो आहे. हे नारायणा, मी अत्यंत हीन आणि लीन होऊन तुझी याचना करत आहे, माझी लाज राख आणि माझ्या संचिताची होळी कर. माझी इंद्रिये आणि मन सैरावैरा धावत आहेत, ती क्षणभरही स्थिर राहत नाहीत. माझे हात, पाय, डोळे, कान हे सगळे मला खेचत आहेत. माझे नातेवाईक, धन, आणि मित्र हे सगळे मला संसारात बुडवण्याचेच उपाय करत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, हे हरी, आम्ही तुझे शरणागत आहोत, तू कोणत्याही प्रकारे आमचे रक्षण कर.