तुझा विसर नको माझिया जीवा । क्षण एक केशवा मायबापा ॥१॥
जाओ राहो देह आतां ये चि घडी । कायसी आवडी याची मज ॥ध्रु.॥
कुश्चीळ इंद्रियें आपुलिया गुणें । यांचिया पाळणें कोण हित ॥२॥
पुत्र पत्नी बंधु सोयरीं खाणोरीं । यांचा कोण धरी संग आतां ॥३॥
पिंड हा उसना आणिला पांचांचा । सेकीं लागे ज्याचा त्यासी देणें ॥४॥
तुका म्हणे नाहीं आणिक सोइरें । तुजविण दुसरें पांडुरंगा ॥५॥
हे केशवा, माझ्या मायबापा, माझ्या जीवाला तुझा एका क्षणाचाही विसर पडू नये. हा देह याच घडीला राहो किंवा जावो, मला या देहाची कोणतीही आवड उरलेली नाही. वाईट इंद्रियांचे संगोपन करण्यात काय हित असणार? मुलगा, पत्नी, भाऊ आणि नातेवाईक यांचा संग आता कोण धरेल? हा देह पाच तत्त्वांचा उसना आणलेला आहे, शेवटी ज्याचा आहे त्यालाच तो द्यावा लागेल. तुकाराम महाराज म्हणतात की हे पांडुरंगा, तुझ्याशिवाय माझे दुसरे कोणीही नातेवाईक नाही.