ब्रह्म जैसे तैशापरी आम्हा वेढिले भूति चारी ।
हात आपला आपणा लागे ।
त्याचा करू नये राग ॥
जीभ दाताने चाविली ।
कोणे बत्तीशी पाडिली ॥
थोडे दुखावले मन पुढे उदंड साहाणे॥
चणे खावे लोखंडाचे ।
मग ब्रह्मपदी नाचे मन मारुनि ।
उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
ज्याप्रमाणे परब्रह्म सर्वत्र आहे, तसेच आपणही पृथ्वी, आप, तेज, वायू या चारी भूतांनी (तत्वांनी) वेढलेले आहोत; सर्व जीव आपलेच अंश आहेत. जर कधी आपलाच हात चुकून आपल्या शरीराला लागला, तर आपण स्वतःवर रागवत नाही. जर आपल्याच दातांनी आपली जीभ चावली गेली, तर आपण रागवून आपलेच बत्तीस दात पाडत नाही (त्याप्रमाणे जग आपलेच आहे, लोकांनी निंदा केली तरी रागवू नये). आज जरी लोकांनी तुमचे मन थोडे दुखावले असले, तरी पुढे तुम्हाला जगाचे खूप मोठे आघात सहन करायचे आहेत. परमार्थ हा लोखंडाचे चणे खाण्याइतका (अत्यंत कठीण) आहे, जेव्हा मन मारून उन्मनी अवस्था प्राप्त होते, तेव्हाच मन ब्रह्मपदात नाचू लागते; म्हणून हे ज्ञानेश्वरा, ताटी उघडा.