उघडली दृष्टी इंद्रिया सकट ।
आणीक ऐके गा दुता ।
जेथे रामनाम कथा तेथे करद्वय जोडूनी हनुमंता ।
सदासन्मुख असिजे ।।१।।
रामनामी चाले घोष ।
तो धन्य देशु धन्य दिवसु ।
प्रेम कळा महा उल्हासु ।
जगन्निवासु विनवितुसे ।।२।।
दिंड्या पताका मृदंग ।
टाळ घोळ नामे सुरंग ।
तेथे आपण पांडुरंग ।
भक्तसंगे नाचत ॥३॥
तथा भक्ता तिष्टती मुक्ती ।
पुरुषार्थ तरी नामे कीर्ति ।
रामनामी तया तृप्ती ।
aise त्रिजगती यमु सांगत ।।४।।
ज्या नामे शंकर निमाला।
गणिका अजामेळ पद पावला।
अहिल्येचा शाप दग्ध माला ।
तोची पान्हा दिवला पांडुरंगे ॥५॥
चित्रगुप्त म्हणती यमा ।
काय करावे गा धर्मा।
लोक रातले रामनामा ।
पुरुषोत्तमा विठ्ठलदेवा ॥६॥
कलिकालासी दाटुगे नाम ।
रुखे घरीले मला प्रेम ।
त्रिभुवनी विस्तारीले सप्रेम ।
रामनाम उच्चारी यम तोही तरला जाणा ।७।।
ऐसे नाम अगाध बीज ।
उच्यारी तो होय चतुर्भुज सोपान म्हणे है गुज ।
उमाशंकर देवाचे ॥८॥
यमदूतांना उद्देशून सांगितले आहे की, जिथे रामनामाची कथा चालते, तिथे हनुमान दोन्ही हात जोडून नेहमी समोर उभे असतात. तो देश आणि तो दिवस धन्य आहे, जिथे रामनामाचा गजर होतो. जिथे दिंड्या, पताका, टाळ आणि मृदंगाच्या गजरात भक्तीचा रंग भरतो, तिथे स्वतः पांडुरंग भक्तांसोबत नाचू लागतो. रामनामामुळे अजामेळ, गणिका आणि अहिल्येसारख्यांचा उद्धार झाला. चित्रगुप्त यमराजाला सांगतात की, सर्व लोक विठ्ठल आणि रामनामात मग्न झाल्यामुळे आता यमाचे भय उरले नाही. हे रामनाम इतके अगाध आहे की त्याचा उच्चार करणारा मुक्त होतो; हेच उमाशंकराचे अंतिम गुपित आहे, असे सोपानदेव सांगतात.