॥ जय जय विठ्ठल रखुमाई ॥ नामदेव गाथा - भाग 10 (श्रीयाळ चरित्र)
भाग 10

सार्थ नामदेव गाथा : श्रीयाळ चरित्र

भक्तशिरोमणी संत नामदेव महाराजांचे प्रासादिक संवाद अभंग आणि त्यांचा सार्थ मराठी भावार्थ.

॥ अभंग १ ॥ अभंग रचना
सूर्यवंशीं राजा असे तो श्रीयाळ । पंच वरुषीं बाळ चिलया त्यासी ॥१॥
पतिव्रता कांता नाम तें चांगुणा । अतिता भोजन घाली नित्य ॥२॥
कैलासीं नारद वर्णी यांची कीर्ति । सत्व पाह्याप्रति आले शिव ॥३॥
जाहालासे अतित रूप तें कुश्चळ । रक्त पू हा गळे सर्वांगासा ॥४॥
आला तो अतित श्रीयाळाचे घरीं । नमस्कार करी राजा त्यासी ॥५॥
येऊनि चांगुणा वंदिती चरण । बहुत सन्मान केला त्याचा ॥६॥
उष्णोदकें त्यासी घातियलें स्नान । केलेंसे पूजन अतिताचें ॥७॥
म्हणे महाराजा करावें भोजन । पतीता पवन करा तुम्ही ॥८॥
येरु म्हणे माझें शरीर हें रोगी । नरमांस वेगीं देईं मज ॥९॥
चांगुणा ती म्हणे देतें माझें मांस । नये उपयोगास आमूचिया ॥१०॥
राज म्हणे माझें मांस मान्य करा । न लगे उदारा तुझें मज ॥११॥
पंच वरुषीं बाळ तुझा हा चिल्हाळ । मांस हें सकळ देईं त्याचें ॥१२॥
पाक हा करुनी घालीं मज आतां ।खेद काय चिंता करूं नये ॥१३॥
करितां हा खेद जाईन उठोनी । सत्वाची हे हानी करूनियां ॥१४॥
तेव्हां ते चांगुणा म्हणे अतितातें । करितें पाकातें सिद्ध आतां ॥१५॥
बोलविला तेव्हां तिनें तो चिल्हाळ । वचन कोमळ बोले त्यासी ॥१६॥
तुज हा अतित आलासे पाहुन । मागतो भोजन तुजलागीं ॥१७॥
होईं बा उदार अर्पी हें शरीर । संतोषला वर पार्वतीचा ॥१८॥
ऐकोनी चिलया बोले मातेप्रती । संतोष हा चित्तीं माझे असे ॥१९॥
नाशवंत देह नाहीं राहणार । सार्थक समग्र करीं याचें ॥२०॥
सांडीं हे ममता होईं तूं उदार । कैलासी शंकर संतोषेल ॥२१॥
घेऊनि चिलिया गेली पाकशाळे । कापियेलें बाळ चांगुणेनें ॥२२॥
शीर् त्याचें तेव्हां ठेविलें झांकोन । शरिराचा तिनें पाक केला ॥२३॥
तेव्हां तो अतित बोले चांगुणेसी । वस्तु हे कार्याची ठेवियेली ॥२४॥
मीही आतां जातों आपुल्या आश्रमा । कासयासी श्रम करितेसी ॥२५॥
तुज हे ममता झालीसे उत्पन्न । वाहतसे आण चांगुणा ते ॥२६॥
म्हणे महाराजा सांगाल तें मान्य । वंदित चरण चांगुणा ते ॥२७॥
पाकामाजी घालीं शीर हें कांडोनी । रसिक गाय गाणीं आवडीनें ॥२८॥
चांगुणेनें शीर घातिलें उखळीं । ओंव्या ते वेल्हाळी गात असे ॥२९॥
सत्वधीर राजा स्वामी हा श्रीयाळ । धन्य त्याचा बाळ चिलया तूं ॥३०॥
अतिताच्या वेशें आला असे शिव । देखोनियां भाव द्दढ तुझा ॥३१॥
आवर्डीनें तुज ठेवितो उदरीं । पुण्याची सामोग्री मोठी तुझी ॥३२॥
माझे पोटीं तुवां घेतला अवतार । दाविलें चरित्र जगामाजी ॥३३॥
येऊनि वंशाचा केला त्वां उद्धार । मित्र केला वर पार्वतीचा ॥३४॥
तुझी माता मज म्हणती हे जन । पूर्वींचें हें पुण्य फळा आलें ॥३५॥
तुज हा प्रसन्न जाहला सदाशिव । मागसी वैभव देईल तो ॥३६॥
मज बाळा तुवां सांडियेलें येथें । कैलासींचा पंथ धरीयेला ॥३७॥
अतित गेलीया सांडीन मी प्राण । येईन धांवोन तुजमागें ॥३८॥
तुझी माजी भेटी होईल कैलासीं । सांग शिवापाशीं नमस्कार ॥३९॥
धैर्याचा उखळ वैराग्य मुसळ । घेतलें सबळ चांगुणेनें ॥४०॥
कांडून्यां शीर केला पाक तिनें । अतिताकारणें भोजनासी ॥४१॥
म्हणे महाराजा करावें भोजन । वंदित चरण चांगुणा ते ॥४२॥
येरु म्हणे बाई पात्रें वाढी तीन । पंक्ति यजमान बैसा तुम्हीं ॥४३॥
ऐकोनी श्रीयाळ सद्नद अंतरीं । जाला असे भारी मोठा तेव्हां ॥४४॥
तेव्हां ते चांगुणा म्हणे श्रीयाळासी । बैसावें पंक्तीसी स्वामी आतां ॥४५॥
नवमास बाळ ठेविला उदरीं । एक दिन भारी काय झाला ॥४६॥
अतिता संतोष होय ऐसें करा । मान्य गिरिजावर होईल तो ॥४७॥
सिद्ध झालीं तेव्हां दोघें भोजनासी । अतित तयासी पुसतसे ॥४८॥
काय तुम्हां आतां असे हो संतान । केलें शिवार्पण म्हणती ते ॥४९॥
निपुत्रिकाचे घरीं न घे मी हें अन्न । चालिला उठोन अतित हा ॥५०॥
श्रीयाळ चांगुणा वंदिती चरण । फुटकें प्राक्तन आमुचेंचि ॥५१॥
चिलयासारिखा गेला तोही सुत । विन्मुख अतित जातो तोही ॥५२॥
आतां कासयासी ठेवावा हा प्राण । करावा अर्पण शंकरासी ॥५३॥
एकोनियां ऐसें अतित तो भ्याला । चांगुणे पुत्राला बाहे आतां ॥५४॥
येईं बा चिलया धांव तूं त्वरीत । न जेवी अतित तुजवीण ॥५५॥
राखीं आतां सत्त्व येईं तूं धांवोनी । तेव्हां शूळपाणि प्रगटले ॥५६॥
पंचमुख अंगीं विभूत चर्चित । अर्धांगीं शोभत पार्वती ते ॥५७॥
मुगुटीं जयाचे शोभतसे गंगा । कोण वर्णी शोभा स्वरूपासी ॥५८॥
धांवतचि आला तेव्हां तो चिल्हाळा । आलिंगी स्नेहाळ सांभ त्यासी ॥५९॥
श्रीयाळ चांगुणा बैसवी विमानीं । बाळ राजस्थानीं स्थापियेला ॥६०॥
अखंड कैलासीं असे त्यांचा वास । धन्य तेचि दास सांभवाचे ॥६१॥
नामदेव त्याचे आठवीत गुण । करीत करीत कीर्तन प्रेमभावें ॥६२॥
सूर्यवंशातील परम दानशूर राजा श्रीयाळ आणि त्यांची पतिव्रता पत्नी चांगुणा हे दररोज दारात येणाऱ्या अतिथीला (भिक्षेकरूला) भोजन घालत असत. त्यांना पाच वर्षांचा 'चिलया' (चिल्हाळ) नावाचा लाडका मुलगा होता. नारद मुनींनी कैलासात त्यांच्या सत्त्वाची कीर्ती गायली, तेव्हा त्यांचे सत्व पाहण्यासाठी स्वतः भगवान शिव एका कुष्ठरोगी, कुरुप अतिथीचे रूप घेऊन श्रीयाळाच्या घरी आले. अतिथीने भोजनासाठी राजा-राणीकडे त्यांच्या पाच वर्षांच्या एकुलत्या एक मुलाच्या (चिलया) मांसाचा पाक (जेवण) मागितला आणि सांगितले की जर यात काही खेद केला तर मी न जेवता निघून जाईन, ज्याने तुमच्या सत्त्वाची हानी होईल. राणी चांगुणा आणि राजा श्रीयाळ यांनी अतिथी विन्मुख जाऊ नये म्हणून चिलयाला बोलावले. त्या पाच वर्षांच्या बालकानेही हसत हसत 'हा नाशिवंत देह देवासाठी कामी येत असेल तर त्याचे सार्थक होईल' असे सांगून आपले शरीर अर्पण केले. चांगुणेने मुलाचा बळी देऊन त्याचा पाक तयार केला. अतिथीने पुन्हा परीक्षा घेण्यासाठी मुलाचे मस्तकही (शीर) उखळात कांडून पाकात घालण्यास सांगितले. राणीने धैर्याचे उखळ आणि वैराग्याचे मुसळ हाती घेऊन, डोळ्यांत अश्रू आणत मुलाच्या आठवणीत ओंव्या गात त्याचे शीर कांडले आणि भोजन तयार केले. भोजनाची वेळ आली तेव्हा अतिथीने तीन ताटे वाढण्यास सांगितले आणि राजा-राणीला आपल्यासोबत जेवायला बसवले. जेवताना अतिथीने विचारले, "तुम्हाला काही मूलबाळ आहे का?" तेव्हा राजाने सांगितले की, "एकच मुलगा होता, तो आम्ही शिवार्पण केला." यावर अतिथी म्हणाला, "मी निपुत्रिकाच्या (ज्याला मूल नाही अशाच्या) घरी अन्न ग्रहण करत नाही!" आणि तो ताटावरून उठून जाऊ लागला. अतिथी उपाशी जातोय आणि मूलही गेले, या दुःखात जेव्हा राजा-राणीने आपले प्राण देण्याचा निश्चय केला, तेव्हा तो अतिथी (साक्षात शंकर) प्रकट झाला. भगवंताने चांगुणेला सांगितले, "तुझ्या मुलाला हाक मार!" राणीने हाक मारताच बाल चिलया जिवंत होऊन धावत आला. भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन राजा श्रीयाळ, चांगुणा आणि चिलया यांना विमानाने कैलासात अक्षय स्थान दिले. नामदेव महाराज अत्यंत प्रेमभावाने या थोर शिवभक्तांच्या गुणांचे कीर्तन करत आहेत.
भाग 9 सर्व भाग (अनुक्रमणिका) भाग 11 (पुढे)